भारतीय वातावरण वैज्ञानिक खाते : भारतीय वातावरणवैज्ञानिक सेवा ही आशिया खंडातील व जगातील आवश्यक सेवांमधील एक जुनी व महत्त्वाची सेवा आहे. भारतीय वातावरण-वैज्ञानिक खात्याने १९७६ साली आपली शताब्दी साजरी केली.

भारतात दैनिक वातावरणवैज्ञानिक निरीक्षणांची पद्धतशीर नोंद करण्याचे कार्य मद्रास, मुंबई, त्रिवेंद्रम व कलकत्ता या इलाख्यंच्या राजधान्यांत अनुक्रमे १७९६, १८४१, १८४२ व १८५३ साली सुरू झाले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या एक आदेशानुसार १८५१ नंतर लष्करी वैद्यकीय मंडळाच्या देखरेखीखाली बेळगाव, महाबळेश्वर, पाचगणी, पुरंदर, पुणे, डीसा, अहमदनगर, नीमच, नसीराबद, हैदराबाद, झांझिबार, मस्कत व कराची येथे वातावरणवैज्ञानिक वेधशाळा स्थापिल्या गेल्या.

 भारतात मद्रास (१७९२), मुंबई (कुलाबा, १८२३) व त्रिवेंद्रम (१८३६) येथे क्रमाक्रमाने स्थापन झालेल्या खगोलीय वेधशाळांत कालांतराने चुंबकीय व वातावरणीय निरीक्षणे करण्यासही प्रारंभ झाला. सिमला येथे वातावरणीय व भूचुंबकीय वेधशाळा १८४१ मध्ये स्थापन झाली पण १८५५ मध्ये ती बंद करण्यात आली. बंगालमध्ये पहिली वातावरणवैज्ञानिक वेधशाळा कलकत्ता (पार्क स्ट्रीट) येथे १८२९ मध्ये स्थापन झाली. १८७४ पर्यंत ब्रिटिश अंमलाखालील भारतात ७७ वेधशाळा स्थापन करण्यात आल्या होत्या. ठराविक वेळी वातावरणवैज्ञानिक निरीक्षणे करणे, वादळांच्या किंवा बिघडलेल्या हवामानासंबंधी सूचना देणे एवढेच त्यांचे काम असे.

स्थापना, विस्तार व विकास : १८६४ च्या ऑक्टोबर महिन्यात एक उग्र उष्ण कटिबंधीय चक्री वादळाने खास कलकत्त्यालाच (तत्कालीन ब्रिटिश राजवटीच्या राजधानीलाच) धडक दिली. त्या वेळी आलेल्या हुगळी नदीच्या पुरामुळे ८०,००० पेक्षा अधिक लोक मृत्यु पावले. त्याच्या पाठोपाठ आलेल्या दुसऱ्या चक्री वादळाने मच्छलीपट्टनमच्या परिसरातील ४०,००० पेक्षा अधीक लोकांचा बळी घेतला आणि अनेक जहाजांची वाताहत झाली. १८६६ साली बंगाल-ओरिसामध्ये भयंकर दुष्काळ पडला आणि भारताची त्या वेळेची वातावऱणवैज्ञानिक यंत्रणा अत्यंत अपुरी पडते, याची राज्याकरत्यांना जाणीव झाली. वादळांच्या आगमनाच्या पूर्वसूचना मिळाव्यात, कृषी उत्पादनाला व त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांना मार्गदर्शक होतील असे ऋतुकालिक पावसाचे अंदाज आगाऊ उपलब्ध व्हावेत ह्या हेतूने तत्त्कालीन भारत सरकारने सिमला येथे १८७५ मध्ये भारतीय वातवरणवैज्ञानिक खाते स्थापन केले. इतर प्रांतांतील व संस्थानांतील सर्व वेधशाळा या मध्यवर्ती संघटनेला जोडण्यात आल्या. या सर्व वेधशाळांनी ठराविक वेळी केलेली निरीक्षणे हवामान स्थितिनिदर्शक नकाशांवर विशिष्ट संकेतावलीनुसार नोंदण्याचे काम प्रथम १८७७ मध्ये सुरू झाले. सिमला येथे संपूर्ण भारताच्या विविध भागांतील हवामानाचा व जलवायुमानाचा (दीर्घकालीन सरासरी हवामानाचा) सूक्ष्म अभ्यास करणे, नद्यांतील व सागरी दळणवळणाला उपयुक्त होतील या उद्देशाने वादळांच्या किंवा विघातक वातावरणीय आविष्कारांच्या पूर्वसूचना देणे व दैनिक हवामानाचे अंदाज वर्तविणे ही या खात्याची सुरुवातीची कामे होती. एच्. एफ्. ब्लॅनफोर्ड हे या खात्याचे पहिले प्रमुख अधिकारी होते. ब्लॅनफोर्ड व पुढे ⇨ जॉन एलियट यांनी अनेक वातावरणवैज्ञानिक निरीक्षणांचे विश्लेषण करून चक्री वादळांचे व चक्रवातांचे गमनमार्ग आणि भारताच्या विविध भागांतील पर्जन्यमानाची अभिलक्षणे यांसंबंधी अनेक वैज्ञानिक टिपणे व संस्मरणिका प्रसिद्ध केल्या.

