ब्रह्मी साहित्य : ब्रह्मदेशातील सर्वप्राचीन साहित्य विविध शिलालेखांच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांतील काही प्यू ह्या नावाच्या भाषेत (चौदाव्या शतकापासून ही भाषा मृत आहे) आहेत. ह्या शिलालेखांचा काळ इ. स. च्या सहाव्या शतकापासून नवव्या शतकापर्यंतचा आहे. ब्रह्मी ही ब्रह्मदेशाची प्रमुख भाषा असून तिचा लिखित पुरावा अकराव्या शतकापासून उपलब्ध आहे आणि ह्या भाषेतील वाङ्मयाची लक्षणीय परंपरा पंधराव्या शतकाच्या मध्यापासूनची आहे. पंधराव्या शतकाच्या अखेरीस चार थोर कवींचे कर्तृत्व झाले. त्यांची नावे अशी : शिन उत्तमकयॉ, शिन रातथेर, शिन थिलवुंथ आणि शिन अग्गाथमेडी. ‘फॉरेस्ट जर्नी’ (इं. शी.) ह्या आपल्या काव्यात उत्तमकयॉ ह्याने भगवान बुद्धाला मानवंदना दिलेली आहे. अन्य तिघांनी महाकाव्यांची रचना केली. ही महाकाव्येही बुद्धाच्या जीवनातील प्रसंगांवरच रचिलेली आहेत. ह्या कवींनी महत्त्वाच्या सार्वजनिक प्रसंगांवरही काव्यरचना केलेली आहे. कवी थिलवुंथ ह्याने लिहिलेला बौद्धधर्मीय देशांचा इतिहास आणि एक प्रवचनसंग्रह ह्या उल्लेखनीय गद्यकृती होत. सोळाव्या शतकात मोन बिन्या दाला ह्याने एका मॉन राजाच्या जीवनावर रोमान्ससदृश गद्यरचना केलेली आहे. अठराव्या शतकाच्या आरंभी यू कलाने ब्रह्मदेशाचा इतिहास लिहिला. एकोणिसाव्या शतकात (१८७०) ब्रह्मदेशात मुद्रणालये निघाली. परिणामतः कादंबऱ्या, कादंबरिका, कथा, नाटके असे विविध प्रकारचे साहित्य निर्माण झाले आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचू लागले. यू कू, सू था, पोक नी, चान म्या हे विशेष लोकप्रिय नाटककार होत. १९२० साली रंगून विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्यानंतर लेखकांची एक नवी पिढी उदयास आली. आधुनिक ब्रह्मी साहित्याच्या निर्मितीस ह्या पिढीचा वाटा मोठा आहे. १९४८ साली ब्रह्मदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तम इंग्रजी साहित्य लोकांना उपलब्ध करून देण्यात आले. शासकीय मदतीवर उभ्या राहिलेल्या ‘बर्मा ट्रॉन्सलेशन सोसायटी’ ला ह्याचे बरेचसे श्रेय आहे. ह्या सोसायटी तर्फे ब्रह्मी भाषेतील उत्तमोत्तम साहित्यकृतींना पारितोषिके दिली जातात.

कुलकर्णी, अ. र.