भद्रावती : कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्ह्यातील बंगलोरहोनावर मार्गावरील औद्योगिक शहर आणि द. रेल्वेच्या बीरूर-तालगुप्पा या शाखा-लोहमार्गावरील महत्वाचे स्थानक. लोकसंख्या १,३०,१५९ (१९८१). प्राचीन काळी बैंकिपुरा, बेंकियापुरा, बँकीपुरा, बँकिपुरी इ. नावांनी ते ओळखले जाई. हे शहर भद्रा नदीच्या दोन्ही काठांवर वाबा बुढण डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. भद्रा नदी येथे वळण घेऊन पश्चिमवाहिनी होते.
शहराच्या जुन्या भागात, तेराव्या शतकाच्या मध्यकालात बांधलेले होयसळांचे लक्ष्मीनरसिंहाचे पूर्वाभिमुखी देऊळ आहे. तीन गर्भागारे असलेल्या या देवळाचे बांधकाम काही ठिकाणी अपुरे आढळते. देवळातील सुखासनावर बसलेली नरसिंहाची मूर्ती शोभिवंत आहे. मे महिन्यात येथे वार्षिकोत्सव होतो.
‘मायसोर आर्यन अँड स्टील कंपनी’ या नावाने १९२३ साली सुरू झालेला व कर्नाटक सरकारच्या अख्यारीत असलेला लोखंड व पोलाद निर्मिती प्रकल्प आता राज्य व केंद्र सरकार या दोहोंच्या ताब्यात असून ‘विश्वेश्वरय्या आर्यन अँड स्टील वक्स लि.’ या नावाने तो सांप्रत ओळखला जातो. लोखंड वितळविणे, बीड, रेल्वे स्लीपर इ. कारखान्याची मुख्य उत्पादने होत. १९३८ साली प्रतिदिनी ६० टन उत्पादनक्षमता असलेला सिमेंट प्रकल्प या उद्योगसमुहाला जोडला गेला. कोळसा, टार पदार्थ, सिमेंट, कागद, विटा, चंदनतेल इ. वस्तूंची निर्मिती करणारे साहाय्यकारी उद्योग शहरात विकास पावले आहेत. येथील नवीन औद्योगिक नगर ‘पेपर टाउन’ या नावाने या उद्योगसमूहाजवळ वसविण्यात आले आहे (लोकसंख्या ७६,९२७-१९८१). भद्रावतीमध्ये नऊ शाळा, एक कनिष्ठ महाविद्यालय, एक वरिष्ठ महाविद्यालय, एक धंदेशिक्षण शाळा इ. शैक्षणिक सुविधा आहेत. भद्रावतीच्या परिसरात सु. ४०० वर्षापूर्वीपासून बरीच मराठी भाषिक कुटुंबे आहेत.
पंडित, भाग्यश्री
“