कालांतराने भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याचे कार्यक्षेत्र वाढू लागले. प्रदीर्घ अवर्षणकाल, वारंवार पडणारे दुष्काळ, महापूर, तीव्र भूकंप, उग्र उष्णतेच्या व कडक थंडीच्या लाटा, विध्वंसक चक्री वादळे यांसारख्या नैसर्गिक आविष्कारांमुळे भारताचे निरनिराळे भाग जसजसे आपत्तिग्रस्त होऊ लागले, तसतसा त्या समस्यांना तोंड देण्याच्या उद्देशाने नवनवीन शाखा-उपशाखांचा आणि संदेशवहन व दळण-वळणाच्या साधनांचा या खात्यात समावेश करण्यात आला. नैऋत्य मॉन्सूनचे वारे भारतात कशा रीतीने प्रवेश करतात याबद्दलच्या अभ्यासाला प्रथम सुरूवात १८७८ मध्ये झाली. त्यासाठी भारतातील ५१ वेधशाळांनी सकाळी १० वाजता केलेली वातावरणवैज्ञानिक निरीक्षणे तारायंत्रांच्या साहाय्याने सांकेतिक आकड्यांच्या स्वरूपात सिमला येथील मुख्य हवामान कार्यालयात पाठविण्याची सोय करण्यात आली. १५ जून १८७८ रोजी अशा निरीक्षणांच्या तारा सिमल्यात येण्याला प्रारंभ झाला. या वृत्ताला जोडण्यात येणारा भारताचा पहिला हवामान स्थितिनिदर्शक नकाशा १३ ऑक्टोबर १८८७ रोजी मुद्रित केला गेला.

यानंतर १८८० मध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवरील बंदरांना वादळांपासून उद्‌भवणाऱ्या धोक्यांची सूचना देणारी यंत्रणा अस्तित्वात आली. १८८५ मध्ये निरनिराळ्या जिल्हाधिकाऱ्यांना व संस्थानांतील राजकीय प्रतिनिधींना काही ठिकाणांच्या बाबतीत संभाव्य अतिवृष्टीच्या पूर्वसूचना आणि अतिवृष्टीचे विद्यामान आकडे तारायंत्रांकरवी कळविण्याची खास सोय करण्यात आली. अनेक ठिकाणी प्रमाणित पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली. अनेक संस्थानात वातावरणवैज्ञानिक वेधशाळा स्थापिल्या गेल्या. ठिकठिकाणी पडणाऱ्या पावसाचे अहवाल तयार करण्याचे शिक्षण निरीक्षकांना दिले गेले. लगतच्या देशांमध्येही काही तुरळक ठिकाणी वेधशाळा स्थापण्यात आल्या. इराण, भारत आणि उत्तर ब्रह्मदेश यांतील सर्व वेधशाळांवर सिमला येथील वेधशाळा प्रमुखांची देखरेख असे. वादळी धोक्यांच्या सूचना देण्याचे एकविध तंत्र १८९८ मध्ये अंमलात आणले गेले. आसाममध्ये १८७९ साली झालेल्या भयंकर भूकंपानंतर पुढल्याच वर्षी अलीपूर (कलकत्ता), कुलाबा (मुंबई) व मद्रास येथे भूकंपवैज्ञानिक वेधशाळा स्थापण्यात आल्या. १८४६ पासून काम करणारी कुलाबा येथील भूचंबकीय वेधशाळा, मद्रास येथील खगोलीय वेधशाळा व कोडईकानल येथील खगोलभौतिकीय व खगोलीय वेधशाळा या सर्वांचा एप्रिल १८९९ मध्ये वातावरणवैज्ञानिक खात्यात समावेश करण्यात आला. भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याने स्थापन केलेल्या भूकंपवैज्ञानिक वेधशाळांची संख्या १९७७ च्या सुमारास ३६ होती.

