भारत – पाकिस्तान संघर्ष : हिंदुस्थानाच्या फाळणीनंतर पाकिस्तानने भारतावर १९४७ ते १९८१ या कालखंडात चार वेळा आक्रमणे करून भारताला आपले सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी युद्धास भाग पाडले. त्यांपैकी दोन युद्धे काश्मीर समस्येवरून, एक भारताची युद्धक्षमता अजमावण्यासाठी व एक बांगला देशाच्या मुक्तीसाठी झाले. 

पहिले युद्ध : (२० ऑक्टोबर १९४७ – १ जानेवारी १९४९). हिंदूस्थानच्या फाळणीची घोषणा ३ जून १९४७ रोजी ब्रिटिश सरकारने केली. फाळणीच्या कार्यक्रमानुसार हिंदूस्थानी संस्थानिकांना त्यांच्या इच्छेनुसार भारतात वा पाकिस्तानात सामील होण्याचे स्वातंत्र्य दिलेले होते व या संदर्भात योग्य ते करार करण्याचा त्यांना अधिकार होता. सिंधू नदीच्या उत्तरेकडील काशमीरचा एक अविभाज्य भाग गिलगिट प्रांत हा ब्रिटिशांनी काश्मीराचे महाराज हरिसिंग यांच्या हवाली केला. जुलै १९४७ मध्ये तेथील मुस्लिमांनी तेथील ब्रिटिश अधिकाऱ्याच्या संमतीने गिलगिट व त्याच्या पूर्वेकडील बल्टिस्तान हा प्रदेश ताब्यात घेतला त्यामुळे काश्मीरच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रदेशावर पाकिस्तानी हुकमत स्थापन झाली. बल्टिस्तानमधील स्कार्डू येथे सिंधू नदीवर पूल बांधण्यात आला. काश्मीरात मुस्लिम हे बहुसंख्याक असल्याने त्याचे पाकिस्तानमध्येच विलीनीकरण करणे अनिवार्य आहे, असे महंमद अली जिनांचे मत होते. १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत हरिसिगांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला नव्हता तथापि त्यांनी पाकिस्तानशी जैसे थे करार केला. भारताला इतर तातडीच्या समस्यांमुळे तसा करार करणे वा त्यासंबंधी विचार करणे शक्य झाले नाही. जुलै -ऑगस्टमध्ये पूंच व मीरपूर प्रांतांत मुस्लिमांनी सशस्त्र उठाव केले. त्यांनी पूंच येथे ‘आझाद काश्मीर’ स्थापले. पूंच-मीरपूरला लागून असलेल्या पाकिस्तानी बाजूकडून त्यांना पठाणांचे माणूसबळ व शस्त्रास्त्रे तसेच पाकिस्तानची मदत व शस्त्रास्त्रे गुप्तपणे मिळू लागली. जैसे थे करारांनतर लगेच पाकिस्तानने काश्मीरची  आर्थिक व वाहतुकी नाकेबंदी केली. ३ सप्टेंबरपासून पाकिस्तानी बाजूकडून काश्मीराच्या पश्चिमी सीमाप्रदेशावर भुरटे हल्ले होण्यास सुरूवात झाली. काश्मीराच्या सेनापतीने या हल्ल्यांचा निषेध पाकिस्तानी उच्च सैनिकी कार्यालयाकडे नोंदविला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे काश्मीरच्या अल्पसंख्याक हिंदू व शीख राजवटीविरूद्ध हे स्वंयप्रेरित उठाव व हल्ले होते तथापि अशाही दडपणाखाली हरिसिंग नमले नाहीत. २० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने पठाणांमार्फत काश्मीरवर उघड आक्रमण सुरू केले. पेशवारपासून निघालेल्या महसूदा अफ्रिडी व वझिरी पठाणांच्या झुंडीने मुझफराबाद गावावर हल्ला केला. सु. ३०० मोटारगाड्यांतून ५,००० पठाण व तथाकथित रजेवर असलेले पाकिस्तानी सैनिक या झुंड – हल्ल्यात होते. आक्रमणांचे मार्ग पुढीलप्रमाणे होते: (१) झेलम नदी खोऱ्यातून मरी-मुझफराबाद, डोमेल-उरी, बारमूल ते श्रीनगर (२) किशनगंगा खोऱ्यातून  मरी मुझफराबाद-टिटवाल-बांदिपूर ते श्रीनगर (३) मरीकोहला-रावळकोट-उरी ते श्रीनगर (४) मीरपूरमार्गे पूंच-रियासी टेकड्यांवरून, पीर पंजाल डोंगरराशीतील बनिहाल घाटमार्गे श्रीनगर (५) मरी ते हाजीपीर घाट (पीर पंजाल डोंगरराशी) – बडगाम ते श्रीनगर, मीरपूरहून पंचूनदी खोऱ्यातून कोटलीमार्गे पंचूकडे आणि (६) झोजी खिंडीतून श्रीनगरकडे. 

पठाणी झुंडीचा व पाकिस्तानी सैनिकांचा नेता पाकिस्तानी खड्या सैन्याचा मेजर जनरल अकबरखान (कृतक नाव ‘तारिक’) हा होता. या झुंडीने २२ ऑक्टोबर १९४७ रोजी मुझफराबाद घेऊन ते उजाड केले. डोमेलपाशी काश्मीरी ब्रिगेडिअर राजींदरसिंग यांनी पठाणी झुंडीचा प्रतिकार केला तथापि काश्मीरी मुसलमान सैनिक फितूर झाल्यामुळे त्यांना लढत लढत उरीपर्यंत माघार घ्यावी लागली. त्यांनी केवळ ११२ सैनिकांच्या बळावर तीन दिवस उरी लढविली. या लढ्यात राजींदरसिंग व त्यांचे बहुतांश सैनिक गारद झाले. राजींदरसिंगच्या या प्रखर प्रतिरोधामुळे श्रीनगर राजधानीचा बचाव झाला. उरीजवळच्या महूरा वीजकेंद्रांचा पठाणांनी नाश केल्यामुळे श्रीनगरचा वीजपुरवठा बंद पडला. २६ ऑक्टोबरला पठाणी झुंडीने बारमूलवर हल्ला करून ३,००० काश्मीरी जनांची कत्तल केली. स्त्रियांवर बलात्कार झाले व अनेक स्त्रिया मृत्यूमुखी पडल्या. मुझफराबाद ते बारमूल या रस्त्यावरील गावांची जाळपोळ, लूटालूट, स्त्रियांवरील बलात्कार करीतच झुंडीने मार्ग पार केला. 

जवाहरलाल नेहरू व गव्हर्नर जनरल माउंटबॅटन यांना काश्मीरांतील या घटनांची पुसट माहिती २४ ऑक्टोबरच्या रात्री मिळाली. २५ ऑक्टोबर १९४७ रोजी सकाळी भारताचा सरसेनापती जनरल रॉबर्ट लोखार्ट  याने, पाकिस्तानी सैनिकी कार्यालयाकडून आलेल्या पठाणी आक्रमणाची माहिती नेहरू व माउंटबॅटन यांना दिली. खबरीची तारीख, वेळ व उगमस्थान युद्ध -घटनांच्या दृष्टीने लक्षणीय ठरते. पाकिस्तानी आक्रमणाची वेळ व महिना असा होता की, काश्मीरचे रक्षण करण्यास भारतास अशक्यप्राय व्हावे थंडीमुळे बनिहाल व इतर घाट संघटित भारतीय सैन्याच्या वाहतुकीस निरूपयोगी ठरावेत हिमवृष्टी सुरू होण्यापूर्वीच झेलम खोरे, श्रीनगर व मीरपूर जिल्हा पाकिस्तानच्या हातात पडेल विशेषतः श्रीनगरच्या पाडावानंतर येथील एकमेव विमानतळावर भारतीय सैन्यांची कुमक उतरविणे अशक्य होईल भारतीय सैन्याला, मग जम्मूहून खुष्की मार्गाने श्रीनगरकडे लढत लढत कूच करावी लागेल, अशी पाकिस्तानी आक्रमकांची अटकळ होती. पाकिस्तानी आक्रमण पूर्वनियोजित होते हे तत्कालीन हंगामी पाकिस्तानी सरसेनापती जनरल ग्रेसी यांनी पुढे उघड केलेल्या माहितीवरून निश्चित होते. ग्रेसीच्या म्हणण्याप्रमाणे २७ ऑक्टोबर १९४७ रोजी जिनांनी त्यांना बारमूल व श्रीनगर काबीज करण्यास, तसेच मीरपूर जिल्ह्यांत सैन्य घुसविण्याची आज्ञा केली होती तथापि ती आज्ञा झिडकारल्याचे ग्रेसी म्हणतात. 

भारत सरकारने २५ ऑक्टोबरला सर्व सेनापतींना , विमानांनी व खुष्की मार्गाने काश्मीरला सैनिकी मदत-आवश्यक झाल्यास-कशी व किती द्यावी, याविषयी विचार करण्याची आज्ञा दिली.सेनापतींनी त्याप्रमाणे चौकशी करून २६ ऑक्टोबरला तातडीची योजना तयार केली. त्याच दिवशी महाराजा हरिसिंग यांनी भारत शासनाकडे भारतात काश्मीर सामील करण्याचा करार समंतीसाठी पाठविला. त्याचबरोबर रीतसर काश्मीर संस्थानचे भारतात विलीनीकरण झाल्याने पाकिस्तानी आक्रमण परतवून लावण्यासाठी त्यांना सैनिकी मदतही मागितली वास्तविक विलीनीकरण झाले नसते, तरीही शेजारील राज्यात चाललेले हत्याकांड व लुटालुट यामुळे भारताच्या सुरक्षिततेला निर्माण झालेल्या धोक्याची भारताला चिंता वाटणे क्रमप्राप्तच होते. काश्मीरच्या विलीनीकरण-करारानंतर व मदतीच्या विनंतीनंतरच सैन्य पाठविण्याचा निर्णय भारत शासनाने घेतला. काश्मीरातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जवळपास उपलब्ध असलेले सैन्य काश्मीरात पाठविण्याचे ठरले. फाळणीकार्य चालू असल्यामुळे, संघटित सेनाबल सज्‍जही नव्हते. काश्मीर-रक्षण समस्या अनपेक्षित असल्याने पक्की युद्धयोजनाही नव्हती. सैनिक दले जसजशी हाताशी आली, तसतशी ती काश्मीरात पाठविणे भाग पडले. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ३२९ सैनिकांची शीख पलटण श्रीनगरकडे विमानांनी रवाना झाली. वायुसेनेची आणि खाजगी नागरी विमाने या अपूर्व वाहतुकीत देशप्रेमाने सहभागी झाली. जगात अशा तोडीचे व त्वरेने केलेले वायुगामी कार्य घडल्याचे आपणास ठाऊक नाही, असे गौरवोद्‌गार माउंटबॅटन यांनी काढले आहेत. श्रीनगर विमानतळावर सैनिकांना निर्विध्नपणे उतरविणे शक्य आहे की नाही, याचीही चिंता होती. बारमूलची लूटमार, जाळपोळ करण्यात पाकिस्तानी दंग झाल्यामुळे, त्यांची श्रीनगरकडे कूच करण्यात दिरंगाई झाली. श्रीनगर तळावर उतरल्यानंतर (२७ ऑक्टोबर १९४७) लगोलग शीख पलटण बारमूलकडे निघाली. संध्याकाळ पडण्यापूर्वी श्रीनगरपासून केवळ ८ किमी. अंतरावर पाकिस्तानी सैन्याशी शिंखांनी लढा देऊन आक्रमण थोपविले. या लढ्यांत शीख पलटणीचे अधिपती कर्नल रॉय ठार झाले. २६ ऑक्टोबर रोजी श्रीनगर येथे जिना नमाज पढणार आहेत, ही आक्रमकांची बढाई फोल ठरली. 


युद्धाच्या सुसूत्रीकरणाकरिता जनरल कलवंतसिंग यांना युद्ध सेनापती नेमण्यात आले. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्य होते, त्या त्या ठिकाणी भारतीय सैन्य पाठविण्यास सुरूवात केली. लढाया डोंगरी प्रदेशात होत असल्याने ⇨ डोंगरी युद्धतंत्राचा त्यांनी अवलंब केला. सैनिकांना युद्धाचा अनुभव होता.झोजी खिंड : भारतीय रणगाड्यांची आगेकूच, १९४७.

