ब्रह्मदेव : हिंदू देवतांच्या विख्यात त्रिमूर्तीमधील पहिला देव. जगाच्या निर्मितीचा देव म्हणून त्रिमूर्तीमध्ये त्याचा क्रम पहिला असला, तरी माहात्म्य व संप्रदायाची व्यपकता या दृष्टींनी त्याचे स्थान शेवटचे आहे. त्याला ब्रह्मा, प्रजापती, पितामह, स्वयंभू, अब्जभू, चतुरानन, विरंची, हिरण्यगर्भ, विधी, सुरज्येष्ठ, परमेष्ठी इ. नावे असून त्यांवरून त्याची विविध वैशिष्टये स्पष्ट होतात.
‘बृह’ वा ‘बृंह्’ (वाढणे, विस्तारणे) या संस्कृत धातूपासून ‘ब्रह्मन्’ हा शब्द बनला असून ऋग्वेदात नपुसंकलिंगी ब्रह्म शब्दाचा अर्थ मंत्र असा आहे. नपुंसकलिंगी ‘ब्रह्मन्’ (ब्रह्म) शब्दाचा अर्थ उपनिषदात जगाचे मूळ कारण असा असून पुल्लिंगी ‘ब्रह्मन्’ (ब्रह्मा) शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव असा आहे. ऋग्वेद ९.९६.६ मध्ये ‘ब्रह्मा’ असा निर्देश आला आहे परंतु त्याचा अर्थ संदिग्ध आहे. वैदिक काळात विश्वकर्मा, प्रजापती इ. देवता या निर्मिती करणाऱअया मानल्या आहेत. ब्राह्मणकाळातील प्रजापतीचेच पुराणकाळात ब्रह्मदेवामध्ये रूपांतर झाले.
ब्रह्म = परमात्मा असा अर्थ धरून ब्रह्मा, विष्णू व महेश ही तीनही रूपे त्यानेच घेतली, असे अद्वैतवाद्यांचे मत आहे.⇨अवतार ही संकल्पना प्रारंभी प्रजापतीच्या म्हणजेच ब्रह्मदेवाच्या संदर्भातच निर्माण झाली. कारण सध्या विष्णूचे म्हणून सांगितले जाणारे मत्सय, कच्छप व वराह हे तीन अवतार प्रजापतीचे असल्याची वर्णने ब्राह्मणग्रंथांतून आढळतात. घर बांधण्याच्या वेळी ब्रह्मा पूज्य असतो, प्राचीन काळी नगराच्या मुख्य द्वाराला त्याचे नाव देत, वास्तुमंडलात त्याचे स्थान मध्यभागी असे इ. प्रकारे तारापद भट्टाचार्य यांनी त्याचे महत्त्व दर्शविले आहे. सर्व वैदिक वाङमय, इतिहास-पुराणे, नाटयवेद इत्यादींची निर्मिती त्याने केली, असे निर्देश आढळतात. त्याने वास्तुशास्त्र व दंडनीतीवरचे ग्रंथ लिहिल्याचेही निर्देश आहेत. वाल्मीकीला रामायण व व्यासाला महाभारत लिहिण्याची प्रेरणा त्यानेच दिली. अनेक भारतीय लिपींची जननी असलेली ब्रह्मी लिपीही त्याने निर्माण केली, असे म्हटले आहे. अथर्वन् व नारद यांना विद्या देणारा आचार्य म्हणून उपनिषदांनी त्याचा निर्देश केला आहे.
अपूज्य ठरून मागे पडला, असे एक मत आढते. वैष्णवांनी व शैवांनी त्याला गौण लेखणाऱ्या कथा हेतुपुरस्पर लिहिल्या. उदा., तो विष्णूच्या नाभिकमलातून जन्मला, रूद्राने त्याचे पाचवे मस्तक तोडले इत्यादी. सरस्वती ही त्याची कन्या असून तीच त्याची पत्नीही आहे. ब्रह्मा म्हणजे सूर्य व सरस्वती म्हणजे उषा, असे या पुराणकथेचे प्रतीकात्मक स्पष्टीकरण दिले जाते. सरस्वतीलाच शतरूपा, सावित्री, ब्रह्माणी इ. नावे असून गायत्री ही त्याची दुसरी पत्नी म्हटली जाते. स्वायंभुव मनू हा ब्रह्मदेव व सरस्वती यांचा पुत्र होय. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्तय, पुलह, ऋतू, दक्ष, भृगू व वसिष्ठ हे त्याचे मानसपुत्र असून त्यांनाही प्रजापती म्हटले जाते. त्याने सर्व प्रजा निर्मिली असल्यामुळे ब्रह्माला पितामह (आजोबा) म्हणतात. सनक, सनंदन, सनातन व सनत्कुमार हेरी त्याचे मानसपुत्र होत.
