मिरची : (लॅ. कॅप्सिकम ॲन्यूम कुल-सोलॅनेसी). भारतात मिरचीची लागवड जवळजवळ सर्वत्र होते. तिचे मूलस्थान उष्ण कटिबंधीय अमेरिका असून भारताखेरीज उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील इतर अनेक देशांत (द. आफ्रिका, द. आणि प. ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ईजिप्त, स्पेन, चीन, जपान, व्हिएटनाम, ब्रह्मदेश, मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान वगैरे) ती लागवडीत आहे. कॅप्सिकम प्रजातीच्या वर्गीकरणासंबंधी वनस्पतिशास्त्रज्ञांत मतभेद आहेत परंतु पुष्कळ शास्त्रज्ञ त्या प्रजातीच्या कॅप्सिकम ॲन्यूम व कॅ. फ्रुटेसेंस अशा दोनच जाती मानतात. कॅ. ॲन्यूम जातीचा ॲक्यूमिनॅटम हा प्रकार भारतात मोठ्या प्रमाणावर लागवडीत असून त्याची लांब, टोकदार व लालभडक मिरची बाजारात वाळकी मिरची अथवा लाल मिरची या नावाने ओळखली जाते. कॅ. ॲन्यूम जातीच्या ग्रोसम या प्रकाराची फळे भोपळी मिरची या नावाने ओळखली जातात. या सौम्य तिखट प्रकाराची लागवड भाजीसाठी मर्यादित प्रमाणावर होते. त्याच जातीच्या लाँगम प्रकाराची लागवड जाड सालीच्या, सौम्य तिखट अशा हिरव्या मिरच्यांसाठी केली जाते. या जातीचे आणखी कमी महत्त्वाचे प्रकारही भारतात आढळून येतात.
लाल मिरची : (हिं. लाल मिर्च गु. मर्चु क. मेंसिकाई सं. उज्वला, तीक्ष्णा, मरीची फल इं. चिली, रेड पेपर लॅ. कॅ. ॲन्यूम प्रकार ॲक्यूमिनॅटम). ही वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणारी) ⇨ ओषधी पोर्तुगिजांनी भारतात १४९८ मध्ये आणली असे नमूद आहे. मिरचीच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात भारताचा पहिला क्रमांक आहे. या ओषधीची उंची ४५ ते ७५ सेंमी. असून पर्णसंभार दाट असतो. पाने साधी, गुळगुळीत, एकाआड एक, अंडाकृती आणि टोकाकडे निमुळती असतात. फुले पानांच्या बगलेत एकएकटी येतात. फुलांचा देठ बारीक असून टोकाकडे मोठा होत जातो. संवर्त (फुलाचे सर्वांत खालचे हिरवट दलांचे मंडल) फळाच्या तळाशी वेढलेला असतो. पुष्पमुकुट फिकट पांढरा असतो. फळ (मृदू मळ) लांब, टोकाकडे निमुळते, साधारणपणे थोडे फार वक्राकार, कोवळेपणी हिरवे व पिकल्यावर लाल, पिवळे अथवा नारिंगी असते. फळातील गर पातळ व तिखट असतो. इतर सामान्य लक्षणे ⇨ सोलॅमेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.
