वा. वि. मिराशीमिराशी, वासुदेव विष्णु : (१३ मार्च १८९३–३ एप्रिल १९८५). भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक. जन्म कुवळे (जि. रत्नागिरी, महाराष्ट्र) या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात. वडिलांचे नाव विष्णु धोंडदेव आणि मातेचे राधाबाई. शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेजमध्ये तसेच पुण्याच्या डेक्कन कॉलेजात. मॅट्रिक (१९१०), बी.ए. (१९१४) व एम्‌. ए. (१९१६) यात पहिल्या वर्गात उत्तीर्ण. त्यानंतर शासकीय एल्फिन्स्टन महाविद्यालयात (मुंबई) प्राध्यापक म्हणून काम (१९१७–१९१९). या काळात एल्‌एल्‌.बी. पदवी मिळविली आणि अद्वैतब्रह्यसिद्धि या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले. त्याबद्दल त्यांना गोकुळदासजी झाला वेदान्त पारितोषिक मिळाले. पुढे नागपूरच्या मॉरिस कॉलेजात (विद्यमान नागपूर महाविद्यालय) व अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजात प्राध्यापक व प्राचार्य (१९४७ ते १९५०) म्हणून सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठात सन्मान्य व गुणश्री प्राध्यापक म्हणून काम केले (१९५८ ते १९६६).

मिराशींचा प्रथम विवाह १९१७ मध्ये झाला. पत्नी मनोरमाबाई. मनोरमाबाईंच्या अकाली निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला (१९२६). त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कमलाबाई. त्यांना चार मुली व दोन मुलगे असून मधुसुदन हा थोरला मुलगा औरंगाबादला विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य असतानाच १९८३ मध्ये मरण पावला. दुसरा मुलगा सतीश फोरेन्सिक प्रयोगशाळेत (मुंबई) नोकरी करतो. निवृत्तीनंतरचे उर्वरित जीवन त्यांनी नागपूरला लेखन-वाचन-संशोधनात व्यतीत केले. तेथील विविध संस्थांशी, विशेषतः विदर्भ संशोधन मंडळाशी, त्यांचा घनिष्ठ संबंध होता. नागपूर येथेच ते वृद्धापकाळाने मरण पावले.

मिराशींचा मूळ पिंड शिक्षकाचा होता आणि त्यांचा अध्ययन- अध्यापनाचा विषय संस्कृत वाङ्‌मय असला तरी हिरालाल आणि का. ना. दीक्षितांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते भारतीय इतिहासाच्या पुराभिलेख, नाणकशास्त्र इ. शास्त्रांकडे वळले. एपिग्राफिया इंडिका (खंड २१–१९३१) यात त्यांचा पुराभिलेखासंबंधीचा पहिला शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यानंतरच त्यांनी कालिदास हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले (१९३४). सातवाहन, वाकाटक, कलचुरी-चेदी, शिलाहार इ. प्राचीन राजवंशांचे पुराभिलेख त्यांनी संकलित आणि संपादित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले. यासाठी त्यांनी विविध भौगोलिक प्रदेशांचा कसून शोध घेतला. कोरीव लेखांच्या आधारे त्यांनी सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख (१९७९), वाकाटक नृपति आणि त्यांचा काल (१९५७), कलचुरी नृपति आणि त्यांचा काल (१९५६), शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख (१९७४) हे चार प्रमुख ग्रंथ लिहिले आणि संस्कृत साहित्याच्या संशोधनपूर्वक अभ्यासातून कालिदास (१९३४), मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक (१९५८), व भवभूति (१९६८) ही तीन पुस्तके प्रसिद्ध केली. या सर्वच ग्रंथांतून प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती यांसंबंधीचे मौलिक संशोधनही आले आहे.

पुराभिलेखाइतकाच नाणकशास्त्राचा त्यांचा व्यासंग मोठा व सखोल होता. या विषयातील त्यांचे चाळीसहून अधिक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांना संशोधनात्मक कार्याबद्दल अनेक मानसन्मान लाभले. विविध संस्थांनी विविध प्रसंगी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. १९४१ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही उपाधी दिली. १९५६ मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि १९६१ मध्ये राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना ताम्रपट देण्यात आले. इतिहासाविषयक संशोधन करणाऱ्या विविध संस्थांशी सदस्य, अध्यक्ष इ. नात्यांनी त्यांचा निकटचा संबंध आला. भारतीय मुद्राशास्त्र परिषद, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद व भारतीय इतिहास परिषद यांचे त्यांनी अनुक्रमे १९५१, १९५६ व १९६१ मध्ये अध्यक्षपद भूषविले. सागर, मुंबई, नागपूर आणि संपूर्णानंद (वाराणसी) या विद्यापीठांनी डी.लिट्‌. ही सन्मान्य पदवी त्यांना बहाल केली. अनेक प्राच्यविद्या पंडितांचे इंग्रजी शोधनिबंध असलेला डॉ. मिराशी अभिनंदन ग्रंथ राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना अर्पण करण्यात आला (१९६५). १९६७ साली पुराभिलेख विभागाने त्यांची सन्माननीय सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्याच वर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्र देण्यात आले. याशिवाय वि. ना. मंडलिक सुवर्णपदक, पद्मभूषण (१९७५) इ. बहुमान त्यांना मिळाले. साहित्य अकादमीने पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या हस्ते प्रमाणपत्र व अधिछात्रवृत्ती देऊन त्यांचा गौरव केला (१९७५).

मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले तथापि सुरुवातीचे त्यांचे लेखन मराठीत आहे. त्यांच्या मान्यवर ग्रंथांची भारतातील प्रादेशिक भाषांतून – विशेषतः हिंदी, ओडिया, कन्नड – भाषांतरे झाली आहेत. त्यांचे सु. ३८ ग्रंथ व चारशेहून अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांपैकी काही मौलिक व अभ्यासपूर्ण ग्रंथ असे : इन्स्क्रिप्शन्स ऑफ द कलचुरी चेदी – इरा (१९५५), इन्स्क्रिप्शन्स ऑफ द वाकाटक्‌स (१९६३), इन्स्क्रिप्शन्स ऑफ द शिलाहाराज (१९७४), स्टडीज इन्‌ इंडॉलॉजी खंड १, २, ३, ४ (अनु. १९६०, १९६२ ते १९६६), लिटररी अँड हिस्टॉरिकल स्टडीज इन इंडॉलॉजी (१९७५), कालिदास, हिज लाईफ अँड वर्क्स (१९६९), भवभूती, हिज डेट, लाईफ अँड वर्क्स (१९७२) आणि संशोधन मुक्तावलि (सर १–९ : १९५४ ते ५९ मराठी).

मिराशी यांनी आपले संशोधनकार्य जीवनभर अत्यंत निरलसपणे आणि व्रतस्थपणे चालविले. सांसारिक आपत्तींतही त्या कार्यात कधी खंड पडू दिला नाही. एक आदर्श संशोधक म्हणून त्यांना विश्वमान्यता मिळाली. संशोधन महर्षी म्हणून त्यांचा रास्तपणे गौरव करण्यात येतो.

संदर्भ : Deshpande, G. T. and Others, Ed. Dr. Mirashi Feliciation Volume, Nagpur, 1965.

गोखले, शोभना परांजपे, बिंदा