मितानी संस्कृति: उत्तर मेसोपोटेमियाच्या उत्तर भागातील इंडो-इराणी जमातीचे साम्राज्य. ते टायग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यांत इ.स.पू. १७०० ते इ.स.पू. १३६० दरम्यान टिकून होते. त्याचा पूर्वेकडे विस्तार किर्कूक आणि झॅग्रॉस पर्वत व पश्चि मेकडे ॲसिरियापासून भूमध्य समुद्रापर्यंत झाला होता. वॅसक्कनी ही त्यांची राजधानी खाबू र (होबोर) नदीच्या काठी होती. प्रारंभी इतिहासतज्ञांना ह्यांचे अस्तित्व अज्ञातच होते. परंतु ईजिप्तमधील टेल-एल-अमार्ना आणि मेसोपोटेमियातील बोगाझकई या दोन ठिकाणी जी फार मोठी दप्तरे गवसली,त्यांतील मृत्पात्रे व लेख यांवरून त्याजविषयी माहिती उपलब्ध झाली. अमार्ना येथील दप्तरात त्यांचा ईजिप्तच्या राजांशी झालेला पत्रव्यवहार, तहनामे, राजकीय संबंध यांची माहिती मिळते,तर बोगाझकई लेखांवरून वंश, भाषा इत्यादींवर प्रकाश पडतो. या भागातील मूळ रहिवासी सेमेटिक व हुरियन होते. इ.स.पू. १७०० च्या आसपास उत्तर वा ईशान्य दिशेकडून मितानींचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण झाले व त्यांनी आपली सत्ता या भागात बसविली. मूळ आर्यांच्या एका टोळीतील हे लोक असून दुसरी टोळी भारतात शिरली. इ.स.पू. १४७५ मध्ये ॲसिरियाचा सर्व भाग मितानींच्या ताब्यात आला. पुढे ईजिप्त आणि हिटाइट अशा दोघांच्या कात्रीत मितानी सत्ता सापडलेली दिसते. दोघांनाही विरोध करून आपले स्वातंत्र्य त्यांनी कायम ठेवले,तरी ईजिप्तकडून मोठ्या प्रमाणावर सुवर्णरूपाने खंडणी घेऊन हिटाइट लोकांना अडविण्याचे काम मितानींनी केले. या झटपटीतील मितानींचा प्रमुख राजा सौस्टातर (कार. इ.स.पू. १५००–१४५०) होता. त्याने अशूरचा राजवाडा लुटला. तिसरा आमेनहोतेप (इ.स.पू. १४४५–१३७२) याच्या नंतर ईजिप्तची लष्करी सत्ता कमकुवत झाल्यावर मितानींनी हिटाइट राजांचे मांडलिकत्व पत्करले. मितानींचा अखेरचा स्वतंत्र राजा तुश्रत (मृत्यु इ.स.पू. १३६०). त्याच्या वे ळी हिटाइटांनी त्यांची राजधानी वॅसक्कनी लुटली. तुश्रतचा नंतर खून झाला. त्यानंतर त्याचा मुलगा मट्टिवझा याने परकीयांची मदत घेऊन काही वर्षे राज्य केले पुढे हिटाइट व नंतर ॲसिरियन सत्ता मितानींवर प्रस्थापित झाली. पश्चि म आशिया आणि भारत या भागात आर्यां चे आगमन व स्थलांतरे या दृष्टीने मितानींच्या दप्तरांना फार महत्त्व आहे. हे लोक केवळ आर्य वंशीय व भाषिक होते एवढेच नव्हे,तर मित्र,वरुण,इंद्र इ. आर्याच्या देवतांचे पूजकही होते. म्हणजेच इराण आणि भारत येथे आलेल्या आर्यांचे ते पूर्वज किंवा निकटचे आप्त असावेत. मितानी दप्तरांच्या साहाय्यानेच भारातातील आर्यांच्या आगमनाचा, तसेच ऋग्वेद काळाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न काही तज्ञांनी केला आहे.
संदर्भ :Durant, Will,Our Oriental Heritage, New York, 1939.
माटे, म.श्री.