भारतीय विनियोग केंद्र : फेब्रुवारी १९६१ मध्ये या केंद्राची एक स्वायत्त सेवा संस्था म्हणून नोंद करण्यात आली. भांडवल निर्यात करू शकणाऱ्या अथावा तंत्रज्ञान पुरवू शकणाऱ्या प्रगत देशांतील कंपन्यांना भारतातील औद्योगिक परिस्थितीसंबंधी, तसेच शासनाच्या धोरणासंबंधी माहिती पुरवून, भारतीय उद्योगधंद्यांत गुंतवणूक करण्यासाठी परदेशी उद्योगसंस्थांना प्रोत्साहन देणे, हा या संस्थेच्या स्थापनेमागील भारत सरकारचा प्रमुख हेतू होता. भारतीय अर्थव्यवस्थेला पोषक होईल अशा दृष्टीने परकीय भांडवलाचा सहभाग व्हावा म्हणून या केंद्रामार्फत सर्वेक्षण करून एतद्देशीय व परकीय उद्योगधंद्यांना मार्गदर्शन करणे, हे या केंद्राचे एक प्रमुख कार्य आहे.

केंद्राची न्यूयॉर्क, लंडन, ड्युसेलडॉर्फ व टोकिओ या प्रमुख शहरांत कार्यालये तसेच भारतातील नवी दिल्ली (प्रमुख कार्यालय), अलाहाबाद, चंडीगढ, भोपाळ, कलकत्ता, मद्रास अशा मोठ्या शहरांत क्षेत्रीय कार्यालये उघडण्यात आली. भारतीय उद्योजकांना परदेशांतील तंत्रज्ञानाची क्षेत्रे, भांडवलाची उपलब्धता इ. बाबींसंबंधी माहिती पुरविण्यासाठी ही कार्यालये उघडण्यात आली. मात्र अलीकडे महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणूक निगमासारख्या (सिकॉमसारख्या) राज्यपातळीवरील गुंतवणूक संस्थामार्फत अशा सेवा उपलब्ध होऊ लागल्यामुळे केंद्राची भारतातील क्षेत्रीय कार्यालये बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने १९८१-८२ मध्ये घेतला.

या केंद्राच्या घटनेनुसार संस्था सेवाभावी आहे, म्हणून नफ्याच्या उद्देशाने ती कामकाज करीत नाही. तसेच ती स्वायत्त असूनही शासकीय कार्यपद्धतीपासून मुक्त आहे असे नाही उद्योग व वित्त मंत्रालयांच्या कामकाजांचा ठसा या केंद्रावर बराच आहे असे आढळते.

केंद्राची न्यूजलेटर नावाची एक मासिक माहितीपत्रिका प्रसारित करण्यात येते. या पत्रिकेत भारत सरकारने अगोदरच्या महिन्यात दिलेले नवीन उद्योग परवाने, तंत्रज्ञानाकरिता परकीय उद्योगसंस्थांशी केलेले करार, औद्योगिक धोरणांतील बदल, वित्तीय संस्थांची धोरणे अशा औद्योगिकीकरणाशी संबंधित भिन्न बाबींसंबंधी सविस्तर माहिती दिली जाते. केंद्रमार्फत गेल्या वीस वर्षांत अनेक माहितीपुस्तिक प्रसारित करण्यात आल्या आहेत.

अलीकडे प्रकाशित केलेल्या प्रसारसाहित्यात उद्योगधंद्यांसंबंधी वाव आणि मार्गदर्शिका, सार्वजनिक उपक्रमांना साहाय्यभूत होऊ शकणारे उद्योग, कर आणि संबंधित सवलती, कामगारविषयक कायदे, परकीय गुंतवणुकीसंबंधी केंद्र शासनाने धोरण अशा विविध पुस्तिकांचा समावेश आहे. भारतीय उद्योजकांनी आशिया आणि आफ्रिका खंडांतील अविकसित देशांत भांडवलाची आणि तंत्रज्ञानाची निर्यात करण्यास गेल्या सात-आठ वर्षांत सुरुवात केली आहे. अशा उद्योगांसंबधीही माहिती-पुस्तिका काढण्यात आल्या असून त्यांचा प्रसार आशियाई देशांत करण्यात येतो.

पटवर्धन, व. श्री.