भाजीपाला : औषधीय (अल्पायू व नरम देठाच्या) वनस्पतीच्या ताज्या व खाद्य भागांना भाजीपाला ही संज्ञा आहे. खाद्य भागांत मूळ, खोड, पाने, फुले व फळे यांचा समावेश होतो. हे खाद्य भाग ताज्या स्थितीत अगर त्यांवर प्रक्रिया करून खाण्यासाठी वापरण्यात येतात. निरनिराळ्या खाद्य भागांच्या भाजीपाल्याची उदाहरणे पुढील आहेत. मूळ : बीट, गाजर, रताळे, मुळा, सलगम व टॅपिओका खोड : बटाटा, सुरण, नवलकोल आर्वी, गोराडू कंद : कांदा, लसूण पाने : कोबी, पालक, घोळ, अळू, मेथी, चाकवत इत्यादी. भारतात २०० पेक्षा जास्त वनस्पतींच्या पानांचा भाजीसाठी वापर केला जातो फुले : फुलकोबी, अगस्ता, केळफूल, शेवगा अपक्व फळे : वांगी, काकडी, शेवगा, मिरची, गवार, भेंडी, पडवळ, कारले वगैरे पक्व फळे : टोमॅटो, लाल भोपळा बिया : वाटाणा, घेवडा, वाल वगैरे. यांशिवाय बांबूच्या झाडांचे कोवळे अंकूरही काही लोक भाजीसाठी वापरतात.
भारतात एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी भाजीपाल्याखाली फक्त २.५% क्षेत्र आहे. महाराष्ट्रात ते १.६% आहे. नासिक, पुणे व सातारा या तीन जिल्ह्यांत भाजीपाल्याची लागवड विशेष प्रमाणावर होते. इतर कोणत्याही कृषिव्यवसायापेक्षा भाजीपाल्याच्या लागवडीपासून जास्त उत्पन्न मिळते. एकाच शेतात वर्षातून एकापेक्षा जास्त पिके घेता येतात व त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्वांना शेतावर वर्षभर काम मिळते.
आहारातील महत्त्व : मनुष्याच्या आहारात भाजीपाल्याला महत्त्वाचे स्थान आहे. मांस, चीज व इतर अन्नपदार्थांच्या पचनामध्ये उत्त्पन्न होणाऱ्या अम्ल पदार्थांचे उदासिनीकरण (अम्लता नाहीशी करण्याची क्रिया) भाजीपाल्यामुळे होते. त्यातील चोथ्यामुळे अन्नपचनास मदत होते व बद्धकोष्ठता जडत नाही. भाजीपाल्यात खनिज द्रव्ये असतात. कॅल्शियम, फॉस्फरस व लोह ही खनिज द्रव्ये बटाटे, रताळी व कांदे यांत विशेष प्रमाणात असतात. भाजीपाल्यांतील जीवनसत्तवांमुळे त्याला विशेष महत्त्व हिरव्या व पिवळ्या रंगाच्या भाज्यांत अ आणि क ही जीवनसत्त्वे विशेष प्रमाणात असून ब गटातील जीवनसत्त्वेही आढळून येतात. टोमॅटोमध्ये सु. ३४% क जीवनसत्त्व असते. बटाटे व रताळी यांत ते सु. १६% असते. हिरव्या मिरच्यांतही क जीवनसत्त्व मोठया प्रमाणात असते. टोमॅटो, वांगी व भेंडी यांत अ व ब ही जीवनसत्त्वे आढळून येतात. गाजर, सलगमाचा पाला, पालक, रताळी, बीटचा पाला ह्या भाज्यांत अ जीवनसत्त्व विशेष प्रमाणात आढळून येते. वटाणा व घेवडा यासारख्या भाज्यात प्रथिने पुष्कळ प्रमाणात असतात आणि बटाटे व रताळ्यासारख्या भाज्यांत कार्बोहायड्रेट विशेष प्रमाणात असतात. काही भाज्या (उदा., सुरण) औषधी म्हणून उपयोगी असतात.आहारात दर माणशी दररोज कमीत कमी २८५ ग्रॅ. भाजीपाला असावा आणि त्यापेकी ११५ ग्रॅ. पालेभाज्या असाव्यात, असे आहारशास्त्रज्ञांचे मत आहे परंतु भारतातील भाजीपाल्याचा वापर यापेक्षा फार कमी आहे. यासाठी भाजीपाल्याचे उत्पादन पुष्कळच वाढविणे आवश्यक आहे.
