ब्राह्मणेतर चळवळ : ब्राह्मणवर्गाच्या धार्मिक वर्चस्वाविरुद्ध ब्राह्मणेतरांनी केलेली चळवळ. ब्राह्मणेतर चळवळीची सुरुवात महाराष्ट्रापासून झाली. शिक्षणामुळे नवी दृष्टी प्राप्त झालेले जोतीरावर गोविंदराव फुले हे ब्राह्मणवर्चस्वाच्या विरोधी बंड करणारे पहिले नेते होत. त्यांच्या आधी लोकहितवादींनी ब्राह्मणांवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली होती. जोतीराव बहुजनसमाजातून पुढे आलेले होते. मानवाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर त्यांची श्रद्धा होती. या श्रद्धेतूनच त्यांनी आपली सत्यशोधक चळवळ सुरू केली. १८७३ साली स्थापन झालेल्या ⇨सत्यशोधक समाजाला सुरुवातीला चांगले अनुयायी मिळाले. विश्राम रामजी घोले, कृष्णराव भालेकर, ⇨ नारायण मेघाजी लोखंडे, मारुतराव नवले, रामचंद्र हरी शिंदे, रामशेट उधवणे, संतूजी लाड या सत्यशोधकांनी चळवळीचे क्षेत्र व्यापक बनविण्याचा प्रयत्न केला. भालेकर यांचे दीनबंधु साप्ताहिक चळवळीचे मुखपत्र होते. ⇨ जोतीराव फुले (१८२७ – ९०) यांचे गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब नारायण मेघाजी लोखंडे यांची सत्यशोधकी निबंधमाला मुकुंदराव पाटील यांचे कुलकर्णी लीलामृत ही पुस्तके ब्राह्मणेतर चळवळीच्या इतिहासात बरीच गाजली. ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रश्नांचा विचार केलेला असला, तरी ही चळवळ प्रामुख्याने भिक्षुकीशाहीविरुद्धचे बंड होती. परमेश्वराकडे जाताना मध्यस्थाची आवश्यकता नाही, म्हणून जोतीरावांनी पुरोहितांचे महत्त्व नाकारले. धार्मिक विधीदेखील पुरोहितांच्या मार्फत करू नका, असे फुल्यांनी आवाहन केले होते. बहुजनसमाजाला समजावे या हेतूने सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकांसह सर्व पूजाविधी (१८८७) ही पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली. शूद्रातिशूद्रांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. ब्राह्मणेतरांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, ही त्यांची आंतरिक इच्छा होती.

जोतीरावांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचा प्रभाव कमी झाला. देशाचे वातावरण हळूहळू बदलत होते. तुरळक प्रमाणात कोठे सत्यशोधकी जलसे होत असले, तरी एकोणिसाव्या शतकात निर्माण झालेले पुरोहितशाहीविरुद्धचे वातावरण बरेचसे निवळत गेले.

महात्मा फुले यांच्या कार्याने प्रभावित होऊन कोल्हापूरच्या ⇨छ. शाहू महाराजांनी धार्मिक आणि सामाजिक अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचे महत्व ओळखून त्याचा प्रसार करण्याचे धोरण अवलंबले. १९०० मध्ये वेदोक्त प्रकरण निर्माण झाले. राजोपाध्ये  यांनी छत्रपतींच्या घराण्याला वेदोक्ताचा अधिकार नाकारला. महाराजांना शूद्र ठरवले. साहजिकच यातून कटू प्रसंग निर्माण झाले. ज्या शिवछत्रपतींमुळे हिंदू धर्म तरला त्यांच्याच वंशजास शूद्र ठरवल्यामुळे ब्राह्मणेत्तर समाजात असंतोष निर्माण झाला. महाराजांनीही वेदोक्ताचा हक्क नाकारणाऱ्यांची संस्थानावरील इनामे जप्त केली. लोकमान्य टिळकांसारख्या मान्यवर नेत्याने या प्रकरणातील तीव्रता कमी केली.

महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीची सूत्रे अप्रत्यक्ष रीत्या शाहू महाराजांच्या हाती गेली. त्यांनी या चळवळीला विधायक स्वरूप दिले. केवळ ब्राह्मणविरोध हा दृष्टिकोन न ठेवता त्यांनी आपल्या संस्थानात शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक सुधारणा घडवून आणल्या. अस्पृश्यतेविरुद्ध मोहीम उघडली. परिषदा आणि भाषणे यांद्वारे चळवळीचे लोण संस्थानाबाहेर नेले. मद्रासच्या जस्टिस पार्टीच्या नेत्यांबरोबर संबंध प्रस्थापित केले. याच काळात भास्करराव जाधव, आण्णासाहेब लठ्ठे यांसारख्या विचारवंतांनी मोलाची भर घातली. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर (१९२२) चळवळीला दिशा उरली नाही. मात्र या काळातही माधवराव बागलांसारखे एखादे व्यक्तिमत्व फुल्यांचा जुना वारसा सांभाळीत होते. कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे.

राष्ट्रीय चळवळीत लोकमान्य टिळकांच्या नंतर महात्मा गांधींचा उदय झाला. त्यांच्या सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या धोरणाचा आदर साहजिकच महाराष्ट्रातील बहुजनसमाजाने केला. ब्राह्मणतेर चळवळीचे त्यावेळचे नेते ⇨ केशवराव जेधे, शंकरराव मोरे हे १९३० नंतर राजकीय चळवळीत पडले. त्यामुळे ब्राह्मणतेर चळवळीचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी झाला.

तमिळनाडूतील सामाजिक स्थिती महाराष्ट्रापेक्षा खूपच निराळी होती. स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना सर्वच जातिजमातींत दिसून येतात. श्रेणीरचनेतील स्थानानुसार इतर जातींच्या लोकांनी अंतर ठेवून व्यवहार करावे, असे नियम होते. महाराष्ट्रात मराठा समाजासारखा आर्थिक, सामाजिक दृष्टीने बराचसा तुल्यबळ असलेला समाज ब्राह्मणविरोधी संघर्ष करण्यासाठी अस्तित्वात होता. केरळमध्ये ब्राह्मणांना तुल्यबळ नायर समाज होता. तमिळनाडूत ब्राह्मणेतरांमध्ये संख्येने, आर्थिक, सामाजिक दृष्टीने तुल्यबळ असा कोणताच समाज नव्हता. ब्राह्मणेतर हे सर्व छोट्या छोट्या जातिसमूहांत विभागले गेले होते. शिवाय तेव्हाच्या त्रावणकोर आणि कोचीन संस्थानाचे अधिपतीही तमिळी नव्हते, ते मलयाळी नायर होते. तमिळनाडूत धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रांतील त्यांच्या परंपरागत स्थानांमुळे त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते. ते जोपासण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. त्यातूनच बहुजनसमाजाच्या मनात ब्राह्मणांविषयी तिरस्कार निर्माण झाला.

तमिळनाडूतील ब्राह्मणेतर चळवळीत तीन अवस्था दिसून येतात : (१) जस्टिस पार्टीची स्थापना (१९१७), (२) स्वाभिमान संवर्धन चळवळ आणि (३) द्रविड कळघम् ची स्थापना.

वास्तविक जस्टिस पार्टी स्थापन केली, ती केरळमधील नायर समाजातील एका व्यक्तीने. जस्टिस पार्टीच्या स्थापनेत पानगल संस्थानच्या राजाचाही फार मोठा हात आहे. ब्राह्मणेतरांच्या शैक्षणिक विकासासाठी जस्टिस पार्टीने बरेच काम केले. राजकीय दृष्टीने त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.


