ब्रह्मसूत्रे: उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता या तिन्ही ग्रंथांना वेदान्ताची ‘प्रस्थाने’ म्हणतात. प्रस्थान म्हणजे उगमस्थान. [→प्रस्थानत्रयी]. भिन्न भिन्न काळातील निरनिराळ्या ऋषींचे विश्वविषयक आणि जीवनविषयक उद्गार आणि विचार उपनिषदांत संग्रहीत आहेत. त्या सर्वांत काही साधर्म्य असले, तरी साहजिकपणेच सर्व उपनिषदांचा मिळून तत्त्वज्ञानासंबंधी काही एक सुसंगत आणि सुनिश्चित निर्णय आहे असे नाही. पण उपनिषदांना श्रुतीची पदवी असल्याने शब्दप्रामाण्याच्या युगात सर्व उपनिषदवाक्यांचा समन्वय करून त्यातून एकच एक अर्थ काढणे प्राप्त होते. ⇨ बादरायण ऋषींनी (यांनाच कृष्णद्वैपायन अथवा द्वैपायन वेदव्यास म्हणून कित्येक पंडित निर्दिष्ट करतात परंतु ऐतिहासिक दृष्ट्या बादरायण व्यास व कृष्णद्वैपायन वेदव्यास या व्यक्ती भिन्न आहेत, असे मानावे लागते.) विविध उपनिषद वचनांची मीमांसा करून त्यांची एकवाक्यता दाखवून देण्यासाठी व उपनिषदांचा सारांश सांगण्यासाठी जी सूत्रे रचली त्यास ब्रह्मसूत्रे म्हणतात. कारण त्यांमधील प्रतिपाद्य मुख्य विषय ब्रह्म हा आहे. सूत्रांमध्ये अत्यंत थोड्या शब्दात पुष्कळ अर्थ योग्य क्रमाने आणून ठेविलेला असतो. ब्रह्मसूत्रांस बादरायण सूत्रे, वेदान्तसूत्रे, उत्तर मीमांसासूत्रे, शारीरक सूत्रे अशी दुसरीही नावे आहेत. शारीरक म्हणजे शरीरात राहणारा आत्मा. ब्रह्मसूत्रांत जसा ब्रह्माचा विचार आहे तसा आत्म्याचाही आहे आणि त्या दोघांच्या संबंधाचाही आहे. बादरायणाच्या अगोदर उपनिषदांचे भिन्न भिन्न अर्थ करणारे वेदान्त संप्रदाय होते. आत्रेय, आश्मरथ्य, बादरी, औडुलोमी, काशकृत्स्न इ. पूर्वाचार्यांचा उल्लेख बादरायणाच्या ब्रह्मसूत्रांत येतो.
ब्रह्मसूत्रांचे चार अध्याय असून प्रत्येक अध्यायाचे चार पाद आहेत. सर्व उपनिषदवाक्ये ब्रह्म या सिद्ध वस्तूचे प्रतिपादन करून विश्वाची प्रतिष्ठा ब्रह्मामध्ये आहे असे सांगतात, असे पहिल्या ‘समन्वयाध्याय’ नावाच्या अध्यायात दाखविले आहे. या मतास इतर कोणत्याही प्रमाणाने विरोध येत नाही हे दाखविण्यासाठी दुसऱ्या ‘अविरोधाध्याय’ या अध्यायाची योजना आहे. तिसऱ्या अध्यायाचे नाव ‘साधनाध्याय’. त्यात उपनिषदांच्या आधारे मुख्यतः ब्रह्मप्राप्तीच्या साधनांचा विचार केला आहे. चौथ्या म्हणजे ‘फलाध्याया’त ब्रह्मविद्येच्या फलाची मीमांसा केली आहे. त्यात जसे मोक्षावस्थेचे वर्णन आहे तसेच जीवाच्या मृत्यूत्तर गतीचेही आहे. प्रत्येक पादात एक अथवा अधिक सूत्रांची मिळून अनेक अधिकरणे असतात. अधिकरण म्हणजे विषय. सहसा त्यात प्रथम विषय सांगून निर्माण होणाऱ्या संशयाचे स्वरूप सांगितलेले असते. नंतर पूर्वोत्तरपक्ष देऊन उत्तरपक्ष, निष्कर्ष व संगती दाखविलेली असते. अधिकरणे बनविण्यासाठी सूत्रांचे गट करताना निरनिराळ्या भाष्यकारांचे एकमत झालेले नाही. क्वचित सूत्रपाठात सुद्धा मतभेद आढळतो. शांकरपाठात सूत्रसंख्या ५५५ आणि अधिकरणे १९२ आहेत.