भारतातील लागवडीचे प्रदेश, क्षेत्र व उत्पादन : भारतात या मिरचीची लागवड सर्व राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत कमीअधिक प्रमाणात होते परंतु क्षेत्र व उत्पादन या दोन्ही दृष्टींनी आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश ही महत्त्वाची राज्य आहेत. १९८०–८१ मध्ये भारतात लाल मिरचीचे क्षेत्र ८·२५ लक्ष हेक्टर व उत्पादन ४·८५ लक्ष टन (वाळकी मिरची) होते. क्षेत्र व उत्पादन यांच्याबाबतीत आंध्र प्रदेशाचा क्रमांक पहिला आणि महाराष्ट्राचा दुसरा होता. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तामिळनाडू व कर्नाटक या पाच राज्यांत मिळून ६३% उत्पादन झाले. उत्पादनाच्या प्रमुख राज्यांत हेक्टरी उत्पन्न (किग्रॅ.) पुढीलप्रमाणे होते : बिहार – १,२१९, हरियाणा – १,०६६, पंजाब – ९०१, उत्तर प्रदेश – ८५०, आंध्र प्रदेश – ८२१, ओरिसा – ७३८, पश्चिम बंगाल – ७०१, तामिळनाडू – ५६०, महाराष्ट्र – ५०९ आणि कर्नाटक – ३०८. महाराष्ट्रात त्या वर्षी १·५१ लक्ष हेक्टर क्षेत्र आणि ७७,१०० टन उत्पादन होते. धुळे, अमरावती, सांगली व नांदेड या चार जिल्ह्यांत राज्यातील ३० ते ३५% उत्पादन होते. अहमदनगर, जळगाव, नागपूर, चंद्रपूर व उस्मानाबाद हे उत्पादनाचे इतर महत्त्वाचे जिल्हे आहेत. कोकणात मिरचीची लागवड फार कमी प्रमाणात होते. इतर जिल्ह्यांत ती कमीजास्त प्रमाणात होते.
इ. स. १९५०–५१ ते १९७८–७९ या २८ वर्षांच्या कालावधीत भारतातील मिरचीचे क्षेत्र, उत्पादन आणि हेक्टरी उत्पादन यात अनुक्रमे ४४, ७८ आणि ३२% वाढ झाली.
लागवडीतील प्रकार : भारतात लाल मिरचीचे सु. ३५ प्रकार लागवडीत आहेत. रंग, आकार, आकारमान व तिखटपणा या बाबतींत त्यामध्ये भिन्नता आढळून येते. महाराष्ट्रासाठी पुढील सुधारित प्रकारांची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे : (१) ज्वाला : हा भरपूर फांद्या असलेला ठेंगणा प्रकार असून पाने गर्द हिरवी असतात. फळे सर्वांत लांब (१५ ते १८ सेंमी.), वजनदार व सौम्य तिखट असतात. फळावर आडव्या सुरकुत्या असतात. १२०–१३० दिवसांत तयार होणारा हा प्रकार निरनिराळ्या हवामानात लागवडीसाठी योग्य आहे. हिरव्या स्थितीतील मिरचीचा रंग फिकट हिरवा असतो. स्थानिक प्रकारापेक्षा व एन पी ४६ – ए पेक्षा पुष्कळ जास्त उत्पन्न देणारा हा प्रकार आहे व बोकड्या रोगाला काही प्रमाणात प्रतिकारक आहे. (२) एन पी ४६ – ए : झाडे मध्यम उंचीची, फळे ९ ते १२ सेंमी. लांबीची असून साल पातळ असते. पाने गर्द हिरवी. पिकलेल्या मिरचीचा रंग आकर्षक लाल असतो. हिरव्या मिरच्यांसाठी हा प्रकार चांगला आहे. (३) संकेश्वरी ३२ : झाडे उंच असून फांद्या व फुले मोठ्या संख्येने येतात. फळे १५ ते २० सेंमी. लांब असतात. हिरव्या मिरचीचा रंग फिकट हिरवा व पिकलेल्या मिरचीचा गर्द लाल असतो. साल पातळ असून बियांची संख्याही कमी असते. बोकड्या रोगास हा प्रकार काही प्रमाणात प्रतिकारक आहे. (४) पंत सी – १ : पंतनगर कृषी विद्यापीठाने (उ. प्रदेश) विकसित केलेला हा प्रकार बोकड्या रोगाला प्रतिकारक आहे. महाराष्ट्राखेरीज उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार व गुजरात या राज्यात लागवडीस योग्य आहे. मिरच्या झाडावर उभ्या स्थितीत असतात आणि त्या फार तिखट असतात. फळ ७ ते ८ सेंमी. लांब असून साल जाडसर असते. पिकलेली मिरची गर्द लाल व आकर्षक असते. हिरव्या व पिकलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्यांसाठी हा प्रकार चांगला असला, तरी पिकलेल्या व वाळक्या मिरचीसाठी हा प्रकार जास्त चांगला आहे. वर्षाच्या कोणत्याही ऋतूत या प्रकाराचे पीक घेता येते. परदेशांत निर्यातीसाठी हा प्रकार विशेष चांगला आहे. (५) दोंडाईचा : झाड उंच वाढणारे असून त्याचा विस्तारही मोठा असतो. फळ १०–१४ सेंमी लांब, वजनदार व जाड सालीचे असते. पिकलेली मिरची गर्द लाल असते. (६) कोसबाड – गुंतूर : हा हळवा व जास्त उत्पन्न देणारा प्रकार आहे.