वेधशाळांचे जाळे : पृष्ठभागीय वेधशाळांनी केलेल्या वातावऱणवैज्ञानिक निरीक्षणांच्या जोडीला उच्च वातावरणाच्या गुणधर्मांचेही ज्ञान असणे आवश्यक असते. या उद्देशाने हायड्रोजन वायूने भरलेले फुगे उच्च वातावरणात सोडून त्यांच्या साहाय्याने उपरि-वाऱ्यांचा (विविध उंचीवरील वातावरणाच्या थरांतील वाऱ्यांचा) वेग व दिशा मोजणाऱ्या काही वेधशाळा १९१२ मध्ये स्थापन केल्या गेल्या. वातावरणातील विविध उंचींवरील थरांचा दाब, तापमान व आर्द्रता मोजणाऱ्या ‘रेडिओसाँड’ वेधशाळा आणि अधिक उंचीवरील थरांतील वाऱ्यांचा वेग व दिशा रेडिओ तरंगांच्या साहाय्याने मोजणाऱ्या ‘रेविन’ वेधशाळा १९४३ पासून स्थापन होऊ लागल्या. वादळांचे वेध घेणारी रडारसारखी अद्यायावत साधनेही प्रमुख विमानतळांव व भारतीय किनारपट्टीवरील अनेक वेधशाळांत बसविली गेली. काही ठिकाणी ओझोनाचे आणि सल्फर डाय-ऑक्साइडाचे वातावरणातील प्रमाण मोजण्यात येऊ लागले.


 भारतात १९७७ च्या सुमारास ५०० पेक्षा अधिक पृष्ठभागीय वेधशाळा, फुग्यांच्या साहाय्याने उपरि-वाऱ्यांचा वेग व दिशा मोजणाऱ्या ६१ वेधशाळा, १९ रेडिओसाँड वेधशाळा आणि २८ रेविन वेधशाळा दिवसाच्या काही ठराविक वेळेला वातावरणवैज्ञानिक निरीक्षणे नोंदण्याचे कार्य करीत होत्या. विमानवाहतुकीला मदत करण्याच्या उद्देशाने भारतातील १० प्रमुख विमानतळांवर रडार यंत्रणा प्रस्थापित केली गेली आहे. याशिवाय ५८ ठिकाणी दर तासाच्या किंवा अर्ध्या तासाच्या अंतराने सातत्याने वातावरणवैज्ञानिक निरीक्षणे केली जात आहेत. ह्या निरीक्षणांचा जहाजे व विमाने यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी उपयोग केला जातो. पृथ्वीवरील हवामानाचे वेध घेणारे निंबस, एसा इ. विविध वातावरणवैज्ञानिक कृत्रिम उपग्रह १९६२ सालानंतर पृथ्वीभोवतीच्या कक्षांत सोडण्यात आलेले आहेत [⟶ उपग्रह, कृत्रिम]. ठराविक कालांतराने ते पृथ्वीवर ढगांची चित्रे पाठवीत असतात. भारतात पाच ठिकाणी अशी चित्रे ग्रहण करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेथे स्वयंचलित चित्र-प्रेषणाची यंत्रणाही बसविण्यात आलेली आहे. नवी दिल्ली व पुणे येथील कर्मशाळांत विविध प्रकारची वातावरणवैज्ञानिक उपकरणे तयार करण्यात येतात.

सार्वजनिक सेवेसाठी वातावरणाविज्ञानाचा उपयोग : मानवी व्यवहाराच्या विविध अंगोपांगांशी हवामानाचा सातत्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संबंध येत असतो. भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषी उत्पादन बहुतांशी स्थानिक हवामानावर व जलवायुमानावर अवलंबून असते. हवाई, जलीय व भूमार्गी वाहतूक, विविध मैदानी खेळ व उघड्यावरील करमणुकीचे कार्यक्रम, गिर्यारोहण इत्यादींवर प्रतिकूल हवामानाचा अनिष्ट परिणाम होतो. हवामानाच्या विविध विघातक आविष्कारांची पूर्वानुमाने किंवा आगाऊ सूचना देऊन जनतेला सावध करणे व प्रतिकूल हवामानामुळे उद्‌भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यास तयार करून प्राणहानी व वित्तहानी टाळणे हे भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्यातील वातावरणविज्ञांचे मुख्य कर्तव्य असते. दैनंदिन मानवी व्यवहार सुरळीत चालावेत म्हणून आगामी दोन दिवसांचे हवामानाचे अंदाज भारतातील अनेक वातावरणवैज्ञानिक कार्यालये दररोज प्रसिद्ध करीत असतातच.

