ब्रज साहित्य : वररुचीच्या मते प्राकृतचे मुख्य प्रकार दोन आहेत : महाराष्ट्री आणि शौरसेनी. शौरसेनीचाही मूलाधार संस्कृत आहे आणि पैशाची व मागधी हे तिचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत. शौरसेनी प्राकृतचा विकास पश्चिमेकडे ‘पश्चिमी अपभ्रंश’ आणि पूर्वेकडे (मागधी व अर्धमागधीच्या जागी) ‘पूर्वी अपभ्रंशा’च्या रूपात झाला. [→ शौरसेनी भाषा शौरसेनी साहित्य]. या अपभ्रंशांची परिणती अनुक्रमे ‘ब्रज भाषा’ आणि ‘ब्रजबुली/बोली’ यांमध्ये पाहता येते. योगायोगाने यांच्या भरभराटीस अनुक्रमे जैन आणि बौद्ध धर्माचा फार मोठा हातभार लागला. शौरसेनीच्या ह्या दोन्ही रूपांनी एकत्र येऊन ‘हिंदी’ ही संज्ञा प्राप्त करून घेतली. तथापि त्यांना ‘पश्चिमी भाषा’ आणि ‘पूर्वी भाषा’ असेही संबोधिले गेले आणि कितीतरी विद्वानांनी ‘पश्चिमी भाषे’ला अथवा ‘ब्रज भाषे’लाच ‘टकसाली हिंदी’ मानण्याचा आग्रह धरला. त्यांच्या मते ‘हिंदी बोली’ची दोन रूपे आहेत : पश्चिमी आणी पूर्वी परंतु पश्चिमी बोली समृद्ध आणि विकसित होऊन ‘भाषा’ बनू शकली. पूर्वी बोलीचा विकास अतिशय मर्यादित आहे – केवळ लोकसाहित्यपुरताच ती प्रतिष्ठित बनली ब्रज भाषेचे आदिरूप नाथपंथीयांच्या रचनांमधून आढळते. ⇨गोरखनाथ (सु. नववे-दहावे शतक) यांच्या गोरखयानीमध्ये विद्वानांनी ब्रज भाषेची उदाहरणे दाखविली आहेत. नाथपंथीयांचा वैचारिक वारसा संतांना मिळाला, त्यांच्या कवितेत ब्रज भाषेचे चालू रूप आहे. ‘मेरी बोली परबी’ असे म्हणणाऱ्या कबीरांच्या पदांची व साख्यांची आधारशिलाही ब्रज भाषाच आहे. अर्थात पाठभेदांमधून प्रादेशिक प्रभावांची माहिती मिळते. काही काही ठिकाणी तर शुद्ध पंजाबी प्रभाव उसळून पुढे येतो. सूरदासांच्या पूर्वी पश्चिमी हिंदीची दोन रूपे होती : डिंगल आणि पिंगल. डिंगल ही वीरकाव्याची भाषा होती. तिची छाप गुजराती, राजस्थानी आणि पंजाबीवर पडलेली आहे. डिंगलचा विकास साहित्यिक पश्चिमी अपभ्रंशापासून झाला. ⇨चंद बरदाई (बारावे ते सोळावे शतक) रचित ⇨पृथ्वीराज रासोखेरीज मुलतानीमध्ये लिहिले गेलेले संदेसरासक आणि गुजरातमध्ये निर्माण झालेले कान्हडदे प्रबंध यांना याच डिंगलचे प्रतिनिधी मानले पाहिजे. प्रबंध चिंतामणीमध्ये संगृहीत अनेक पद्यांची भाषा डिंगल व अपभ्रंश यांचे संमिश्र रूप आहे.