आंध्र प्रदेशात लाम (जि. गुंतूर) येथील मिरची संशोधन केंद्रात विकसित केलेले जी १, जी २, जी ३, जी ४ व जी ५ आणि तामिळनाडूत एम् डी यू – १ व को – १ हे मिरचीचे सुधारित प्रकार लागवडीत आहेत.
हवामान : मिरची हे सर्वसाधारणपणे पावसाळी हंगामातील पीक आहे. सु. ६० ते १२० सेंमी. पाऊस असलेल्या भागात हे पीक त्या हंगामात घेतात. गंगेच्या खोऱ्यात ते हिवाळी पीक असून सप्टेंबरमध्ये लागण करुन जानेवारी-फेब्रुवारीत फळांची काढणी करतात. पंजाबात ते मार्च-एप्रिलमध्ये लावून सप्टेंबर-डिसेंबरमध्ये फळांची तोडणी करतात. दक्षिणेत जून-जुलैत बी पेरून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रोपे स्थलांतरित करतात व पुढे ३–४ महिन्यांनी फळांची तोडणी करतात. महाराष्ट्रात काही भागात मिरचीची वर्षांतून तीन पिके घेतात (पावसाळी लागण : जून-जुलै, हिवाळी लागण : सप्टेंबर- ऑक्टोबर, उन्हाळी लागण : मार्च-एप्रिल). २०° ते ३५° से. तापमानात हे पीक चांगले वाढते. १०° से. खालील तापमान पिकाला मानवत नाही. जमिनीचे तापमान १०° सें.च्या खाली व ३०° से. च्या वर असल्यास झाडाची वाढ थांबते. १७° सें.च्या आसपासचे जमिनीचे तापमान झाडाच्या वाढीस पोषक असते. पीक फुलावर असताना दव अथवा जोराचा पाऊस असल्यास मिरच्या गळतात. तसेच उन्हाच्या झळीमुळे अपक्व मिरच्या गळतात. उन्हाळ्यात उत्पादन जास्त मिळते परंतु मिरच्यांत तिखटपणा कमी असतो. हिवाळी हंगामात पिकाची वाढ कमी होते.
जमीन : या पिकाला पाण्याचा चांगला निचरा असलेली भारी जमीन चांगली. पोयट्याची तांबडी जमीन अथवा पाणी देण्याची सोय असेल तेथे काहीशी रेताड जमीनही चालते. चुन्याचे प्रमाण थोडे जास्त असलेल्या जमिनीत जास्त उत्पन्न येते. अम्लयुक्त जमिनी या पिकास योग्य नसतात.
मशागत : पावसाळ्यातच्या सुरुवातीस जमीन २०–२५ सेंमी. खोल नांगरून कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी १०–१२ टन व बागायती पिकासाठी २०–२५ टन शेणखत अथवा कंपोस्ट मिसळून जमीन चांगली भुसभुशीत करतात.
