भरतपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानापैकी राजस्थानातील एक संस्थान. क्षेत्रफळ ५,०६३.६८ चौ. किमी. लोकसंख्या सु. ६ लाख (१९४१). वार्षिक उत्तपन्न सु. ३४ लाख. उत्तरेस गुडगाव, पूर्वेस आग्रा-मथुरा हे जिल्हे, दक्षिणेस जयपूर-करौली-धोलपूर व पश्चिमेस अलवर ही संस्थाने यांनी सीमांकित. शासनासाठी भरतपूर आणि डीग असे दोन विभाग पाडलेले असून पहिल्यात बयाना, भरतपूर, नाडबई, रूपबास, वेर व दुसऱ्यात डीग, कुमहेर, नगर, कामन व पहाडी ह्या तहसिली होत्या. यात ७ शहरे असून १,२९५ खेडी होती. सिनसिनवार जाटांपैकी ब्रिज हा संस्थानच्या राजवंशाचा मूळ पुरूष. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस त्याच्या लुटालुटीला आळा घालण्यासाठी आलेल्या मोगल सैन्यापासून सिनसिनीचा (डीगपासून ११ किमी.वर) बचाव करताना तो धारातीर्थी पडला. त्याचा सातवा मुलगा चुडामन याने सय्यद बंधूंच्या साह्याने मोगल दरबारी एवढे वर्चस्व वाढवले, की त्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या सवाई जयसिंगाला आदेश घेऊन परतावे लागले पण पुढे जयसिंगानेच वदनसिंग जाटाला डीगचा राजा म्हणून १७२२ मध्ये मोगल सनद मिळवून दिली. अशा रीतीने संस्थानाची स्थापना झाली. त्याचा मुलगा सूरजमल (कार. १७५६-६३) ह्याने संस्थान उत्कर्षाला नेले, भरतपूरचा जुना किल्ला ताब्यात घेऊन नवे शहर वसविले कुमहेरला वेढा घालणाऱ्या मल्हारराव होळकरला तोंड दिले व दिल्लीवर स्वाऱ्या केल्या. त्याचा मुलगा जवाहरसिंग (कार. १७६३-६८) ह्याच्यापाशी बापाची मुत्सद्देगिरी नसली, तरी शौर्य होते. त्याच्या खुनानंतर माजलेल्या अंतःकलहाचा परिणाम म्हणून महादजी शिंदे, मोगल वझीर नजफखान व अलवर संस्थान इत्यादी सर्वांनी भरतपूरला खच्ची केले. १७७६ मध्ये सत्ता हाती घेतलेल्या रणजितसिंगाने महादजी शिंद्यांची कास धऱुन १७९४ पर्यंत संस्थानचे १४ परगणे परत मिळविले पण शिंद्यांविरुद्ध मदत करुन इंग्रजांना आग्रा मिळवून दिले (१८०३) तथापि यशवंतराव होळकरला आश्रय दिल्यामुळे लॉर्ड लेकने भरतपूरला वेढा घातला (१८०४). जाटांनी किल्ला हिमतीने लढविल्यामुळे वेढा उठला, तरी एप्रिल १८०५ मध्ये इंग्रजांना २० लाख रुपये खंडणी देऊन रणजितसिंगाने सुटका करुन घेतली. १८२५ मध्ये गादीवर आलेला त्याचा नातू बलवंतसिंग ह्याला कैदेत टाकून चुलत भाऊ दूर्जनसालने सत्ता बळकावली. बलवंतसिंगचा पक्ष घेऊन इंग्रजांनी १८२६ मध्ये पुन्हा भरतपुरवर यशस्वी हल्ला केला. बलवंतसिग सज्ञान होईपर्यंत नऊ वर्षे कारभार इंग्रजांनी केला. १८५३-७१ या काळात वारस जसवंतसिंग अल्पवयी असल्यानेही त्यांचेच शासन होते. जसवंतसिंगाच्या कारकिर्दीत (१८७१-९३) संस्थानात रेल्वे येऊन मीठ-अफूवर नियंत्रण आले सैन्याचा उपयोग मुख्यतः वाहतुकीसाठी होऊ लागाला तथापि १८९७ पासून १९२० पर्यंत ब्रिटिश साम्राज्याच्या बऱ्याच लढायांत संस्थानी सैन्याचा उपयोग करण्यात आला. १८९३ मध्ये गादीवर आलेल्या रामसिंगला १९०० मध्ये नोकराचा खून करण्याबद्दल पदच्युत करुन इंग्रजांनी कारभार हाती घेतला, तो १९२८ पर्यंत. त्याच वर्षी गादीवर आलेल्या महाराजा किसनसिंगना प्रजेला राजकीय अधिकार दिल्याबद्दल पदच्युत केले. दडपशाहीमुळे प्रजामंडळाला कायदेशीर मान्यता मिळविण्यासाठी सत्याग्रह करावा लागला (१९३९). विसाव्या शतकात आर्यसमाजाचा प्रभाव संस्थानात दिसू लागला. सहकारी पतपेढ्या, बँका, आरोग्य (१९ रुग्णालये) अशा थोड्या फार सुधारणा झाल्या. प्राथमिक शिक्षण सक्तीचे झाले (१९२६). १९४८ मध्ये संस्थान मत्स्य संघात व १९४९ मध्ये राजस्थान संघात विलीन झाले.
कुलकर्णी. ना. ह.