पिंगल साहित्याचा विकास ब्रज भाषेतून झाला. रासो-काव्य डिंगल मध्ये असूनदेखील पिंगलने युक्त आहे. नाथपंथीयांनी आणि संतांनी जनतेपर्यंत पोचण्याकरिता पिंगलच्या याच रूपाचा अवलंब केला. गोरखनाथ आदिम अवस्थेचे रचनाकार आहेत परंतु कबीरांच्या भाषेची आधारशिला ब्रज भाषाच आहे. ‘पूर्वी’शी मधूनमधून युक्त राहूनदेखील संतांनी सामान्यपणे ब्रज भाषेचाच अवलंब केलेला आहे. गुरू ग्रंथसाहिबात प्राचीन कवींची जी पदे संगृहीत आहेत त्यांमध्ये जयदेव, नामदेव, कबीर इ. संतांची तसेच खुद्द नानकादी गुरूंची भाषाही ब्रज भाषा आहे. सूरदासांच्या आधी हिंदी भाषेची ब्रज भाषेतर रूपे भरभराटीला येत होती. त्यांमध्ये⇨अमीर खुसरौ (१२५४-१३२५) याने ब्रज भाषेच्या बरोबरच खडी बोलीमध्येही रचना केली,⇨विद्यापतींची मुख्य भाषा ब्रजबुली आणि अपभ्रंश आहे, सिद्धांनी अपभ्रंशाच्या पूर्वेकडील रूपाचा आणि तज्जन्य हिंदीच्या छटेचा अवलंब केला. काही काळपर्यंत सूफी कवींमध्ये पूर्वेकडील भाषेचे अवधी रूप पुढे येऊ शकले. त्यामुळे एकीकडे आराकान विभागापर्यंत हिदी कवितेची प्रतिष्ठापना केली गेली आणि दुसरीकडे तुलसीदासांच्या रामचरितमानसाकरिता आधारभूमी तयार केली. [→ अपभ्रंश भाषा अपभ्रंश साहित्य].

अष्टक (अष्टछाप) : परकीयांच्या अव्याहत आक्रमणांपूर्वी समाजाला मनोबल व आत्मबल मिळवून देणारे पहिले दोन आचार्य –शंकराचार्य आणि रामानुजाचार्य – यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम संस्कृत भाषा होती. या आचार्यांचा प्रभाव प्रादेशिक भाषांतील कवींवर देखील मोजक्या प्रमाणात आढळतो. परंतु ब्रज भाषेला स्थायी रूपात प्रतिष्ठित करणारे⇨वल्ल्भाचार्य (१४७९-१५३१) होत. काशीमध्ये शिक्षण व दीक्षा घेतल्यावर आणि चिंतन-मनन केल्यावर वल्ल्भाचार्यांनी ब्रज हे आपले केंद्र ठेवले आणि गोवर्धन पर्वतावर श्रीनाथजींच्या उपासनेच्या माध्यमातून ब्रज संस्कृतीला समृद्ध केले. ब्रज संस्कृती, ब्रज भाषा, ब्रज संगीत, ब्रज कला इत्यादींवर कृष्णभक्तीची आणि वल्लभ संप्रदायाची [→ पुष्टिमार्ग]  स्थायी छाप आङे. १५२३ मध्ये सूरदासांनी वल्ल्भाचार्यांकडून दीक्षा घेतली. काही काळ गेल्यावर इतर तीन कवी (कुंभनदास, परमानंददास आणि कृष्णदास) देखील संप्रदायात प्रविष्ट झाले. वल्लभाचार्यांनंतर त्यांचे पुत्र विठ्ठल हे संप्रदायाच्या गादीवर बसले. पित्याच्या कार्याला पुढे नेण्यासाठी त्यांनी १५४५ मध्ये वरील चार कवींबरोबर आपल्या चार शिष्यांना (गोविंदस्वामी,⇨नंददास, छीतस्वामी आणि चतुर्भुजदास) जोडून कवींचे अष्टक स्थापन केले. या सुसूत्र प्रयत्न्मुळे संप्रदायाला स्थैर्य प्राप्त झाले तसेच ब्रज भाषासाहित्याचा अजस्त्र स्त्रोत गोचर होऊ लागला. सामान्यतः कवींना व कलावंतांना राज्यकर्त्याचे संरक्षण मिळते, पण परकीय संस्कृतीच्या राजवटीत वल्लभ संप्रदायाच्या आचार्यांनी साहित्यकलांना संरक्षण देऊन संस्कृतीच्या प्रसारात व प्रचारात अपूर्व कार्य केले. [→ अष्टछाप कवि].