सैनिकी दलांचे नेतृत्व तरूण अधिकाऱ्यांनी केले. भारतीय सैन्याने ब्रिगेडिअर एल्‍. पी. सेन आणि कर्नल हरबक्षसिंग यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे श्रीनगर-बारमूल-डोमेलकडे आणि श्रीनगर-बांदिपूर-टिटवालकडे कूच केली. ले.क.प्रीतमसिंग यांच्या पलटणीने उरीकडून पूंचकडे कूच केली. पूंचकडून त्यांनी पाकिस्तानी हद्दीपर्यंत पाकिस्तानी सैन्याचा पाठलाग केला तथापि सैनिकबळ कमी पडल्याने त्यांनी पूंचचा आसरा घेतला. पूंचचा कोंडमारा पुढे एक वर्षभर पाकिस्तानी सैन्याने केला. पूंच वेढा उठविण्यासाठी व मीरपूर जिल्हा निर्वेर करण्यासाठी जम्मूकडून ब्रिगेडिअर यशवंत यांची ५० वी छत्रीधारी ब्रिगेड कार्यान्वित झाली. पाकिस्तानी खडे सैन्य पठाणांच्या बरोबर लढत असल्याचे स्पष्ट झाले. २२ डिसेंबर १९४७ रोजी पं. नेहरूंनी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांस पठाण गनिमांना मदत न देण्याची विनंती केली तथापि त्यांनी नेहरूंच्या दाव्याचा इन्कार करून ती विनंती अमान्य केली (३० डिसेंबर १९४७). युद्धक्षेत्राचा विस्तार झाल्याने, पीर पंजालच्या उत्तरेकडील युद्धआघाडीचे नेतृत्व ⇨ ज. थिमय्या व दक्षिणेकडील आघाडीचे नेतृत्व मे. ज. आत्मासिंग यांना देण्यात आले. जम्मू -काश्मीर युद्धाचे नेतृत्व ज. श्रीनागेशांकडे आले. १९४८ पासून प्रतिचढाईस आरंभ झाला. ५० व्या ब्रिगेडने जांगारे, नौशहर, राजौरी, मेंधर इ. गावे काबीज करीत करीत पूंचमध्ये उरीकडून येणाऱ्या सैन्याशी हातमिळवणी केली. बारमूलावर ८ नोव्हेंबर रोजी व उरीवर १४ नोव्हेंबरला थिमय्यांनी कबजा केला. सर्व आघाड्यांवर भारतीय सैन्याची सरशी होत होती. थिमय्यांनी मे १९४८ मध्ये टिटवाल घेतले. भारताच्या प्रतिचढाईमुळे पाकिस्तानच्या सुरक्षिततेला धोका पोहोचणार म्हणून पाकिस्तानी खडे सैन्य सु. दोन पायदळ डिव्हिजन इतके काश्मीरात लढत असल्याचे मे १९४८ मध्ये पाकिस्तानने जाहीर केले. पाकिस्तानने कार्गिल क्षेत्रात नवीन आघाडी उघडली. श्रीनगर-लेहमधील दळणवळण बंद पाडून लेह गावाला धोका निर्माण केला. झोजी घाटामार्गे पाकिस्तानी सैन्य व पठाण यांनी श्रीनगरकडे आगेकूच केली. थिमय्यांनी झोजी खिंडीकडे हलके रणगाडे धाडून पाकिस्तानी सैन्याला माघार घ्यावयास लावली. अतिशय उंचीवरील झोजी खिंडीकडे खडतर मार्गाने रणगाडे वापरण्याचा अपूर्व पराक्रम थिमय्यांनी केला. या कारवाईत असलेले मेजर जठार व इतर तीन अधिकाऱ्यांना वीरचक्र मिळाले. लेह येथे मेहेरसिंगाने विमानांनी मदत पोहोचविली. लाहोरच्या रक्षणासाठी   असलेले सैन्यही पाकिस्तानने भारताच्या प्रतिचढाईला तोंड देण्यासाठी काढले. यावरून भारत पाकिस्तानवर चढाई करणार आहे, हा पाकिस्तानी कांगावा फोल ठरतो. भारताने काश्मीरपुरतेच युद्धक्षेत्र सीमित केले होते. पाकिस्तानी खडे सैन्य युद्धात सामील झाल्यामुळे युद्धाचा विस्तार  भारत – पाकिस्तान युद्धात होईल, म्हणून माउंटबॅटनच्या सल्ल्यानुसार पं. नेहरूंनी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीकडे हे प्रकरण नेले. १९४८ च्या अखेरीस पाकिस्तानी आक्रमक भारतीय सेनेला पाठ दाखवू लागले. सुरक्षा समितीने नियुक्त केलेल्या संयुक्तराष्ट्रसंघ भारत – पाकिस्तान आयोगाच्या ‘युद्धबंदी व सैनिकी जैसे थे’ हा आदेश दोन्हीही राष्ट्रांनी १ जानेवारी १९४९ रोजी मान्य केला. युद्धबंदी रेषा निश्चित करण्यात आली. भारताने युद्धबंदी स्वीकारण्यात घाई केली. जर काही थोडे दिवस युद्ध चालले असते, तर जम्मू-काश्मीरातून पाकिस्तानला पूर्णपणे माघार घ्यावी लागली असती असे काही राजकीय व सैनिकी तज्ञांचे मत होते. 

भारतसंरक्षण व सैनिक बळक्षमतेच्या दृष्टीने पुढील निष्कर्ष काढले आहेत : (१) स्वतंत्र भारताचे हे पहिलेच संरक्षणात्मक युद्ध होय. (२) आरंभी सूत्रबद्ध अशी युद्धयोजना नसताना, थोड्याच अवधीत भारतीय अधिकारी व सैन्याने देशप्रेमाने प्रेरित होऊन पाकिस्तानी आक्रमण परतवून लावले. (३)जम्मू -काश्मीरसारख्या डोंगरी व हिमवृष्टीच्या क्षेत्रात आणि वाहतुकी साधनांचा अभाव असताना, सैन्याची विमानांनी व मोटारींनी वाहतूक करून कुमक व रसदपुरवठा केला. (४) बहुसंख्य काश्मीरी जनतेचा भारतीय सैन्याला पाठिंबा मिळाला. (५) भारतीय वायुसेनेचे मेहेरसिंग यांनी विमानसंचरणाचे पारंपारिक संकेत झुगारून पूंच व लेह येथे विमानाने रसद व कुमकपुरवठा करण्याचा जागतिक विक्रम केला. भारतीय झुंजबाज विमानचालकांनी श्रीनगरच्या विमानतळावरून स्पिटफायर लढाऊ विमाने उडविली व उतरविली. (६) युद्धनेतृत्व संपूर्णपणे भारतीय अधिकाऱ्यांनी केले. (७) खाजगी विमान कंपन्यांनी सर्व विमाने राष्ट्राच्या दिमतीला दिली. त्यांच्या चालकांनी वायुसेनेच्या कार्याला भरघोस मदत केली, नपेक्षा काश्मीर पाकिस्तानने गिळंकृत केले असते. (८) या युद्धात ब्रिगेडिअर महंमद उस्मान (नौशहर लढाई), मेजर एस्‌. एन्‌. शर्मा (बडगाम लढाई), हवालदार मेजर पिरूसिंग (टिटवाल), नाईक जदुनाथ सिंग (नौशहर लढाई), कॅप्टन राम राघोबा राणे (मुंबई अभियांत्रिकी कोअर) व लान्स नाईक करणसिंग (शीख पलटण) यांना हौतात्म्याबद्दल परमवीरचक्र हा अत्युच्च सैनिकी सन्मान मिळाला. (९) यदाकदाचित भारताचा या युद्धात पराभव झाला असता, तर भारतीय प्रदेशाचे संरक्षण करण्यास भारतशासन असमर्थ आहे, असा भारतांतर्गत राज्यांचा आणि संस्थानांचा समज झाला असता व फुटीरतेला भयंकर चालना मिळाली असती. (१०) एवढेच नव्हे, तर भारताचे आणखी प्रादेशिक लचके तोडण्यास पाकिस्तान उद्युक्त झाले असते. तसेच विजयी पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानी सैन्याचाच विजय असे उघडपणे घोषित करण्यास पाकिस्तान कचरले नसते. (११) हैदराबादचा निजाम याने भारतात विलीन होण्याचा प्रश्न लोंबकळत ठेवला होता, तो या युद्धामुळे त्यास पुढे त्वरेने सोडविणे भाग पडले. (१२) युद्धाच्या अखेरीस पाकिस्तानने जम्मू -काश्मीरचा काही प्रदेश (आझाद काश्मीर) अजूनही सोडला नाही. पाकिस्तानने फिरून १९६५ साली भारतावर आक्रमण केले. 


दुसरे युद्ध: (९ एप्रिल १९६५ – ३० जून १९६५). कच्छ रणात हे दुसरे भारत -पाकिस्तान युद्ध झाले. 

पार्श्वभूमी: पहिल्या युद्धात, काश्मीरला भारतापासून तोडून त्याचा पाकिस्तानमध्ये समावेश करण्याचा जिनाचा प्रयत्‍न फसला. अयुबखानांच्या कारकीर्दीतच (१९५८ – ६९) अमेरिकाप्रेरित ‘मध्य आशियाई राष्ट्रयुती’ (सेंटो) व ‘आग्‍नेय आशियाई राष्ट्रयुती’ (सीटो) या संरक्षणात्मक करारात पाकिस्तान सामील झाले. या युतींचे उद्दिष्ट व कार्यक्रम कम्युनिस्टविरोधी होते. या करारात सामील झालेल्या राष्ट्रांना अमेरिका आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत देण्याचा संभव होता. मे १९५४ मध्ये पाकिस्तानला २०० ‘पॅटन’ व काही ‘शर्मन्‌’ रणगाडे, १५० स्वनातीत स्टार फायटर व अवस्वनी सेबर जेट लढाऊ विमाने, ३० कॅनबेरा बाँबफेकी विमाने, भारी व मध्यम तोफा आणि एक पाणबुडी (गाझी) अशी सु. १५० कोटी डॉलर किंमतीची प्रभावी शस्त्रास्त्रे अमेरिकेने पुरविली.भारताची शस्त्रास्त्रे संख्येने जास्त असली, तरी फारशी परिणामकारक नव्हती. १९६२ सालापासून पाकिस्तानने ५ १/२ पायदळी व चिलखती डिव्हिजन नव्याने तैनात केल्या. बदिन (दक्षिण सिंध), मिरपूर, सरगोधा व पेशावर या ठिकाणी आधुनिक विमानतळ बांधले. युद्धक्षेत्राला सोयीस्कर अशा नव्या १४ छावण्या उभ्या केल्या. फ्रान्सकडून ‘शफी’ हे हलके रणगाडे खरेदी केले. अमेरिकेकडून प्रक्षेपणास्त्रे व बाँब खरेदी केले. पाकिस्तानी नौसेनेत १४ नव्या युद्धनौकांची भर पडली. भारताला काही राष्ट्रांकडून शस्त्रास्त्रे मिळण्याची आश्वासने मिळाली होती. स्टार फायटरच्या तोडीची बारा मिग – २१ विमाने रशियाकडून भारताला मिळाली. अमेरिका व ग्रेट ब्रिटन यांच्याकडून संदेशवहन साधने तसेच डोंगरी पायदळाला लागणारी हलकी शस्त्रास्त्रे (सु. आठ कोटी डॉलर किंमतीची) मिळाली. 

भुट्टोच्या खटपटीने चीन-पाकिस्तान मैत्रीकरार घडून आला. सेंटो, सीटो व हा करार यांमुळे भारतावर राजकीय दडपण आले भरीसभर दोन आघाड्यांवर एकाच वेळी युद्धास तोंड देण्याची समस्या उभी ठाकली. मुस्लिम राष्ट्रांकडून (ईजिप्त व मलेशिया वगळता) पाकिस्तानला राजकीय पाठिंबा आणि लष्करी साहाय्य मिळण्याची पाकिस्तानी नेत्यांना खात्री होती. 

भारतात १९६२ च्या भारत-चीन संघर्षात राजकीय व सैनिकी पीछेहाट तसेच नामुष्की पत्करावी लागली. त्या वेळी आफ्रिकी-आशियाई अलिप्ततावादी राष्ट्रांचा पाठिंबा भारतास उघडपणे मिळाला नव्हता. २७ मे १९६४ रोजी जवाहरलाल नेहरूंचे निधन झाले व लालबहादूर शास्त्री पंतप्रधानपदी आले त्या वेळी भारताचे राजकीय नेतृत्व दुबळे झाले आहे तेव्हा सैनिकी बलप्रदर्शन केल्यास लालबहादूरशास्त्री पडखाऊ भूमिका घेतील, असा पाकिस्तानी राज्यकर्त्याचा अंदाज  होता. काश्मीरमध्येही शेख अब्दुल्ला यांची वर्तणूक व वक्तव्ये भारतविरोधी दिसत होती. शिखांची असंतोषदर्शक चळवळ सुरू झाली होती. या सर्व घटनांच्या संदर्भात पाकिस्तानला अनुकूल असे राजकीय बदल घडवून आणण्यात यश मिळेल असा अयुबखान व त्यांचे सल्लागार यांनी निष्कर्ष काढला. 

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारताविरूद्ध १९६५ मध्ये दोन युद्धे (एक कच्छचे रणात व दुसरे काश्मीर पंजाब या भागात) लादली. कच्छ रणातील या संघर्षास प्रायोगिक किंवा पुढे काश्मीर-पंजाबात होणाऱ्या प्रखर युद्धाची नांदी म्हणणे अवास्तव ठरणार नाही. कच्छचे रण हे भारताच्या प्रादेशिक बाजूकडून युद्धाला प्रतिकूल आहे. सिंधच्या दक्षिण दिशेकडून मात्र ते अनुकूल आहे. मे – नोव्हेंबर या काळात हे रण जलमय राहते. बाकीच्या काळात त्यावर वाळू व मिठाचे थर जमतात. रणातील बेटे – छाड, बियार, ‘८४’ उंटवटा इत्यादी – उंचवट्याच्या जागा या सैनिकी दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. भौगोलिक व ऐतिहासिक नोंदी व शासकीय कागदपत्रांवरून कच्छचे रण हा दलदलीचा व वाळवंटी भूप्रदेश ठरतो. फाळणीच्या वेळी २४ रेखांशाला समांतर, उत्तरेस ३८ किमी. अंतरावर कच्छ संस्थानचे सींमा -स्तंभ होते. कच्छेचे रण भूप्रदेश नसून भूप्रदेशांतर्गत समुद्र (इन्लँड सी) आहे म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे त्याचा अर्धा भाग (२४ अक्षांशापर्यंत) पाकिस्तानचा आहे, असा पाकिस्तानी दावा होता. 