मन्वंतर,⇨कल्प,⇨युग इ. पौराणिक कालसंकल्पना या ब्रह्मदेवाच्या आयुर्मानाशी निगडित आहेत. त्याच्या शंभर वर्षांच्या आयुष्याची कालगणना प्रचंड संख्यात्मक परिमाणाने गणतात. मानुष वर्ष = देवांचा १ दिवस देवांचे १ वर्ष = ब्रह्मदेवाचा १ दिवस या प्रमाणात ब्रह्मदेवाची शंभर वर्षे मोजतात. सध्या त्याचे एक्कावनावे वर्ष चालू आहे. त्याची रात्र सुरू झाल्यावर नैमित्तिक प्रलय व त्याचे आयुष्य संपल्यावर महाप्रलय [= प्रलय] घडून येतो.
पद्मपुराणात त्याच्या १०८ स्थानांचा व महाभारताच्या वनपर्वात त्याच्या अनेक तीर्थस्थानांचा निर्देश आहे. परंतु सध्या भारतात त्याची अत्यंत कमी स्थाने व मंदिरे आहेत. अजमेरजवळचे पुष्कर हे स्थान फार पूर्वीपासून त्याचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. याखेरीज खेडब्रह्म (गुजरात), वसंतगड (राजस्थान), महाबलीपुर, ईडर, दुधई, कार्माली (गोवा) इ. स्थानी त्याची मंदिरे आहेत. मद्रास व मथुरेची वस्तुसंग्रहालये आणि मंगळवेढे येथे त्याच्या मूर्ती आहेत. मध्य आशिया, चीन, इंडोनेशिया, ब्रह्मदेशा, जावा इ. ठिकाणी त्याच्या मूर्ती व चित्रे सापडली आहेत. बौद्ध धर्मात प्रसन्नतारा, दशभुजसित मारीची इ. देवता त्याला तुडवत असल्याचे मानले आहे. त्याला बुद्धाचा सेवक व मार असेही मानले आहे. जैन धर्मात त्याला तीर्थंकर वा दिकपाल मानले आहे.
तारापद भट्टाचार्यांनी ब्रह्मदेवाविषयी पुढील मते मांडले आहेत : शैव व वैष्णव संप्रदायांप्रमाणे पूर्वी ब्रह्मदेवाचाही संप्रदाय होता, असुर हे त्याचे उपासक होते⇨पांचरात्र पंथ मूळचा ब्रह्मदेवाचा होता, महाभारताचे शांतिपर्व व गीता हे ग्रंथ मूळचे ब्रह्मदेवाच्या संप्रदाचाचे होते, ब्रह्मदेवाच्या संप्रदायाशी समान असे संप्रदाय ग्रीस, ईजिप्त,इराण इ. ठिकाणी होते, जैनांचा पहिला तीर्थंकर नाभिराजपुत्र आदिनाथ हा ब्रह्मा असावा, बौद्ध धर्माचा उदय ब्रह्माच्या संप्रदायातून झाला असावा इत्यादी.
त्याची मूर्ती कशी असावी, याविषयी मत्स्यादी पुराणांतून व रूपमंडननादी ग्रंथातून बरीच माहिती मिळते. लालवर्ण, चार मुखे, चार बाहू, दाढी आणि हंस वा कमळ हे वाहन असे सामान्यतः त्याचे स्वरूप असते. तो ब्रह्मलोकात राहतो, तो निर्मितीचा देव असल्यामुळे तो रजोगुणी आहे, तो सुवर्णाच्या अंड्यातून जन्मला, तो प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर तिचे नशीब लिहितो, त्याने रावणादी राक्षसांना वर दिले, त्याच्या इच्छेतून निर्माण झालेल्या अंड्यामधून ब्रह्मांडाची म्हणजेच विश्वाची निर्मिती झाली इ. कल्पना पुराणांत आढळतात.
संदर्भ : Bhattacharya, Tarapada, The Cult of Brahma, Patna, 1957.
साळुंखे, आ. ह.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..