रोपे तयार करणे व त्यांचे स्थलांतर : मिरचीची लागवड सामान्यतः रोपे लावून करतात परंतु दक्षिण भारतातील काही भागात वाळूमध्ये बी मिसळून ते मुठीने शेतात फोकतात. रोपे तयार करण्यासाठी मे महिन्याच्या अखेरीला १५ सेंमी. उंचीच्या गादी वाफ्यात बी पेरतात. एक हेक्टर क्षेत्रात रोपे लावण्यासाठी सु. १,१५० ग्रॅ. बी लागते. उवगून आल्यावर ५–६ आठवड्यांनी रोपांचे स्थलांतर केले जाते (हिवाळ्यात जमिनीचे तापमान कमी असल्यामुळे रोपे वाढण्यास वेळ लागतो). स्थलांतर करते वेळी रोपांची उंची १५–२० सेंमी. पेक्षा जास्त ठेवीत नाहीत. स्थलांतरापूर्वी एक आठवडा रोपांचे शेंडे कापून टाकतात. यामुळे लागवडीच्या वेळेपर्यंत रोपांची दांडी मजबूत होऊन लागवडीनंतर सुरुवातीलाच झाडांची वाढ फांद्यायुक्त होते. लागवडीपूर्वी रोपे (विशेषतः त्यांची पाने) १० लि. पाण्यात मोनोक्रोटोफॉस (नुव्हाक्रॉन) ४०% प्रवाही १२ मिलि. + ३० ग्रॅ. पाण्यात विरघळणारे गंधक + २५ ग्रॅ. डायथेन एम ४५ + यूरिया १०० ग्रॅ. मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवितात. कोरडवाहू पिकासाठी ६० X ६० सेंमी. आणि बागायती पिकासाठी ९० X ९० सेंमी. अंतरावर लागण करतात. ज्वाला आणि एन. पी. ४६ – ए या बुटक्या प्रकारांची लागवड ४५ X ३० सेंमी. अंतरावर करतात.
पाणी : कोरडवाहू पिकाला रोपांच्या लागणीनंतर पाऊस नसल्यास तीन दिवस पाणी देणे आवश्यक असते. बागायती पिकाला जरुरीप्रमाणे पाणी देतात. उन्हाळ्यात ५–७ दिवसांच्या अंतराने आणि हिवाळ्यात १२ दिवसांच्या अंतराने पाणी देतात. शेतात पाणी साचून राहिल्यास पाने व फुले गळतात आणि झाडे मरतात. झाडे फुलावर असताना पाणी कमी पडल्यासही फुले गळतात व मिरच्या चांगल्या पोसत नाहीत. मातीचा वरचा ५–७ सेंमी. थर भुसभुशीत ठेवल्याने जमिनीत ओलावा कायम राहतो.
वरखते : पावसाळी पिकासाठी जमीन कमी सुपीक असल्यास हेक्टरी ३४ किग्रॅ. नायट्रोजन, १६ किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल आणि ५० किग्रॅ. पोटॅश देण्याची शिफारस करण्यात येते. यापैकी नायट्रोजनाचा निम्मा भाग, संपूर्ण फॉस्फोरिक अम्ल व संपूर्ण पोटॅश लागवडीपूर्वी आणि नायट्रोजनाचा राहिलेला निम्मा भाग पीक फुलावर आल्यावर देतात. बागायती पिकासाठी हेक्टरी १५० किग्रॅ. नायट्रोजन, १२० किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल व ५० किग्रॅ. पोटॅश देतात. यापैकी ५० किग्रॅ. नायट्रोजन, संपूर्ण फॉस्फोरिक अम्ल व संपूर्ण पोटॅश लागवडीपूर्वी देतात. ५० किग्रॅ. नायट्रोजन लागवडीनंतर १ महिन्याने व राहिलेला ५० किग्रॅ. नायट्रोजन झाडे फुलावर आल्यावर देतात.