ब्रह्मसूत्रांवर अनेक व्याख्या, भाष्ये, टीका आणि वृत्ती आहेत. उपलब्ध व्याख्यांत ⇨ शंकराचार्य (७८८ – ८२०) यांचे भाष्य सर्वांत जुने होय. त्यांच्या आधी सु. १५० वर्षांपूर्वी भर्तृप्रपंचाने एक द्वैताद्वैतपर भाष्य लिहिले होते, असे इतरत्र आलेल्या उल्लेखांवरून म्हणता येते. शंकराचार्यांच्या भाष्यानंतर झालेल्या उपलब्ध भाष्यांमध्ये ⇨ रामानुजाचार्य, ⇨ मध्वाचार्य, श्रीकंठाचार्य, श्रीपती आणि ⇨ वल्लभाचार्य यांची भाष्ये विशेष प्रसिद्ध आहे. ⇨ निंबार्काचार्यांचा वेदांतपारिजातसौरभ हा ⇨ द्वैताद्वैतवादी ग्रंथही प्रसिद्ध आहे. पण त्यास ब्रह्मसूत्रांवरील भाष्य म्हणण्याऐवजी व्याख्यान म्हणण्याचा प्रघात आहे.
निरनिराळ्या व्याख्याकारांनी आपापल्या संप्रदायाच्या पुष्ट्यर्थ ब्रह्मसूत्राचे अर्थ केवळ भिन्न भिन्न तऱ्हेने इतकेच नव्हे, तर एकमेकांस विरोधी अशा रीतीने लावले. म्हणून सूत्रकारांच्या मनात औपनिषद तत्त्वज्ञान म्हणून नेमके काय होते, असा प्रश्न पडला. सूत्रे इतकी ‘अल्पाक्षर’आहेत, की निव्वळ सूत्रे वाचून फारसा अर्थबोध होत नाही. म्हणून निरनिराळ्या भाष्यांची तुलना करून अनुमानाने ब्रह्मसूत्रकारांचा तात्त्विक विचार पुढीलप्रमाणे मांडता येईल :
जगाची उत्पत्ती दुसऱ्या कोणाच्याही साहाय्यावाचून आनंदमय चेतन ब्रह्मापासून होते अचेतन प्रकृतीपासून नाही. जगाची धारणा ब्रह्माकडून होते आणि त्याचा लयही ब्रह्मातच होतो. जीव ज्ञानस्वरूप असून तो ब्रह्माचा अंश आहे. (अ. २, पा. ३, सूत्र ५० या ठिकाणी मात्र जीवास ‘आभास’म्हटले आहे.) परमात्मा सर्व जीवांच्या अंतर्यामी राहतो. निरनिराळ्या उपासनांनी ब्रह्मज्ञान झाल्यावर जीव ब्रह्मलोकाला जातो व तेथून कधीच परत येत नाही.
पहा : ब्रह्म
संदर्भ : १. अभ्यंकर, वासुदेवशास्त्री, ब्रह्मसूत्र-शांकरभाष्य (मराठी भाषांतर), पुणे, १९५७.
२. शंकराचार्य वाचस्पतिमिश्र अमलानंद अप्पय्य दिक्षित, ब्रह्मसूत्रशांकरभाष्यम् भामतीकल्पतरुपरिमलोपेतम्, निर्णयसागर प्रत, मुंबई, १९१७.
दीक्षित, श्री. ह.