ब्राह्मणी नदी : भारताच्या ओरिसा राज्यातील वायव्य आग्नेय दिशेने वाहणारी व बंगालच्या उपसागरास मिळणारी एक प्रमुख नदी. लांबी ७०५ किमी. जलवाहनक्षेत्र ३६,४०० चौ. किमी. बिहार राज्यात छोटा नागपूरच्या पठारावर उगम पावणाऱ्या दक्षिण कोएल व सांख या दोन नद्यांचा ओरिसा राज्यातील सुंदरगढ जिल्ह्यात पनपोश येथे संगम होतो. त्यानंतरच्या संयुक्त प्रवाहास ‘ब्राह्मणी’ हे नाव पडले आहे. प्रथम दक्षिणवाहिनी असली, तरी बहुतांश ही नदी वायव्य आग्नेय दिशेत सुंदरगढ, संबळपूर, धेनकानाल व कटक या जिल्ह्यांतून वाहते. कटक जिल्ह्यात ती धाम्र नदीमुखखाडी व मैपारा नदी या दोन मुखांद्वारे बंगालच्या उपसागरास मिळते. खर्सुआ, किमिरिआ, तिक्किरा, लिंगारी, पतिया या हिच्या प्रमुख उपनद्या होत.

ब्राह्मणी नदीस धार्मिक दृष्ट्या महत्व असून, दक्षिण कोएल आणि सांख यांच्या संगमस्थानास विशेष महत्व आहे. मुखाकडील प्रदेशात कालवे काढून बागाइती पिकांना पाणीपुरवठा केला जातो. कटक जिल्ह्यातील लोकांस या नदीच्या पुरांना वारंवार तोंड द्यावे लागत असून पुरामुळे कटक जिल्ह्याचे सतत नुकसान होत असते.

यार्दी, ह. व्यं.