पाकिस्तानी सैनिकांनी कच्छच्या रणातील छाड बेट अंकित केल्याचे, गुजरात राज्य पोलिसांना १९५६ च्या आरंभी अवगत झाले. २५ फेब्रुवारी रोजी ते बेट रिकामे केल्याचे, गुजरात पोलिसांना दिसले. भारताने कच्छच्या सीमा निश्चित करण्यासंबंधी पाकिस्तान सरकारबरोबर १९६३ पर्यंत पत्रव्यवहार चालू ठेविला होता. तरीही पाकिस्तानने या संदर्भात तोपर्यंत काही कळविले नाही. १२ मे १९६४ रोजी, भारत प्रदेशांतर्गत कांजरकोटपाशी काही पाकिस्तानी आढळले. त्यांना तेथून हुसकाविण्यात आले. २५ जानेवारी रोजी, गुजरात पोलिसांना, २४ रेखांशालगतचा सु, २३ किमी. लांब व २.५ किमी. रूंदीचा प्रदेश पाकिस्तानी सैन्याने व्यापलेला आढळला.१० फेब्रुवारी १९६५ रोजी कांरजकोट पाकिस्तानी सैनिकांनी परत व्यापले. या अन्याय्य कारवायांविषयी विचारविनिमय करण्यास पाकिस्तानने नकार दिला. ९ एप्रिल १९६५ रोजी पहाटे पाकिस्तानने सरदारकोटवर तुफानी हल्ला करून तो काबीज केला. त्यानंतर कच्छ रणाच्या संरक्षणाकार्यास खडे सैन्य घाडण्यास भारताने आरंभ केला. ११ एप्रिल रोजी सरदारकोट भारत सैन्याने परत हस्तगत केला. पाकिस्तानने रणांगणावर एक पायदळ डिव्हिजन, पॅटन व शफी रणगाडे, मध्यम तोफा आणून सरदारकोट, व्हिगोकोट, छाड बेट व ‘८४’ उंचवटा यांवर हल्ले चढविणे. २६ एप्रिल रोजी बियार बेटावरील हल्ला भारतीय सैन्याने उधळून लावला. २८ एप्रिल रोजी, जर पाकिस्तान आपल्या आक्रमक कारवाया चालू ठेवणार असेल, तर भारतीय सैन्य स्वराष्ट्राचे संरक्षण करील आणि त्यासाठी योग्य ती संरक्षणयोजना, मनुष्यबळ व साधने उपयोगात आणण्याचा निर्णय घेईल, असे लालबहादूर शास्त्रींनी २८ एप्रिल रोजी घोषित केले. कच्छ रणावरील पाकिस्तानी आक्रमणाला चीनने पाठिंबा दिला. मे महिन्यात, श्रीनगर-लेह या मार्गीवरील दळणवळणास कार्गिलपाशी पाकिस्तानी सैन्याने उपद्रव देण्यास आरंभ केला. लेह-लडाख येथील भारतीय सैन्याला सांग्रामिक व नागरी पुरवठा या मार्गाने केला जाई. मे-नोव्हेंबर या काळात प्रतिकूल हवामानामुळे पुरवठयंत्रणा बंद पडते. मे महिन्याच्या आधीच पुढील सहा महिन्यांचा पुरवठा करावा लागतो. पुरवठा बंद झाला, तर लडाखमधील सैन्याची संरक्षणक्षमता दुर्बल होऊन चिनी सैन्याशी लढणे अशक्य होण्याची भीती होती. पाकिस्तानी उपद्रव बंद पाडण्यासाठी कार्गिल येथील पाकिस्तानी पहाडी मोर्च्यावर काळा पहाड, भारत पहाड, काफीर पहाड व पर्याण यांवर हल्ले चढवून ते निर्वेर करण्यात आले. २८ एप्रिल रोजी ब्रिटिश पंतप्रधान विल्सन यांच्या युद्धबंदी व सीमाप्रश्न लवादामार्फत मिटवावा या सूचनेला लालबहादूर शास्त्री व अध्यक्ष अयुबखान यांनी मान्यता दिली. या सूचनेवर विचार चालू असतानाच पाकिस्तानने कच्छमध्ये बियार बेट व व्हिगोकोटवर हल्ले केले तथापि हे हल्ले निष्फळ ठरले. १७ जून रोजी लंडनमध्ये लालबहादूरशास्त्री व अयुबखान यांची भेट झाली. ३० जून रोजी पंतप्रधान विल्सनच्या सूचनेला दोघांनी लेखी संमती दिली. पाकिस्तान आक्रमक असताना लालबहादूर शास्त्रीनी समझोता केल्याबद्दल भारतात असंतोष प्रकट झाला. लवाद निर्णयाप्रमाणे पाकिस्तानला सु. २,७०० चौ. किमी.कच्छ प्रदेश मिळाला. 


तत्कालीन भारतीय भूसेनाध्यक्ष ⇨ जनरल चौधरी यांचे कच्छ लढ्यासंबंधी विश्लेषण पुढीलप्रमाणे होते : कच्छ रण लढा हा प्रधान लढा नसून त्यातील एकमेव उद्दिष्ट्य काश्मीरच आहे. म्हणून कच्छच्या लढ्यात, इतर महत्त्वाच्या संरक्षणक्षेत्रांतून सेना काढून त्या कच्छमध्ये गुंतवून ठेवणे गंभीर घोडचूक ठरेल. कच्छमधील आक्रमण थोपविणे व त्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी पंजाबची आघाडी बलशाली करणे आवश्यक आहे. कच्छ युद्ध ही काश्मीरच्या आगामी युद्धाची नांदी आहे, तेव्हा काश्मीरकडील पाकिस्तानी आघाडीच्या उजव्या बगलेवर वचक बसेल, अशी सेनेची पखरण करणे तसेच यदाकदाचित चीनने दुसरी आघाडी उघडली, तर त्यास तोंड देण्यासाठी लडाख आघाडीचा रसदपुरवठा अबाधित ठेवणे आवश्यक आहे.

कच्छ युद्धाची पाकिस्तानी उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती : अमेरिकी शस्त्रांची कार्यक्षमता अजमाविणे व ती कम्युनिस्टेतर राष्ट्रांविरूद्ध वापरल्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया काय होते, याचा अंदाज घेणे. या संदर्भात अमेरिकेने नुसती नापसंती दर्शविली यावरून ती शस्त्रास्त्रे पुढील काळात वापरल्यास अमेरिका निष्क्रिय राहील, याची पाकिस्तानला खात्री पटली. भारताला प्रतिकूल अशा रणांगणावर मोठी लढाई देण्यास भाग पाडून, पाकिस्तानी सेनेचे नीतिधैर्य वाढविणे हे पाकिस्तानचे उद्दिष्ट अंशतः सफल झाले. या युद्धामुळे पाकिस्तानला कच्छचे रण जिंकता आले किंवा त्याचा काही भाग पदरात पाडता आला, तर लालबहादूर शास्त्रींच्या नेतृत्वाबद्दल भारतात असंतोष माजेल, असेही एक उद्दिष्ट पाकिस्तानी राज्यकर्त्याच्या मनात असावे तथापि हे उद्दिष्ट मात्र सफल झाले नाही. 

भारताच्या दृष्टीने पाहता पाकिस्तानच्या आगामी कारवयांची काहीशी कल्पना करणे भारताला शक्य झाले. या लढ्याच्या बाबतीत भारताची संरक्षणयोजना व राजकीय सैनिकी प्रतिक्रिया योग्य ठरली. अमेरिकी शस्त्रास्त्रांचा वापर पाकिस्तान कसा करील व त्यांची परिणामक्षमता कितपत आहे, याचा अंदाज घेणेही भारताला शक्य झाले. 

कच्छ रणातील युद्धामुळे पाकिस्तानने चुकीचे निष्कर्ष काढले. सैनिकी बळावर काश्मीर जिंकण्याचा त्याचा निश्चय झाला. 

संघर्षाची सुरुवात: (१ सप्टेंबर – २२ सप्टेंबर १९६५). १ सप्टेंबर १९६५ पासून पाकिस्तानने काश्मीरवर दुसरे आक्रमण सुरू केले. बावीस दिवसांच्या युद्धानंतर २२ सप्टेंबरला युद्धबंदी अंमलात आली. भारतात या दुसऱ्या आक्रमणास ‘बावीस दिवसांचे युद्ध’ आणि पाकिस्तानात ‘पहला दौर’ म्हटले जाते. वास्तविक ५ ऑगस्ट १९६५ पासूनच पाकिस्तानने गमिनीकाव्याचे छुपे आक्रमण सुरू केले होते तथापि गनिमीकाव्याने उद्दिष्ट साध्य होत नसल्याने पाहून १ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी खड्या सैन्याने उघडपणे युद्ध सुरू केले. या भारत – पाकिस्तान युद्धाचे विवेचन पुढे दहा भागांत केले आहे : (१) पार्श्वभूमी, (२) पाकिस्तानचा युद्धहेतू व उद्दिष्ट आणि भारताची प्रतिक्रिया, (३) दोन्ही पक्षांचे सैनिकी बल, (४) पाकिस्तानी  घुसखोरी, (५) पाकिस्तानी खड्या सैन्याचे आक्रमण, (६) भारताचे प्रतिकारात्मक कार्य व युद्धाच्या प्रमुख घटना, (७) युद्धस्थगिती, (८) युद्धमीमांसा, (९) ताश्कंद करार आणि (१०) युद्धोत्तर परिस्थिती. 

पार्श्वभूमी : भारत – पाकिस्तान संघर्ष पहिले युद्ध व कच्छ रणातील आक्रमण यांच्या संदर्भात या दुसऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीचे विवरण बहुतांश आले आहे तथापि काही अतिमहत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत : १९६२ मधील भारत – चीन संघर्षात भारताला पड खावी लागली होती. चीनची भारतविरोधी भूमिका लक्षात घेऊन १९६३ साली पाकिस्तानचा नवा परराष्ट्रमंत्री भुट्टो याने चीनबरोबर आर्थिक व राजकीय संबंध घनिष्ठ करण्याचे धोरण अंमलात आणले. १९६३ च्या मार्च महिन्यात, चीनबरोबर सीमाकरार करून काश्मीर- सिंक्यांगच्या सीमेवरील भारताचा सु. ३,२०० चौ. किमी. प्रदेश चीनला देण्यात आला. डिसेंबर १९६३ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात यदाकदाचित संघर्ष उद्‌भवला, तर पाकिस्तानला मदत करण्याचे आश्वासन चीनने दिले. डिसेंबर १९६४ मध्ये भारत-चीन सीमेवर चीनने १४ ते १५ पायदळ डिव्हिजन खड्या केल्याचे तत्कालीन रक्षामंत्री यंशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेत सांगितले. २७ मे १९६३ रोजी हजरतबालवरून काश्मीरात दंगे सुरू झाले. संयुक्त राष्ट्राच्या सभेत भुट्टोने फेब्रुवारी १९६४ रोजी काश्मीरातील धार्मिक असंतोष हे बंडच आहे. असे सांगितले. पाकिस्तानच्या आगामी युद्धपटात या तथाकथित बंडाचा युद्धासाठी उपयोग केला जाण्याची शक्यता निर्माण झाली. १९६४ मध्ये सु. सात लक्ष बिगर मुस्लिम पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगला देश) मधून भारताच्या आश्रयास आले. १९५३ ते १९६४ या काळात काश्मीरचे नेते शेख अब्दुला स्थानबद्ध होते. १९६४ ते १९६५ या काळात ते मुक्त होते. मे १९६५ मध्ये त्यांना परत ऊटकमंड येथे चीनने साहाय्य मागणे, पाकिस्तान-चीन सीमाकरार मान्य करणे वगैरे भारतविरोधी कृत्यांसाठी स्थानबद्ध करण्यात आले. पाकिस्तानी व तथाकथित आझाद काश्मीर यांना गनिमी युद्धतंत्राचे शिक्षण चीनच्या साहाय्याने दिले जात असल्याचा पुरावा १९६५ मध्ये याच गनिमांकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून मिळाला. मे १९६५ मध्ये भारत – पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी सैन्य खडे असल्याचे व पूर्व -पाकिस्तानात चिनी विशेषज्ञ असल्याचे रक्षामंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेत जाहीर केले. भारताची संरक्षणक्षमता ठिसूळ करण्याकरिता सीमा-अतिक्रमण, वायुप्रदेशातिक्रमण इ. प्रकार पाकिस्तानने सुरू केले (१९६३ साली : ४४८ १९६४ साली : ५२२ जुलै १९६५ अखेर : १,८०० – अशी अतिक्रमणाच्या प्रसंगांची आकडेवारी होती). ११ मे १९६५ रोजी शिलाँग येथील पाकिस्तानी दुय्यम आयुक्त कार्यालय भारताने बंद करविले. चीनने १९६४ ऑक्टोबरमध्ये मॅकमहोन रेषेच्या दक्षिणेकडील ८०,००० चौ. किमी. प्रदेशावरील हक्काची परत घोषणा केली. १६ ऑक्टोबर १९६४ रोजी चीनने पहिल्या आण्विक साधनाचा स्फोट केल्याचे जाहीर केले. पाकिस्तानने परत मे महिन्यात श्रीनगर – लेहमार्ग कार्गिल येथे तोडण्याचा प्रयत्‍न केला. जून १९६५ मध्ये भारताने प्रतिचढाई करून तेथील पाकव्याप्त पर्वतावरील दोन मोर्चे काबीज केले. आश्वर्याची बाब म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेऊन भारताने ते मार्चे पाकिस्तानला परत घ्यावेत, अशी सूचना केली. पाकिस्तानी सैन्य परत तो मार्ग तोडणार नाही अशी हमी मिळाल्यावर ते मोर्चे भारताने रिकामे केले. भारताने ही चूक केली हे युद्ध सुरू झाल्यावर उमगले. पाकिस्तानने भारताच्या सीमेवर सैन्य आणल्यामुळे भारतानेही तेथे आपले सैन्य खडे केले. पाकिस्तानला हे परवडणारे नव्हते, म्हणून दोन्हीही राष्ट्रांनी आपापल्या सेना काढून घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे जुलै महिन्याच्या आरंभी दोघांचेही सैन्य तेथून काढून घेण्यात आले. पाकिस्तानने तेथील सैन्य काश्मीरच्या हद्दीवर तैनात केले. 


नेहरूंनी पहिल्या युद्धाच्या अनुभवावरून, पाकिस्तान पुढे गनिमी युद्धतंत्र वापरून काश्मीर पादाक्रांत करण्याचा प्रयत्‍न करील, असे भाकित केले होते. चीनच्या साहाय्याने, पाकिस्तान गनिमांची संघटना करीत असल्याच्या बातम्यांवरून नेहरूंचे भाकित खरे ठरणार, असे दिसू लागले. १९४५ नंतर कम्युनिस्ट राष्ट्रांनी जनतामुक्ति किंवा जनताक्रांति युद्धाची संकल्पना प्रचारात आणली. परतंत्र काश्मीरला मुक्त करण्यासाठी त्या युद्धाची संकल्पना साकार करण्याच्या योजना पाकिस्तानने आखल्या. भुट्टोच्या वक्तव्यावरून त्याची जाणीव भारतीय अधिकाऱ्यांना झाली असावी. शिवाय, युद्धाला ‘जिहाद’ चे स्वरूप देणे पाकिस्तानला अवघड नव्हते. चीनने अशाप्रकारचे तंत्र तिबेट गिळंकृत करण्यासाठी वापरले होते. 

पाकिस्तानने गनिमांच्या (घुसखोरी व घातपाती कृत्ये करणाऱ्या) सु. आठ पलटणी उभ्या केल्या होत्या. मुस्लिम अरब वीरांच्या नावांवरून त्या पलटणींना नावे देण्यात आली.  उदा., सलाउद्दिन तारीक, गझनवी खलीद इत्यादी. या गनिमांना ‘मुजाहिद’ (इस्लामी धर्मयोद्धे) म्हटले जाई. या मुजाहिदांना गनिमी काव्याचे जे शिक्षण दिलेले होते त्यात पुढील विध्वंसक गोष्टीचा समावेश होता : (१) पूल उडविणे, लष्करी गाड्यांवर घाला घालणे व दळणवळणात व्यत्यय आणणे, (२) सैनिकीकार्यालये, पाणीपुरवठा – यंत्रणा व वीजकेंद्रे यांसारख्या नागरी सुविधा आणि शासकीय कार्यालये यांवर धाडी घालणे, तसेच (३) जेणेकरून जम्मू -काश्मीर शासन हतःप्रभ होईल आणि त्या राज्याविरूद्ध जनता बंड करण्यास उद्युक्त होईल अशी परिस्थिती निर्माण करणे. या मुजाहिदांना पाकिस्तानने शस्त्रास्त्रे, दारूगोळा इ. रणसामग्री व भारतीय पैसा पुरविला, तसेच त्यांना खड्या सैन्यात अंतर्भूत केले होते. युद्ध -बंदीरेषेलगत आणि काश्मीरात मुजाहिदांच्या विध्वंसक कार्याला खीळ घालण्यात भारताचे खडे सैन्य, पोलीस व सीमासंरक्षक दले गुंतली म्हणजे त्यांचे सुसूत्रपणे नियंत्रण करणे भारत व काश्मीर सरकारला कठीण जाईल, असा पाकिस्तानचा डाव होता. 