ब्रज भाषेच्या कवींमध्ये सूरदास सर्वप्रथम आणि सर्वश्रेष्ठ आहेत. प्राचीन समीक्षकांच्या मते सूरदास हे साहित्यगगनातील सूर्य आणि तुलसीदास हे चंद्र आहेत. सूरदासांच्या काव्यात ब्रज भाषेच्या लोकछटेचे चारूत्व आहे. एक प्रकारचे सहजसौंदर्य आहे.पंडिती परंपरेतील काव्यामध्ये ते आढळता नाही. सूरसारावलि आणि साहित्य लहरी यादेखील सूरदासांच्याच कृती मानल्या जातात तथापि सूरदासांच्या कीर्तीचा मेरुमणी सूर-सागर हाच आहे. परंपरेनुसार यात एक लाख पदे होती असे मानले जाते परंतु आतापर्यंत केवळ काही हजार पदेच उपलब्ध झालेली आहेत. गुरूच्या आज्ञेने सूरदास श्रीनाथजींच्या सेवेत गढून गेले. ते तन्मय अवस्थेत जी पदरचना करीत, तिचा संग्रह सूर सागर नावाने प्रसिद्ध झाला. या ग्रंथाचा आधार भागवत आहे. हे कथाकाव्य नाही, तरीदेखील यात प्रच्छन्नपणे कथेचे सूत्र आहे. सूरदासांच्या कलेचे सर्वांत अधिक सौंदर्य भ्रमरगीताच्या प्रसंगी खुलले आहे. वल्लभदर्शन संकल्पनेपासून पूर्णपणे मुक्त’. यामध्ये मायेच्या जागी लीलेला महत्त्व देऊन भावसाधनेवर भर दिलेला आहे. भावसाधना म्हणजे अनन्य भावाने आपल्या समस्त भावनांना कृष्णार्पित करणे. गीतेचे निष्काम कर्म येथे ‘निष्काम भाव’ बनते. वात्सल्याची जशी चित्रे सूरदासांच्या ठिकाणी आढळतात, तशी इतर कोणत्याही कवीत त्यांच्या आधीही आढळली नव्हती. अंध कवी सूरदासांची रचना काव्य आणि संगीत दोन्ही दृष्टींनी अपूर्व आहे. [→ सूरदास].


अष्टछापातील इतर सात कवींमध्ये परमानंददास आणि नंददास यांना विशेष प्रसिद्धी लाभलेली आहे. अष्टछापाच्या बाहेरही वल्लभ संप्रदायाचे इतर कवी होते. त्यांच्या अप्रकाशित रचना उपलब्ध झाल्या आहेत. ब्रजमधील इतर भक्तिसंप्रदायांतही साहित्य आणि कलाविषयक या प्रकारची अभिरूची चालत आलेली आहे. हित हरिवंशप्रणित⇨राधावल्लभ पंथाचे नाव या संदर्भात घेणे आवश्यक आहे. या पंथाचा प्रभाव उत्तरकालीन कवींवरदेखील आढळतो. यांमध्ये रीतिकाळीतील⇨बिहारी (सु. १५९५-१६६२) आणि आधुनिक काळातील⇨भारतेंदू हरिशचंद्र यांचे नाव सर्वतोमुखी आहे.⇨निंबार्क (सु. अकरावे शतक) यांचा संप्रदाय [→ द्वैताद्वैतवाद] आणि⇨चैतन्य संप्रदाय यांनीसुद्ध ब्रज भाषेच्या काव्याला गौरवपूर्ण स्थान मिळवून दिलेले आहे. परंतु वल्लभ संप्रदायाने ब्रजमधील साहित्य, संस्कृती आणि कला यांना जी व्यापकता आणि उत्तुंगता दिली, ती बाकीच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्‍नांपेक्षाही अधिक आहे, हे निर्विवाद. केवळ सूर-सागर देखील एक असे एकमेव भांडार आहे, की त्यामध्ये बुडी घेणारा प्रत्येक वाचक प्रत्येक वेळी नवीन रत्‍ने घेऊन बाहेर पडतो.