हवामान : भाजीपाल्याच्या लागवडीत हवेतील तापमानाला सर्वांत जास्त महत्त्व आहे. फळभाज्यांना सर्वसाधारणपणे उबदार हवामान (१८०-२७ ०सें.) व इतर भाज्यांना तुलनेने थंड हवामान (१३०-२१० सें.) लागते. उबदार हवामानातील भाज्यांना कडाक्याची थंडी मानवत नाही. काकडी, भोपळा, घेवडा, टोमॅटो, वांगी वगैरे भाज्या या गटात मोडतात व त्यांची पक्क अथवा अपक्क फळे भाजीपाल्यासाठी वापरतात. थंड हवामानाच्या भाज्यांपैकी कोबी, सलगम, पालक, बीट, व कांदे या भाज्यांचे कडाक्याच्या थंडीमुळे फार नुकसान होत नाही. याच गटातील वाटाणा, फुलकोबी, गाजर, बटाटा व सालीट या भाज्यांना पीक तयार होण्याच्या सुमारास कडाक्याची थंडी मानवत नाही.
हवामानाबरोबर शुद्ध व सुधारित प्रकारांचे बी-बियाणे, योग्य प्रकारची जमीन, मशागत, खत आणि पाणीपुरवठा व पीकसंरक्षण या बाबींना भाजीपाल्याच्या लागवडीत फार महत्त्व आहे.
जमीन : भाजीपांल्याच्या लागवडीसाठी भुसभुशीत, पाण्याच्या योग्य निचऱ्याची व सुपीक जमीन योग्य असते. भारी जमीन असल्यास किमान एक मीटर खोलीपर्यंत पाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे. झाडांची अगर इमारतींची सावली पिकावर न येईल अशी खबरदारी घेणे आवश्यक असते.
मशागत : जमीन नांगरुन कुळवाच्या पाळ्या देतात व ती सपाट करुन तीत वाफे अथवा सऱ्या काढतात. सर्व भाजीपाल्याच्या पिकांना भरपूर खताची मात्रा लागते. सुरुवातीला हेक्टरी २५ ते ५० टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत नांगरटीच्या वेळी मिसळतात.विशिष्ट प्रकारच्या भाजीपाल्याला कोणते व किती खत द्यावे हे ठऱविताना जमिनीचा प्रकार, पाणी देण्याची सोय, हेक्टरी अपेक्षित उत्पन्न वगैरे बऱ्याच बाबी लक्षात घ्याव्या लागतात. भारतात विविध भागांत केलेल्या प्रयोगांवरुन काढण्यात आलेल्या निष्कर्षांवर आधारित अशा खते देण्याच्या शिफारशी कोष्टकामध्ये दिल्या आहेत. जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा १० ते २५% कमी अगर जास्त खत देण्याचीही शिफारस करण्यात येते.