युद्ध – हेतू व उद्दिष्टे: काश्मीर जिंकून त्यास पाकिस्तानात विलीन करण्याचा प्रयत्‍न पहिल्या युद्धात फसला होता. काश्मीरचा एक तृतीयांश भाग मात्र पाकिस्तानने पादाक्रांत केला. १९६३ सालापासून बदलत चाललेली भू-राजनैतिक (रशिया – चीन संघर्ष, भारत -चीन संघर्ष व पाकिस्तान-चीन मित्रत्व) तसेच भू-सामरिक परिस्थिती पाकिस्तानला १९६५ सालात अनुकूल वाटू लागल्या. भारताला दोन आघाड्यांवर युद्ध करण्यास भाग पाडल्याने काश्मीर ताब्यात येईल, असा पाकिस्तानचा दृष्टिकोन होता. काश्मीर जिंकण्यासाठी युद्धाला मुक्तियुद्ध व ‘जिहाद’ असे स्वरूप देण्यात आले. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य प्रदेश असल्याने त्याचे संरक्षण करणे हे भारताचे उद्दिष्ट होते. जुलै ते ५ ऑगस्ट या काळात झेलम खोऱ्यात मुजाहिंदाची काही टोळकी घुसली होती. पाकिस्तानच्या दृष्टीने आक्रमण सुरू करण्याची वेळ आली. ५ ऑगस्टपासून मुजाहिद गनिमांनी घुसखोरी सुरू केली. पाकिस्ताननी युद्धयोजनेप्रमाणे मुजाहिदी सैन्याला पुढीलप्रमाणे कामे दिली होती : (१) ५ – ८ ऑगस्ट : गुरेस, कार्गिल टिटवाल, हाजीपार इ. मार्गे काश्मीरात घुसणे घातपात करणे काश्मीर राज्य घातपाताने बेजार असताना हाजीपीर घाटातून सलाउद्दीन गनिम दस्त्याने ८ ऑगस्ट रोजी श्रीनगरात प्रवेशणे व त्यादिवशी श्रीनगरात पीर दस्तीगीरसाहेब ऊरूसाच्या प्रचंड मेळाव्यात सशस्त्र मिसळणे. (२) ९ ऑगस्ट रोजी काश्मीर स्वयंनिर्णय संघटनेच्या कृतिसमितीने, शेख अब्दुला अटकदिनानिमित्त एक जंगी मिरवणूक काढण्याचे ठरविले होते. त्या मिरवणुकीत तथाकथित मुजाहिदांनी सशस्त्र भाग  घेणे. (३) मिरवणुकीच्या गोंधळात सशस्त्र बंडाची घोषणा करून धूमधाम उडविणे. (४) आकाशवाणी, टपाल -तार खाते, पोलिस केंद्रे व कार्यालये ताब्यात घेणे, आणि (५ ) शेवटी प्रस्थापित जम्मू-काश्मीर सरकारचे स्थान बळकावणे.  

वरील कार्यक्रम पार पाडल्यानंतर ‘क्रांतिकारी मंडळ’ स्थापून जम्मू-काश्मीरचे तेच न्यायाधिष्ठित सरकार असल्याचे जगजाहीर करून सर्व मुस्लिम राष्ट्रे, विशेषतः पाकिस्तान, यांना त्यास मान्यता देण्याची व शस्त्रसाहाय्य पुरविण्याची विनंती करणे, अशी पाकिस्तानप्रेरित योजना होती. हीच वेळ पाकिस्तानी खड्या सैन्याला जम्मू-काश्मीरात उघडपणे शिरण्याची खूण होती. जणू काही बंड हे जनक्रांतियुद्ध असून काश्मीरी जनतेच्या हाकेप्रमाणे पाकिस्तान त्या धर्मयुद्धाला साहाय्य करण्यास उद्युक्त झाले, असा पाकिस्तानचा पवित्रा होता.  

भारताला पाकिस्तान गनीम सैन्य संघटित करीत सल्याच्या गुप्तवार्ता मिळत होत्या (उदा., राष्ट्राध्यक्ष अयुबखानांची मरी येथील गनीम कार्यालयाला भेट व भाषण जुलै १९६५) तथापि गनीम संघटना करण्याचा खरोखरी काय हेतू असावा, याचे विश्लेषण भारत गुप्तवार्ता संकलकांना करता आले नाही. १ जानेवारी १९६५ पासून सुरू झालेल्या पाकिस्तानी अतिक्रमण कारवायांवरून आगामी संकटाची चाहूल सेनाधिपतींना लागली होती. युद्धबंदी रेषेलगतच्या जम्मू-काश्मीर प्रदेशात गनिमांच्या  प्रत्यक्ष कारवायांमुळे सेनाधिकारी चकित झाले तथापि धास्तावले नाहीत. ५ ऑगस्टनंतर गनिमांच्या कार्यक्रमाचा पुरावा, भारताला मिळाला. ९ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस यु थांट यांनी पाकिस्तानी बाजूकडून भारतीय सैनिक स्थानांवर गनिमांचे हल्ले होत असल्याचे जाहीर केले आणि भारत व पाकिस्तान यांना सबुरी करण्याचे आवाहन केले. एका भारतीय ब्रिगेडच्या व कुमाऊँ पलटणीच्या कार्यालयावर मुजाहिदानी छापे घातले. या छाप्यांत (५-८ ऑगस्ट) ब्रिगेडिअर मास्टर आणि कर्नल गोरे मारले गेले. १० ऑगस्ट रोजी काश्मीरातील घटनांशी पाकिस्तानचा कसलाही संबंध नसल्याचे भुट्टोने जाहीर केले. 

हाजीपीर खिंड : भारताने सर केल्यानंतरचे दृश्य, १९६५.

भारताची प्रतिकार – योजना: गनिमी आक्रमणाचा प्रतिकार करण्याची भारताची योजना पुढीलप्रमाणे होती.प्रत्येक गनिम टोळ्यांचा वा टोळक्यांचा नायनाट करण्याऐवजी पाक -व्याप्त आझाद काश्मीरातील त्यांच्या मुख्य तळापासून त्यांना अलग पाडणे ही योजना होती. तत्पूर्वी सरकारी कार्यालये, जीवनोपयोगी संस्थापने व सैनिकी कार्यालये इत्यादींना सुरक्षित करणे आवश्यक होते. २४ ऑगस्टपर्यंत जम्मू-काश्मीरातील कार्यालये व केंद्रे सुरक्षित केल्यावर २५ ऑगस्ट रोजी हाजीपीरवर उत्तरेकडून उरीमार्गे व दक्षिणेकडून पूंचमार्गे रणजित  दयाळ (आता ले. जनरल) यांच्या तुकडीने दुधारी हल्ला केला व हाजीपीर घाट व उभारा काबीज केला (२८ ऑगस्ट). त्यानंतर श्रीनगर खोऱ्यातील घुसखोरी व घातपात मोठ्या प्रमाणात कमी झाले. हाजीपीरप्रमाणे, उरीच्या वायव्येला असलेल्या टिटवाल गावाला महत्त्व आहे. टिटवालच्या पश्चिमेस असलेल्या मुझफराबाद गावी गनिमांचा मोठा तळ होता. टिटवाल-बारमूलामार्गे श्रीनगर खोऱ्यात गनीम घुसत असत. २४ ऑगस्ट रोजी टिटवाल गाव काबीज करण्यात आले. त्यामुळे घुसखोरी व घातपात बंद झाले. काश्मीरी जनतेनेही सैन्याला घुसखोर व गनिमांचा माहिती वेळोवेळी पुरविली होती. पाकिस्तानने चीनकडून घेतलेले माओ -त्से-तुंगप्रणीत तथाकथित ‘जनतामुक्ति युद्ध’ किंवा क्रांतियुद्ध प्रणाली मुळातच उखडली गेली.  


पाकिस्तानच्या दुर्दैवाने मुजाहिदी आक्रमण ५ ऑगस्टपासून अडचणींच्या फेऱ्यात सापडले. सीमासंरक्षक दले व काश्मीरी जनता यांच्या अवधानामुळे मुजाहिद व रझाकार ८ ऑगस्टपर्यंत श्रीनगरपर्यंत पोहचू शकले नाहीत. मॉऊ झेडूंगच्या गनिमी-तंत्राप्रमाणे (म्हणजे मासे = गनीम व पाणी = जनता) गनिमांना स्थानिक जनतेचा सहकार मिळाला नाही. पाक गनिमांची फाटाफूट झाल्याने २ – ३ गनिमांची फुटकळ टोळकी तयार झाली. ९ ऑगस्टपर्यंत (या दिवशी मुक्त काश्मीरची घोषणा व नव्या क्रांतिसरकारची स्थापना होणार होती.) मुजाहिद गलितधैर्य व निष्क्रिय झाले होते तथापि पाकिस्तानी वर्तमानपत्रे व पाकिस्तानव्याप्त काश्मीरात असलेल्या सदा-इ-काश्मीर आकाशवाणीने न घडलेल्या क्रांतीच्या व क्रांतिसरकार स्थापन झाल्याच्या खोट्याच बातम्या प्रसिद्ध-प्रक्षेपित करण्याचा सपाटा लावला. गनिमी डाव फसला. खड्या सैन्याचा उपयोग करून उद्दिष्ट साध्य करण्याशिवाय दुसरे अन्य साधन पाकिस्तानजवळ उरले नाही. चिनी मित्र दुसरी आघाडी उघडेल. अशीही आशा पाकिस्तानला वाटत होती. १ सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या खड्या सैन्याने छांबवर हल्ला सुरू केला.  

सैनिकी बळ : युद्धारंभी दोन्ही पक्षांचे सैनिकी बळ पुढीलप्रमाणे होते : 

 

भारत 

पाकिस्तान 

सैनिक संख्या

८,००,०००

२,३०,०००

लढाऊ डिव्हिजन

१७

लोकसेना

२,५०,००० 

आझाद काश्मीरमधील सैन्यबळ

३०,०००

भारत-पाकिस्तान बळाचे गुणोत्तर ८ : २.३ येते व भारत बलिष्ठ वाटतो तथापि काश्मीर रणक्षेत्र व त्याला अनुकूल गनिमी रणतंत्र घ्यानात घेता गुणोत्तर ८.५ : ५.१ येते. पाकिस्तानी विशेषज्ञांच्या मताप्रमाणे १९६५ च्या आरंभी भारत ४.५ : १ या गुणोत्तराने पाकिस्तानला भारी होता. पाकिस्तान सरकारच्या म्हणण्याप्रमाणे ४ : १ इतपत प्रमाणात भारत वरचढ असला, तरी विशेष नाही. 

युद्धारंभी असलेल्या सैन्य परखणीवरून भारत व पाकिस्तान यांच्या युद्धप्रवृत्ती आणि युद्ध लढविण्याची क्षमता मापता येते. काश्मीरात भारताच्या तीन डिव्हिजन होत्या. त्यांना (१) लडाख आघाडीवर चीनला तोंड देणे. (२)युद्धबंदी रेषेचे (सु. ७५० किमी.) रक्षण करणे आणि (३) अंतर्गत सुव्यवस्था राखणे अशी तीन संरक्षणकामे होती. यांशिवाय पंजाबच्या उत्तरेकडील उजव्या बगलेचेदेखील रक्षण त्यांनाच करावे लागे. हिमालयाच्या संरक्षणासाठी आणि पूर्व पाकिस्तानजवळ भारताच्या सहा डिव्हिजन गुंतल्या होत्या. राजस्थान व पश्चिम पंजाबच्या संरक्षणासाठी फक्त आठ डिव्हिजन होत्या. यातूनच राखीव व इतर कामासाठी (उदा., अंतर्गत सुव्यवस्था) सैन्याची  तरतूद करणे भाग होते. अंतर्गत युद्धआघाडी तंत्र-म्हणजे एका आघाडीवरील सैन्य काढून दुसऱ्या आघाडीवर खडे करणे- वापरण्यास (वेळ व आघाड्यांमधील अंतर लक्षात घेता) अडचणी व धोका होता.  

पश्चिम पाकिस्तानात पंजाबच्या सीमेवर चार ते पाच डिव्हिजन तैनात केल्यानंतरही तीन डिव्हिजन राखीव व इतर कामासाठी मोकळ्या ठेवणे पाकिस्तानला शक्य होते. दोन आघाड्यांवरील युद्धाची भीतीही पाकिस्तानला नव्हती. 

पंजाबचे मैदानी रणक्षेत्र लक्षात घेता दोन्ही पक्षांना रणगाडे हे प्रभावी शस्त्र वाटत होते. भारताकडे एक सेंच्युरियन रणगाडा व एक शर्मन, अशा दोन ब्रिगेड तसेच हलके रणगाडे (एएम्‌एक्स्‌ – १३) यांच्या दोन रेजिमेंट आणि एकूण रणगाडे १,४०० होते. पाकिस्तानकडे एक डिव्हिजन अमेरिकी पॅटन आणि एक अपूर्ण डिव्हिजन – पॅटन, शर्मन व शक्ती रणगाड्यांची – आणि एकूण रणगाडे १,१०० होते. 

संख्येच्या तुलनेत भारत भारी दिसला. तरी गुणवत्ता व युद्धक्षमतेच्या दृष्टीने पाकिस्तानी रणगाडा-सैन्य बलवत्तर होते. पॅटन तोफांचा पल्ला भारताच्या रणगाडा-तोफांपेक्षा दुपटीने लांब होता. पॅटन रणगाडे अंधारातही तोफमारा करू शंकतात. मध्यम व भारी तोफांच्या बलात पाकिस्तान भारी होते. वायुबलाच्या दृष्टीने भारत पाकिस्तानला भारी होता (भारत ५००, तर पाकिस्तान २०० विमाने). रणक्षेत्रात भूसेनेला साहाय्य करण्यासाठी भारताची बहुतांश विमाने (नॅट वगळता) अक्षम होती. ही त्रुटी नवीन तंत्र वापरून व हातात असलेल्या विमानाच्या गुणांचा योग्य उपयोग करून भरून काढण्यात आली. उदा., पाकिस्तानच्या स्वनातीत एफ्‍- १०४ विमानांना कमी उंचीवर लढण्यास भाग पाडून त्यांचा धुव्वा उडविणे. सैन्यबळ व त्यांची क्षमता यांच्या तुलनेवरून पुढीलप्रमाणे निष्कर्ष काढता येतात : (१) भारताकडे युद्धाची उपक्रमशीलता नव्हती. ज्या क्षेत्रात आक्रमण करावयाचे तेथे किमान आक्रमणकाकडे शत्रूच्यापेक्षा तिपटीने सैन्यबल असावे लागते भारताकडे तेवढे नव्हते. (२) तडित्‌ पद्धतीचे पण मर्यादित स्वरूपाचे आक्रमण करण्याची पाकिस्तानची स्थिती होती [⟶ तडित्‌ युद्धतंत्र] म्हणून पाकिस्तानने आक्रमणाचा उपक्रम केला.