संप्रदायमुक्त कवी : संप्रदायांच्या बाहेर राहून ज्या कवींनी ब्रज भाषेला समृद्ध केले त्यांमध्ये तुलसीदास, मीराबाई, रसखान, रहीम, सेनापती इत्यादींची नावे अतिशय विख्यात आहेत. तुलसीदासांच्या प्रसिद्धीचा आधार असलेले रामचरितमानस म्हणजे वाङमयीन अवधी भाषेची सर्वोत्कृष्ट रचना आहे. हे महाकाव्य लिहून तुलसीदासांनी रामकथेसाठी इतर भाषाशैलींचाही अवलंब केला. त्यांच्या कवितावलि आणि गीतावलि या ब्रज भाषेच्या कृती आहेत. परंतु सर्वांत अधिक प्रसिद्धी त्यांच्या विनयपत्रिकेची आहे. तिला अनेक समीक्षक रामचरितमानसच्या तोडीची रचना मानतात. शुद्ध भक्तीचे प्रतिपादन करणाऱ्या काव्याच्या दृष्टीने विनयपत्रिका हा त्या युगाची सर्वश्रेष्ठ रचना आहे. विनयपत्रिकेची भाषा ही वाङमयीन ब्रज भाषा आहे. हा स्वतंत्र पदांचा सुव्यवस्थित संग्रह आहे. यामध्ये तुलसीदासांचे दार्शनिक व्यक्तिमत्व उचंबळून आलेले आहे. [→ तुलसीदास रामचरितमानस]. 

राजाची राणी होऊनदेखील मीराबाई भक्तीमध्ये इतकी रंगून गेली, की तिने घरादारचा त्याग केला आणि संतसहवासात ती आपला पूर्ण वेळ घालवू लागली. तिच्या ब्रज भाषेत राजस्थानी आणि गुजरातीची अशी छटा आहे, की तिला सहजच राजस्थानी किंवा गुजराती मानले जाणे शक्य आहे. मीरेचे उपास्य दैवत श्रीकृष्ण होते आणि ती त्यास आपला पती मानून त्याची उपासना करीत असे. राजपरिवाराने तरुण विधवा मीरेचे आचरण निंद्य मानले. तिचा अनेक प्रकारे छळ करण्यात आला. परंतु मीरा प्रेमदिवानी होती. तिला सारे जग कृष्णमयच दिसत होते. स्त्रीच्या हृदयाची स्वभाविक अनुभूती असल्यामुळे मीरेची वेदना अत्यंत मर्मग्राही आहे. आधुनिक समीक्षकांनी मीरा आणि⇨आंडळ यांच्या वेदनानुभूतीत साम्य दाखविले आहे. मीरेची पदे आजसुद्धा जनतेच्या मुखी घोळत आहेत. [→ मीराबाई].रसखान आणि रहीम हे दोघे धर्माने मुसलमान होते परंतु त्यांच्यावर भारतीय संस्कृतीची आणि भक्तीची अशी छाप होती, की ते उच्च कोटीच्या हिंदू भक्तांनादेखील अनुकरणीय बनून राहिले आहेत. रसखान ब्रज भाषेच्या माधुर्यावर आणि ब्रज जीवनाच्या अकृत्रिमतेवर लुब्ध होते. श्रीकृष्णाच्या माधुरीत त्यांना आपल्या जीवनाचे ध्येय गवसले होते. सवैया छंदात आपले हृदय ओतून त्यांनी त्याला नवी झळाली प्राप्त करून दिली आङे. त्यांच्या सवैयांमधून सर्वत्र ब्रजभूमी, ब्रजराज आणि ब्रज भाषा यांविषयी अनन्यता भरून राहिलेली आहे. [→ रसखान].

