ब्राँटी, शार्लटः(२१ एप्रिल १८१६ – ३१ मार्च १८५५). प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकर्त्री. एमिली ब्राँटी आणि ॲन ब्राँटी ह्या कादंबरीलेखिकांची ज्येष्ठ भगिनी. जन्म यॉर्कशरमधील थॉर्नटन येथे. औपचारिक शिक्षण तिला फारसे मिळाले नव्हते. कौअन ब्रिज आणि ड्यूसबरी येथे थोडेसे शिक्षण तिने घेतले. धाकटी बहीण एमिली हिच्याबरोबर ब्रूसेल्स येथे फ्रेंच भाषेचा अभ्यास केला (१८४२ – ४३). हॉवर्थ येथील क्यूरेट आर्थर बेल निकोल्स ह्याच्याशी शार्लटचा विवाह १८५४ मध्ये झाला होता. तथापि विवाहानंतर काही महिन्यांनीच ती हॉवर्थ येथे निधन पावली.
शार्लट, एमिली आणि ॲन ह्या भगिनींनी पुरुषी टोपण नावे घेऊन त्यांच्या कवितांचा जो एक संग्रह १८४६ मध्ये प्रसिद्ध केलेला होता, त्यातील ‘करर बेल’ च्या कविता ह्या शार्लटच्या होत. शार्लट ह्या नावाच्या वर्णक्रमातील ‘सी’ हा पहिला वर्ण घेऊन हे टोपण नाव तयार करण्यात आले होते. द प्रोफेसर (१८५७) ही शार्लटची पहिली कादंबरी. प्रकाशकांनी ती नाकारली होती. तिच्या मृत्यूनंतर ती प्रसिद्ध झाली. जेन आयर (१८४७) ही तिची प्रकाशित झालेली पहिली कादंबरी मात्र यशस्वी ठरली आणि आज तिची कीर्ती मुख्यतःह्याच कादंबरीवर अधिष्ठित आहे. ही कादंबरी आत्मचरित्रात्मक असून तीत स्त्रियांच्या भावनांची उकल प्रत्ययकारीपणे करून दाखविली आहे. स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व असते पुरुषाच्या करमणुकीचे एक साधन म्हणून तिच्याकडे पाहता येणार नाही, हा आधुनिक विचार शार्लटने ह्या कादंबरीत मांडलेला आहे. ह्या कादंबरीच्या घाटाकडे मात्र शार्लटने फारसे लक्ष दिलेले नाही, अशी टीका तिच्यावर झालेली आहे. शर्लि (१८४९) आणि विलेट (१८५३) ह्या तिच्या अन्य दोन कादंबऱ्या.
संदर्भः 1. Gaskell, E. C. The Life of Charlotte Bronte, London, 1908.
2. Gerin, Winifred, Charlotte Bronte, London, 1967.
3. Martin, Robert B. The Accents of Persuasion : Charlotte Bronte’s Novels, London, 1966.
बापट, गं. वि.