पाकिस्तानने १ सप्टेंबर रोजी सुरू केलेल्या युद्धाच्या आघाड्या पुढीलप्रमाणे होत्या : (१) छांब -भिंबर, (२) सियालकोट, (३) लाहोर व (४) राजस्थान. अर्थात हल्ले व प्रतिहल्ले यांमुळे नवीन आघाड्या उघडल्या जाऊन युद्धक्षेत्रे बदलत गेली. उदा., छांब -भिंबरवरील पाकिस्तानचा हल्ला बोथट करण्यासाठी भारताने लाहोर व सियालकोट आघाडी उघडली. युद्धक्षेत्रांची एकूण आघाडी सु. १,९२५ किमी. लांबीची होती. कडव्या लढाया पंजाबच्या सीमेवर झाल्या. 

पाकिस्तानने रणगाडे व सु. एक डिव्हिजन सैन्य घेऊन छांबवर हल्ला केला. छांब रणक्षेत्रात भारताचे केवळ १,००० जवान व ७.८ रणगाडे होते. छांब रणक्षेत्र पाकिस्तानी हल्ल्यास अनुकूल होते. या रणक्षेत्राला सियालकोटकडून झटपट कुमक पाठविता येते. येथे युद्धबंदीरेषा व आंतरराष्ट्रीय सीमा मिळतात. तेव्हा सैन्य घुसवताना युद्धबंदी रेषेचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानवर आला असता. छांबच्या पिछाडीला, अखनूर येथे चिनाबवरील एकमेव पूल आहे. येथूनच दक्षिणेकडे सु. २० किमी. वर जम्मू आहे. युद्धबंदीच्या अटीप्रमाणे छांब रणक्षेत्रात भारताला कुमक (रणगाडे , तोफा वगैरे) पाठविण्यावर निर्बंध होते. चिनाबचा पूल रणगाड्याचे वजन पेलू शकणारा नव्हता. छांब-अखनूर, जम्मूवर पाकिस्तान जर वर्चस्व स्थापू शकले, तर काश्मीरचा भारताबरोबरचा संबंध तुटू शकतो. पाकिस्तान आक्रमणाचे तेच उद्दिष्ट होते.


पाकिस्तानी हल्ल्यामुळे भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली. १ सप्टेंबरला संध्याकाळी पाकिस्तानी सैन्य अखनूरच्या जवळपास आले. युद्धाचा अत्यंत निर्णायक क्षण येऊन ठेपला. भूसेनाप्रमुख जनरल चौधरींनी रक्षामंत्री यशवंतराव चव्हाण यांना भेटून युद्धाची खडतर परिस्थिती सांगितली. छांब क्षेत्रातील पाकिस्तानी रेटा थांबविण्यासाठी वायुहल्ल्याचा उपाय सांगितला. चव्हाणांनी ताबडतोब वायुहल्ल्याला संमती मिळविली. संध्याकाळी ६ वाजता भारतीय वायुहल्ले सुरू झाले. २ सप्टेंबरपर्यंत १६ रणगाडे निकालात निघाले. ३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी विमाने (सेबर जेट) लढाईत उतरली.सेबरच्या मुकाबल्यात भारताची छोटी पण चपळ नॅट विमाने यशस्वी ठरली तथापि अखूनरकडची पाकिस्तानी कूच चालू होती. ५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने अमृतसर येथील विमानविरोधी तोफखान्यावर हल्ला केला. युद्धाला कलाटणी मिळाली. पाकिस्तानी दौडीला थांबविण्याचा किंवा तिचा वेग थांबविण्यासाठी जनरल धिल्लाँ यांच्या ११ व्या कोअरने ६ सप्टेंबर रोजी लाहोर आघाडी उघडून लाहोरकडे आगेकूच करण्यास सुरूवात केली. ७ सप्टेंबरपर्यंत भारताचे जनरल ओ. पी. डन यांच्या नेतृत्वाखाली पहिले कोअर खडे केले. डन कोअरने ७ सप्टेंबर रोजी सियालकोट आघाडी पेटवली. पाकिस्तानला आता छांब, सियालकोट व लाहोर या तीन आघाड्यांवर लढणे भाग पडले. पाकिस्तानच्या दृष्टीने लाहोरच्या उत्तरेकडील प्रदेशाच्या (वझीराबाद, गुजराणवाला वगैरे) संरक्षणाची फळी सियालकोट येथे होती. लाहोर पाकिस्तानचे मर्मस्थान होते. पाकिस्तानला छांब रणक्षेत्रातील रणगाडे सियालकोट व लाहोरकडे पाठविणे भाग पडले. काश्मीरवरील दडपण खूप कमी झाले. लाहेर व सियालकोट प्रमुख रणक्षेत्रे बनली.काही तज्ञांच्या मते छांबमधील रणगाडे काढून घेण्यात पाकिस्तानने चूक केली. लाहोर व सियालकोट आघाडीवर चकमकीस सुरूवात असल्याने, पाकिस्तानने अखनूरकडील रेटा तसाच चालू ठेवला असता, तर अखनूर व जम्मू त्यास काबीज करता आले असते. जनरल चौधरींच्या लाहोर-सियालकोट आघाडीवर रणगाड्यांची व सैन्याची नवीन हालचाल व पखरण करण्याच्या कौशल्याची वाखाणणी तज्ञांनी केली. या क्षेत्रात चौधरींनी उपक्रमशीलता दाखवून या नव्या खेळीची सूत्रे आपल्या हाती ठेवली. लाहोरवरील हल्ल्यात भारतीय सैन्याला इछोगिल कालव्याचा मोठा अडथळा होता. हा कालवा दक्षिणोत्तर सु. ११५ किमी. लांब, ३० – ४० मीटर रूंद व ५ मीटर खोल असून रावी व सतलज या नद्यांना जोडतो. याच्या लगतच्या भागात क्राँक्रीटचे मोर्चे व रणगाड्याची तळघरे अशी संरक्षण फळी बांधलेली होती. इछोगिल कालवा भारताच्या हद्दीपासून पश्चिमेला ४ -५ किमी. वर आहे. या कालव्यावर १२ पूल होते.  

धिल्लाँ कोअरच्या त्रिभुजात्मक हल्ल्याची सुरूवात ६ सप्टेंबर रोजी पहाटे झाली. पहिल्या डिव्हिजनने (४ थी) खेमकरणहून कसूर (पाकिस्तान) मार्गे लाहोरकडे, दुसरीने (७ वी) खलरा ते बुर्कीकडे (पाकिस्तान ते लाहोरकडे) व  तिसरीने (१६ वी) अमृतसर, बाघ, डोग्राई ते लाहोरकडे आगेकूच केली. कसूरकडे कूच करणाऱ्या डिव्हिजनला पाकिस्तानी रणगाड्यांनी टक्कर देऊन तिला खेमकरणपर्यंत माघार घ्यावयास लावली. दुसरीने १० सप्टेंबर रोजी बुर्की घेतले. अमृतसरहून कूच करणाऱ्या डिव्हिजनच्या एका ब्रिगेडने इछोगिल कालवा ओलांडला. तिची एक पलटण लाहोरपासून पूर्वेला १० किमी. अंतरावर पोहचली. लाहोरकडील भारताचे आक्रमण सुरू झाल्यावर ‘पाकिस्तान भारताविरूद्ध युद्धास सज्‍ज’ असा संदेश पाकिस्तानला अयुबखानानी दिला. एवढेच नव्हे, तर संयुक्त राष्टांत भुट्टोने ६ सप्टेंबर रोजी भारताने युद्धास प्रारंभ केल्याचे निवेदन केले. लाहोरपाशी पोहोचलेल्या भारतीय सैन्यावर पाकिस्तानने जोराने प्रतिहल्ले सुरू केल्याच्या बातमीमुळे त्या   सैन्याला माघार घेण्याची आज्ञा १६ व्या डिव्हिजन अधिपतीने दिली. ही आज्ञा चुकीची ठरल्याने त्याला हरबसिंग यांनी पदच्युत केले. या पदच्युतरीबद्दल उलटसुलट मते व्यक्त करण्यात आली. कसेही असो लाहोरचा धोका गेला व या आघाडीवर केवळ १० किमी. पर्यंत प्रगती झाली. युद्धबंदीपर्यंत हाणामाऱ्या चालू राहिल्या. या आघाडीवरील डोग्राई गावाच्या लढाईत (२२ सप्टेंबर) भारतीय सैन्याने पराक्रम गाजविला. कर्नल हाईड (डोग्रा पलटण) व त्यांचे मेजर त्यागी यांनी सन्मान मिळविणे. या युद्धात त्यागी ठार झाले. 

अयुबखानांच्या युद्धघोषणेच्या रात्री पाकिस्तानने पठाणकोट, आदमपूर, हलवारा इ. ठिकाणांवर काही घातपाती छत्रीधारी सैनिकांना सोडले. या छत्रीधारी सैनिकांची धरपकड पंजाबी शेतकऱ्यांनी केली. पाकिस्तानचा घातपाती डाव मुळातच फसला. ७ सप्टेंबर रोजी लाहोरपाशी पाकिस्तानी प्रतिहल्ले झाले. पाकिस्तानी वायुसेनेने पठाणकोट. अमृतसर, जलंदर, फिरोझपूर, श्रीनगर, जामनगर, कलाईकुंडा येथील विमानतळांवर व गावांवर वायुहल्ले केले. 

लाहोर काबीज करण्याची भारताची योजना नव्हती, असे रक्षामंत्री चव्हाणांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचा कोणताही प्रदेश पादाक्रांत करण्याची भारताची भूमिका नव्हती. पाकिस्तानचे काश्मीरवरील लष्करी दडपण कमी करण्यासाठीच लाहोर व सियालकोट या वैकल्पिक आघाड्या उघडण्यात आल्या. पाकिस्तानचे काश्मीरपुरतेच युद्धक्षेत्र मर्यादित करणे लष्करी दृष्ट्या भारताला शक्य नव्हते हे पाश्चात्य व इतर राष्ट्रे यांनी पटवून घेतले नाही, असे दिसते. 

सियालकोट आघाडी भारताने ८ सप्टेंबर रोजी सुरू केली. या क्षेत्रात पाकिस्तानने कडवा विरोध केला. मोठ्या प्रमाणावर व तीव्रतेने रणगाड्यांच्या लढाया झाल्या. कर्नल तारापोर [⟶ पूना हॉर्स] हे येथेच ठार झाले व त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र बहाल करून गौरविण्यात आले. रणगाड्यांचा नाश मोठ्या प्रमाणावर झाला. २३ सप्टेंबर म्हणजे युद्धबंदीपर्यंत फारशी प्रगती झाली नव्हती.

तिसरे गाजलेले रणक्षेत्र खेमकरण हे होय. खेमकरण-कसूरमार्गे लाहोरकडे कूच करणाऱ्या चौथ्या डिव्हिजनला पाकिस्तानने परत खेमकरणकडे माघार घ्यावयास भाग पाडले. (७ सप्टेंबर). लाहोर व सियालकोट आघाड्यांवरील भारतीय दडपणाला उत्तर म्हणून पाकिस्तानी सैन्याने ८ सप्टेंबर रोजी २०० पॅटन रणगाडे घेऊन खेमकरणवर हल्ला केला. हल्ल्याचे लक्ष्य, खेमकरण-बुर्की येथील आघाड्यांच्या पिछीडीस जाणे व बिआस नदीवरील बिआस व हरीके पूल हे होते. येथून दिल्लीकडे कूच करण्याचा पाकिस्तानी हेतू होता, असे म्हणतात. पण त्यात तथ्य नाही व पाकिस्तानला ते शक्यही नव्हते. भारतीय सैन्याने सतलज नदी व कपूर कालवा यांमध्ये घोड्याच्या नालासारखी व्यूहरचना केली. कालव्याचे पाणी सोडून कृत्रिम दलदल निर्माण करण्यात आली. ऊसाच्या पिकांत भारतीय रणगाडे, तोफा व रणगाडा-विरोधी मोर्चे नाल्याच्या बाजूने उभारले गेले. या दलदलीत सापडल्याने पॅटनची चलनक्षमता नष्ट झाली. ऊसामुळे क्षेत्रनिरीक्षण मंदावले. १० सप्टेंबरपर्यंत पाकिस्तानी रणगाड्यांचा धुव्वा करण्यात आला. सु. १०० पॅटन नष्ट झाले. त्यांपैकी उत्तम स्थितीतील ३२ रणगाडे भारताच्या ताब्यात आले. याच क्षेत्रात भारताच्या ग्रेनेडिअर पलटणीचे (मेओ मुस्लिम) क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद हे शहीद होऊन त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र देण्यात आले. येथील लढाई ‘अस्सल उत्तर’ म्हणून जगप्रसिद्ध झाली. अस्सल उत्तर हे खेडे खेमकरणाच्या पूर्वेस आहे. ब्रिगेडिअर त्यागराज हे रणगाडा ब्रिगेडचे प्रमुख होते.

लाहोर व सियालकोटच्या आघाड्यांवर लढाया सुरू होत असतानाच ८ सप्टेंबरला, राजस्थानातील बारमेरकडून सिंधमधील गद्रा गाव भारताने काबीज केले. पाकिस्तानने मुनाबाववर विमानी व तोफमारा केला. त्याला उत्तर म्हणून गद्राच्या नैर्ऋत्येकडील डाली गाव १८ सप्टेंबरला भारतीय सैन्याने काबीज केले. राजस्थानी आघाडी उघडण्याचे कारण पाकिस्तानचे लक्ष दुसरीकडे वळविणे हे होते. यानंतर एकमेकांत वरील किरकोळ हल्ले २२ सप्टेंबरपर्यंत चालू होते.


अमेरिका व ब्रिटन यांनी भारत व पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरविण्यावर बंदी आणली. चीनने १७ सप्टेबर रोजी भारताला निर्वाणीचा खलिता धाडला. या खलित्यान्वये सिक्कीम हद्दीवरील मोर्चे भारताने विस्थापित केले नाहीत, तर चीन योग्य ती कार्यवाही करील, अशी धमकी देण्यात आली होती. अमेरिका व रशिया यांनी भारत – पाकिस्तानच्या बाबतीत हस्तक्षेप न करण्याची सूचना चीनला दिली. 

