भागलपूर विद्यापीठ : बिहार राज्यातील एक विद्यापीठ. भागलपूर येथे १२ जुलै १९६० रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. अध्यापनात्मक व संलग्नक असे विद्यापीठाचे स्वरूप आहे. घटक महाविद्यालय म्हणून ताब्यात घेतलेले तेजनारायण बनैली महाविद्यालय (स्थापना १८८७) हेच प्रारंभी या विद्यापीठाचे मुख्य केंद्र होते. १ एप्रिल १९७२ रोजी विद्यापीठाचे नियंत्रण व व्यवस्थापन राज्य सरकारकडे सोपविण्यात आले. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र भागलपूर, मोंघीर, संथाळ परगणा व बेगुसराई या जिल्ह्यांत विखुरलेले आहे.
कला, विज्ञान, शिक्षण, अभियांत्रिकी, विधी, वैद्यक, ललित कला व व्यवसाय आणि वाणिज्य हे विद्यापीठाचे विद्याविभाग आहेत. यांतील कला, विज्ञान आणि वाणिज्य या विषयांतील प्रथम पदवीपर्यंतचे माध्यम हिंदी असले, तरी इंग्रजी, उर्दू, बंगाली आणि ओडिया या भाषांचे माध्यम विकल्पाने विद्यार्थ्यांना घेता येते. अन्य परीक्षांना व विषयांना मात्र इंग्रजी माध्यम असते. विद्यापीठाच्या कक्षेत २२ पदव्युत्तर विभाग, १९ घटक महाविद्यालये व २७ संलग्न महाविद्यालये आहेत. विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांची विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३९,०९८ व अध्यापकसंख्या ९०० आहे (१९७९- ८०).
विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष जुलै-मे असून त्यात जुलै-सप्टेंबर (किंवा १५ ऑक्टोबर), ऑक्टोबर-डिसेंबर व जानेवारी-मे अशी तीन सत्रे असतात. कला, विज्ञान व वाणिज्य या शाखांतर्गत पदवीपूर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयात दर आठवड्याला एक पाठनिर्देश असतो. पदवी परीक्षेसाठी आठवड्यातून दोनदा पाठनिर्देश असतात. बी.एससी. (अभियांत्रिकी) ह्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठातर्फे अंतर्गत मूल्यांकनासाठी तीस टक्के गुण राखून ठेवण्यात आले आहेत. विद्यापीठात संगीतशास्त्रांतर्गत चार वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमाची सोय असून त्यात कंठसंगीत व वाद्यसंगीत, नृत्य आणि शिल्प यांचा अंतर्भाव होता.
अधिसभा ही विद्यापीठाची सर्वोच्च समिती असून दर तीन वर्षांनी तिच्या सभासदांची निवड होते. यांशिवाय कार्यकारिणी, विद्वत परिषद, अभ्यासमंडळे, संशोधन परिषद आणि परीक्षा मंडळ ह्या विद्यापीठांच्या अन्य समित्या होत. कुलगुरू हा विद्यापीठांच्या अन्य समित्या होत. कुलगुरू हा विद्यापीठाचा सवेतन सर्वोच्च अधिकारी असतो.
विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना खेळण्यास एक विस्तीर्ण क्रीडांगण आहे. फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, टेनिस, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन इ. खेळ विद्यार्थी खेळतात. विद्यापीठाचे केंद्रीय आरोग्यसेवा केंद्र विद्यापीठातील विद्यार्थी, अध्यापक व कर्मचारी यांना विविध आरोग्यसेवा पुरविते.
विद्यापीठाच्या ग्रंथालयाची इमारत स्वतंत्र असून संशोधनासाठी त्यात स्वतंत्र अभ्यासिका व सूक्ष्मपट यांची सोय आहे. ग्रंथालयात ७१,२५९ ग्रंथ व ३,७७९ नियतकालिके होती (१९७९-८०). याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्त्पन्न ४.०४ कोटी रु. व खर्च ४.६८ कोटी रु. होता.
मिसार, म. व्यं.