पीक |
पोषकाची मात्रा (किग्रॅ./हेक्टर) |
||
नायट्रोजन |
फॉस्फरस |
पोटॅशियम |
|
कांदा |
८० |
१८ |
४० |
काकडी |
७५ |
२० |
५० |
कोबी |
१८० |
२० |
४० |
गाजर |
१०० |
२० |
८० |
टोमॅटो |
११० |
२५ |
८० |
पालक |
१८० |
४० |
४० |
फुलकोबी |
१८० |
१५ |
४० |
बटाटा |
२०० |
४० |
१६० |
बीट |
१०० |
१५ |
९० |
मुळा |
१२० |
२५ |
७५ |
वांगी |
१०० |
४० |
५० |
वाटाणा |
३० |
२५ |
५० |
वरील पोषकांखेरीज कांद्याला हेक्टरी सु. १०० किग्रॅ. गंधक देणे फायद्याचे असते. शेतातील मातीचे पृथक्करण करुन आवश्यक ती सूक्ष्म पोषके खताच्या रुपाने दिल्यास उत्पन्नात वाढ होऊन भाजीपाल्याची प्रतही सुधारते.
हंगाम : भाजीपाल्याच्या पिकाचा हंगाम पिकाप्रमाणे खरीप, रब्बी अगर उन्हाळी असतो. पालेभाज्या बहुतेक वर्षभर लावतात. भोपळा, दोडका, टोमॅटो, वांगे, कारले या फळभाज्या खरीप व रबी हंगामात, घेवडा, वाटाणा, चवळी वगैरे शेंगभाज्या मुख्यतः पावसाळी हंगामात आणि कोबी, फुलकोबी व नवलकोल रबी हंगामात लावतात. कारले, दुधी भोपळा,दोडका,टोमॅटो, वांगे कारले या फळभाज्या खरीप व रब्बी हंगामांत, घेवडा वाटाणा, चवळी वगेरे शेंभभाज्या मुख्यतः पावसाळी हंगामात आणि कोबी फुलकोबी व नवलकोल रब्बी हंगामात लावतात. कारले, दुधी भोपळा दोडका व घोसाळे या भाज्यांची रोपे पॉलिथिनाच्या पिशव्यात तयार करुन वर्षातून ४-५ पिके घेता येणे शक्य आहे.
लागवडीचे प्रकार : पालेभाज्याची लागवड वाफ्यात बी फोकून करतात. भोपळा व दुधी भोपळा यांच्या लागवडीसाठी ३ मी. हमचौरस अंतरावर ३० सेंमी. व्यासाचे आणि तितकेच खोल खड्डे (आळी) खणून, शेणखत घालून त्यांत बिया लावतात. उगवून आल्यावर वेल जमिनीवर पसरु देतात. दोडका, कारले वगैरे भाज्या अशाच आळ्यात पण १.५ मी. हमचौरस अंतराने लावतात. व त्यांचे वेल झाडांच्या फांद्या रोवून त्यांच्या आधारावर चढवतात. चवचव, तोंडले, पडवळ इ. भाज्यांचे वेल मांडवावर चढवतात. डबल बीनचे वेल बांबूच्या शिड्यांवर चढवतात. वाटाणा, चवळी, वाल, श्रावण घेवडा, भेंडी, गवार ही पिके ओळीत ठराविक अंतरावर बी पेरून आणि टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, नवलकोल या भाज्या ठराविक अंतरावर रोपे लावून लागवड करतात. बटाट्याची लागवड डोळे असलेल्या फोडी लावून आणि सुरणाची लागवड लहान गड्डे अगर मोठ्या गड्ड्यांच्या डोळे असलेल्या फोडी लावून करतात. (तपशीलासाठी त्या त्या भाज्यांवरील स्वतंत्र नोंदींतील वर्णन पहावे).
