भात,राजाराशास्त्री :(११ नोव्हेंबर १८५१-४ जानेवारी १९०८). प्रख्यात विद्वान आणि

राजारामशास्त्री भागवत

समाजसुधारक. भाषाशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र व्युत्पत्ती, इतिहाससंशोधन, धर्मसुधारणा, वेद-पुराणे, स्मृती वगैंरेंची चिकित्सा इ. ज्ञानाच्या क्षेत्रांत हे मोठे प्रज्ञावंत होते. यांचा जन्म कशेळी (ता. राजापूर जि. रत्नागिरी) येथील भिक्षुकी करणाऱ्या कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. १८३० च्या सुमारास इंग्रजी शिक्षणार्थ त्यांचे वडील रामकृष्ण हरी व चुलते भास्कर हरी हे दोघे मुंबईस आले. पुढे रामकृष्ण हरी यांनी मुंबई नगरपालिकेत नोकरी केली. राजारामशास्त्री यांची आई ते लहान असतानाच वारली. वडील वेदान्त विषयाचे भोक्ते होते.सर्वसामान्यांना वेदान्त समजावा म्हणून रामकृष्णापंतांनी सायुज्यसदन (१८६८) आणि कायाजीचा संवाद अशी नाटके लिहीली होती. राजारामशास्त्री १८६७ साली मॅट्रिक झाले. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांचे ग्रँट मेडिकल कॉलेजात तीन वर्षे शिक्षण झाले. नंतर वडिलांच्या मृत्यूमुळे हे शिक्षण थांबले. एका संस्कृत पंडिताकडे अध्ययन करुन ते शास्त्री झाले. नंतर रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये १८७५ साली ते शिक्षक झाले. नंतर ते सेंट झेव्हिअर कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून शेवटपर्यंत होते. १९०२ साली मुंबई विद्यापीठात ‘विल्सनफायलॉलॉजिकल’लेक्चरर म्हणून त्यांची निवड झाली. शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ साली बाँबे हायस्कूल व पुढे स्वालंबनाने मराठा हायस्कूल काढले. महर्षी कर्वे, रॅं. परांजपे, बॅ, जयकर वगैरे अनेक नामवंत त्यांचे विद्यार्थी होते. भागवत स्वतः जन्मभर विद्यार्थी व लोकशिक्षक होते. पाश्चात्त्य व पौर्वात्य विविध भाषांचा सखोल अभ्यास शक्य व्हावा म्हणून लॅटिन, ग्रीक, अरबी, फार्सी वगैरे भाषा ते शिकले म्हणूनच त्यांच्या अनेक शब्दांच्या व्युपत्त्या आजही विचारार्ह ठरतात.

त्यांचे चुलते भास्कर हरी मुंबई प्रार्थना समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यामुळे न्या. रानडे व त्यांच्या अनेक विद्वान मित्रांचा राजारांमशास्त्रांना निकटचा सहवास प्राप्त झाला. राजारामशास्त्री यांची मते त्यांचे गुरु न्या. रानडे यांच्याप्रमाणे नेमस्तच होती तथापि प्रत्यक्ष राजकारणात त्यांनी कधीच भाग घेतला नाही किंवा ते प्रार्थनासमाजाचे सभासदही झाले नाहीत. तरीही प्रार्थनासमाजाचे मुखपत्र सुबोध पत्रिका ह्या साप्ताहिकात राजारामशास्त्री यांचे जातिभेद, सामाजिक खुळचट चाली, स्त्रियांची सुधारणा इत्यादींवर विपुल लेखन प्रसिद्ध झाले.

मुंबईमधील सर्वदेशीय वातावरणाचाही त्यांच्यावर परिणाम झाला. विधवाविवाह वगैरे प्रश्नांवर सुरुवातीस त्यांची मते जुनी होती नंतर मात्र ती पालटली. अस्पृश्यतानिवारणाकडेही त्यांनी सक्रिय लक्ष दिले. हिंदू धर्माची शास्त्रबोवांनी जी निस्पृह व निर्भीड समीक्षा केली होती तिच्यासंबंधी डॉ. आंबेडकरांनीही त्यांची प्रशंसा केलेली आहे.

 

१९०० नंतर प्रथम बडोदे व पुढे कोल्हापूर येथे वेदोक्त प्रकरण गाजले. मराठे क्षत्रिय आहेत असे शास्त्राधारयुक्त मत व्यक्त करून राजारामशास्त्री यांनी शाहू महाराजांचा पक्ष घेतला. मराठा मुलांची उपनयने चालू व्हावीत म्हणून कोल्हापूर-बेळगाव येथे जाऊन स्वतः त्यांनी पौरोहित्य केली त्यांना गायत्री मंत्र दिला. दीनबंधु ह्या सत्यशोधक मुखपत्रात जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी अनेक वादळी लेख लिहिले.लोकहितवादींच्या धारदार शतपत्रांत त्यांनी भरच घातली. ⇨जोतीराव फुले व राजारामशास्त्री यांच्या काही प्रतिपादनात व कृतींत साम्य आढळते. स्त्रियांची सुधारणा व सुशिक्षण यासंबंधानेही शास्त्रीबोवांनी प्रयत्न केले. त्यांनी सत्यशोधक चळवळीतील दोषही स्पष्टपणे सांगितले होते. जोतीरावात ‘बाम्हणेतर’ ही संज्ञा अभावाने आढळते पण राजारामशास्त्र्यांनी ती वापरून रूढ केली तसेच बहुजनसमाज पुढे यावा म्हणून झंजावती व्याख्याने दिली. अ. भा. मराठी शिक्षण परिषदेच्या कार्याचा वऱ्हाडात प्रचार व्हावा म्हणून त्यांनी दौरा काढला होता तिकडे त्यांचे मोठे स्वागत झाले. भास्करराव जाधव यांचा वेदपुराणे आदिकरून संस्कृत ग्रंथाचा संशोधनपर अभ्यास राजारामशास्त्र्यांच्या सहवासातून वाढला.

