ब्रेक्ट, बेर्टोल्ट: (१० फेब्रुवारी १८९८ – १४ ऑगस्ट १९५६). जर्मन नाटककार, कवी आणि नाट्यदिग्दर्शक. जन्म बव्हेरियातील आऊग्जबुर्ग येथे. १९१७ साली म्यूनिक विद्यापीठातून मॅट्रिक झाल्यानंतर तो वैद्यकाचा अभ्यास करू लागला. पहिल्या महायुद्धाच्या काळात आऊग्जबुर्ग येथील सैनिकी इस्पितळात ‘मेडिकल ऑर्डर्ली’म्हणून त्याने वर्षभर काम केल्यानंतर त्याने पुन्हा आपला वैद्यकाचा अभ्यास सुरू केला. तथापि ह्या अभ्यासावरून त्याचे लक्ष उत्तरोत्तर उडतच गेले आणि तो नाट्यलेखनाकडे वळला. बाSल (१९२२) आणि ट्रोमेल इन डेअर नाख्ट (प्रयोग १९२२, प्रकाशित १९२३, इं. शी. ड्रम्स इन द नाइट) व इम डिकिश्ट डेअर ष्टेट (प्रयोग १९२३, इं. शी. इन द सिटीज जंगल्स) ही ब्रेक्टची आरंभीची काही नाटके. शून्यवादी विचारसरणीचा व अभिव्यक्तिवादी नाट्यलेखनतंत्राचा प्रभाव त्यांवर दिसून येतो. त्यांतील ‘ड्रम्स इन द नाइट’ ह्या नाटकाला दर वर्षी उत्कृष्ट नाटककाराला देण्यात येणारे क्लाइस्ट पारितोषिक मिळाले होते. १९२४ साली ब्रेक्ट बर्लिनला आला आणि विख्यात ऑस्ट्रियन नाट्यदिग्दर्शक माक्स राइनहार्ट ह्याच्या नाट्यसंस्थेत काम करू लागला. १९२६ च्या सुमारास ब्रेक्ट मार्क्सवादाकडे वळला. ह्या नव्या संस्काराचा प्रभाव त्याच्या कवितांतून (डी हाउसपोस्टिलS १९२७, इं. शी. डोमेस्टिक ब्रेव्हिअरी) जाणवतो तसेच मान इस्ट मान (प्रयोग १९२६, प्रकाशित १९२७, इं. शी. मॅन इज मॅन), डी ड्रायग्रोशेन ओपर (१९२८, इं. शी. थ्री पेनी ऑपेरा), आउफष्टीग उण्ट फाल डेअर ष्टाट महागोनी (प्रयोग आणि प्रकाशित १९३०, इं. शी. द राइझ अँड फॉल ऑफ द सिटी ऑफ महॉगनी) ह्यांसारख्या नाट्यकृतींवर स्पष्टपणे दिसून येतो. बूर्झ्वा भांडवलशाही समाजव्यवस्थेबद्दलचा त्याचा तिटकारा त्याने ह्या नाटकांतून स्पष्टपणे व्यक्तविलेला आहे. ह्या नाट्यकृतींपैकी ‘थ्री पेनी ऑपेरा’ह्या नाटकानेब्रेक्टला अफाट लोकप्रियता मिळवून दिली. प्रसिद्ध इंग्रज कवी आणि नाटककार ⇨ जॉन गे ह्याच्या बेगर्स ऑपेरा (१७२८) ह्या संगीतिकेवरून ब्रेक्टला ‘थ्री पेनी ऑपेरा’ची कल्पना सुचली. गे’ने त्याच्या काळातील इंग्रज समाजातील नैतिक-राजकीय अधःपाताचे उत्कृष्ट विडंबन ह्या संगीतिकेत केले होते. ब्रेक्टने ह्या संगीतिकेच्या कथानकाचा आधार घेऊन बूर्झ्वा मनोवृत्तीवर आघात केले. ह्या नाटकाचे मराठी रूपांतर पु. ल. देशपांडे ह्यांनी तीन पैशांचा तमाशा ह्या नावाने केलेले आहे. पक्षाची शिस्त मोडणाऱ्या कार्यकर्त्याने शिक्षा म्हणून आत्मनाशालाही मान्यता दिली पाहिजे असा विचार ब्रेक्टने बाडेनर लेडरश्टयूक (प्रयोग १९२९, इं. शी. डिडॅक्टिक प्ले ऑफ बाडेन ऑन कन्सेंट) ह्या नाटकात मांडलेला आहे.