रहीम (अब्दुल रहीम खानखाना) हे अकबराचे सेनापती होते तसेच उच्च कोटीचे भक्त आणि भाविकही होते. तुलसीदासांशी त्यांचे सौहार्द होते. सांप्रदायिक पदरचना आणि भक्तिभावी सवैयारचना यांपासून दूर जाऊन रहीम यांनी ब्रज भाषेत नीतिपर दोह्यांची निर्मिती केली. यांमध्ये संस्कृतीचा आधार असलेले पुराणेतिहासांतील समस्त संदर्भ भारतीय जीवनातून आलेले आहेत. त्यांतील मार्मिकतेमुळे त्यांचे दोहे आजही ब्रज भाषेच्या नीतिकाव्यांत सर्वश्रेष्ठ मानले जातात. रहीम यांनी आपल्या काव्यात जे दृष्टांत घेतले आहेत, ते सर्व  रचना उपलब्ध आहे. दुसरी रचना ध्रुव-चरित हिचा उल्लेख तेवढा मिळतो. सुदामा-चरित हे दोहा, सवैया, कवित्त या छंदांत लिहिलेले लहानसे खंडकाव्य आहे. त्यातील मार्मिकतेसाठी ते अतिशय प्रसिद्ध आहे. सुदामा-चरित देशातील अनेक भाषांत रचले गेले आहे तथापि नरोत्तमांची ही रचना अकृत्रिमता आणि संवेद्यता यांमुळे सूरदासांच्या काव्याच्या पातळीवर पोहोचते. [→ नरोत्तम दास].

सेनापतींचे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत : कवित्तरत्नाकर आणि काव्यकल्पद्रुम. कवित्तरत्नाकर प्रकाशितही झालेला आहे. हा संग्रह कवित्त, सवैया छंदांमुळे आणि शब्दालंकारांमुळे (विशेषतः यमक आणि श्लेष) प्रसिद्ध आहे. त्यांत चमत्कृती आहे, सहजता नाही प्रभावनिर्मितीची शक्ती आहे, मार्मिकता नाही. ऋतुवर्णनसंबंधीच्या छंदांत मात्र वर्णनाचा सच्चेपणा आणि वर्णनीयाची मनोरमता आहे. [→ सेनापति].

राजदरबारातील साहित्य : ब्रज भाषेच्या केंद्रात परकीय सत्तेची मुळे खोलवर रुजली होती. मोगल सत्ता स्थिरावली होती. अकबराने राज्यव्यवस्थेत सुधारणा केली. तो भारतीय बनून भारतीय जीवनात रस घेऊ लागला. भक्तीने साहित्यात आणि संगीतात प्राण फुंकला होता. तिचे निनाद दरबारतही उमटले. स्वामी हरिदासांच्या समोर श्रोता बनून अकबरसुद्धा हजर झाला होता. रसखान आणि रहीमसारखे राजपुरुष दरबार सोडून संस्कृतीत रमू लागले होते. तानसेनाने दरबार आणि साधना दोन्ही उत्म प्रकारे साधले. स्वतः अकबरानेदेखील ब्रज भाषेत कविता करीत आणि दरबारी लोक त्यांना कवी म्हणून मान्यताही देत. अशा दरबारी कवींत माहपात्र नरहरी बंदीजन, अखबराचे मंत्री महाराजा तोडरमल, वाकचातुर्यासाठी प्रसिद्ध असेलेले राजा बीरबल, दरवारी कवी गंग इत्यादींची नावे विख्यात आहेत. हे युग कवितेच्या क्षेत्रविस्ताराचे होते. कविता आणि संगीत श्रीकृष्णाच्या परिसरात इतके प्रतिष्ठित झाले होते, की शाही दरबारसुद्धा त्यांची नक्कल करू लागला. भक्तकवी व संगीतकार राजदरबारात जात नसत. उलट दरबारी लोक त्यांच्याजवळ शिकण्यासाठी आणि आस्वाद घेण्यासाठी येत आणि मग आपल्या दरबारात जाऊन त्याची नक्कल करण्याचा प्रयत्नम करीत.