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने २० सप्टेंबर रोजी, भारत व पाकिस्तानला २२/२३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ‘गोळीबार स्थगिती’ करण्याचा आदेश दिला. भारताने तो तत्काळ मान्य केला. पाकिस्तानने २२ सप्टेंबर रोजी त्यास मान्यता दिली.

युद्धबंदी व ताश्कंद करार: जागतिक आणि उपखंडीय राजनैतिक व राज-सामरिक दृष्ट्या हे छोटे युद्ध महत्त्वाचे ठरते. चीन, रशिया व अफगाणिस्तान या राष्ट्रांच्या सरहद्दी काश्मीरच्या हद्दीला मिळतात. काश्मीर व पंजाब यांचे भू-समारिक महत्त्व ओळखून अमेरिका, रशिया व चीन यांचा भारतीय उपखंडावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्‍न लक्षात ठेवला पाहिजे. अमेरिका व ब्रिटन यांची भारतातील आर्थिक गुंतवणूक (तत्कालीन सु. ८,००० कोटी रूपये) लक्षात घेता, त्यांना या उपखंडाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाटत असावी. म्हणून भारत -पाकिस्तान संघर्ष हद्दीबाहेर जाण्यापूर्वी, त्यास थांबविण्यास अमेरिका व रशिया उघुक्त झाले. रशियाच्या मध्यस्थीने व अमेरिकेच्या मूक संमतीने युद्ध थांबविण्यात आले. ४ ते १० जानेवारी १९६६ पर्यंत भारत व पाकिस्तान यांच्यात रशियाचे पंतप्रधान कोसिजिन यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होऊन ‘ताश्कंद करार’ करण्यात आला. 

या समझोत्यामुळे रशियाचे भारत व पाकिस्तानबरोबरचे संबंध घनिष्ट होतील, असे कोसिजिन म्हणाले. तथाकथित काश्मीर समस्या सोडविण्यात किंवा तिला जागतिक प्रश्नाचे स्वरूप देण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरले. हा करार रशियाच्या दडपणामुळे झाला, अशी  भुट्टो याने कराराविरूद्ध प्रचारभूमिका घेतली. २१ फेब्रुवारी १९६६ रोजी भारतीय लोकसभेत ‘ताश्कंद करार’ मान्य करण्यात आला. २५ फेब्रुवारीपर्यंत भारत व पाकिस्तान यांनी आपापले सैन्य युद्धपूर्व स्थानापर्यंत मागे घेतले. 

संरक्षणक्षमता दृढ करण्यासाठी पाकिस्तान चीनकडे व भारत रशियाकडे वळले. जोपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रश्न सुटणार नाहीत, तोपर्यंत शस्त्रास्त्रवाढीची स्पर्धा चालू राहील, असा इशारा राष्ट्राध्यक्ष अयुबखानानी दिला. पाकिस्तानला चीनने २७० रणगाडे व १२५ मिग-१९ विमाने पुरविली, अशी बातमी त्यावेळी प्रसृत झाली होती. चीनने मे १९६६ मध्ये सिंक्यांग-हुंझा-गिलगिट रस्ता खुला केला. गिलगिट येथे पाकिस्तानचा मोठा विमानतळ आहे. 

युद्धमीमांसा: हे युद्ध तीव्रतेने व अहमहमिकेने लढले गेले. भारत-चीन युद्धाचा कलंक भारतीय सैन्याने धुऊन काढला. युद्धात पुढीलप्रमाणे प्राणहानी व वित्तहानी झाली भारताचे २,२२६ व पाकिस्तानचे ४,८०२ सैनिक ठार झाले. भारतीय तरूण अधिकाऱ्यांची प्राणहानी फार झाली, ही महत्त्वाची बाब होय. आघाडीवर राहून त्यांनी आपल्या दलांचे नेतृत्व केल्याची ही साक्ष म्हणता येईल. भारताचे सु. ७,८७० सैनिक जखमी झाले. जखमी पाकिस्तानी सैनिकांची माहिती नाही पण त्यांची संख्या सु. ९,००० असावी. पाकिस्तानची  १००, तर भारताची सु. ३५ विमाने नष्ट झाली. भारताला युद्धकार्यासाठी रू.५०० कोटी खर्च आला. भारताने पाकिस्तानची १,८०० चौ. किमी., तर पाकिस्तानने भारताची ५०० चौ. किमी. भूमी बळकाविली होती परंतु ताश्कंद करारानुसार प्रदेशाची देवाणघेवाण करण्यात आली. रणगाडे किती नष्ट व निकामी झाले, याची खरी माहिती उपलब्ध नाही. सामान्यपणे भारताचे २७ टक्के, तर पाकिस्तानचे ३२ टक्के रणगाडे नष्ट वा निकामी झाले. काही पाश्चात्य तज्ञांच्या मताप्रमाणे भारताचे १०० ते १२५ रणगाडे नष्ट वा निकामी झाले असावेत. सियालकोटच्या लढाईत पाकिस्तानने रणगाड्यांची प्रतिचढाई केली नाही, यावरून त्याच्या पॅटनची वाताहत मोठी झाली असावी. पॅटनच्या भीतीची बागुलबुवा उऱला नाही. पाकिस्तानचे रणगाडा रणतंत्र दोषास्पद ठरले. पायदळ व रणगाडे यांची सांगड घालणे पाकिस्तानला जमले नाही. अयुबखानानी ११ जनरल व ३९ ले. कर्नल निवृत्त केले. चौधरींनी १ मेजर जनरल, २ -३ ब्रिगेडिअर व तितकेच ले. कर्नल निवृत्त केले आसावेत. 

युद्धकामगिरीबद्दल भारत सरकारने पुढीलप्रमाणे पुरस्कार दिले: (१) परमवीरचक्र : हवालदार अब्दुल हमीद व कर्नल तारापोर (दोन्ही मरणोत्तर). (२) महावीरचक्र : २०, (३) वीरचक्र : ५८, (४) पद्मविभूषण : जनरल चौधरी व एअर मार्शल ⇨ अर्जनसिंग  यांशिवाय इतरही पुरस्कार देण्यात आले.

या युद्धामुळे भारताला पुढील गोष्टीची प्रकर्षाने कल्पना आली : (१) गुप्तवार्तासंकलन अकार्यक्षम होते. (२)सैन्य, काश्मीरी लोकसेना, सशस्त्र पोलीस व इतर पोलीस यांचे एकसूत्री नियंत्रण व अधिपत्य नसल्याने काश्मीरात मोठ्या प्रमाणावर तिन्ही बाजूंनी घुसखोर शिरले. (३) घुसखोरी थांबविण्यासाठी खडे सैन्य प्रारंभापासूनच गुतविण्यात आले. तीच गोष्ट युद्धबंदी संरक्षणाबाबतही झाली. वास्तविक ही कामे सीमासंरक्षक व हत्यारी पोलीसांना प्रारंभापासून द्यावयास हवी होती. 

या युद्धात भारताने प्रतिक्रियात्मक भूमिका घेतल्याबद्दल टीका केली जाते तथापि या टीकेत तथ्य नाही. जागतिक मत व बड्या राष्ट्रांची हस्तक्षेपक्षमता ध्यानात ठेवल्यास प्रतियोगी भूमिका वस्तुनिष्ठ व म्हणून योग्य ठरते. या युद्धात भारताने कालबाह्य झालेले दुसऱ्या महायुद्धातील युद्धतंत्र वापरल्याबद्दल काही भारतीय युद्धविशारदांनी टीका केली तथापि कालेचित युद्धतंत्र म्हणजे काय, याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. भारताकडे दुसऱ्या महायुद्धकालीन शस्त्रास्त्रे होती. शस्त्रास्त्रांचा मगदूर, सैनिकी कौशल्य व शिक्षण त्यानुसार असणे, स्वाभाविक ठरते. हे युद्ध मर्यादित उद्दिष्टासाठी लढले गेले, हे विसरता कामा नये. 

बांगला देश मुक्तियुद्ध: (३ डिसेंबर – १५ डिसेंबर १९७१). भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये हे तिसरे युद्ध झाले. (कच्छ रण युद्ध धरल्यास, चौथे युद्ध). भारतावर ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानने हवाई हल्ले करून युद्धास आरंभ केला. या संघर्षाचे निमित्त बांगला देशाचे मुक्तियुद्ध हे होते. या युद्धाची राजकीय, आर्थिक व इतर पार्श्वभूमी इतरत्र दिली आहे.बांगला देशातील दडपशाही बंद करावी व भारतात लोंढ्याने येणारे निर्वासित परत आपल्या घरी सुखासमाधानाने नांदतील अशी कार्यवाही पाकिस्तानने करावी, याबद्दल भारताने त्याला वारंवार सुचविले तथापि पाकिस्तानने तसे काहीही न करता उलट पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात भारत हस्तक्षेप करीत असल्याचा व बांगला देशातील बंडखोरांना मदत देत असल्याचा दावा केला. 

मार्च १९७१ च्या आरंभी जनरल टिक्काखान याची बांगला देशाचा लष्करी कायदा प्रशासक म्हणून राष्ट्राध्यक्ष याह्याखानानी नेमणूक केली. त्याने बांगला देशात सुव्यवस्था स्थापण्यासाठी सैनिकी बळाचा उपयोग करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे समुद्रमार्गे व विमानांनी पश्चिम पाकिस्तानातून तीन डिव्हिजन व इतर रणसामग्री पाठविण्यात आली. पाकिस्तानी विमानांना श्रीलंकेमध्ये इंधन पुरवठा केला जाई त्यामुळे बांगला देशात सैन्याची मोठ्या प्रमाणावर त्वरेने जमवाजमव करणे पाकिस्तानला शक्य झाले. टिक्काखानाच्या नेतृत्वाखाली २५ मार्च रोजी शेकडो बांगला देशीयांची (विद्यार्थी, प्राध्यापक व बुद्धिमान) कत्तल झाली व हजारो स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले. तेथील जनतेने २६ मार्च रोजी स्वतंत्र बांगला देशाची घोषणा केली. पाकिस्तानी सैन्यासी लढा देण्यासाठी बांगला देश मुक्तिसेना (पुढे मुक्तवाहिनी) स्थापन करण्यात आली (११ एप्रिल १९७१). कर्नल महमूद ओस्मानी हे मुक्तिवाहिनीचे सरसेनापती होते.


युद्धाच्या आरंभीच्या दोन महिन्यांत पाकिस्तानने पुढीलप्रमाणे महत्वाच्या सैनिकी कारवाया केल्या : (१) भारताच्या हद्दीत असलेल्या बांगला देशीय शरणार्थी वसाहतीवर तोफमारा करणे, खेडेगावांना आगी लावणे, माणसे पळविणे व घातपात करणे. २३ ऑक्टोबर रोजी आसामच्या गोआलपाडा जिल्ह्यात शेकडो रझाकार घुसले, पण त्यांना गिरफ्दार करण्यात आले. (२) काश्मीर व त्रिपुरावर हवाई अतिक्रमणे करण्यात आली. (३)२१ नोव्हेंबर रोजी कलकत्ता जेसोर (बांगला देश) मार्गावरील बोप्रा (प. बंगाल) गावावर पाकिस्तानी सैन्याने व विमानांनी हल्ला केला. प्रतिहल्ल्यात, भारतीय सैन्याने त्याचे १३ रणगाडे व तीन विमाने नष्ट केली. या दिवसापासून भारताने आक्रमण सुरू केल्याचा पुकारा पाकिस्तानने केला. (४) नोव्हेंबरअखेर हिल्ली गावावर पाकिस्तानने हल्ला केला. लढाई तीन दिवस चालली, दोन्ही पक्षांची जबर हानी झाली. (५) अगरतला विमानतळावर पाकिस्तानी विमानांनी हल्ला केला. (६) पाकिस्तानी अतिक्रमणे बंद पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय हद्द ओलांडूनही संरक्षणात्मक प्रतिकार करण्याची सवलत भारत सरकारने भारतीय सैन्याला दिली. (७) २५ नोव्हेंबर रोजी पुढच्या दहा दिवसांत स्वतः युद्धाला निघणार अशी याह्याखानानी घोषणा केली. नोव्हेंबर २३ रोजी त्याने ‘आणीबाणी’ जाहीर केली. (८) पूर्व पाकिस्तानाचे सरसेनापती महंमद नियाझीने भारताने सात आघाड्यांवर युद्ध सुरू केल्याची हाकाटी केली.

भारतीय युद्धसज्जता व बल पुढीलप्रमाणे होते : जनरल कॅन्डेथ यांच्या पश्चिमी विभागात पाकिस्तानी सेनेच्या तोंडावर तेरा पायदळ व एक रणगाडा डिव्हिजन आणि काही रणगाडा ब्रिगेड होत्या. लडाखमध्ये दोन डिव्हिजन चीनच्या समोर होत्या. मध्य विभागात सु. तीन पहाडी डिव्हिजन आणि पूर्व विभागात (जनरल अरोरा) बांगला देशाच्या पूर्वेला, उत्तरेला व पश्चिमेला सर्व मिळून एकूण सात डिव्हिजन होत्या. दक्षिण विभाग [⟶ जनरल बेवूर] कच्छ बारमेर प्रदेशात दोन डिव्हिजन खड्या होत्या. याशिवाय फुटकळ पायदळ व रणगाडा ब्रिगेड होत्या. १९६५ च्या युद्धानंतर भारतीय रणगाड्यांच्या संख्येत ४५० रशियायी व ३०० विजयंता रणगाड्यांची भर पडली होती. भारतीय वायुसेनेकडे एकूण ६२५ लढाऊ विमाने (मिग – २१, सुखोई – ७, हंटर वगैरे) होती. भारतीय नौसेनेकडे एक विमान वाहक, दोन क्रूझर, तीन विनाशिका व चौदा फ्रिगेट होत्या.

पाकिस्तानची युद्धसज्जता व युद्धबल पुढीलप्रमाणे होते. बांगला देशात ४ १/२ पायदळ डिव्हिजन, ७०,००० रझाकार अन्सार सशस्त्र पोलीस, सु. ८० रणगाडे, सहा तोफखाना रेजिमेंट इत्यादी डाक्का विमानतळावर एक सेबर स्कॉड्रन आणि चित्तगाँग, कॉक्स बाझार येथे काही तोफनौका होत्या. काश्मीर ते कच्छपर्यंत ८ पायदळ डिव्हिजन, २ रणगाडा ब्रिगेड व फुटकळ पायदळ ब्रिगेड आणि सर्व प्रकारचे तोफखाने होते. नौसेना कराची बंदरात होती. विमाने पेशावर, कराची, सरगोधा इ. ठिकाणी होती. १९६५ च्या युद्धक्षेत्रासारखीच ही पखरण होती तथापि रणगाडे मोठ्या संख्येने लाहोर सियालकोट व कसूर लाहोर या क्षेत्रांत होते.

