भागवत मेळा नाटक: एक पारंपरिक नृत्यनाट्यप्रकार, तंजावर जिल्ह्यातील मेलात्तूर या गावी ‘भागवत मेळा’ नामक नृत्यनाट्यांच्या परंपरेने पुरातन व आधुनिक रंगभूमीमधील अमोल असा दुवा सांभाळून ठेवलेला आहे.तमिळनाडूमधील लोकनाट्यापासून भागवत मेळा ही परंपरा निर्माण झाली असावी, असा काही विद्वानांचा कयास आहे. परंतु प्रत्यक्षात लोकनाट्याची कोणतीही वैशिष्ये यात आढळत नाहीत. भरताच्या नाट्यशास्त्रातील नाट्याच्या संकल्पनेचेच थोडेसे उत्क्रांत स्वरुप म्हणजे भागवत मेळा असे म्हटल्यास ते अतिशयोक्त ठरु नये.
तंजावरच्या नायक वंशातील राजा अच्युताप्पा नायक (१५७२-१६१४) ह्याच्या उदार आश्रयाखाली हा प्रकार उदयास आला. त्याने या नृत्यकलेस उत्तेजन देण्याच्या उद्देशाने नर्तक, संगीतकार वगैरेंच्या ५१० ब्राह्मण कुटुंबास एक गाव दान दिले . त्यामुळे हे गाव ‘अच्युतपुरम्’ म्हणून ओळखले जाऊ लागले व त्यासच पुढे ‘मेलात्तूर’ हे नाव मिळाले. भागवत मेळा नाटकाचे स्वरुप सुरुवातीपासूनच प्रायः भक्तिरसप्रधान, आध्यात्मिक असे होते. यात फक्त पुरुष नर्तकच भाग घेत असत. त्यांना ‘भागवत’ (भक्त) असे म्हणत व म्हणून या नृत्यनाट्यांना ‘भागवत मेळा नाटक’हे नाव पडले. नारायण तीर्थ यती हा तेलुगू ब्राह्मण संत या नृत्यनाट्याचा जनक मानला जातो. वेंकटराम शास्त्री यांनी सु. पावणेदोनशे वर्षापूर्वी तेलुगूमध्ये लिहिलेली उषा परिणयम्, रुक्मांगद, गोल्लमामा, रुक्मिणी कल्याणम्, सीता कल्याणम्, ध्रूव चरित्रम्, हरिश्चंद्र, कंसवध, शिवरात्रवैभवम्, भस्मासूर वधम्, मार्केडेय व प्रहलादचरित्रम् ही बारा नृत्यानाट्ये या संप्रदायात वापरली जातात. नरसिंह जयंतीला म्हणजेच मेच्या शेवटी किंवा जुनच्या पहिल्या आठवड्यात ही नृत्यनाट्ये मेलात्तूरच्या वरदराज पेरुमल मंदिरात करण्याची सुरुवातीपासून प्रथा आहे. पूर्वी हे मेळे रात्रीपासून पहाटेपर्यंत चालत पण हल्ली एकेक नृत्यनाट्य फक्त पाच तास करण्यात येते.
नृत्यनाट्याची सुरुवात ‘कोणंगी’च्या (विदूषक) प्रवेशाने होते. यामध्ये एखादे विनोदी पात्र रंगमंचावर येऊन नर्तन करते. मग वाद्यवृंद रंगमचावर येऊन ‘मंगलम्’म्हणतात व नंतर प्रयोग सफल व्हावा, म्हणून गणपतीचे रुप घेतलेला बारा वर्षाखालील एखादा मुलगा नृत्य करतो, ह्यालाच ‘गणपतिवंदन’म्हणतात. यानंतर ‘पात्रप्रवेश दरु’ नावाचा छोटासा प्रवेश सादर केला जातो. यामध्ये पडद्यामागून एकेक पात्र रंगमंचावर येते व नृत्य करते. शेवटी मुख्य नृत्यनाट्याला सुरुवात होते.
नृत्यनाट्यातील सर्व स्त्रीभूमिका तरुण मुलेच करतात. जेथे शक्य असेल तेथे नर्तक अभिनयाच्या जोडीला संवाद बोलतो किंवा गातो पण सर्वसाधारणपणे मुख्य गायक इतर सर्व गीते गातो. हे संवाद व गीते सर्वसाधारणपणे तेलुगू भाषेत असतात, परंतु विनोदी पात्र तमिळ भाषा वापरते.
सर्व नृत्यनाट्यांमध्ये कर्नाटक संगीतपद्धती आणि अभिनय व नृत्य यांसाठी ⇨भरतनाट्यम्, नृत्यशैली वापरली जाते. पदम्, दरु, शब्दम्, चूर्णिका, पदवर्ण हे संगीताचे प्रकार वापरले जातात. भागवत मेळ्यात संगीतातील तांत्रिक कसरती जाणूनबाजून टाळल्यामुळे हे संगीत भावनांना आवाहन करु शकते. नृत्यनाट्य जसजसे पुढे सरकते, तसतसे समयानुकूल राग गायले जातात. ह्यामुळे वातावरणानिर्मितीला मदत होते. अहिरी, घंटा यांसारखे राग मध्य रात्रीनंतरच गायले जातात. या नृत्यनाट्यात ‘सोलकट्टु’सुद्धा (बोल) सुरात गायची पद्धत आहे. नृत्यनाट्याची वेशभूषा पुराणकाळाला साजेशी असते. नटेश अय्यर हे पूर्वी स्त्री भूमिका करणारे एक श्रेष्ठ नर्तक व नृत्यगुरु होऊन गेले. भारत्रम् नल्लूर नारायणस्वामी, के. सुब्रह्यण्य अय्यर व कोदंड राम अय्यर हे नर्तक नट त्यांचे शिष्य होत. अलीकडच्या काळातील एक ज्येष्ठ व अग्रणी नर्तक म्हणजे बालसुब्रह्यण्य शास्त्री ऊर्फ बाळू भागवतर होय. त्यांच्या परंपरेत कृष्णमूर्ती, नागराजन, वेकंटरामन, स्वामीनाथन इत्यादींचाही उल्लेख करावा लागले. ई. कृष्ण अय्यर यांनीही अलीकडच्या काळात या नृत्यनाट्याच्या पुरातन परंपरेचे जतन व पुनरुज्जीवन करण्यासाठी खास प्रयत्न केले.
संदर्भ: 1. Marg Publications, Marg, Vol. XIX No.
2. Bombay, March 1966 2. Singha, Rina Massey, Reginald, Indian Dances, London, 1967.
पार्वतीकुमार
“