आंतर मशागत : कोरडवाहू पिकात दोन-तीन कोळपण्या व बागायती पिकात खुरपणी करून तण काढणे ही मुख्य कामे आहेत. तणांचा उपद्रव फार असल्यास रोपांच्या लागणीपूर्वी आणि लागणीनंतर पुन्हा ३०–४० दिवसांनी तणनाशक रसायनांचा वापर करतात.
रोग व किडी : रोग : (१) रोपे कुजणे : रोपवाटिकेत कवकांमुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे) रोपांचा जमिनीलगतचा भाग कुजून ती मरतात. उपाय म्हणून बियांना १% पारायुक्त कवकनाशक (१ किग्रॅ. ला २·५ ग्रॅ.) लावतात. वाफ्यातून पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी तजवीज करतात. रोपांवर ०·४ % शक्तीचे बोर्डो मिश्रण फवारतात.
(२) करपा : कोलेटॉट्रिकम प्रजातीतील कवकामुळे झाडांची पाने गळतात, फांद्या वाळतात किंवा फळांवर चट्टे पडतात. रोगग्रस्त फळे नरम पडतात आणि कुजतात. ०·४ % शक्तीचे बोर्डो मिश्रण अथवा ५०% ताम्रयुक्त कवकनाशक पिकावर फवारतात.
(३) भुरी : कवकाची पांढरी वाढ झाडाच्या निरनिराळ्या भागांवर दिसून येते. उपाय म्हणून पाण्यात विरघळणारे गंधक पिकावर फवारतात.
(४) व्हायरसजन्य रोग : यात पाने वळणे (बोकड्या), केवडा, पर्णगुच्छ या रोगांचा समावेश होतो. लक्षणे टोमॅटोवरील [⟶ टोमॅटो] अशाच प्रकारच्या रोगांप्रमाणे असतात. काही व्हायरसजन्य रोगांचा फैलाव कीटकांद्वारे होतो. यासाठी कीटकांचा बंदोबस्त केल्याने रोगाचे प्रमाण कमी राहाते. पंत सी – १ हा प्रकार व्हायरस रोगाला काही प्रमाणात प्रतिकारक आहे.
किडी : फुलकिडे, मावा, कोळी, पांढरी पिसू व खोड कुरतडणारी अळी या किडी या पिकावर आढळून येतात. रोग व किडींसाठी कवकनाशके व कीटकनाशके एकत्र मिसळून फवारणे फायद्याचे असते. रोपांचे स्थलांतर केल्यावर १० दिवसांनी हेक्टरी ३७५ लि. पाण्यात एंडोसल्फान (३५% प्रवाही) ३२५ मिलि. [अथवा फॉस्फोमिडॉन (डिमेक्रॉन) ८५% प्रवाही, ७५ मिलि. ] अधिक ८०% पाण्यात मिसळणारे गंधक ७५० ग्रॅ. अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०%) ९५० ग्रॅ. ही सर्व मिसळून फवारणी करतात. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५–२० दिवसांनी करतात. यावेळी एका हेक्टरसाठी ५०० लि. पाण्यात वरील कवकनाशके अथवा कीटकनाशके जास्त प्रमाणात मिसळतात (एंडोसल्फान ४१० मिलि. अथवा डिमेक्रॉन १०० मिलि., गंधक १,२५० ग्रॅ. व कॉपर ऑक्सिक्लोराइड १,२५० ग्रॅ.) फुले व फळे गळण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एनएए (नॅप्थॅलीन ॲसिटिक अम्ल) हे हॉर्मोन १०० लि. पाण्यात ५ मिलि. या प्रमाणात मिसळून झाडे फुलावर आल्यावर फवारतात व पुन्हा २० दिवसांनी फवारतात. याचबरोबर पीक फुलावर असताना पाण्याचा ताण पडणार नाही, तसेच जमिनीत प्रमाणाबाहेर पाणी साचणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक असते.
