मिलान : मिलानो. इटलीच्या उत्तर भागातील लाँबर्डी प्रांताची राजधानी आणि इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या १५,८०,८१० (१९८२). हे पो नदी व अल्पाइन पर्वतरांगांदरम्यानच्या सुपीक प्रदेशात, रोमच्या वायव्येस ४८० किमी. व जेनोआच्या ईशान्येस १२० किमी. वर ऑलॉना नदीकाठी वसले आहे. लाँबर्डी मैदानातील सर्व महत्त्वाच्या व्यापारमार्गांवर हे असल्याने पूर्वीपासूनच याला वित्तीय, औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

येथील मूळच्या केल्टिक लोकांचा पराभव करून इ. स. पू. २२२ मध्ये हे शहर रोमनांनी जिंकले, रोमन साम्राज्याच्या राजधानीचे व उत्तर इटलीतील प्रमुख धार्मिक ठिकाण म्हणून ते प्रसिद्ध होते (इ. स. ३०५ ते ४०२). ३७४ ते ३७९ या काळात सेंट आंब्रोस हा येथील बिशप होता. धार्मिक विधी व वक्तृत्व यांबद्दल त्याची ख्याती होती. ४५० मध्ये हूण लोकांनी आणि ५३९ मध्ये गॉथ जमातीच्या टोळ्यांनी हल्ले करून या शहराचे अतोनात नुकसान केले. त्यानंतर ५६९ मध्ये लोंबार्ड लोकांनी हे जिंकून घेतले. तेव्हापासून शहराची हळूहळू प्रगती होऊ लागली. बाराव्या शतकात मिलान हा एक स्वतंत्र परगणा (कम्यून) बनला व लाँबर्डी प्रदेशातील इतर शहरांवरही त्याचा अंमल बसला. याच काळात (इ. स. अकरावे ते तेरावे शतक) येथे धनिक आणि निर्धन लोक यांच्यात झगडे सुरू झाले व त्यांतच बाजूच्या विरोधी शहरांनी सम्राट पहिला फ्रेडरिक याला हे शहर उद्‌ध्वस्त करण्यास मदत केली (११५८ व ११६२) परंतु ‘लाँबर्ड लीग सिटीज’ ने ११७६ मध्ये पहिल्या फ्रेडरिकचा पराभव केला. या लीगमध्ये मिलानही होते. ११८३ मध्ये कॉन्स्टन्स येथील शांतता करारानुसार इटलीच्या राजाने मिलानच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. मात्र तेराव्या शतकात येथील लोकसत्ताक शासन संपुष्टात येऊन सरदार घराण्याची सत्ता स्थापन झाली. सरदार घराण्यातील गॅले ऑझो सरदार ‘ड्यूक ऑफ मिलान’ या नावाने प्रसिद्ध झाला व त्याचे राज्य इटलीतील एक महत्त्वाचे ड्यूक राज्य म्हणून मानले जाऊ लागले. १४४७ मध्ये मिलानवर र्स्फार्त्सा घराण्याची सत्ता आली. इटालियन युद्धानंतर मिलान राज्याची सत्ता स्पेनकडे (१५३५) व त्यानंतर १७१३–९६ या काळात ऑस्ट्रियाकडे गेली. पहिल्या नेपोलियनने ऑस्ट्रियाचा पराभव करून इटलीची पाच नगर-राज्यांत विभागणी केली व सिसॅलपाइन राज्याची तसेच इटली साम्राज्याची मिलान ही राजधानी केली (१८०५–१४). परंतु १८१५ मध्ये नेपोलियनचा पाडाव झाल्यावर मिलान पुन्हा ऑस्ट्रियाकडे आले व १८४८ मध्ये मिलानमधील लोकांनी ऑस्ट्रियांना येथून हाकलून दिले. १८५९ मध्ये हे शहर सार्डिनियाच्या राज्यात व इटलीच्या स्वातंत्र्यानंतर (१८६१) इटलीमध्ये समाविष्ट झाले. १८६१ नंतर आर्थिक दृष्ट्या मिलानचे महत्त्व वाढले. दुसऱ्या महायुद्धकाळात मात्र या शहराचे बाँब वर्षावामुळे अतोनात नुकसान झाले. [⟶ इटली].

औद्योगिक दृष्ट्या मिलान पूर्वीपासून प्रसिद्ध झाले. शहरात कापड, यंत्रसामग्री, रसायने, मोटारी, मोटारसायकली, महत्त्वाची विजेची उपकरणे, लोहमार्गसामग्री, विमाने, रबरी, वस्तू इ. उद्योगधंदे विकसित झाले आहेत. छपाई व प्रकाशन व्यवसायातही हे शहर अग्रगण्य असून यूरोपातील एक महत्त्वाची रेशीम बाजारपेठ येथेच आहे. येथे दरवर्षी एप्रिलमध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारजत्रेत व प्रदर्शनात हजारो प्रदर्शक सहभागी होतात, तर लक्षावधी लोक भेट देतात.

पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीनेही हे शहर महत्त्वाचे आहे. चौथ्या शतकातील सेंट आंब्रॉजो बॅसिलिका (अकराव्या शतकात पुनरूज्जीवित झालेले), पंधराव्या शतकातील सांता मारीआ देल ग्रात्सिए चर्च (लिओनार्दो दा व्हींची या श्रेष्ठ चित्रकाराच्या द लास्ट सपर १४९५–९८ ह्या उत्कृष्ट भित्तिचित्राकरिता प्रसिद्ध), इटलीतील उत्कृष्ट चित्रकलाकृतींच्या संग्रहासाठी प्रसिद्ध असलेला सतराव्या शतकातील ब्रेरा राजवाडा, पांढऱ्या संगमरवराचे गॉथिक कॅथीड्रल (१३८६–१८१३), श्रेष्ठ यूरोपीय चित्रकारांच्या चित्रांचा संग्रह तसेच दुर्मिळ ग्रंथ व प्राचीन हस्तलिखिते यांकरिता ख्याती पावलेले आंब्रोसियन ग्रंथालय, लिओनार्दो दा व्हींची विज्ञान व तंत्रविद्या संग्रहालय, मॉडर्न आर्ट गॅलरी, संगीतिका गृह, भव्य नाट्यगृहे इ. वास्तू उल्लेखनीय आहेत. शहरात एक तंत्रनिकेतन व तीन विद्यापीठे आहेत.

चौंडे, मा. ल.