फुले-आंबेडकरांच्या चळवळीत समाजातील खालच्या थरातील लोकदेखील सामील झाले होते, तसे जस्टिस पार्टीचे नव्हते. जस्टिस पार्टीत उच्चमध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांचाच भरणा अधिक होता. जस्टिस पार्टीने ब्रिटिशांना अनुकूल अशी भूमिका १९२० सालापर्यंत उघडपणे स्वीकारली नव्हती. त्याच सुमारास ब्राह्मणेतर चळवळीबद्दल सहानुभूती बाळगणारे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांची बदली मद्रास इलाख्यला झाली. राष्ट्रीय चळवळीला आणि काँग्रेसला त्यांनी विरोध केला,कारण काँग्रेसमध्ये ब्राह्मण अधिक होते.  ⇨ रामस्वामी नायकर (१८७९-१९७३) यांनी १९२५ च्या सुरुवातीला स्वाभिमान संवर्धन चळवळीला प्रारंभ केला. ही चळवळ नायकरांनी गतिशील बनवली. या चळवळीने ब्राह्मणी श्रद्धा व आचार यांच्यावर हल्ले सुरू केले. ब्राह्मणांनी द्रविड संस्कृती नष्ट केली. त्या संस्कृतीच्या उज्ज्वल कालखंडाच्या आठवणी निघू लागल्या. विवाहविधी आणि इतर धार्मिक विधींसाठी ब्राह्मणाला बोलावले जाऊ नये, असा प्रचार केला गेला. केरळमधील वायकोम सत्याग्रहात नायकरांनी भाग घेतला होता (१९२४).

तमिळनाडूतील ब्राह्मणेतर चळवळीला पुढे राष्ट्रविरोधी वळण लागले. स्वातंत्र्यसोहळ्यावर बहिष्कार टाकणे, राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, राज्यघटनेच्या प्रती जाळणे असे प्रकार सुरू झाले.

यातूनच पुढे द्रविड कळघम् ची स्थापना झाली. अण्णादुरै, करुणानिधी, एम्. जी. रामचंद्रन् ही नेतेमंडळी या चळवळीतूनच पुढे आली. नाटके आणि चित्रपट या माध्यामांच्या द्वारे ब्राह्मणेतर चळवळ खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली. निरीश्वरवाद, जातिनिर्मूलन, पारंपारिक आचारांना, रूढींना विरोध या गोष्टींवर तमिळनाडूतील ब्राह्मणेतर चळवळीचा रोख होता परंतु ही चळवळदेखील परंपरेविरुद्धचे बंड अशीच होती.

महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीपेक्षा तमिळनाडूची चळवळ अधिक उग्र होती. राजर्षी शाहूंच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीची जी अवस्था होती, ती तमिळनाडूतील चळवळीत नेहमीच राहिलेली दिसते परंतु असे असले तरी ब्राह्मणेतर चळवळीमुळे बहुजनसमाजात शिक्षणाचा प्रसार झाला, राजकीय-सामाजिक जागृती निर्माण झाली, सामाजिक सुधारणांच्या चळवळीला गती मिळाली हे मान्य करावेच लागेल. बहुजनसमाजात ‘स्व’ची जाणीव निर्माण झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदीय लोकशाहीच्या प्रभावाखाली राजकीय सत्ता बहुजनसमाजाच्या, विशेषतः महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हाती आली. त्याचप्रमाणे तमिळनाडू, केरळ तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक याही राज्यांतून राजकीय सत्ता बहुजनसमाजातील लोकांच्या हाती आली.

पहा : धर्मसुधारणा आंदोलन भारतीय प्रबोधनकाल.

संदर्भ :1. Kavlokar, K. K. Non Brahmin Movement in Southern India 1873 – 1949, Kolhapur, 1979.2. Pillai, S. Devdas, Ed. Aspects of Changing India, Bombay, 1976.3. कीर, धनंजय, संपा. समग्र फुले वाङ्मय, मुंबई, १९७३.4. जोशी, लक्ष्मणशास्त्री, ज्योति निबंध, वाई, १९४७.5. बेडेकर, दि. के. भणगे, भा. शं. संपा. भारतीय प्रबोधन, पुणे, १९७३.6. सरदार, गं. बा. महात्मा फुले, मुंबई, १९८१.

परळीकर, नरेश