तोडणी व वाळविणे : लाल मिरचीच्या खरीप पिकाच्या लागणीपासून सर्वसाधारणपणे ६–७ आठवड्यांनी फुले येऊ लागून दहाव्या आठवड्यापासून झाडावर मिरच्या दिसू लागतात. पुढे सु. ३ महिने मिरच्या धरण्याचा हंगाम चालू राहातो. पहिला तोडा हिरव्या मिरच्यांचा केल्याने फुले जास्त संख्येने येतात, असा समज आहे. पक्व फळांची तोडणी नोव्हेंबरपासून सुरू होते व पुढील ३ ते ४ महिन्यात ५, १० अथवा २० दिवसांच्या अंतराने ६ ते १० वेळा तोडणी करतात. डिसेंबरच्या अखेरीपर्यंत सु. ७०% मिरच्या तोडल्या जातात. प्रत्येक वेळी पूर्ण पक्व झालेल्या व पिकण्यास आलेल्या मिरच्या देठासह तोडतात. तोडल्यावर त्यांचा ढीग करून २–३ दिवस घरातच ठेवतात. त्यामुळे फळांना एकसारखा रंग येतो. शिवाय कमी प्रमाणात पिकलेल्या मिरच्या तोडण्यात आल्या असल्यास त्यांनाही लाल रंग येतो. (अशा मिरच्या ताबडतोब उन्हात वाळविल्यास त्या पांढऱ्या पडतात). ढिगातील मिरच्या फरशीवर अथवा ठोकून घट्ट केलेल्या जागी उन्हात वाळत घालतात. दोन दिवसांनी मिरच्या मऊसर असताना त्या पायाने तुडवितात अगर त्यावर रुळ फिरवितात. त्यामुळे मिरच्या चपट्या होतात व पोत्यात जास्त संख्येने मावतात. मिरच्या उन्ह्यात वाळविण्याचे काम हवामानावर अवलंबून असून ते ३ ते १५ दिवस (सर्वसाधारणपणे ८ ते १० दिवस) चालते आणि वजनात ७०–७५% घट येते. मिरच्या वाळविण्याच्या यंत्रात ४४° ते ४६° से. तापमानात १८ तासांत मिरच्या वाळविता येतात. या पद्धतीत मिरचीचा रंग चांगला राहातो. वाळलेल्या मिरचीला चकाकी येण्यासाठी कोठे कोठे मोहाचे तेल चोळण्यात येते.
उत्पन्न : कोरडवाहू पिकाचे सरासरी हेक्टरी उत्पन्न सु. ६०० किग्रॅ. (वाळलेल्या मिरच्या) आणि बागायती पिकाचे १,४०० ते १,७०० किग्रॅ. उत्पन्न येते.
रासायनिक संघटन : सामान्य लागवडीतील लाल मिरचीच्या हिरव्या व पिकवून वाळविलेल्या फळात अनुक्रमे पुढीलप्रमाणे प्रतिशत घटक असतात : जलांश ८२·६ व १०·००, प्रथिने २·९ व १५·९, वसा (स्निग्ध पदार्थ) ०·६ व ६·२, कार्बोहायड्रेटे ६·१ व ३१·६, तंतू ६·८ व ३०·२, लवणे १·०० व ६·२, मिरचीत क जीवनसत्त्व विशेष प्रमाणात व अ जीवनसत्त्व थोड्या प्रमाणात असते. हिरव्या मिरचीत वाळलेल्या मिरचीपेक्षा जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असते. मिरचीतील तिखटपणा तीतील कॅप्सिसीन नावाच्या पदार्थामुळे असतो. हा पदार्थ फळाच्या सालीच्या आतील थरात सर्वांत जास्त असतो. सर्वसामान्य मिरचीत कॅप्सिसिनाचे प्रमाणे ०·१% असते. हे एक अत्यंत तीव्र द्रव्य आहे. मिरचीच्या प्रमाणाबाहेर वापरामुळे आतड्यातील पेशींच्या अभिशोषण क्रियेवर अयोग्य परिणाम होतो डोळ्यांची संवेदनाशक्ती नाहीशी होते रक्तदाब, आतड्यातील व्रण इ. विकारांची शक्यता वाढते, असे आढळून आले आहे.
