भाऊ महाजन : (सु.१८१५-१८९०). मराठी पत्रकार. मुळ नाव गोविंद विठ्ठल कुंटे. जन्म कुलाबा (विद्यमान रायगड) जिल्हातील पेण ह्या गावी. सु. १८२२ मध्ये ते मुबंईस आले आणि तेथे सदाशिव काशीनाथ ऊर्फ बापू छत्रे ह्यांच्याकडे राहुन त्यांनी शिक्षण घेतले. मुबंईच्या एल्फिन्स्टन विद्यालयात त्यांनी अध्ययन व अध्यापन केले. इंग्रजी, संस्कृत व फार्सी ह्या भाषांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, १८४१ मध्ये, त्यांनी प्रभाकर हे साप्ताहिक पत्र काढले. व ते २०-२१ वर्षे चालविले. स्वजनांना स्वदेशी-विदेशी घडामोडी समजाव्यात व लोकमताला योग्य वळण लावावे, हा हेतू हे पत्र काढण्यामागे होता. तत्कालिन आंग्लशिक्षित विद्वान ह्या पत्रात लिहीत. महाजनांची दृष्टी पुरोगामी होती. लोकहितवादींच्या शतपत्रांना त्यांनीच प्रभाकरातून निर्भयपणे प्रसिद्धि दिली. इंग्रजांच्या राज्यपद्धतीवरही ह्याच पत्राने प्रथम टीका केली. इंग्रजांकडून भारताचे होणारे शोषण, इंग्रज अधिकाऱ्यांची लाचबाजी आणि भारतीयांचा इंग्रजांकडून होणारा अवमान ह्यांकडे प्रभाकराने लक्ष वेधले. १८५३ मध्ये त्यांनी धूमकेतू हे साप्ताहिक काढले. सनातनी विचारांच्या वृत्तपत्रांना त्यातून उत्तरे दिली जात. विरुद्ध बाजूच्या विचारांनाही आपल्या पत्रांचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याइतका उमेदपणा महाजनांच्या ठायी होता. विष्णुबोवा ब्रह्मचारी ह्यांच्यावर धूमकेतूने परखड टीका केली त्यांच्या, वेदोक्त धर्मप्रकाशातील दोष दाखविले परंतु त्या बाबतीतली विष्णुबोवांची बाजूही धूमकेतूने प्रसिद्ध केली होती. बाबा पदमनजी ह्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्या वेळी त्यांची कैफियतही भाऊ महाजन ह्यांनी धूमकेतूतून मांडू दिली होती. भाऊ महाजन हे वादपटू होते. त्यांच्या काळातील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ मेजर कँडी ह्याच्या बरोबर मराठी भाषेच्या लेखनपद्धती बाबत त्यांनी परखडपणे वाद केला होता. पश्चिमी विद्यांचा परिचय लोकांना करून देण्यासाठी ज्ञानदर्शन नावाचे एक त्रैमासिकही त्यांनी काढले होते (१८५४).
स्वसमाज सुविद्य व स्वाभिमानी व्हावा, ह्यासाठी त्यांनी आपल्या पत्रांतून प्रयत्न केले. तथापि पश्चिमी संस्कृतीचे अंधानुकरण त्यांना मान्य नव्हते. त्यांनी स्वतंत्र ग्रंथनिर्मित केल्याचे दिसत नाही तथापि विनायकशास्त्री दिवेकर ह्यांच्या शब्दसिद्धिनिबंध (१८४३) ह्या ग्रंथाच्या लेखनात त्यांनी सहाय्य केले होते.
जोशी, सु. दा.
“