भाती : या पक्ष्याला घाटावर ‘पखुरडी’ म्हणतात. याचा टेरोक्लिडी या कुलात समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव

भाटतीतर

टेरोक्लिस एक्झस्टस असे आहे. भारतातील सगळ्या कोरडया प्रदेशात हा सापडतो पण आसाममध्ये मात्र आढळत नाही. सपाट बरड प्रदेश, पडीक जमीन आणि कापणी झालेली शेते यांत हा राहतो.

भाटतीतर कबूतरापेक्षा लहान असतो रंग पिवळसर भुरकट तपकिरी छातीवर अरुंद आडवा काळा पट्टा पोट तपकिरी काळे गाल, हनुवटी आणि गळा मळकट पिवळा शेपटी टोकदार पाचरीच्या आकाराचा पाय आखूड मादीच्या सगळ्या शरीरावर (हनुवटी वगळून) काळ्या रेषा, ठिपके किंवा पट्टे असतात छातीवर नराप्रमाणेच काळा आडवा पट्टा असतो.

धान्य, गवताचे व इतर झुडपांचे बी हे यांचे खाद्य होय. यांचे लहानमोठे थवे किंवा छोटया टोळ्या भक्ष्य टिपीत असताना दिसतात. या पक्ष्याला झाडावर बसता येत नसल्यामुळे तो नेहमी जमिनीवरच वावरतो. याच्या शरीराची संरक्षक रंगव्यवस्था आणि दबून जमिनीला चिकटून बसण्याची याची सवय यांमुळे हालचाल केल्याशिवाय तो आपल्याला मुळीच दिसत नाही. यांची पाणी पिण्याची वेळ आणि ठिकाणे ठरलेली असतात. दररोज सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या सुमारास यांचे मोठाले थवे लांब अंतरावरून या ठराविक ठिकाणी पाणी पिण्यास येतात. पिल्लांना पाणी पाजण्याचे काम नराकडे असते पाणी पिण्याच्या वेळी तो शरीराच्या खालच्या भागाची पिसे पाण्याने भरपूर भिजवून घेतो घरटयात गेल्यावर पिल्ले ही पिसे चोखून त्यांतले पाणी पितात. उडत असताना हा ‘कुटरो’ असा दूरवर ऐकू जाणारा आवाज काढतो.

भाटतीतरांचा प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नाही पण बहुसंख्य माद्या एप्रिलमध्ये अंडी घालतात. झुडपांच्या खाली किंवा उघडया जमिनीवर उथळ खळगा करून मादी त्यात फिक्कट करडया किंवा पिवळसर रंगाची ३ अंडी घालते त्यांच्यावर तपकिरी डाग असतात. अंडी उबविण्याचे काम नर-मादी दोघेही करतात. भाटतीतरांची ऑक्टोबर ते मार्च या काळात शिकार करतात.भाटतीतराची एक जात मध्य व दक्षिण भारतात सापडते तिला ‘रंगीबेरगी भाटतीतर’ म्हणतात. ‘शाही भाटतीतर’ हिवाळी पाहुणा म्हणून ऑक्टोबरमध्ये भारतात येतो व फेब्रुवारीअखेर परत जातो. दक्षिण पंजाब, राजस्थान, कच्छचे रण आणि उत्तर प्रदेश या भागांत तो आढळतो.

कर्वे, ज. नी.