भरद्वाज : प्राचीन भारताच्या इतिहासात ‘भरद्वाज’ या नावाने अनेक पुरूष होऊन गेले आहेत. सूक्तद्रष्टा असलेला विख्यात वैदिक ऋषी भरद्वाज हा त्यांपैकीच एक होय. ऋग्वेदाच्या सहाव्या मंडळातील बहुसंख्या ऋचा भरद्वाज व त्याच्या कुळातील अन्य पुरुष यांनी रचलेल्या आहेत. म्हणूनच ‘भरद्वाज’ हा शब्द व्यक्तिनाम व कुलनाम अशा दोन्ही पद्धतींनी आणि एकवचन व बहुवचन अशा दोन्ही वचनांत वापरल्याचे आढळते. भरद्वाज हा अंगिरस बृहस्पती व ममता यांचा पुत्र होता.
त्याच्या नावाचे स्पष्टीकरण विविध पद्धतींनी केले जाते. ‘भरत् (द)’ आणि ‘वाज’ या दोन संस्कृत शब्दांचा समास होऊन ‘भरद्वाज’ हा शब्द बनला आहे. ‘भरद्’ म्हणजे पोषण वा धारण करणारा. ‘वाज’ या शब्दाचे अन्न, संपत्ती, सामर्थ्य, वेग इ. अर्थ आहेत. तेव्हा ‘भरद्वाज’ या शब्दाचा संपन्न आणि सामर्थ्यशाली असा अर्थ झाला. सर्वांचे भरण करणारा तो ‘भरद्वाज’ अशीही एक व्युप्तत्ती आढळते. ‘भर-द्वा-ज’ असा एक विग्रह करण्यात येतो. या विग्रहानुसार ‘दोन पित्यांकडुन जन्मलेल्या याचे पोषण कर’, असा अर्थ मिळतो. बृहस्पतीने ममता या आपल्या भावजयीशी समागम केल्यानंतर भरद्वाज जन्माला आला, म्हणून तो दोन पित्यांचा पुत्र ठरला. तसेच त्याच्या जन्मानंतर बृहस्पती व ममता हे दोघेही ‘याचे पोषण कर’ असे एकमेकांना म्हणाले व दोघेही त्याला टाकून निघून गेले, अशी कथा आढळते.
आईवडिलांनी टाकलेल्या भरद्वाजाला मरुतांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करणाऱ्या दुष्यंतपुत्र भरताच्या स्वाधीन केले. त्यानंतर भरद्वाज हा भरताचा पुत्र ठऱला अथवा त्याने यज्ञ करुन भरताला एक पुत्र प्राप्त करुन दिला, अशा अर्थाच्या कथा आढळतात. मरुत् या देवतांनी अथवा वैशालीच्या मरुत्तनामक राजाने त्याचे पालन केले, अशा कथाही आढळतात. भरद्वाज हा उंच, कृक्ष, दीर्घायुषी व विद्वान असल्याचे निर्देश वैदिक वाड्मयात आढळतात.
काशीच्या दिवोदास राजाचा तो पुरोहित होता. त्याच्यासाठी यज्ञ करुन त्याने त्याला प्रतर्दन हा पुत्र प्राप्त करुन दिला, अशी कथा आढळते. दिवोदासाला व त्याच्या पुत्राला त्याने यज्ञात विजय मिळवून दिले. त्याच्या आज्ञेवरुन त्याचा पुत्र पायू यानेही चायनाम व प्रस्तोक या राजांना युद्धात विजय मिळवून दिले. त्याच्या वंशजांना ‘भारद्वाज’ असे म्हणतात.
विश्वामित्राच्या रैभ्यनामक पुत्राशी मैत्री असलेला एक भरद्वाज होऊन गेला. यवक्रीत हा त्याचा पुत्र होता. भरद्वाजनामक एका ऋषीला घृताची नावाच्या अप्सरेपासून श्रुतावती नावाची कन्या झाली होती व तिने इंद्राला वरले होते. भरद्वाज आणि धृताची यांच्यापासून द्रोणाचार्यांचा जन्म झाला होता. भरद्वाजाची अथवा त्याच्या एका वंशजाची कन्या देववर्णिनी हिचा विवाह ‘विश्रवस्’ याच्याबरोबर झाल्याचा व कुबेर हा त्यांचा पुत्र असल्याचा निर्देश आढळतो. वाल्मीकींनी ज्याला प्रथम रामायणाची कथा सांगितली, त्या त्यांच्या शिष्याचे नाव भरद्वाज असेच होते. भरद्वाजाने आपल्या आश्रमात अनेकदा रामाचे आतिथ्य केले होते. बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्माला भेटावयास गेलेल्या एका ऋषीचे नावही भरद्वाज असे होते. भरद्वाजाची सप्तर्षीमध्येही गणना करण्यात आली आहे. त्याने विष्णूच्या छातीवर शिंपडलेल्या पाण्याचे विख्यात अशा श्रीवत्सनामक चिन्हात रुपांतर झाले, त्याने वेदांच्या अध्ययनासाठी तीन जन्म घेतले, तरीही अध्ययन पूर्ण झाले नाही इ. कथा आढळतात.
‘श्रौतसूत्र’ आणि ‘धर्मसूत्र’ यांची रचना करणारा ग्रंथकार म्हणूनही एक भरद्वाज प्रसिद्ध आहे. अर्थशास्त्रकार असलेल्या भरद्वाजाचा कौटिलीय अर्थशास्त्रात उल्लेख आला आहे. महाभारत, यशस्तिलक इ. ग्रंथातून भरद्वाजाची राज्यशास्त्रविषयक मते आढळतात. भरद्वाजसंहिता, भरद्वाजस्मृति, वास्तुतत्व, वेदपादस्तोत्र इ. ग्रंथही त्याच्या नावावर आढळतात. काही विद्वनांच्या मते भरद्वाज नावाचे लोक मध्य आशियात असलेल्या अर्कोशिया आणि ड्रँजियाना (सध्याचेसीस्तान) या ठिकाणी रहात होते.
साळुंखे, आ. ह.