पहिली आत्मकथा : अकबराच्या काळातील एका ब्रज भाषी कवीची चर्चा स्वतंत्रपणाने करणे आवश्यक आहे. बनारसीदासांचा जन्म १५८६ मध्ये झाला. त्यांनी अर्धकथानक नावाच्या पुस्तकात आपले ५५ वर्षांपर्यंतचे जीवनवृत्त लिहिले आहे. ते हिंदीतील पहिले आत्मचरित्र आहे. गुरू गोविंदसिंगांनी लिहिलेले विचित्र नाटक हे दुसरे आत्मचरित्र आहे. दोन्हीही ब्रज भाषेच्या पद्यात आहेत. अर्धकथानकात अकबराच्या अंतिम दिवसांचे, तसेच त्याच्या मृत्युनंतर जहांगीरच्या राज्यकारभाराचे चित्र आढळते. जन्मस्थान जौनपूरशिवाय आग्रा, दिल्ली, मीरत या शहरांशी कवीचा संबंध होता. आग्रा शहरात राहून त्याने आपला प्रपंच चालविला होता. मुक्तयोग्याच्या भूमिकेतून त्याने राज्यात घडणाऱ्या सुखदुःखाचे प्रभावशाली वास्तव वर्णन केले आहे. हिंदीचे मध्ययुगीन साहित्य परकीय राज्यकारभारापासून अलिप्त राहून रचले गेले होते. म्हणून त्यामध्ये राज्यकारभाराविषयीची माहिती केवळ अप्रत्यक्ष किंवा सूचित रूपानेच आढळते. साहित्याच्या अभावी सरकारी लेखकांच्या विवरणालाच बहुधा इतिहास मानले गेले आहे. अर्धकथानकासारखी रचना या अज्ञानांधःकारात मार्गदर्शक ठरू शकते.