रोपे तयार करणे : भाजीपाल्याच्या पिकाचे ५०% यश रोपे तयार करण्याच्या पध्दतीवर अवलंबून असते. रोपे तयार करण्यासाठी वापरावयाचे बी ताजे, शुध्द व टपोरे असावे. पेरण्यापूर्वी त्यांवर जंतुनाशकाची बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे असते. रोपे तयार करण्यासाठी १५ ते २२ सेंमी. उंच, ३ मी. लांब व १ ते १.२५ मी. रुंद गादीवाफे तयार करतात. भुसभुशीत केलेल्या मातीत कंपोस्ट खत मिसळून त्यात ओळीमध्ये पातळ बी पेरून ते मातीने झाकतात (बी दाट पेरल्यास रोपाची वाढ चांगली होत नाही), नंतर बारीक छिद्रांच्या झारीने पाणी देतात. बी उगवून आल्यावर रोग व किडीपासून रोपांची संरक्षण करणे आवश्यक असते. ५ ते ६ आठवड्यांनी रोपे स्थलांतरासाठी (लावणीसाठी) तयार होतात.
पीक संरक्षण : स्थलांतर केल्यानंतर भाजीपाल्याच्या पिकांचे कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती), सूक्ष्मजंतू व व्हायरस यांमुळे होणारे रोग आणि किडी यांपासून फार नुकसान होते. यासाठी आवश्यक ती कवकनाशके व कीटकनाशके आणि ती फवारण्यासाठी आवश्यक ती साधने तयार ठेवणे जरूरीचे असते.
लागवडीचे क्षेत्र विस्तृत होण्याची कारणे : पूर्वीच्या काळी भाजीपाल्याच्या लागवडीचे क्षेत्र मोठ्या शहरांभोवती मर्यादित असे कारण भाजीपाला नाशवंत असल्यामुळे त्याला जवळची बाजारपेठ असणे आवश्यक होते. रस्ते व वाहतुकीच्या सोयी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यामुळे आजकाल भाजीपाला उत्पादनाच्या केंद्रापासून दूरवर पाठविता येतो. त्यामुळे भाजीपाल्याच्या लागवडीचे क्षेत्र विस्तृत झाले आहे. उत्पादनाच्या केंद्रापासून दूरच्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचा भाजीपाला नेहमीच्या हंगामाखेरीज इतर महिन्यांतही मिळणे आता सुलभ झाले आहे. शीतगृहांची सोय पुष्कळ ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे नाशवंत माल साठवून ठेवता येतो व पुष्कळ माल एकाच वेळी बाजारात आल्यामुळे किंमती घसरतात त्याला आळा बसतो. तसेच शीतगृहाच्या सोयीमुळे बटाट्यासारख्या काही भाज्या वर्षभर मिळू शकतात. भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी अमेरिकेत प्रशीतनाची सोय असलेले ट्रक व रेल्वेचे मालडबे उपलब्ध असल्यामुळे दूर अंतरावरील वाहतूक जास्तच सुलभ झाली आहे.
थंड हवामानातील लागवडीतील भाज्या शीतगृहात ०० से. तापमानात सर्वांत जास्त काळ टिकतात, मात्र बटाटा हा याला अपवाद आहे. सुमारे ३० से. च्या खालील तापमानात त्यात अप्रिय चव निर्माण होते, उबदार हावमानात वाढलेल्या निरनिराळ्या भाजीपाल्यांच्या पिकांवर ७० ते १३० से. खालील हवामानाचा कमीजास्त अनिष्ट परिणाम होतो. बटाटे, रताळी, कांदे, कोबी, गाजर, बीट, लसूण, सलगम आणि भोपळा या भाज्या योग्य तापमान आणि आर्द्रतेमध्ये दीर्घकाळ टिकतात परंतु काही भाज्या काही आठवड्यांपेक्षा जास्त टिकविता येत नाहीत. शीत तापानाबरोबरच नायट्रोजन वायूच्या पर्यावरणात भाजीपाल्यासारखा नाशवंत माल बराच काळ सुस्थितीत राहू शकतो, असे अलीकडे आढळून आले आहे.