जर्मनीत हिटलर सत्तेवर आल्यानंतर (१९३३) ब्रेक्टला तेथे राहणे शक्य नव्हते. त्याच वर्षी जर्मनी सोडून तो डेन्मार्कमध्ये जाऊन राहिला. तेथील वास्तव्यात त्याने हिटलरविरोधी प्रचार केला. फूर्श्ट उण्ट एलेण्ड डेस ट्रिटेन रायशेस (१९३७, इं. शी. फीअर्स अँड मिझरीज ऑफ द थर्ड राइश) ह्या नावाने त्याने लिहिलेली काही नाट्यदृश्ये ह्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. जर्मनीतील हिटलरी हुकूमशाहीची त्यांत निर्भर्त्सना केलेली आहे. ह्या नाट्यदृश्यांपैकी काहींचा प्रयोग १९३८ साली करण्यात आला, तर काही दृश्ये १९४५ मध्ये रंगभूमीवर सादर केली गेली. मुटूर कुराजSउण्ट ईरS किण्डर (प्रयोग १९४१, प्रकाशित १९४९, इं. भा. मदर करेज अँड हर चिल्ड्रन, १९६२), डेअर गुटSमेन्श फोन सेत्सुआन (प्रयोग १९४३, प्रकाशित १९५६, इं. भा. द गुड वूमन ऑफ सेत्सुआन, १९६१) आणि लेबेन डेस गालिलाय (प्रयोग १९४३, इं. शी. द लाइफ ऑफ गॅलिलीओ) ही नाटकेही त्याने लिहिली. तथापि त्यांत मानवी जीवनातील काही समस्यांचा तत्वचिंतनात्मक वृत्तीने विचार केलेला आढळतो. मदर करेज…….. मध्ये युद्धाची विनाशकता प्रत्ययकारीपणे दाखविलेली आहे. तीस वर्षांच्या युद्धाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्या नाटकाला ब्रेस्टने दिलेली आहे. स्वार्थावर उभ्या राहिलेल्या समाजात व्यक्तीला चांगुलपणाने राहणे शक्य आहे काय, हा प्रश्न द गुड वूमन …….. मध्ये त्याने उपस्थित केलेला आहे तर ‘लाइफ ऑफ गॅलिलीओ’ मध्ये प्रतिभावंत शास्त्रज्ञाच्या सामाजिक जबाबदाऱ्यांचा विचार आहे. १९३९ साली ब्रेक्टने डेन्मार्क सोडले. त्यानंतरचा काही काळ स्वीडन आणि फिनलंड ह्या देशांत काढून तो अमेरिकेत आला (१९४१). फिनलंडमधील वास्तव्यात ब्रेक्टने हेअर पुण्टिला उण्ट झाइन कनेश्ट (१९४८, इं. शी. मास्टर पुण्टिला ॲड हिज सर्व्हंट) हे नाटक लिहिले. अमेरिकेत ब्रेक्टने सहा वर्षे काढली. डेअर कौकाझिश Sक्रायड S क्राइस (१९४७, इं. भा. द कॉकेशिअन चॉक सर्कल, १९६० १९६३) हे आपले एक श्रेष्ठ नाटक ब्रेक्टने तेथे असताना लिहिले. ह्या नाटकात मानवी न्यायाचा प्रश्न ब्रेक्टने मांडलेला आहे. ह्या नाटकाचे मराठी रूपांतर चिं. त्र्यं. खानोलकर ह्यांनी अजब न्याय वर्तुळाचा ह्या नावाने केले आहे (१९७४).
ब्रेक्टने १९४७ च्या उत्तरार्धात अमेरिका सोडली आणि काही काळ स्वित्झर्लंडमध्ये घालवून तो पूर्व बर्लिनमध्ये आला. तेथे त्याने स्वत:ची एक नाट्यसंस्था चालविली. ब्रेक्ट हा केवळ नाटककार नव्हता, तर उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शकही होता. त्याने ‘एपिक थीएटर’ ही स्वतःची नाट्यविषयक प्रणालीही मांडली होती. नाटकाचे कार्य प्रेक्षकांचे भावविरेचन घडवून आणणे हे नसून त्यांची मने जागृत करणे हे आहे, असे ब्रेक्टचे मत होते. रंगमंचावर जे घडते ते खरे मानून प्रेक्षकांनी त्याच्याशी तादात्म्य पावण्याऐवजी एक प्रकारची चिकित्सक अलिप्तता बाळगून नाट्यांतर्गत घटना पाहाव्यात, असे त्याला वाटे. त्यामुळे अनेक रंगतंत्रसंकेत त्याने बाजूला ठेवले. उदा., त्याच्या नाटकातील नट रंगभूमीवरून उतरून प्रेक्षकांत मिसळत आणि नाट्यप्रसंगात त्यांनाही सामील करून घेत. नटांनी आपल्या ‘भूमिकां’तून बाहेर पडणे त्याच्या दृष्टीने आवश्यक होते. संपन्न व्यक्तिरेखन व उपरोधप्रचुर विनोद ही ब्रेक्टच्या नाट्यलेखनाची आणखी काही लक्षणीय वैशिष्ट्ये. विसाव्या शतकातील श्रेष्ठ नाटककारांत त्याचा समावेश केला जातो.
सोव्हिएट रशियाने १९५४ साली स्टालिन पारितोषिक देऊन ब्रेक्टच्या साहित्यसेवेचा गौरव केला. पूर्व बर्लिन मध्येच तो निधन पावला.
संदर्भ : 1. Bentley, Eric, Ed. Seven Plays by Bertolt Brechi, New York, 1961.
2. Esslin, Martin, Brecht: The Man and His Work, New York, 1959.
3. Willett, John, The Theatre of Bertolt Brechi, New York, 1961.
महाजन, विद्यासागर
“