उत्तर मध्ययुग : काव्य आणि कला दरबारात पोहोचल्यावर त्यांमध्ये दोन प्रकारांनी परिवर्तन झाले. पहिले म्हणजे भक्तीच्या अविचल स्थानावर कृत्रिमता किंवा दिखाऊपणाची प्रवृत्ती निर्माण झाली. यामध्ये साधना कमी परंतु तिचे कौतुक अधिक होते. दुसरे म्हणजे, दिव्य आणि समर्पणशील भावाच्या जागी ऐंद्रीय, भौतिक आणि वासनात्मक प्रेमाचा एकछत्री अंमल सुरू झाला. दरबारी कवींनी उपास्य आणि उपासक यांचे अवगुंठन घेतले आणि ते हरिलीलेच्या निमित्ताने कामक्रीडा करू लागले. किशनगढ शैलीच्या राधेचे चित्र पाहून सहजच नूरजहाँचा भास होऊ शकतो. जहांगीर आणि शाहजहान पृथ्वीवर स्वर्गाचा उपभोग घेत होते. राज्यकारभार हे कारस्थानांचे केंद्र बनले होते. दरबारी संस्कृतीची धाव मदिरा आणि मदिराक्षी यांच्यापर्यंतच होती. राज्यांचे केंद्र आग्रा हे होते आणि ते ब्रज संस्कृतीचेही केंद्र होते म्हणून भारतीय संस्कृतीवर विलासी राज्यकारभाराची सावली पडणे स्वाभाविकच होते. आग्र्याप्रमाणेच दिल्ली, जयपूर इ. उपकेंद्रे बनू लागली. मध्ययुगीन जीवनाचा हा शेवटचा टप्पा चंचलतेमध्ये घसरत गेलेला आहे. औरंगजेबाचा कर्मठपणाही त्या वातावरणाला बदलू शकला नाही. परिवर्तन झाले ते एवढेच, की काही काळानंतर संस्कृतीचे संरक्षण-संवर्धन दरबारातूनही नष्ट झाले आणि दिल्ली राजधानी झाल्यावर तिचा संबंध ब्रज संस्कृतीपासून कायमचा दुरावला. कवी आणि कलाकार विलासाकरितादेखील इकडेतिकडे लहान लहान राजांचा आणि नवाबांचा आश्रय शोधू लागले. मंदिरामध्ये परतून जाण्याचा तर प्रश्नच उद्‍भवत नव्हता. दोनशे वर्षांच्या (१६४३ ते १८४३) ब्रज साहित्याची कितीतरी वैशिष्टये आहेत. या युगात केवळ ब्रज भाषेत साहित्याची निर्मिती पुढे मान्यता मिळाली नाही. दुसले वैशिष्टय म्हणजे भक्तीच्या जागी शृंगार किंवा प्रतिक्रिया म्हणून वीररसाला काव्याचा विषय बनवणे किंवा नीतिविषयक साधीसुधी कविता लिहून जनतेला सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्नद करणे. तिसरे वैशिष्टय म्हणजे सहजस्फूर्त कवितेच्या जागी कृत्रिम कवितेचा खटाटोप करणे. बहुधा आपला वचक बसवण्यासाठी काव्यरचनेच्या जागी काव्यशास्त्राचे वर्णन करणे. बहुतेक कवी आश्रयदात्यांच्या शोधात असत आणि आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करून सामंतांचे मनोरंजन करीत. ज्यांना चांगला आश्रयदाता आणि स्थायी आश्रय मिळे, असे भाग्यशाली कवी फारच थोडे असत. एक प्रसिद्ध कवी देवदत्त तर एकामागून दुसऱ्या आश्रयदात्यापाशी हिंडत राहिले. केवळ बिहारीच तेवढे भाग्यशाली होते. त्यांना  औरंगजेबाचे सेनापती मिर्झा राजे जयसिंह यांचा स्थायी आश्रय आणि आयुष्यभर असामान्य मिळू शकला. बिहारी हे त्या युगाचे सर्वश्रेष्ठ प्रातिनिधिक कवी आहेत. मोगलांची सत्ता वाढत गेली, त्याचबरोबर त्यांच्यात आपापसांतील वैराचीही नांदी झडली. भावांची हत्या करून अथवा पित्याला कैदेत टाकून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सर्वस्व हरण करूनच नवा राज्यकर्ता गादीवर बसत होता. परिणामतः पंजाब, महाराष्ट्र आणि बुंदेलखंड येथे राष्ट्रीय संघटना मजबूत होऊ लागल्या. त्यांनी स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे देशाला परकीयांपासून मुक्त करण्याचे स्वप्न पाहिले आणि आपल्या राज्यव्यवस्थेला राष्ट्रीय स्तर प्राप्त करून दिला. या शक्तींनी ब्रज भाषेला अंगीकारले आणि वीरकाव्याला आश्रय दिला. वैष्णव भक्तीच्या जागी शैव भक्ती आणि शक्तीची उपासना लोकप्रिय झाली. प्राचीन पुराणेतिहासांचे अनुवाद करविले गेले. लोकसंस्कृतीचा विकास होऊ लागला. ब्रज संस्कृतीवर परकीय विलासाचा पडदा पडलेला होता. जे कृष्णकाव्य लिहिले गेले ते विलासी काव्य होते. म्हणून ब्रज भाषेचाच अंगीकार करून राम, शिव, शक्ती, हनुमान इ. दैवतांच्या आश्रयाने अधिक प्रभावी वीरकाव्याची रचना या काळात झाली. अशा साहित्याला मुख्यतः छत्रपती शिवाजी आणि गुरू गोविंदसिंग यांचे संरक्षण प्राप्त झाले होते.

तीन प्रकार : उत्तर मध्ययुगात तीन प्रकारचे साहित्य उपलब्ध होते : काव्यशास्त्रीय, प्रेमप्रधान व अभ्युत्थानपर, ब्रज भाषा हिंदीमध्ये पहिल्यांदाच काव्यशास्त्राविषयी शेकडो ग्रंथ लिहिले गेले. त्यांच्या लेखकांना ‘आचार्य कवी’ म्हटले गेले. हे ग्रंथ वस्तुतः मौलिकही नाहीत आणि संस्कृतचे केवळ अनुवादही नाहीत. वस्तुतः संस्कृतमध्ये ज्या प्रकारे ‘वालानां सुखबोधाय’ पुस्तके लिहिली जात होती, त्याच प्रकारे ब्रज भाषेच्या कवींनी संस्कृत न जाणणाऱअया नवयुवकांसाठी या ग्रंथांची निर्मिती केली होती. हे ग्रंथ ‘अल्पधियामपि’ सुखकारक असल्यामुळे त्यांना काव्य म्हटले जाते. त्यांत ‘लक्ष्य-लक्षण-समन्वय’ आहे यासाठी त्यांना शास्त्र म्हणता येते. आजच्या परिभाषेत ह्या शास्त्रीय रचना आहेत. विद्यार्थ्यांना वयोगटाप्रमाणे आणि धारणाशक्तीप्रमाणे अभ्यासक्रमात लावण्यास योग्य असे त्यांचे स्वरूप आहे. कवींनी दोहा छंदात लक्षण दिलेले आहे आणि मग दोहा, सवैया किंवा कवित्तमधअये त्याचे लक्ष्य (उदाहरण) वर्णन केले आहे. बहुतकरून उदाहरणे शृंगार अथवा विद्रोहस्वरूप वीररसाची आहेत भक्तिलकाची विरळच आहेत. ⇨भूषण कवीच्या दोन्ही भावांनी (चिंतामणी आणि⇨मतिराम) शृंगाराची उदाहरणे लिहिली, तर विद्रोही भूषणाने शिवाजीच्या पराक्रमापासून उदाहरणे लिहिली, तर विद्रोही भूषणाने शिवाजीच्या पराक्रमापासून उदाहरणे तयार करून शिवराजभूषण ग्रंथाची रचना केली. आचार्यत्वाची ही प्रवृत्ती इतकी व्यापक आहे, की या युगाचे अधिक लोकप्रिय नाव ‘रीतिकाल’ असे आहे.