परिरक्षण : भाजीपाल्याच्या परिरक्षणाच्या (टिकविण्याच्या) निरनिराळ्या पध्दती प्रचलित आहेत. (१) उन्हात अगर वाऱ्यावर सुकविणे, (२) लोणची करणे, (३) ⇨ डबाबंदीकरण, (४) शीघ्र प्रशीतन, (५) निर्जलीकरण (यांत्रिक साधनाच्या साहाय्याने वाळविणे). उन्हात भाज्या वाळवून ठेवण्याची घरगुती पद्धत फार प्राचीन आहे. भाज्यांचे सोयीस्कर आकारमानाचे तुकडे करुन ते उन्हात अशा तऱ्हेने वाळवितात की, त्यामध्ये कुजण्याची क्रिया सुरु होणार नाही. मात्र व्यापारी तत्त्वावर हा उपक्रम फायदेशीर होत नाही, असे प्रयोगांवरुन सिध्द झाले आहे. उन्हात वाळविल्यानंतर भाजीची प्रत चांगली राहत नाही. लोणची करुन काही भाज्या टिकविण्याचा प्रघातही फार पूर्वापार आहे. सलगमचे गोड लोणचे आणि कॉलीफ्लावरचे लोणचे ही विशेष प्रसिध्द आहेत. डबाबंदीकरण व शीघ्र प्रशीतनाने भाज्या टिकविण्याची पध्दत या पाश्चात्य देशांत मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. निर्जलीकरणाने भाजीपाला टिकविण्याची पध्दत अमेरीकेत दुसऱ्या महयुध्दात विशेष प्रचलित होती. यात बटाटे ७०%, गाजरे ११%, कांदा ७%, रताळी ६%, कोबी ४%, बीट ३% असत.महायुध्द संपल्यावर परिक्षणासाठी भाजीपाल्याचे निर्जलीकरण करण्याच्या पध्दतीचा वापर फार मोठ्या प्रमाणावर कमी झाला. भारतात निरनिराळ्या भाजीपाल्यांचे निर्जलीकरण करण्यासाठी विशिष्ट पध्दती निश्चित करण्यात आल्या आहेत [⟶ खाद्यपदार्थ उद्योग].
संशोधन : भारतात भाजीपाल्यासंबंधी संशोधन अनेक ठिकाणी चालू आहे. सिमला, कुफरी व इतर ठिकाणी बटाट्याच्या पिकावर फार वर्षांपासून संशोधन चालू आहे [⟶ बटाटा]. दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत भाजीपाल्याची पिके व पुष्पसंवर्धन यांसाठी स्वतंत्र विभाग आहे. १९४७ नंतरच्या तीस वर्षांतील संशोधनातून निवड पद्घतीने अथवा संकर पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या भाजीपाल्याच्या अनेक प्रकारांची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यांपैकी विशेष उल्लेखनीय असे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : वाटाणा : बॉनव्हिल व अरकल वांगी : पुसा पर्पल लाँग टोमॅटो : पुसा रुबी व एसएल १२०, फुलकोबी : पुसा दीपाली व पुसा सिंथेटिक कारले : पुसा दो मौसमी मुळा : पुसा चेतकी कांदा : पुसा रत्नार व पुसा सफेद. कट्राँ येथील भाजीपाला संशोधन केंद्राने गरव्या फुलकोबीच्या (स्नोबॉल) बियांचे भारतातच उत्पादन करण्यात यश मिळविले. यापूर्वी भाजीपाल्याच्या फक्त याच पिकाचे बी आयात करण्यात येत असे. या संशोधनामुळे हरियाणा हे राज्य फुलकोबीच्या बीजोत्पादनात अग्रेसर झाले आहे. सध्या देशाची या बियांची गरज भागवून शिल्लक राहिलेले बी निर्यात करता येईल, अशी परिस्थिती आहे.
बंगलोर येथील भारतीय फलसंवर्धन संशोधन संस्थेने भाजीपाल्याचे पुढील सुधारित प्रकार लागवडीसाठी दिले आहेत : वांगी : अर्काशील, कुसुमाकर वि शिरीष तांबडा भोपळा : अर्का सूर्यमुखी व अर्का चंदन.