युद्ध लढविण्याच्या दृष्टीने भारत पाकिस्तानपेक्षा थोडा वरचढ होता. चीनने वल्गना करण्यापलीकडे फारसा उपद्रव दिला नाही. युद्धकाळात भारताचे राष्ट्राध्यक्ष गिरी, पंतप्रधान इंदिरा गांधी, रक्षामंत्री जगजीवनराम, भूसेना प्रमुख [⟶ जनरल माणेकशा], नौसेना प्रमुख [⟶ अँड्‌मिरल नंदा] आणि वायुसेना प्रमुख [⟶ एअर चीफ मार्शल लाल] हे होते.

युद्धयोजना व युद्धपट : पाकिस्तानने युद्धाचा उपक्रम केल्यास बांगला देशाची मुक्ती करणे हे प्रथम राजकीय उद्दिष्ट होते. इतर आघाड्यांवरील युद्धकार्य हे त्या उद्दिष्टास पूरक होते. युद्ध सुरू झाल्यानंतर बांगला देशाकडे कुमक पाठविणे पाकिस्तानला अशक्य करणे, हे दुय्यम आघाड्यांवरील कार्य होते. बांगला देशातील युद्ध आक्रमणशील, तर दुय्यम आघाड्यांवर आक्रमक संरक्षक स्वरूपाचे होते. दहा तेरा दिवसांत बांगला देशाची मुक्तता करावयाची असल्याने वेळेला महत्व होते आणि त्या दृष्टीने युद्धपट आखण्यात आला होता. युद्धपटाच्या दृष्टीने तिन्ही दिशांकडून बांगला देशात आगेकूच करण्याचे मार्ग ताब्यात घेणे, सरहद्दीवरील पाकिस्तानी सैन्याला पीछेहाट करण्याची व डाक्का येथे एकत्रित होण्याची संधी मिळू न देणे. डाक्क्याच्या पूर्वेला मेघना, पश्चिमेला व दक्षिणेला जमुना पद्मा आणि उत्तरेला नद्यांचे अडथळे असल्याने डाक्का ‘बेट दुर्ग’ बनतो. या दुर्गाचा आश्रय घेऊन पाकिस्तानी सैन्याला अखेरची लढाई देणे अशक्य करणे, हे लष्करी उद्दिष्ट होते. दहा ते तेरादिवसांत युद्ध आटोपणे आवश्यक होते, नपेक्षा संयुक्त राष्ट्रे तसेच त्रयस्थ राष्ट्रे यांना हस्तक्षेप करण्यास वाव मिळून कुजलेला राजकीय डाव निर्माण होण्याचा संभव होता. चीनच्या विरुद्ध असलेली हिमालय आघाडी पण मजबूत ठेवण्यासाठी बांगला देशातील काम आटोपल्यावर तत्काळ तिकडे सैन्य पाठविणे जरूरीचे होते. बांगला देशाला सागरी बाजूने अलग पाडण्यासाठी त्याची सागरी नाकेबंदी आवश्यक ठरली. बांगला देशावर हवाई वर्चस्व मिळविणे व राखणे हे एक महत्वाचे काम भारतीय वायुसेनेकडे होते.

पाकिस्तानचा डाव पुढीलप्रमाणे होता : बांगला देशातील पाकिस्तानी सैन्याला, भौगोलिक, वेळ व वाहतूक साधनांचा अभाव या कारणावरून त्वरेने मदत करणे अशक्य होते. तेव्हा बांगला देश हद्दीवर भारतीय सैन्याला थोपवून धरणे व बांगला देशांतर्गत सर्व ठिकाणी सत्ता कायम ठेवणे. या दृष्टीने बांगला देशावरील भारतीय दडपण काढण्यासाठी काश्मीरच्या व पंजाबच्या आघाड्यांवर युद्ध हिरीरीने लढविणे. निष्कर्ष हा की बांगला देशाकडे संरक्षणात्मक काळकाढूपणाचे युद्ध, तर पंजाब काश्मीरचे युद्ध आक्रमणशील ठेवणे. भारताचा युद्धपट पाकिस्तानी युद्धपटाविरोधी राहणार हे उघड होते. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष व लष्करी प्रशासक याह्याखान यांनीच युद्धनिर्देशन केले. इतरांची नावे दिली नाहीत.

युद्धघटना : पाक विमानांनी ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी श्रीनगर, पठाणकोट, जोधपूर, आग्रा इ. विमानतळांवर हल्ले केले. या हल्ल्यांमुळे त्या विमानतळांचे नुकसान झाले नाही. त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधी कलकत्त्याला होत्या. हल्ल्याची बातमी पूर्व विभागाचे जनरल अरोरा यांनी दिल्यावर त्या त्वरेने दिल्लीला परतल्या. रात्री ११ वाजता राष्ट्रपतींनी ‘आणीबाणी’ जाहीर केली. मध्यरात्री भारतीय विमानांनी पाकिस्तानी विमानतळावर प्रतिहल्ले चढवून तेथील अनेक विमाने नष्ट केली. पाकिस्तानने रात्री ८.३० वाजता काश्मीर विभागात छांब व पूंचवर हल्ले सुरू केले.


बांगला देशात ३ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास, अगरतला विमानतळावर पाकिस्तानी विमानांनी दुसऱ्यांदा हल्ला केला. त्याच्या आदल्या दिवशी बांगला देशाच्या हद्दीत, अगरतल्याजवळील पाकिस्तानी तोफमोर्च्यावर भारतीय सैन्याने हल्ले केले. हल्ल्यानंतर तेथेच सैनिकी ठाण मांडले. डिसेंबर ४ ते १५ या काळात पुढीलप्रमाणे लढाया झाल्या : डिसेंबर ४ : याह्याखाननी युद्धाची घोषणा केली. या युद्धात भारताचा जबरदस्त पराभव होणार अशी त्यानी ग्वाही दिली. भारतीय लोकसभेत भारत संरक्षण अधिनियम एकमताने संमत झाला. काश्मीर पंजाब राजस्थान आघाडी : या आघाडीवर छांब क्षेत्रातील लढाया घनघोर झाल्या. ४ – ७ तारखांस पाकिस्तानी हल्ले जोराने झाले. भारतीय सैन्याला छांब गाव सोडून मुनावर तावीच्या पश्चिम काठापर्यंत माघार घ्यावी लागली. पाकिस्तानी सैन्याने नदीपार करावयाचे प्रयत्न केले. ८ – १२ तारखांच्या या काळात झालेल्या संघर्षात, पाकिस्तानी सैन्याचे ३,००० सैनिक व ५० रणगाडे नष्ट झाले. पाकिस्तानी चढाई थंड झाली. तारीख ४ – ६ या तीन दिवसांत पाकिस्तानी सैन्याने पूंचवर सारखे हल्ले केले. ब्रिगेडिअर विश्वनाथ नातूंच्या ब्रिगेडने ते हल्ले निष्प्रभ ठरविले. कार्गिल येथील पाकिस्तानचे ३३ मोर्चे भारतीय दलांनी पादाक्रांत केले. टिटवाल व लिपा खोरे यांतून पाकिस्तानी सैन्याला हाकलून देण्यात आल्यामुळे तथाकथित आझाद काश्मीर सरकारच्या मुझफराबाद राजधानीवर दडपण आले. पंजाब आघाडी : गोळीबार स्थगितीपर्यंत (१६ डिसेंबर) या आघाडीवर लढाया चालू राहिल्या. भारतीय सैन्याने खेमकरण उभारा काबीज केला. (१९६५ च्या युद्धात हा उभारा पाकिस्तानने काबीज केला होता). डिसेंबर ६ रोजी भारताने सियालकोटच्या पूर्वेस शंकरगड उभाऱ्यावर (जम्मू व अमृतसरच्या मध्ये) चढाई केली. १५ व १६ रोजी या उभाऱ्यात घनघोर रणगाडा लढाया झाल्या. पूना हॉर्सने आपले ‘फरवर्-इ-हिंद’ (हिंदचे अभिमान चिन्ह) हा लोक किताब खरा केला. या लढाईत पराक्रम गाजविणारे ले. अरुण खेत्रपाल यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले. शंकरगडच्या लढाईत पाकिस्तानचे ५० पॅटन नष्ट करण्यात आले. सिंध राजस्थान आघाडी : पाकिस्तानी सैन्याने ४ डिसेंबर रोजी राजस्थानमधील जैसलमीरच्या पश्चिमेकडील लोंगेवाल व बामगडकडे चढाई सुरू केली. ५ डिसेंबर रोजी बेवूरांच्या सैन्याने प्रतिहल्ले करून त्यास सिंधमध्ये माघार घ्यावयास लावले. लोंगेवालची लढाई प्रसिद्ध आहे. येथे केवळ १०० – १५० भारतीय जवानांनी २४ तास पाकिस्तान रणगाड्यांना यशस्वी झुंज दिली. भारतीय वायुसेना मदतीस आली होती. लोंगेवालच्या लढाईत ३४ पाकिस्तान रणगाडे व ८० वाहने नष्ट करण्यात आली. बारमेरकडून भारतीय सैन्याने चढाई करून सिंधमधील नया चोर, इस्लामकोट व नगर पारकरपर्यंत मुसंडी मारली.

डिसेंबर ४ रोजी भारतीय सैन्य आणि मुक्तिवाहिनी यांनी (१) कोमिल्ला, (२) सिल्हेट, (३) मैमनसिंग, (४) रंगपूर दिनाजपूर आणि (५) जेसोर या पाच मार्गांनी चढाई सुरू केली. वास्तविक आगेकूच २३ मार्गांनी झाली. पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे जसा मार्ग सापडेल तशी आगेकूच केली. पाकिस्तानी मोर्चेबंद गावे शहरे जिंकण्याच्या भानगडीत न पडता त्यांना झुकांड्या देऊन किंवा एकाकी पाहून निकामी करण्याचे रणतंत्र वापरण्यात आले. डाक्का हेच अंतिम लक्ष्य होते. तेथे पाकिस्तानी सैन्याला एकत्रित होण्याची संधी मिळता कामा नये, हे उद्दिष्ट होते. ८डिसेंबरपर्यंत आखौरा, लाक्षाम, दारसाना, कमलपूर व जेसोर विमानतळ पायदळाने आणि हेलिकॉप्टरने सैन्य उतरवून सिल्हेट इ. महत्वाची ठाणी काबीज करण्यात आली. ६ डिसेंबर रोजी लोकसभेत इंदिरा गांधींनी बांगला देशाला मान्यता दिल्याची घोषणा केली. पाकिस्तानने भारताबरोबरच राजकीय संबंध तोडून टाकले. ७ डिसेंबर रोजी जनरल माणेकशा यांनी बांगला देशातील पाकिस्तानी सैन्याला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले. नपेक्षा बांगला देशीयांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारांचा बदला घेण्यास ते उत्सुक असल्याचा इशारा माणेकशा यांनी दिला.

डिसेंबर ८ ते १४ या काळात भारतीय सैन्य व मुक्तिवाहिनी यांची सर्व आघाड्यांवर आगेकूच चालू राहिली. डिसेंबर १० रोजी, बांगला देशातील पाकिस्तानी गव्हर्नराने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ऊ थांट यांच्याकडे गोळीबारस्थगिती प्रस्ताव पाठविला. ११ डिसेंबरला याह्याखाननी हा प्रस्ताव रद्दबातल केला. त्याच दिवशी बांगला देशातील पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंन्यास आरंभ केला. त्यानंतर मैमनसिंग, मैनामती, नोआखाली, जमालपूर, कुश्तिया इ. गावांतून पाकिस्तानी सैन्य एकतर पळून गेले किंवा किरकोळ हाणामारीनंतर मुक्तिवाहिनी व भारतीय सैन्याच्या हातात पडले. पाकिस्तानी सैन्य व रझाकार यांनी आपापसांत मारामाऱ्या सुरू केल्या. ११ डिसेंबर रोजी कलकत्त्याच्या डमडम विमानतळावर भारतीय छत्रीधारी सैनिक विमानात चढताना दिसले. हे सैनिक कोठल्यातरी महत्वाच्या कामगिरीवर निघाल्याची बातमी सर्वदूर पसरली. यांपैकी एका छत्रीधारी पलटणीला (ब्रिगेडिअर हरदेवसिंग) डाक्क्याच्या वायव्येला तनगैलपाशी सोडण्यात आले बाकी छत्रीधारी पंजाबच्या आघाडीकडे पाठविले गेले. छत्रीधारी पलटणीवर पाकिस्तानी सैन्याने हल्ले चढविले, पण ते निष्फळ ठरले. १२ डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने नावांमधून पळण्याचा प्रयत्न केला. त्या सहा नावा सैनिकांसहित बुडविण्यात आल्या. १३ डिसेंबर रोजी पुनश्च जनरल माणेकशांनी शस्त्रसंन्यासाची सूचना डाक्क्यातील आणि इतर ठिकाणच्या पाकिस्तानी सैन्याला केली. १४ डिसेंबर रोजी डाक्यावर भारतीय सैन्याने बाँब व रॉकेट हल्ले सुरु केले. १५ तारखेस भारतीय सैन्याने डाक्क्याभोवतीचा फास पक्का केला. चहूबाजूंनी भारतीय सैन्य डाक्क्याभोवती गोळा होऊ लागले. युद्ध सुरू झाल्यापासून अखेरपर्यंत हिल्ली येथील पाकिस्तानी सैन्याने मोठ्या शर्थीने भारतीय सैन्याला तोंड दिले. हिल्लीच्या लढाईत एका मराठा पलटणीचे अर्धे जवान गारद झाले. बोग्रा येथेही घनघोर छोटी लढाई झाली. हवाई हल्ल्याने चितगाँग बंदर वगैरेंना मोठ्या आगी लागल्या. चितगाँगच्या दक्षिण किनाऱ्यावर भारतीय सेनेची ⇨संयुक्त सेनाकारवाई फसली. १४ डिसेंबर रोजी पाकिस्तानी गव्हर्नर मलिक याने याह्याखानांस राजीनामा सादर केला होता. मलिक व इतर पाकिस्तानी नागरी अधिकाऱ्यांनी ⇨रेडक्रॉस  व्यवस्थापनाचा आश्रय घेतला.

