मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या १,२८,१७९ (१९८१). हे वाराणसीच्या नैर्ऋत्येस ४८ किमी. गंगेच्या दक्षिण तीरावर आणि ईस्ट इंडिया रेल्वे मार्गावर वसलेले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे उत्तर भारतातील सर्वांत महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. द. भारतातील कापूस व उ. भारतातील धान्य येथून नदीमार्गे कलकत्यास जाई. पूर्वी नदीमार्गे मिर्झापूरपर्यंत मोठ्या बोटी येत असत. मात्र १८६४ मध्ये लोहमार्ग सुरू झाल्यावर याचे पूर्वीचे व्यापारी महत्त्व हळूहळू कमी होत गेले. तथापि वाहतुकीच्या सर्व प्रकारच्या सोयींमुळे अलीकडच्या काळात याचे व्यापारी महत्त्व वाढत आहे. १८६७ पासून येथे नगरपालिका आहे. जिल्ह्याचे व व्यापारी ठिकाण म्हणून आवश्यक अशा शासकीय कचेऱ्या, नगरभवन, शाळा, दवाखाने, अनाथालय, सांस्कृतिक केंद्रे इ. सुविधा येथे आढळतात. तांदूळ, गहू सातू, मका, कडधान्ये, ऊस, मोहरी, जवस इ. पिके व तांब्या-पितळेची भांडी, लाख व लाखेच्या वस्तू, लोकरी गालीचे, कापूस इत्यादींसाठी हे पूर्वापार प्रसिद्ध आहे. जवळच वालुकाश्माच्या खाणी आहेत. नदीकाठी सुंदर बांधीव घाट, देवळे, मशिदी तसेच सुंदर नक्षीकामाचे प्रासाद आहेत. नगरपालिकेच्या हद्दीत नैर्ऋत्येस बिंधाचल-विंध्याचल येथे विंध्यवासिनी विंध्येश्वरी देवीचे पुरातन मंदिर आहे. येथे जवळच पंपापूर या प्राचीन शहराचे अवशेष आढळतात.

कुमठेकर, ज. ब.