  गेल्या शंभर वर्षात केलेली असंख्य निरीक्षणे भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याने संग्रही ठेवली आहेत. त्यांच्या अभ्यासाने कोणत्याही ठिकाणच्या जलवायुमानाविषयी स्थूल माहिती मिळवून धरणे कोठे व कशा रीतीने बांधावीत, त्यांचा आकृतिबंध कसा असावा, विमानतळ कोठे उभारावेत, त्यांच्या धावपट्टीची दिशा कोणती असावी, जहाजांचे व विमानांचे कोणते मार्ग सुरक्षित आणि कमी खर्चाचे होतील, नवीन औद्योगिक प्रकल्प कोठे उभारावित व त्यातील कामगारांच्या वसाहती प्रकल्पांच्या कोणत्या दिशेने बांधाव्यात, कोणत्या भागात कोणती पिके काढावीत, हवामानानुरूप आरोग्यकेंद्रे कोठे काढावीत यांसारख्या लोककल्याणकारी योजनांना मूर्त स्वरूप देता येते. स्वातंत्र्यानंतरच्या नियोजनकालात भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याने याबाबतीत फार महत्वाचे कार्य केले असून अनेक योजना यशस्वी करण्यात बहुमोल साहाय्य केले आहे.

कार्य : वादळी धोक्याच्या पूर्वसूचना :  समुद्रावर निर्माण होणाऱ्या विध्वंसक वातचक्रांचा वेध घेण्यासाठी मुंबई, कलकत्ता, मद्रास, विशाखापट्टनम् आणि भुवनेश्वर येथे चक्री वादळांची पूर्वसूचना देणारी केंद्रे स्थापन केलेली आहेत. त्यासाठी वातावरणवैज्ञानिक कृत्रिम उपग्रह व वादळ-अभिज्ञातक (वादळाचे अस्तित्व ओळखणारे) रडार यांसारख्या अद्ययावत साधनांची मदत घेण्यात येत आहे. समुद्रात चक्री वादळ निर्माण झाल्याचे दिसताच समुद्रावर भ्रमण करणाऱ्या जहाजांना, बंदरांना व मच्छीमारीसाठी किनाऱ्यापासून दूर समुद्रावर गेलेल्या कोळ्यांना सावध करण्यात येते. चक्री वादळ किनाऱ्यावर थडकून तो पार करून जमिनीवर जाऊन क्षीण होईपर्यंत ठराविक कालांतराने तीव्रतर झंझावाती वारे, मुसळधार पाऊस व सीमित दृश्यमानता यांबद्दलच्या धोक्याच्या सूचना बंदराच्या अधिकाऱ्यांना देण्यात येतात. किनारपट्टीवरील अनेक ठिकाणी विशिष्ट संकेतावलीप्रमाणे वादळाची तीव्रता दर्शविणारे बावटे (शंकू व दंडगोल दिवसा दिसावेत म्हणून व एकाखाली एक असणारे तीन कंदील रात्री दिसावेत म्हणून) उंच खांबावर लावण्यात येतात. वादळाबद्दलची नवीन माहिती व धोक्याच्या सूचना रेडिओ केंद्रावरून दिवसातून अनेकदा प्रेषित करण्यात येतात. [⟶ नाविक वातावरणविज्ञान]. 

अतिवृष्टी व माहपुराच्या धोक्याचे इशारे : नदीच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने दीर्घकाळपर्यंत अतिवृष्टी झाल्यास पूर येऊन शेतातील पिकांना अपाय संभवतो. अतिवृष्टीची सूचना काही काळ अगोदर मिळाल्यास शेतकरी वेळीच पूरप्रतिबंधक उपाय योजून भावी नुकसान टाळू शकतो. यासाठी आगामी पर्जन्याची परिमाणतात्मक मूल्ये निश्चित करणारी वातावरणवैज्ञानिक कार्यालये नवी दिल्ली, लखनौ, भुवनेश्वर, गौहाती, अहमदाबाद, जलपैगुरी व पाटणा या सात ठिकाणी स्थापन केलेली आहेत. या कार्यात त्यांना केंद्रीय जल व शक्ती आयोगाच्या जलविज्ञांची व अभियंत्याची मदत मिळते. या सर्वांच्या साहाय्याने भारतातील अनेक नद्यांच्या खोऱ्यांत पडणारा पाऊस व त्यामुळे उद्‌भवणारे पूर यांच्या सहसंबंधांबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली आहे. भावी पर्जन्यांची राशिमूल्ये निश्चित करण्याची नवीन तंत्रेही उपलब्ध झालेली आहेत.