 

राजारामशास्त्र्यांनी परकीय सरकारची नोकरी, अनुदान किंवा कोणापासूनच मानधनाची अपेक्षा केली नाही. आजही त्यांचे कित्येक क्रांतीकारक विचार समाजप्रबोधन करू शकतात.

 

हिंदुधर्मविवेचक पत्राचे शास्त्रीबोवा काही वर्षे संपादक होते. केरळ कोकीळ, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, विविधज्ञान विस्तार ज्ञानप्रकाश पुणे वैभव इ.नियतकालिकांतून राजारामशास्त्र्यांचे बाणेदार लेख, खरमरीत टीका, उत्तरे-प्रतिउत्तरे करणारी पत्रे प्रसिद्ध झाली. तत्त्वज्ञान, काव्य, कथा, पुस्तक परीक्षण, वैद्यक आरोग्य, पदार्थविज्ञान, प्राचीन संस्कृतिसंशोधन, देशी भाषा, आमचा देश व देशी लोक, ज्योतिष, वैदिक व पौराणिक चर्चा वगैरे विषयांचा ऊहापोह त्यांनी त्यांतून केला. शास्त्रीबोवांची चाळीसच्यावर पुस्तकेत्यांच्या हयातीतच प्रसिद्ध झाला. त्यांत मराठ्यांसंबंधाने चार उद्गार (१८८७), ब्राह्मण व ब्राम्हणीधर्म (१८८९), शिवछत्रपतींचे चरित्र (१८९२) इ. महत्त्वाच्या पुस्तकांचा अंतर्भाव असून ही पुस्तके त्यांच्या चतुरस्त्र विद्वत्तेची आजही साक्ष देतात. वेद-वेदान्त, गीता व तत्सम धर्मपर विषयांतर त्यांची इंग्रजीतही वेगवेगळी दहा निबंधवजा पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे निवडक लेख दुर्गाबाई भागवत यांनी संपादून कै. राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक लेख (१९५०) ह्या शीर्षकाने प्रसिद्ध केले आहेत.

 

राजारामशास्त्री यांच्या पत्नी सुंदरबाई प्रेमळ व कष्टाळू होत्या. त्यांना एकुलती एक मुलगी होती ती १८९७ साली वारली. चुलत भावाला राजारामशास्त्र्यांनी पुत्रासमान मानले होते तोही १९०७ साली वारला. स्वभावाने राजारामशास्त्री तापट व विक्षिप्त होते. त्यांच्या वैयक्तिक दोषांचे विरोधकांनी भांडवल केले. टिळक व केसरी, सनातन धर्ममार्तंड धर्मकर्ते भाऊशास्त्री लेले इत्यादींनी राजारामशास्त्र्यांना कडवा विरोधच केला. ब्राम्हणांनी मांस भक्षण करावे, अंत्यजासह सर्वांच्या मुलींच्या मौजी कराव्यात वगैरे शास्त्रीबोवांची अनेक मते अनेकांना त्या काळात विक्षिप्त वाटली. राजारामशास्त्री हे असे वादळी व्यक्तीमत्त्व होते. संस्कृतचे जाडे विद्वान असूनही त्यांना मराठी बोलभाषेचा विलक्षण अभिमान होता. वेदाभिमानी असूनही त्यांना आर्य समाजाची सर्वच मते पसंत नव्हती त्याचप्रमाणे प्रार्थना समाजाचा मूर्तिपूजेला असणारा विरोधही मान्य नव्हता. उपनयन, विवाह वगैरे संस्कारविधींचे प्रयोग त्यांत जरूर तेवढा शास्त्रोक्त भाग कायम ठेवून त्यांनी सार्थ तयार केले. अशा प्रकारे ऐतिहासिक तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादाचा त्यांनी एका अर्थी प्रारंभ केला. मुंबई येथे ते निधन पावले.

 

संदर्भ:   1. Bhate, G. C. History of Modern Marathi Literature, 1800-1938, Mahad, 1939.

             २. केळूसकर, संपा. धनुर्धारी साप्ताहिक (राजारामशास्त्री भागवत अंक), जानेवारी,१९४९.

             ३. खानोलकर, गं. दे. अर्वाचीन मराठी वाङमयसेवक, था खंड, मुंबई, १९५७.

             ४. भागवत, दुर्गा, राजारामशास्त्री भागवत, व्यक्तिचित्र व वाङमयविवेचन, मुंबई, १९४७.

 

चव्हान, रा. ना.