नव्याने स्थापन झालेल्या कृषी विद्यापीठांतही भाजीपाल्याच्या पिकांवर संशोधन चालू असून पंजाब कृषी विद्यापीठाने लागवडीसाठी दिलेले एसएल १२, पंजाब ट्रॉपिक्स, केक्रुथ, केक्रुथ अगेती व पंजाब छुहारा हे टोमॅटोचे प्रकार आणि पंजाब चमकीला व पंजाब बहार हे वांग्याचे प्रकार विशेष उल्लेखनीय आहेत. हरियाणा कृषी विद्यापीठाने एचएस १०१ ते १०२ आणि कानपूर कृषी विद्यापीठाने अंगुरलता, कुबेर, टी१, टी२ व टी३ हे टोमॅटोचे सुधारित प्रकार लागवडीसाठी दिले आहेत. जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालयाने वाटाण्याच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या अनेक प्रकारांची लागवडीसाठी शिफारस केली असून त्यांत जवाहर हा प्रकार विशेष उल्लेखनीय आहे.
ज्वारी व कापूस या पिकांप्रमाणे भाजीपाल्यांचे संकरित वाणाचे बियाणे (संकर केल्यानंतरच्या पहिल्या पिढीचे) उत्पादन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून वांगी, टोमॅटो व कांदा या पिकांचे संकरित वाण तयार करण्यात भारतीय कृषी संशोधन संस्थेला यश मिळाले आहे. एका खाजगी कंपनीने टोमॅटो व मिरचीचे संकरित प्रकारांचे बी बाजारात विक्रीसाठी आणले आहे. दुसऱ्या एका कपंनीने पुसा मेघदूत या दुध्या भोपळ्याच्या संकरित प्रकाराच्या बियांचे अर्ध-व्यापारी प्रमाणावर उत्पादन सुरु केले आहे.
रोगांना व किंडींना प्रतिकारक अशा भाजीपाल्याच्या प्रकारांच्या निर्मितीबाबत संशोधन सुरू असून पुसा सावनी हा भेंडीचा केवडा रोगाला प्रतिकारक प्रकार सर्वत्र लागवडीत आहे. एसएल १२० हा टोमॅटोचा प्रकार सूत्रकृमि-प्रतिकारक असून हा गुणधर्म असलेला तो भारतातील पहिलाच प्रकार आहे. अन्नमलई विश्वविद्यालयाने मावाप्रतिकारक वांग्याचे प्रकार शोधून काढले आहेत.
विशिष्ट रसायनांचा भाजीपाल्याच्या विशिष्ट पिकावर योग्य वेळी वापर केल्यास पुढील फायदे होतात, असे दिसून आले आहे: बियांची उगवण जास्त प्रमाणात व एकासारखी होते स्थलांतरानंतर रोपे जगण्याचे प्रमाण जास्त असते झाडांची पालेवाढ व फुले येणे यांचे नियंत्रण होते फळे धरण्याचे प्रमाण वाढते व साठवणीत भाजीपाला जास्त काळ टिकून राहतो.
निरनिराळ्या वनस्पतिवृध्दी हॉर्मोनांचे [वनस्पतींची वाढ नियंत्रित करणाऱ्या हॉर्मोनांचे⟶हॉर्मोने] परिणाम-विशेषतः उत्पन्नावर-फार आशादायक ठरले असून या व इतर अनेक बाबींवर संशोधन सुरु आहे.
संदर्भ : 1. Choudhary, B. Vegetables, New Delhi 1967.
2. I. C. A R. Handbook of Agriculture, New Delhi, 1996.
3. I. C. A R. Preservation of Fruits and Vegetables, New Delhi, 1967
4. Thompson, H. C Kelley, W. C, Vegetable Crops, New York, 1957.
पाटील, ह. चिं., गोखले, वा. पु.
“