म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने मिरचीच्या सालीपासून तिखट-तेलकट मिश्रण व नैसर्गिक खाद्य रंग आणि बियांपासून तेल काढण्याची कृती विकसित केली आहे. (सालीच्या आतील थरांत कॅप्सिसीन व बाहेरील थरात मुख्यत्वेकरुन रंगद्रव्य असते).
एक वर्षाच्या साठवणीनंतर वाळविलेल्या मिरचीचा रंग १५% कमी होतो.
औषधी उपयोग : कटिशूल, तंत्रिकाशूल (मज्जातंतुजन्य वेदना), संधिवाताच्या तक्रारी यावर मिरचीपासून तयार केलेल्या पदार्थांचा प्रतिदाहक म्हणून वापर करतात. मिरची सौम्य प्रमाणात शक्तिवर्धक व पाचक असून अग्निमांद्यावर गुणकारी आहे. मात्र जठरशैल्यावर (जठराच्या बुळबुळीत अस्तराच्या दाहयुक्त सुजेवर) तिचा उपयोग निषिद्ध मानला गेला आहे. वाजवीपेक्षा जास्त वापर केल्यास जठरांत्रशोथ (जठर व आतडे यांचे दाहयुक्त सूज) संभवतो. घसादुखीसाठी गुळण्या करण्याच्या औषधात मिरचीचा वापर केला जातो. तसेच चूर्ण, टिंक्चर, चोळण्यासाठी औषधे, लेप, मलम इ. स्वरूपात मिरचीचा (विशेषतः तिखट प्रकारांचा) वापर केला जातो.
निर्यात व्यापार : भारतीय मिरची तिखटपणासाठी सर्व जगात प्रसिद्ध आहे. इतर देशांतील मिरच्यांपेक्षा भारतीय मिरची जास्त काळ साठवून ठेवता येते.
मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारात भारतातील मिरचीचे महत्त्व गेल्या काही वर्षांत कमी होत चालले आहे. याला १९७८–७९ हे साल अपवाद होते. त्या साली ३०,००० टनांपेक्षा जास्त मिरची निर्यात झाली व २९ कोटी रुपयांचे परकी चलन मिळाले. १९७९–८० साली १०,२६७ टन आणि १९८०–८१ साली ७,६२९ टन मिरची निर्यात झाली आणि अनुक्रमे ७·७३ आणि ५ कोटी रुपयांचे परकी चलन मिळाले. १९८०–८१ साली निर्यात झालेली मिरची देशातील एकूण उत्पादनाच्या फक्त १·५% होती. भारतीय मिरचीची निर्यात मुख्यत्वेकरून अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सिंगापूर, मलेशिया, नेपाळ व कॅनडा या देशांना होते. भारतातून होणाऱ्या मिरचीच्या निर्यातीसंबंधी सल्ला देण्याचे व देखरेख करण्याचे कार्य कोचीन येथील स्पायसेस प्रमोशन कौन्सिल ही संस्था करते.