कृषिकार्यात मदत : हवामानाच्या अंदाजांचा खरा उपयोग भारतातील शेतकरी करून घेतात. त्यांच्यासाठी हवामानाच्या विशेष विवरणपत्रिका तयार करण्यात येतात. पिके वाढताना त्यांच्या वेगवेगळ्या अवस्थांत हवामानाच्या विशेष गरजा असतात. त्या ध्यानात ठेवूनच शेतकऱ्यांसाठी हवामानाच्या अंदाजांच्या विवरणपत्रिका भारतातील ५५ रेडिओ केंद्रांवरून २२ भाषांत दररोज प्रेषित केल्या जातात. कृषिकार्यांतील अनेक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी पुणे येथे कृषी वातावरणवैज्ञानिक विभाग १९३२ मध्ये स्थापन केला गेला आहे. [⟶ कृषि वातावरणविज्ञान].

वैमानिक वाहतुकीचे मार्गनिर्देशन : वैमानिक वाहतुकीची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि नियमितता मोठ्या प्रमाणात हवामानाच्या विविध घटकांवर व हवामानाच्या अंदाजांवर अवलंबून असते. भारतातील प्रत्येक विमानतळावर एक वातावरणवैज्ञानिक कार्यालय प्रस्थापित केलेले आहे. विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या वैमानिकाला त्याच्या मार्गावरील नियोजित काळातील प्रत्यक्ष हवामान व त्यात होणारे संभाव्य बदल यांची पूर्ण कल्पना दिल्याशिवाय विमानतळ सोडू दिले जात नाही. [⟶ वैमानिक वातावरणविज्ञान]. 


सार्वजनिक सेवा : भारतातील विविध क्षेत्रांना वातावरणवैज्ञानिक माहिती पुरविली जाते. त्यासाठी नवी दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास व नागपूर या पाच ठिकाणी प्रादेशिक वातावरणवैज्ञानिक केंद्रे प्रस्थापित केली आहेत. या मुख्य कार्यालयांच्या अधिकारकक्षेत येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांना किंवा उद्योगसमूहांना हवी ती मार्गदर्शक वातावरणवैज्ञानिक निरीक्षण-सामग्री पुरविण्यात येते. या मुख्य प्रादेशिक केंद्रांशिवाय जयपूर, गौहाती, लखनौ, बंगलोर, त्रिवेंद्रम, हैदराबाद, अहमदाबाद, भुवनेश्वर, भोपाळ, पाटणा व श्रीनगर येथेही वातावरणवैज्ञानिक कार्यालये स्थापन केलेली आहेत. दैनंदिन हवामानाचे अंदाज आणि प्रतिकूल हवामानाच्या व धोक्याच्या पूर्वसूचना देणे हे त्यांच कार्य असते. हवामानाची ही पूर्वानुमाने स्थानिक रेडिओ केंद्रांवरून प्रसृत करण्यात येतात. बहुतेक सर्व दैनिक वर्तमानपत्रांतून त्यांना प्रसिद्धी देण्यात येते. अतिवृष्टी, द्रुतगती वारे, नीचतम तापमान, चक्रीवादळांचे आगमन इत्यादींसारखे विघातक आविष्कार एखाद्या क्षेत्रावर अपेक्षित असतील, तर त्या क्षेत्रातील तार व दूरध्वनी खात्यातील केंद्रे, रेल्वेची कार्यालये, सार्वजनिक बांधकाम खाते, कालवे व पाटबंधारे प्रकल्प, बंदरे, काही शेतकरी व उद्योगसमूह यांना भावी काळातील प्रतिकूल हवामानासंबंधी धोक्याचे इशारे देण्यासाठी खास तारा पाठविण्यात येतात. हिमालयातील गिर्यारोहकांनाही प्रतिकूल हवामानाच्या बाबतीत सावध करण्यात येते. 

हवामानाची दीर्घावधीची (ऋतुकालिक) पूर्वानुमाने : अनेकदा पावसाची दीर्घावधीची अनुमाने करणे किंवा संपूर्ण पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात पर्जन्यमान कसे राहील, सरासरी पर्जन्यमानापेक्षा हे ऋतुकालिक पर्जन्यमान किती प्रमाणात कमी किंवा अधिक असेल, याची कल्पना असणे भावी योजनांच्या दृष्टीने आवश्यक असते. भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याने जगात प्रथमच १८८४ साली ऋतुकालिक पर्जन्याची अपेक्षित मूल्ये सांख्यिकीच्या (संख्याशास्त्राच्या) साहाय्याने मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भारतातील विविध भागांतील हवामान-परिस्थितीच्या विशिष्ट निरीक्षणांचा उपयोग केला गेला. ह्या पद्धतीत क्रमाक्रमाने अनेक सुधारणा होऊन भारताच्या काही विनिर्दिष्ट क्षेत्रांवर नैऋत्य मॉन्सूनच्या काळात किंवा हिवाळ्यात किती वर्षण होईल, याची विश्वासार्ह पूर्वानुमाने देण्यात बरेच यश संपादण्यात आले आहे.

