मिलिदपञ्ह : पाली भाषेतील एक विख्यात ग्रंथ. ‘मिलिंदप्रश्न’ हे त्याच्या शिर्षकाचे संस्कृत रूप, ह्या शीर्षकातील मिलिंद म्हणजे ग्रीक राजा मिनॅनड्रॉस किंवा मीनांदर होय. मिलिंद हे त्याच्या नावाचे भारतीय रूप. मिलिंद आणि बौद्ध भिक्षू नागसेन ह्यांच्यातील संवाद ह्या ग्रंथात ग्रथित केलेला आहे. उपयुक्त भिक्षू नागसेन हा ह्या ग्रंथाचा कर्ता असावा, असे मानले जाते. इ. स. सु. पहिले शतक हा ह्या ग्रंथाच्या रचनेचा काळ.

राजा मिलिंद ह्यास तत्त्वज्ञानासंबंधी चर्चा करण्याची फार हौस होती. त्या दृष्टीने नागसेनाशी संवाद व्हावा, अशी ह्याला इच्छा झाली. नागसेनाने अट घातली, की हा संवाद ‘राजवादा’ च्या नव्हे तर ‘पंडितवादा’ च्या पद्धतीने व्हावा कारण त्याला माहीत होते, की राजे लोक वादामध्ये आपल्या विरुद्ध बाजूची सरशी होऊ लागताच क्रोधाविष्ठ होऊन प्रतिपक्षावर दंडयोजना करण्याचा प्रयत्नसुद्धा करतात. परंतु मिलिंदराजाने नागसेनाची अट मान्य केली व बुद्ध, धर्म, संघ ह्यांच्याशी निगडित असलेल्या अनके प्रश्नांवर नागसेनाबरोबर चर्चा केली. बुद्धाचे अलौकिकत्व, बौद्ध धर्मातील अनात्मवाद, संघामध्ये देवदत्ताने पाडलेली फूट, निर्वाण, अर्हतांची विस्मृती व त्यांची स्थानभ्रष्टता, बौद्ध ग्रंथातील निरनिराळ्या रचनांत दिसणारा विरोध व समन्वय, गृहस्थ व प्रव्रजित ह्यांची सम्यक प्रतिपत्ती व अर्हत्वप्राप्ती ह्यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. चर्चेच्या शेवटी मिलिंद राजाने नागसेनाचे वाक्‌चातुर्य व वादपटुत्व ह्यासंबंधी प्रंशसोद्‌गार काढले त्याचप्रमाणे नागसेनाकरिता त्याने एक विहार बांधविला आपले राज्य आपल्या मुलाच्या स्वाधीन करून प्रव्रज्या घेतली व कालांतराने अर्हत्व प्राप्त केले असा ह्या ग्रंथात उल्लेख आहे.

ह्या ग्रंथाचे एकूण सात विभाग आहेत. मात्र सातव्या विभागात जे प्रश्न विचारात घ्यावयाचे म्हणून आरंभीच यादी दिलेली आहे, तिच्यातील सर्व मुद्यांची उत्तरे आलेली नाहीत. बौद्धांच्या त्रिपिटकातील अनके ग्रंथांचा उल्लेख ह्या ग्रंथात करण्यात आला असून, त्यांपैकी काही ग्रंथातून प्रत्यक्ष उतारेही ह्या ग्रंथाने घेतले आहेत.

नागसेनाने वापरलेल्या दृष्टांताचे सौंदर्य व समर्पकत्व हे ह्या ग्रंथाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. ग्रंथाची भाषा बऱ्याच ठिकाणी सोपी व ओघवती असली, तरी काही काही ठिकाणी लांब लांब समासांमुळे क्लिष्ट झालेली आहे.

ह्या ग्रंथाच्या चिनी भाषांतरात फक्त पहिले तीन विभाग असल्यामुळे ह्या ग्रंथाचे उर्वरित चार विभाग उत्तरकालीन असावेत, असे काही विद्वानांचे मत आहे. हिंदी, बंगाली (अंशतः) व कानडी भाषांत हा ग्रंथ अनुवादिला गेला आहे. ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद टी. डब्ल्यू. ऱ्हिस डेव्हिड्‌स ह्यांनी द क्वेश्चन्स ऑफ किंग मिलिंद ह्या नावाने दोन भागांत केलेला आहे (प्रथमावृत्ती १८९० १८९४ डोव्हर पब्लिकेशन्स, न्यूयॉर्क ह्यांनी काढलेली नवी आवृत्ती १९६३).

संदर्भ : 1. Bapat, P.V., Ed. 2500 Years of Buddhism, Delhi, 1959.

              2. Law, B. C. A History of Pali  Literature, 2 Vols., London, 1933.               ३. उपाध्याय, भरतसिंह, पालि साहित्य का इतिहास, प्रयाग, १९६३.

बापट, पु. वि.