भोपळी मिरची : (हिं. काफ्री मरिच, सिमला मिर्च इं. बेल पेपर, स्वीट पेपर लॅ. कॅ. ॲन्यूम प्रकार ग्रोसम). ४५ ते ६० सेंमी. उंची वाढणारी ही औषधी असून तिच्या हिरव्या फांद्यावर बारीक गाठी असतात. खोडाची पेरे फुगीर असून त्यावर जांभळट रंगाची झाक असते. पाने जाड, अंडाकृती व टोकाकडे निमुळती असतात. तळाकडील पाने फार मोठी असून त्यांचे देठ मजबूत व ५ ते ७·५ सेंमी. लांब असतात. फुले पानांच्या बगलेतून एकएकटी येतात. फुलांचे देठ मजबूत व १·७५ ते २·५ सेंमी. लांब असतात. संवर्त फळाच्या तळाशी वेढलेला नसतो. पुष्पमुकुट मोठा, पसरट व फिकट पांढरा. फळ मोठे (५–१० सेंमी. व्यासाचे) व देठाच्या बाजूला खोलगट असते. कोवळे फळ हिरवे असते व पक्व फळ रंगाने लाल अथवा पिवळे असून आकाराप्रमाणे त्याचे आखूड (उदा., बुलनोज) व लांब (उदा. एलिफंट्स ट्रंक) असे दोन प्रमुख प्रकार आहेत. फळाच्या आडव्या छेदात त्याचे कोनीय स्वरूप स्पष्ट दिसून येते. साल जाड असून सौम्य प्रमाणात तिखट असते. गर जाड असून तो क्वचितच तिखट असतो व त्यात पुष्कळ बिया असतात. हवामानाप्रमाणे हे झाड वर्षायू अगर द्विवर्षायू (एक वा दोन हंगामांत जीवनचक्र पूर्ण करणारे) असते. डोंगराळ भागात या मिरचीची मर्यादित प्रमाणात लागवड होते. या मिरचीचा उपयोग मुख्यतः भाजीसाठी व थोड्या फार प्रमाणात कोशिंबीर व लोणच्यासाठी करतात. वर्ल्डबीटर, बेल पेपर, आर ४४९ , धारवाड स्थानिक, कॅलिफोर्नीया वंडर व चायनीज जायंट हे या मिरचीचे प्रकार प्रसिद्ध आहेत.
लवंगी मिरची : (हिं. लोंग का मिरच, गाक मरिच गु. मर्चु इं. बर्ड्स आय चिली, बर्ड पेपर लॅ. कॅ. फ्रुटेसेंस). ७५ सेंमी. पासून २ मी. पर्यंत उंच वाढणारी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वनस्पती झुडपासारखी वाढते. फांद्या कोनीय असून पाने रुंद, अंडाकृती व टोकाकडे निमुळती, बहुधा सुरकुत्या असलेली व काहीशी लवदार असतात. फुले दोन अगर जास्त संख्येने एकत्र येतात. फुलांचे देठ बारीक व २·५ ते ५ सेंमी. लांब असतात. संवर्त फळाच्या तळाशी वेढलेला आणि पेल्याच्या आकाराचा असतो. पुष्पमुकुट पांढरा वा हिरवट पांढरा. फळे लहान (१२ ते २५ मिमी. लांबीची), लाल शंकूच्या आकाराची व फार तिखट असून त्यात पुष्कळ बिया असतात. ही मिरची उष्ण कटिबंधात जंगली अथवा अर्धजंगली अवस्थेत आणि कोठे कोठे मर्यादित प्रमाणात लागवडीत आढळून येते. लागवडीत १ ते २ वर्षांनंतर झाडांची वाढ खुरटते.
या मिरचीत कॅप्सिसिनाचे प्रमाणे पुष्कळ असते (सर्वसाधारणपणे ०·२% व क्वचित प्रसंगी १ टक्क्यापर्यंत). आफ्रिकेतील सिएरा लिओन व झांजीबार (टांझानिया) येथून या मिरचीचा पुरवठा होतो.
संशोधन : भारतात मिरचीसंबंधी खालील ठिकाणी संशोधन होते : (१) भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली (२) मिरची संशोधन केंद्र, पो. लाम, जि. गुंतूर (आंध्र प्रदेश) (३) मिरची संशोधन केंद्र कोविलपट्टी, तामिळनाडू (४) तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईमतूर (५) गोविंद वल्लभ पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर (उत्तर प्रदेश).
पहा : मसाले.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials , Vol. 2. Delhi, 1950.
2. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1966.
3. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khuspe, V. S. Crop production and Field Experimenation, Poona, 1972.
जोशी, रा. ना., महल्ले, प्र. शे. रुईकर, स. के. गोखले, वा. पु.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..