राष्ट्रीय अभिलेखागार : अनेक वेधशाळांनी केलेली विविध प्रकारची वातावरणवैज्ञानिक निरीक्षणे पुणे येथील मुख्य कार्यालयात आधुनिक पद्धतींनी साठवून ठेवली आहेत. हे कार्यालय म्हणजे वातावरणवैज्ञानिक निरीक्षणांचे राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून समजण्यात येते. येथे सर्व प्रकारची निरीक्षणे छिद्रित पत्रांवर नोंदली जातात. अशी सु. अडीच ते तीन कोटी छिद्रित पत्रे तयार करून साठविण्यात आलेली आहेत. त्यांत १८९१ पासूनच्या सर्व वातावरणवैज्ञानिक निरीक्षणांचा समावेश आहे. जुने आलेख, चित्रे, नकाशे, हवामान-वृत्ते व जुनी पुस्तके सूक्ष्म-छायाचित्रांच्या स्वरूपात सुरक्षित रीतीने जतन करून ठेवण्यात आली आहेत. नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयातही अशी सोय उपलब्ध आहे. पुण्याच्या अभिलेखागारात प्रत्येक वेधशाळेने केलेल्या वातावरणवैत्रानिक निरीक्षणांचे संक्षिप्त सारांश व केवळ पर्जन्यमान मोजण्याऱ्या अनेक वेधशाळांच्या निरीक्षणांचे विश्लेषणात्मक अहवाल तयार करून ठेवले आहेत. या माहितीचा संशोधनासाठी व योजनाबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी उपयोग केला जातो. 

आंतरराष्ट्रीय सहकार्य : १८७८ मध्ये स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय वातावरणवैज्ञानिक संघटनेचा भारत हा एक संस्थापक सभासद आहे. ह्या संघटनेचे १९५१ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाने चालणाऱ्या ⇨ ‘जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटना’ या शाखेत रूपांतर झाले. ह्या संघटनेच्या अनेक शास्त्रीय कार्यक्रमांत व योजनांत भारताने महत्वाचा भाग घेतला आहे. जागतिक हवामान निरीक्षण योजनेनुसार नवी दिल्ली येथे मार्च १९७१ पासून प्रादेशिक वातावरणवैज्ञानिक केंद्र व प्रादेशिक दूरसंदेशवहन केंद्र अशी दोन केंद्रे सुरू झाली आहेत. मॉस्को, टोकिओ, बँकॉक, कैरो आणि मेलबर्न ही शहरे दूरमुद्रण यंत्रणेद्वारा (एका टोकाला संदेश पाठविण्यासाठी टंकलेखन मुद्रफलक आणि दुसऱ्या टोकाला कागदी फितीवर मुद्रित रूपात संदेश ग्रहण करण्याची सोय असलेल्या यंत्रणेद्वारा) नवी दिल्लीशी जोडली गेली आहेत. आग्नेय आशियातील वेधशाळांची वातावरणवैज्ञानिक निरीक्षणे गोळा करून त्यांचे पुनःप्रेषण करणे व ह्या निरीक्षणांवर आधारलेले हवामानस्थितिनिदर्शक नकाशे व आलेख तयार करून ते रेडिओद्वारा प्रेषित करणे ही नवी दिल्ली येथील या दोन केंद्रांची नित्याची कामे आहेत. ह्या कामांसाठी नवी दिल्ली येथे बसविलेल्या संगणकाच्या (गणक यंत्राच्या) साहाय्याने विविध वातावरणीय निरीक्षणांचे विश्लेषण करून संख्यात्मक पद्धतींनी कोणत्याही क्षेत्रावरील भावी हवामानाचे अंदाज व पूर्वकथन करता येते. अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांशिवाय आंतरराष्ट्रीय नागरी वैमानिकी संघटनेच्या आदेशानुसार आग्नेय आशियातील शहरांचे विमानतळ आणि मध्यपूर्वेतील शहरांचे विमानतळ यांच्या दरम्यान उड्डाण करणाऱ्या सर्व विमानांना त्यांच्या मार्गांवरील हवामानाची आगाऊ कल्पना देण्यासाठी नवी दिल्ली येथे एक खास वातावरणवैज्ञानिक कार्यालय (क्षेत्रीय हवामान पूर्वकथन केंद्र) स्थापन केले गेले आहे.

