ब्रह्म : भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. ‘ब्रह्म’ हा शब्द ऋग्वेदात अनेक वेळा आला आहे. सुरूवातीस त्याचे अर्थ ‘मंत्र’, ‘देवतास्तवन’, ‘प्रार्थना’, ‘मंत्राच्या ठिकाणी असलेले दिव्य अद्भु’त सामर्थ्य’, ‘गूढ शक्ती’ अशा तऱ्हेचे होते. उपनिषत्काली त्याच्या अर्थाचा आणखी विकास होऊन तो ‘विश्व आद्य कारण’, ‘पर तत्त्व’, ‘अनुभवास येणाऱ्या क्षर विश्वाच्या विविधतेच्या उगमस्थानी असणारे अक्षर तत्त्व’ अशा प्रकारचा झाला. हा अर्थ मनात आणून बृह = वाढणे, मोठे होणे या धातूपासून ब्रह्म शब्दाची व्युत्पत्ती दिली जाते. जे सतत वाढतच राहते, ज्याला मर्यादा नाही, अत्यंत व्यापक असे जे काही ते ब्रह्म असे त्या व्युत्पत्तीने सुचवावयाचे आहे. त्या शब्दाच्या अरथा्च्या विकासातील कोणत्याही अवस्थेत पावित्र्य आणि गूढता ही दोन्हीही येतात. अन्न, प्राण, वायू, आकाश, प्रणव इ. ब्रह्माची विविध प्रतीके उपनिषदांत सांगितलेले आहेत. त्या सर्वांत⇨ओम हे अक्षर ब्रह्मप्रतीक म्हणून महत्त्वाचे आहे. त्या अक्षरात ‘अ’, ‘उ’ आणि ‘म्’ अशा तीन मात्रा असून त्या अनुक्रमे आत्म्याचे (= ब्रह्माचे) जागरित स्थान, स्वप्नस्थान व सुषुतस्थान यांचा निर्देश करतात आणि या तिन्ही अवस्थांपलीकडच्या निर्गुण ब्रह्माचा निर्देश सबंध ओंकाराने होतो, असे मांडूक्योपनिषदात सांगितले आहे.
ब्रह्म निर्गुण आहे, असा एक विचार उपनिषदांत जागोजागी दिसतो. बृहदारण्यकात (२.३.६) ब्रह्मासंबंधी ‘ते असे नाही, ते असे नाही’ (नेति, नेति) अशी नकारार्थी भाषा वापरली आहे. निर्गुणता सांगण्याकरिता कधी ‘ते स्थूल नाही, सूक्ष्म नाही, ऱ्हस्व नाही, दीर्घ नाही’ (बृहदारण्यक ३.८.८) अशा तऱ्हेची वाक्यरचना करून विशेषणे नाकारलेली असतात, तर कधी ‘ते अणूपेक्षाही लहान व मोठ्यापेक्षाही मोठे आहे’ असे सांगून परस्पर विरोधी विशेषणे ब्रह्मास दिलेली असतात. जेथे न पोहोचताच वाणी आणि मन परत येतात ते ब्रह्म (तैत्तिरीय २.४.१) अशा तऱ्हेने स्पष्टपणे ब्रह्माची निर्गुणता सांगणारे उल्लेखही आहेत. याच्या उलट, ‘त्याची श्रेष्ठ शक्ती विविध प्रकारची आहे, त्याचे ज्ञान आणि बल यांची क्रिया त्याला स्वाभाविकच आहे’ (श्वेताश्वतर ६.८), ‘तो भूक नसलेला, तृष्णा नसलेला, सत्यकाम, सत्यसंकल्प आहे’ (छांदोग्य ८.७.३) अशा तऱ्हेची ब्रह्माचे गुण सांगणारी वचनेही उपनिषदांत आहेत.
