भारंगी : (भारंग हिं. बारंगी गु. भारंगी सं. भारंग लॅ. क्लेरोडेड्रॉन सेरॅटं कुल व्हर्बिनेसी). या ०.९-२.५

भारंगी : (१) फूलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फळ.

मी. उंच झुडपाचा प्रसार भारतात वविस्तृतपणे झालेला आहे. ते श्रीलंकेतही आढळते. महाराष्ट्रात कोकण, पेणजवळील मिऱ्या डोंगर, खंडाळा, महाबळेश्वर, कात्रज घाट, पुरंदर इ. ठिकाणी त्याचा प्रसार आहे. ते क्वचित काष्ठयुक्त असून फांद्याही फारशा नसतात. त्याचे खोड चौकोनी असते व त्याच्या कडा धारदार नसतात. कोवळे भाग सामान्यतः केशहीन असतात. पाने बहुधा काही त्रिदली व समोरासमोर असून वरील छंदात (उपांगांत) घुसलेली असतात आणि कधीकधी त्यांच्यी लांबी १८ सेंमी. पर्यंत असते पण सामान्यतः ती १२-५×५.७५-६.२५ सेंमी., आयात किंवा लंबगोल लघुकोनी, ओबडधोबड व तीक्ष्ण दंतुर असतात. पण ती अगदी क्वचित दातेरी असतात. फुले निळी, असंख्य, दिखाऊ असून विरळ, लवदार, द्विशाखित वल्लरीवर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येतात. दर वेळेला फांद्या फुटतात तेथे लघुकोनी छंदाची एक जोडी येते व दुबळक्यात एक फूल येते. प्रत्येक फूल मोठया पानासारख्या छंदाच्या बगलेत येते व अशा तऱ्हेने त्यांची एकत्र मिळून लांब, विरळ, अग्रीय (टोकाकडील), सामान्यत पिरॅमिडसारखी, उभी, १५-२५ सेंमी. लांब परिमंजरी बनते [⟶ पुष्पबंध]. पुष्पमुकुट बाहेरून केशहीन, फिकट निळा, खालचा भाग गर्द निळसर जांभळा व दंडगोलाकार असतो. आठळी फळ ०.६५ सेंमी. लांब, काहीसे रसाळ, रुंदट अंडाभ (अंडयासारखे), सामान्यतः चार पालींचे (भागांचे) असून प्रत्येक पालीत एक छोटी आठळी असते. इतर लक्षणे ⇨ व्हर्बिनेसीमध्ये (सागकुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

भारंगीच्या मुळांना तिखट, कडू व जहाल चव असते. त्यांचा उपयोग ज्वर, संधिवात व अग्निमांद्य (भूक मंदावणे) यांवर करतात मुळांचा काढा आले व धने घालून शिसारीवर देतात. पानांचा उपयोग तापावर, तसेच डोकेदुखी व नेत्रदाहावर बाहेरून लावण्यासाठी होतो. बिया अगदी सौम्य विरेचक असतात व त्यांचा उपयोग काही प्रमाणात जलोदरावर करतात. (चित्रपत्र ६०).

पहा : क्लेरोडेंड्रॉन.

जमदाडे, ज. वि.