रशियाच्या सहकार्याने १९७३ आणि १९७७ मध्ये भारताने नैऋत्य मॉन्सूनसंबंधीच्या संशोधनात महत्वाची कामगिरी बजावली [⟶ मॉन्सून वारे]. याच्या अगोदर १९५७-५८ मध्ये ⇨ आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्ष व १९६४-६५ मध्ये आंतरराष्ट्रीय शांत (क्षोभरहित) सौर वर्ष या कालखंडांतही भारताने महत्वाची महत्वाची वातावरणीय निरीक्षणे केली. १९६१-६५ मध्ये आंतरराष्ट्रीय हिंदी महासागर मोहिमेत अनेक भारतीय व अमेरिकन वातावरणविज्ञांनी महत्त्वाचे कार्य केले. १९६५ – ७४ हे आंतरराष्ट्रीय जलवैज्ञानिक दशक आणि १९७२ चे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम वर्ष या कालावधीत भारतीय वातावरणविज्ञांनी उल्लेखनीय कार्य केले. त्याचप्रमाणे १ मे १९७९ ते ३१ ऑगस्ट १९७९ पर्यंतच्या १२३ दिवसांच्या कालखंडांत जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटना (इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्स) यांच्या प्रेरणेने आखल्या गेलेल्या ‘मोनेक्स’ या मॉन्सूनसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पात अनेक प्रयोग केले गेले. भारताने त्यात महत्त्वाचे सहकार्य केले. यांखेरीज इतर अनेक आंतरराष्ट्रीय योजनांत व कार्यक्रमांत भारतीय वातावरणविज्ञ महत्त्वाचे काम करीत आहेत. विकसनशील राष्ट्रांतील वातावरणवैज्ञानिक कर्मचाऱ्यांना भारतीय वातावरणविज्ञ आवश्यक ते प्रशिक्षण देऊन वातावरणवैज्ञानिक निरीक्षक व अधिकारी वर्ग तयार करीत आहेत. पुणे येथील प्रशिक्षण शाखेत १९४१-६८ या कालावधीत भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याच्या कर्मचाऱ्यांना आणि राजपत्रित अधिकाऱ्यांना तसेच भारतीय नौसेनेच्या व वायुसेनेच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रशिक्षण दिले जात असे. या शाखेचे १९६९ पासून वातावरणवैज्ञानिक प्रशिक्षण विभागात रूपांतर करण्यात आले आहे. येथे आग्नेय आशियातील देशांमधील वातावरणवैज्ञानिक अधिकाऱ्यांनाही निरीक्षणे करण्याचे व हवामानाचे पूर्वकथन करण्याचे शिक्षण देऊन वातावरणविज्ञानात संशोधन करण्यासाठी तयार केले जात आहे.

भारतबाहेरील व भारतातील गिर्यारोहकांच्या अनेक पथकांना भावी हवामानाचे अंदाज देऊन त्यांच्या गिर्यारोहणाच्या कार्यक्रमात बहुमोल मदत भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याने केलेली आहे.

त्रिवेंद्रमजवळ थुंबा येथे रॉकेट क्षेपण केंद्र प्रस्थापित करण्यात भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याने महत्वपूर्ण मदत केली आहे.रॉकेट अंतराळात सोडण्यापूर्वी अनेक वातावरणीय निरीक्षणे करणे आवश्यक असते आणि त्यासाठी थंबा येथे एक खास वातावरणवैज्ञानिक वेधशाळा उभारली आहे. येथील रॉकेट क्षेपणांमुळे बऱ्याच प्रमाणात वातावरणवैज्ञानिक माहिती उपलब्ध झालेली असून तिची इतर देशांशी देवाणघेवाण केली जाते. 


भारतातील ५५ निवडक वेधशाळांची पर्जन्य, सापेक्ष आर्द्रता, हवेचा दाब व तापमानविषयक निरीक्षणे आणि उपरि-वारे मोजणाऱ्या १४ रेविन वेधशाळांची निरीक्षणे आणि त्यांची मासिक सरासरी मूल्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या हवामान विभागातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या क्लायमेटॉलॉजिकल डेटा ऑफ द वर्ल्ड या नियतकालिकात समाविष्ट केली जातात.