जनरल नियाझीने १५ डिसेंबर दुपारी अमेरिकी राजनैतिक माध्यमाद्वारे माणेकशांना गोळीबार थांबविण्याचा प्रस्ताव पाठविला. माणेकशांनी नियाझीला ‘बिनशर्त शरणागती’ पतकरण्यास सांगितले. बिनशर्त शरणागती मान्य करण्यापूर्वी भारताची सद्भावना दर्शविण्यासाठी माणेकशांनी १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून एकतर्फी गोळीबार स्थगितीची घोषणा केली तथापि ‘बिनशर्त शरणागती’ ताबडतोब न स्विकारल्यास, १६ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजेपासून भारतीय सैन्य अधिक जोमाने युद्ध सुरू करील, अशी कडक सूचना त्यांनी त्याला केली.

भारतीय बाँबफेकीने बांगला देशाचा इतरांशी संपर्क तुटला होता. संयुक्त राष्ट्रांच्या रेडिओद्वारे १६ डिसेंबर रोजी सकाळी ८.५० (युद्ध परत सुरू होण्याच्या अगोदर केवळ १० मिनिटे) नियाझीने माणेकशाबरोबर संपर्क साधला. त्याने त्यांच्याकडून आणखी सहा तासांची मुदत मागून घेतली. या मुदतीत भारतीय सैन्याने बाँबफेक करू नये, अशी विनंती केली. शरणागतीच्या शर्तीसंबंधी विचार विनिमयासाठी भारताचे जनरल जेकब डाक्क्यात दुपारी १.२० वाजता आले. तोपर्यंत भारत व मुक्तिवाहिनी यांच्या पाच पलटणी कसलाही विरोध न होताडाक्क्यात शिरल्या होत्या. ‘जय बांगला देश’ व ‘जय भारत’ अशा घोषणा देत बांगला देशियांनी भारतीय सैन्याचे स्वागत केले.


आंतरराष्ट्रीय अधिनियमाप्रमाणे ‘बिनशर्त शरणागती’ चा मसुदा तयार झाला. मसुदा मान्य झाल्यावर जनरल अरोरा, भारतीय वायुदल व नौदल यांचे वरिष्ठ अधिकारी आणि मुक्तिवाहिनीचे ग्रुप कॅप्टन खोंडकर डाक्क्यात आले. डाक्क्याच्या रेसकोर्सवर संध्याकाळी ४.३१ वाजता नियाझीने बिनशर्त शरणागतीचे कागदपत्र त्यांना सादर केले. बांगला देश स्वतंत्र झाला. याबरोबर भारत सरकारने आघाड्यांवर (पंजाब, काश्मीर व सिंघ) ‘गोळीबार स्थगिती’ ची एकतर्फी घोषणा केली. (डिसंबर १७, रात्री ८ वाजता).

हवाई व नाविक युद्धे : १९७१ सालचे युद्ध हे भूसेना, नौसेना व वायुसेना यांचे संयुक्त युद्धकार्य होते. वायुसेनेने व नौसेनेने बांगला देशातील पाकिस्तानी सैन्यास एकाकी पाडले.वायुसेनेने आणि नौसेनेने युद्धाच्या पहिल्या तीन दिवसांतच हवाई व सागरी वर्चस्व स्थापन केले.युद्धाच्या शेवटी बंगार उपसागरात अमेरिकेची नाविक दले आणि त्यांच्या पाठोपाठ रशियाची नौदले आली. त्यांच्या आगमनामुळे युद्धावर परिणाम झाला नाही. अमेरिकी नौदल बांगला देशातील अमेरिकी नागरिकांना घेण्यास आले होते, असे म्हटले जाते परंतु खरा उद्देश समजला नाही. भारतीय वायुसेनेने पुढीलप्रमाणे कामे केली : (१) शत्रूचे विमानतळ, गोद्या, पेट्रोल साठे वगैरेंवर हल्ले केले (२) हवाई लढाया करून हवाईवर्चस्व स्थापले (३) भूसैन्याच्या कामगिरीला मदत केली. उदा.,शत्रूचे रणगाडे, वाहने, रेल्वे, रसदपुरवठा यांना निकामी करणे (४) हवाई टेहळणी करून शत्रूच्या हालचालींची वार्ता मिळविणे (५) विमान आणि हेलिकॉप्टरद्वारे भूसैन्याची गतिमानता वाढविली. रणांगणावर छत्रीधारी सोडले. भारतीय नौसेनेने पुढील नाविक कार्ये पार पाडली : (१) यथाशक्ती शत्रूच्या युद्धनौका व व्यापारी जहाजे बुडविली वा काबीज केली (२) भारतीय सागरी व्यापाराचे रक्षण केले (३) बांगला देश व सिंध यांना समुद्राकडून अलग पाडले (४) शत्रूची गाझी पाणबुडी बुडवून बंगाल उपसागर निर्वैर केला (५) बांगला देश व पाकिस्तानची ⇨सागरी नाकेबंदी केली हे कार्य करताना खुकरी युद्धनौका कामास आली.

पाकिस्तानच्या जनरल नियाझीची शरणागती, डाक्का १६ डिसेंबर १९७१

प्राणहानी  व वित्तहानी यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : भारत – बांगला देश : १,०४७ ठार, ३,०४२ जखमी व ८९ बेपत्ता. पश्चिम आघाडी : १,४२६ ठार, ३,६११ जखमी व २,१४९ बेपत्ता. पाकिस्तान-बांगला देश ५ ते ६ हजार ठार व ६ ते ७ हजार बेपत्ता. पश्चिम आघाडीवरील हानीचे तपशील जाहीर नाहीत.  

भारताचे एकूण ७३ रणगाडे व ४५ विमाने नष्ट झाली. पाकिस्तानचे एकूण २४६ रणगाडे व ९४ विमाने नष्ट झाली. नाविक युद्धात पाकिस्तानची फार हानी झाली. ती अशी : युद्धनौका – आठपैकी २ पाणबुड्या चारपैकी २ व तौफनौका १६. भारताचे एक फ्रिगेट बुडाले. वित्तहानीचा तपशील अद्याप उपलब्ध नाही. बांगला देशात सु. ९०,००० पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी करण्यात आले. 

या युद्धात अत्युच्च शौर्य दाखविल्याबद्दल मेजर होशियारसिंग (३ री ग्रेनेडिअर पलटण) आणि ले. अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर सेखो आणि नाईक इक्का (गार्ड पलटण) यांना मरणोत्तर परवीरचक्रे प्रदान करण्यात आली. भारताविरुद्ध केलेल्या युद्धात झालेल्या पराभवास पाकिस्तानी जनतेने व भुट्टो इ. पुढाऱ्यांनी याह्याखानास जबाबदार ठरविले. त्याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. २० डिसेंबर रोजी भुट्टोची राष्ट्राध्यक्ष व प्रमुख लष्करी कायदा प्रशासक म्हणून नेमणूक झाली. त्याच दिवशी पूर्व पाकिस्तान (म्हणजे बांगला देश) हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग असल्याचे व पराभवाचा बदला घेण्याचे आणि याह्याखान यांना सैन्यातून निवृत्त केल्याचे भुट्टोने जाहीर केले. जनरल अब्दुल गुल हसन याला याह्याखानाच्या बदली पाकिस्तानी सैन्याचे सरसेनापती पद मिळाले.  

जानेवारी ११ ते १४ फेब्रुवारी १९७२ पर्यंत पाकिस्तान वगळता, सर्व प्रमुख राष्ट्रांनी बांगला देशाच्या शेख मुजीबूर रहमान यांच्या सरकारला तसेच स्वतंत्र बांगला देशाला मान्यता दिली. २८ जून ते २ जुलैमध्ये सिमला येथे इंदिरा गांधी व भुट्टो यांच्यात बोलणी होऊन सिमला करार करण्यात आला [⟶ सिमला करार]. 

युद्धमीमांसा : बांगला देशीयांची चाललेली ससेहोलपट पहात असताना व असह्य आर्थिक ताण पडत असताना भारताने बांगला देशातील सैनिकी राजवटीविरुद्ध ताबडतोब (२६ मार्च नंतर) युद्ध का केले नाही, असे विचारण्यात आले होते. ताबडतोब युद्ध का सुरू केले नाही याची कारणे पुढीलप्रमाणे देता येतात : (१) सामोपचारे आणि जागतिक राजकीय मताने पाकिस्तानला ताळ्यावर आणणे हा महत्वाचा प्रथम उपाय होय. युद्ध हा अखेरचा उपाय असतो. (२) युद्धाची व्याप्ती बांगला देशापुरतीच मर्यादित ठेवणे आवश्यक होते नपेक्षा अमेरिका व चीन यांना हस्तक्षेप करण्याची संधी मिळून त्याची परिणती अमर्याद युद्धात होण्याची दाट व गंभीर समस्या उभी झाली असती. (३) १९६५ मध्ये (भारत पाकिस्तान संघर्ष १ – २२ सप्टेंबर) चीन जरी प्रत्यक्ष युद्धात उतरला नव्हता, तरी १९७१ मध्ये त्याची भूमिका धमक्या देण्यापलिकडे जाणार नाही अशी परिस्थिती नव्हती. १९७१ च्या जूनमध्ये राष्ट्राध्यक्ष निक्सन याचे सल्लागार हेन्री किसिंजर याच्या खटपटीमुळे अमेरिका व चीन यांच्यातील संबंध घनिष्ठ होण्याचा पाया घातला गेला. (४) दोन आघाडी युद्धांची तयारी करणे अत्यावश्यक होते शिवाय युद्धकाळात युद्धसामग्री अखंडित व इच्छित संख्येने मिळण्याची आवश्यकता होती. रशियाशी झालेल्या मैत्रीकरारामुळे (ऑगस्ट १९७१) हा प्रश्न बराचसा सोपा झाला. (५) भारताची पंचवार्षिक संरक्षण विकास योजना (१९६४ – ६९) पूर्णपणे कार्यान्वित झाली नाही. यास कारण अमेरिकेने १९६५ पासून मदत देण्याचे बंद केले, हे होय. रशियाने बरीच रणसामग्री भारताला पुरविली तरीही नवीन रणसामग्री आल्यानंतर तिला पचनी पाडण्यास बऱ्याच कालावधीची गरज होती. (६) भारतांतर्गत परिस्थितीमुळे (पश्चिम बंगाल, नागालँड, मिझोराम येथील अशांतता व पुंडावे) दोन डिव्हिजन अंतर्गत सुरक्षाकार्यात गुंतल्या होत्या. (७) बांगला देशातील युद्धकार्यासाठी सोयीस्कर असे हवाई तळ उपलब्ध नव्हते, उदा., कुंभीग्राम (सिलचर). (८) बांगला देशाच्या युद्धासाठी पश्चिम पाकिस्तान, काश्मीर, राजस्थान, भारत चीन सरहद्द व बांगला देश या पाच आघाड्यांवर फौजफाटा, रसद इ. संघटित करण्यास व त्यांची पखरण करण्यास बराच कालावधी लागला. (९) एप्रिल मेपासूनचे बांगला देश आणि पूर्व भारतावरील हवामान व पर्यावरण लक्षात घेता, मार्च ते ऑक्टोबर यांमधील काल युद्ध लढविण्यास प्रतिकुल होता. शिवाय मार्च ते ऑक्टोबर अखेर हिमालयाच्या घाटखिंडी हालचालीस योग्य असल्याने चीनला हस्तक्षेप सुलभपणे करता आला असता. (१०) बांगला देश मुक्तिसंग्राम हा बांगला देशीयांनीच करावयाचा असल्याने त्यांच्या मुक्तिवाहिनीची युद्धसज्जता पूर्ण होणे प्रथमतः आवश्यक होते. (११) नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासूनचा काळ युद्धकार्याला अनुकूल ठरतो, असे भारताच्या पूर्व विभागाचे त्याकाळचे जनरल अरोरा यांचे मत होते.


युद्ध लढविणे, युद्धयोजना, युद्धकार्य व त्यासाठी आवश्यक राजकीय निर्णय आणि निदेशन यांचे सुसूत्रीकरण निर्दोष झाल्याचे हे भारताच्या इतिहासातील पहिलेच उदाहरण आहे. राजकीय उद्दिष्टे व बळ साध्य करण्यासाठी लष्करी पाठबळ असावे लागते. त्याबरोबरच उद्दिष्टे न्याय्य असल्याचे सिद्ध व्हावे लागते. भारत सरकारने लष्कराला त्याच्या शक्तीप्रमाणे भौगोलिक उद्दिष्टे साधण्याची आज्ञा दिली. ती उद्दिष्टे इच्छित कालावधीत लष्कराने साध्य केली. युद्ध लढविण्याच्या तांत्रिक कार्यात सरकारने हस्तक्षेप केल्याचे दिसत नाही. उदा., गोळीबार स्थगिती व बिनशर्त शरणागती आणि शत्रूच्या प्रदेशात युद्ध लढविणे. या युद्धात अक्षमता किंवा नाकर्तेपणाबद्दल एकाही अधिकाऱ्यावर ठपका आला नाही. कनिष्ठ अधिकारीवर्गाने चोख नेतृत्व केले. हवाई संरक्षणाबाबत मात्र अपुरी व्यवस्था असल्याचे दिसून आले. ते आधुनिक बनविण्याची गरज भासू लागली. जनतासंपर्क उत्कृष्ट होता. आकाशवाणी, वर्तमानपत्रे व मुलाखती यांद्वारा भारतीय जनतेला युद्धाच्या घटना वेळोवेळी कळल्या. तरीही जनतासंपर्क कार्य अधिक कार्यक्षम करण्याची निकड भासू लागली होती. 

पहा : काश्मीरसमस्या पाकिस्तान बांगला देश.

संदर्भ : 1. Asgharkhan M. Air Marshal, The first Round Indo Pakistan War : 1965, Shahi Bad, 1979.

            2. Birdwood, Lord, Two Nations and Kashmir,

            3. Brines, Russel, The Indo Pakistani Conflict, London, 1968.

            4. Campbell, Johnson, Alan. Mission with Mountbatton, London, 1951.

            5. Government of India, Defending Kashmir, New Delhi, 1949.

            6. Government of India, Jawaharlal Nehru’s Speeches : 1945 – 49, New Delhi, 1959.

            7. Hersh, S. M. The Prince of War, New York, 1983.

            8. Lamb, Alastair, Crisis in Kashmir : १९४७ – ६६, London, 1966.

            9. Sinha, S. K. Maj. Gen. Operation Rescue : Vision Book, New Delhi, 1977.

          10. Sukhwant Sing, Maj. Gen – Defence of the Westren Border, New Delhi, 1981.

          11. Tucker,Sir Francis, Lt. Gen, While Memory Serves, London, 1950.

दीक्षित, हे. वि.