बूलवायो : आफ्रिका खंडातील झिंबाब्वे प्रजासत्ताकामधील (पूर्वीचे ऱ्होडेशिया) एक प्रमुख शहर. उत्तर मॅटबीलीलॅँड या प्रांताचे ते प्रशासकीय केंद्र आहे. लोकसंख्या ३,६३,००० (१९७९ अंदाज). हे सॉल्झबरी शहराच्या नैर्ऋत्येस सु.३७० किमी. मॅत्‌झेंमलोप नदीकाठी वसलेले आहे. हे लोहमार्गाचे प्रस्थानक असून लोहमार्गाचे ते झॅँबिया आणि बोट्‌स्वाना या देशांशी जोडलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे.

विद्यमान शहराच्या उत्तरेस५किमी. वर मॅटबीलीलॅँडचा राजा लोबेंगुला (१८३३-९४) याने क्रालकरिता (वसाहतीसाठी) जागा निश्चित केली होती. १८९३ मध्ये ब्रिटिशांनी याचा ताबा घेतला व १८९४ मध्ये सध्याच्या ठिकाणी शहर वसविण्यात आले. केप ते कैरो या सेसिल ऱ्होड्सच्या महत्वाकांक्षी लोहमार्ग योजनेत १८९७ साली येथे लोहमार्ग आला [⟶ केप ते कैरो रेल्वे] . १९४३ मध्ये त्यास शहराचा दर्जा मिळाला.

शहराच्या परिसरात शेती व दुग्धव्यवसाय प्रमुख असले, तरी कोळसा, सोने यांच्या खाणींमुळेच शहराचा वेगाने विकास घडून आला. लोखंड-पोलाद, साखर, सिमेंट, मांस डबाबंदीकरण, अन्नप्रक्रिया, रसायने, रेडिओ, कापड, टायरनिर्मिती इ. उद्योग येथे विकसित झालेले आहेत. बूलवायो हे एक शैक्षणिक केंद्रही आहे. शहरापासून४५ किमी. अंतरावर माटोपो टेकडीवरील सेसिल ऱ्होड्‌सची कबर, शहरातील त्याचा ब्रॉंझचा पुतळा तसेच ग्रंथालय, राष्ट्रीय संग्रहालय, शहराजवळील प्राचीन आफ्रिकन संस्कृतीच्या दृष्टीने महत्व असलेले खामी अवशेष इ. गोष्टी उल्लेखनीय आहेत. शहरातील सु.३३ टक्के लोक गौरवर्णीय आहेत.

लिमये,दि.ह. पंडित, अविनाश