 प्रकाशने : रिजनल डेली वेदर रिपोर्ट, इंडियन डेली वेदर रिपोर्ट, विकली वेदर रिपोर्ट, मंथली वेदर रिपोर्ट अँड ॲन्युअल समरी, इंडियन वेदर रिव्ह्यू, एरॉलॉजिकल डेटा ऑफ इंडिया (मासिक), मौसम (त्रैमासिक) अशा विविध स्वरूपांच्या नियतकालिकांत भारतीय वातावरणवैज्ञानिक खाते देशभर केलेली वातावरणवैज्ञानिक निरीक्षणे व त्यांवर आधारलेले निष्कर्ष प्रसिद्ध करते. या सामग्रीचा संशोधनासाठी व अनेक विकासयोजना आखण्यासाठी उपयोग केला जातो. काही संशोधनात्मक माहिती मेम्वार्स ऑफ द इंडिया मिटिऑरॉलॉजिकल डिपार्टमेंट, सायंटिफिक नोट्स, टेक्निकल नोट्स, मिटिऑरॉलॉजिकल रिव्ह्यूज, सायंटिफिक रिपोर्ट्स यांच्यासारख्या संस्मरणिकात किंवा विवरणपत्रिकांत प्रसिद्ध केली जाते. इंडियन जर्नल ऑफ मिटिऑरॉलॉजी, हायड्रॉलॉजी अँड जिओफिजिक्स आणि क्वार्टरली सिस्मॉलॉजिकल बुलेटिन्स यांसारखी शास्त्रीय त्रैमासिकेही खात्याकडून प्रसिद्ध केली जातात.

  यांशिवाय, भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याने भारताच्या विविध क्षेत्रांवर आढळणारे जलवायुमान, पर्जन्य, उपरि-वारे, वादळांचे गमन-मार्ग, विविध वातावरणवैज्ञानिक वेधशाळांनी केलेल्या निरीक्षणांची माध्य (सरासरी) मूल्ये, त्यांची कोष्टके, हवामान स्थितिनिदर्शक नकाशे, विस्तृत क्षेत्रावरील उपरि-वाऱ्यांचे प्रवाह दाखविणारे अनेक नकाशे इ. पुस्तकरूपाने तसेच वैमानिकांना उपयुक्त व मार्गदर्शक होतील अशी काही पुस्तके, नकाशे व कोष्टके प्रसिद्ध केली आहेत. 

अलीपूर (कलकत्ता) येथील प्रादेशिक वातावरणवैज्ञानिक केंद्राची नाविक पंचांग शाखा व दरवर्षी राष्ट्रीय पंचांग (इंग्रजी, संस्कृत व हिंदीत तसेच मराठी, गुजराती, कन्नड इ. नऊ प्रादेशिक भाषांत) तयार करते आणि ते वेधशाळांच्या महासंचालकांच्या द्वारे नवी दिल्ली येथे प्रसिद्ध करण्यात येते [⟶ पंचांग]. इंडियन एफेमेरिस अँड नॉटिकल अल्मॅनॅक (वार्षिक) व एअर अल्मॅनॅक (वर्षातून दोनदा) ही नियतकालिकेही प्रसिद्ध केली जतात. 

भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याने पुणे व नवी दिल्ली येथे दोन मोठी ग्रंथालये स्थापन केली आहेत. १९७७ मध्ये नवी दिल्ली येथील ग्रंथालयात ६,००० ग्रंथ व १०,००० नियतकालिके आणि पुस्तपत्रे होती पुण्याच्या ग्रंथालयात ५०,००० च्या वर ग्रंथ, नियतकालिकांचे एकत्र बांधलेले खंड, पुस्तपत्रे, विवरणपत्रिका, संस्मरणिका इ. होती. वातावरणवैज्ञानिक जगात पुणे येथील ग्रंथालय हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते.  भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याच्या महासंचालकांचे कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. त्यांना चार उपमहासंचालक मदत करतात. यांपैकी प्रशासन आणि उपकरणे या दोन विभागांचे उपमहासंचालक नवी दिल्लीला असतात. हवामानाचे पूर्वकथन आणि जलवायुविज्ञान व भूभौतिकी या दोन विभागांच्या उपमहासंचालकांची कार्यालये पुणे येथे आहेत. उष्णकटिबंधी वातावरणविज्ञानाचा विशेष अभ्यास करण्याकरिता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिऑरॉलॉजी ही संशोधन संस्था पुणे येथे १९६२ मध्ये स्थापन करण्यात आली असून येथे वातावरणविज्ञानाच्या अनेक शाखांत मूलभूत संशोधन केले जाते. [⟶ उष्णकटिबंधी वातावरणविज्ञान].

संदर्भ : 1. India Meteorological Department, Growth of Meteorology in India and Its Service to Agriculture, New Delhi, 1968.

            2. India Meteorological Department, Hundred Years of Weather Service (1875-1975), New Delhi, 1976.

            3. Ministry of Transport and Communications, Government of India Our Weather Service, New Delhi,1961.

गद्रे, कृ.म. चोरघडे, शं. ल.