ब्रह्माचे सगुणत्व आणि निर्गुणत्व अशी दोन्हीही सांगणारी वाक्ये ज्याप्रमाणे उपनिषदांत आहेत त्याचप्रमाणे ब्रह्म निष्प्रपंच, निष्क्रिय, अविकारी, अमृत आहे असे सांगून त्याजबरोबर ब्रह्माकडे जगत्कर्तृत्व व जगाचे संचालकत्व देणारी वाक्येही उपनिषदांत आहेत. आणखी दिसून येणारा एक विरोध असा : ‘हे सर्व ब्रह्म आहे’, ‘हा आत्मा ब्रह्म आहे’, ‘ते एकच आहे, अद्वितीय आहे’, ‘तू ते आहेस’, येथे कोठल्याही तऱ्हेचे नानात्व नाही अशा रीतीने जाव व ब्रह्म (तसेच जग व ब्रह्म) यांचे संपूर्ण अद्वैत सांगून प्रसंगी, ‘ठिणग्या जशा अग्नीचा अंश तसा जीव ब्रह्माचा अंश आहे’ असे म्हटले आहे. या दुसऱ्या प्रकारच्या विधानात जीव आणि ब्रह्म नसलेले असे आहे, ही एक संकल्पना व ते शुभगुणयुक्त, जग उत्पन्न करणारे आणि जीवांच्या अंतर्यामी असलेले (पण सर्वस्वी एकरूप नसलेले) असे आहे, ही दुसरी संकल्पना.उपनिषदांची रचना भिन्नभिन्न ऋषींनी वेगवेगळ्या काली केली, ही ऐतिहासिक दृष्टी पतकरल्यास त्या ठिकाणी ब्रह्मासंबंधी विभिन्न कल्पना आढळण्यात काही चमत्कारिक वाटणार नाही. पण श्रुतिप्रामाण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनातून पाहिल्यास उपनिषदे ‘श्रुती’ असल्याने त्यांच्यातून एकच एक सुसंगत अर्थ काढता आला पाहिजे. श्रुति-श्रुतींमध्ये वस्तुसत्याबद्दल विरोध असल्यास कोणती तरी एक श्रुती प्रमाण व दुसरी अप्रमाण मानावी लागेल. कोणती श्रुती प्रमाण व कोणती अप्रमाण हे ठरविता येत नाही. दोन्ही प्रमाण मानल्यास अविरोध सिद्ध करणे आवश्यक होते. अविरोध सिद्ध करताना भिन्नभिन्न वेदान्त संप्रदाय निर्माण झाले.
श्रुतिप्रामाण्याची दृष्टी पतकरून⇨शंकराचार्य (७८८-८२०) यांनी असा पक्ष घेतला, की निर्गुण ब्रह्म हेच खरे अंतिम तत्त्व अथवा पर ब्रह्म होय. त्याचे ज्ञान ही परा (श्रेष्ठ) विद्या होय. सगुणत्व सांगणारी वर्णने अपर (गौण) ब्रह्माची होत. त्यांचे ज्ञान ही अपरा विद्या होय. सगुण ब्रह्म, अपर ब्रह्म, ईश्वर हे शांकर तत्त्वज्ञानात एकमेकांचे पर्याय होत. माया अथवा अविद्या या उपाधीने उपहित असलेले पर ब्रह्म म्हणजेच ईश्वर होय. ईश्वर अथवा सगुण ब्रह्म हे उपासनेला उपयोगी पडते. उपासनेमुळे चित्तशुद्ध होऊन मागाहून क्रमाक्रमाने निर्गुण ब्रह्माचे साक्षात ज्ञान होऊन⇨मोक्ष मिळतो.
पण उपनिषदांत जेव्हा ब्रह्माची ‘सर्व कर्मा, सर्व कामः, सर्वगंधः, सर्वरसः’ (छादोग्य ३.१४.२) अशासारखी वर्णने येतात तेव्हा ती पर ब्रह्माची नसून अवांतर रीत्या उपयोगी असलेल्या अपर ब्रह्माची आहेत, असे सुचविणारा पुरावा त्या ठिकाणी काहीच उपलब्ध नाही. असली वर्णने⇨रामानुजाचार्यानी आणि इतरही आचार्यांनी ब्रह्मचे वास्तविक स्वरूप प्रतिपादणारी म्हणूनच घेतली. ब्रह्म निर्गुण आहे असे सांगणाऱ्या वाक्यांचा अर्थ त्यांनी ब्रह्म सर्व त्याज्य गुणांनी रहित आहे असा केला. अर्थ लावण्याच्या त्यांच्या रीतीप्रमाणे ब्रह्म अनंत-कल्याण-गुणांनी युक्त आहे. तसेच सर्वार्थाने जगाचे कर्तृत्व ब्रह्माकडेच आहे आणि ब्रह्म जीवांचा शास्ता आणि नियामक असल्याने, जीवाचे त्याच्याशी काही सारूप्य असले तरी तादात्मय नाही.
पहा : कैवलाद्वैतवाद
संदर्भ : Radhakrishnan, S. and Others, Ed. History of Philosophy, Eastern and Western, Vol. I, London, 1952.
दीक्षित, श्री. ह.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..