आचार्य कवींमध्ये पहिले आणि प्रमुख नाव⇨केशवदास (सु. १५५५-१६१७) यांचे आहे. ते या काळाचे प्रवर्तकही आहेत. अलंकारविषयावर कविप्रिया, रसविषयावर रसिकप्रिया आणि विविध छंदांमधील त्यांची रचना रामचंद्रिका ही त्रयी दीपस्तंभांचे काम करते. असे म्हणतात, की बिहारींनी केशवदासांपासूनच काव्यशिक्षणाचा अभ्यास केला होता. काही इतर कवींच्या निर्मितीमध्येही त्यांचा हात होता. मूल्यांकनाच्या दृष्टीने सूरदास आणि तुलसीदास यांच्यानंतर केशवदासांचे स्थान मानले जाते. ते संस्कृतचेही प्रकांड पंडित होते आणि पिढयानपिढ्या राजगुरूच्या पदावर त्यांचा वारसा चालत आलेला होता. त्यांची कविता क्लिष्ट आणि दुर्बोध आहे. त्यामध्ये संस्कृत ग्रंथांची फार दाट छाया आढळते. केशवदासांच्या मृत्युनंतर एका शतकाने⇨भिखारीदास नावाच्या आचार्यांनी कीर्ती मिळविली. त्यांच्या काव्यनिर्णय आणि रससारांश या रचना प्रसिद्ध आहेत. या कवींमध्ये मौलिकता होती आणि ब्रज भाषेतील काव्याच्या नवीन समस्या समजावून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याची अपूर्व क्षमताही होती. हिंदी ब्रज भाषेचे हे सर्वांत विचारशील आचार्य होते. वरील दोन्ही प्रमुख आचार्यांच्या व्यतिरिक्त शेकडोंपैकी काही आचार्य कवींची नावे येथे निर्दिष्टकरणे आवश्यक आहे.

(शिवराजभूषण), कुलपतिमित्र (रसरहस्य),⇨देव (भावविलास व काव्यरसायन), सोमनाथ (रसपीयूषनिधी), दुलह (कविकुलकंठमरण),⇨पद्माकर भट्ट (पद्माभरण आणि जगदविनोद), प्रतापसाही (व्यंगयार्थ कौमुदी आणि काव्यविलास), रसिक गोविंद (रसिक गोविंदानंदवन) इत्यादी.


प्रेमप्रधान काव्य लिहिणाऱ्या कवींवर संप्रदायाचे अथवा कविशिक्षणाचेही बंधन नव्हते. हे सच्चे कवी होते. त्यांची रचना म्हणजे मुक्त हृदयाचा कोमल उच्छवास आहे. बिहारी या गटात प्रमुख आहेत. औरंगजेबाचे प्रमुख सहायक आणि सेनापती जयपूरचे महाराज राजा जयसिंह यांच्या आश्रयाने समस्त सुखसोयींचा आयुष्यभर उपभाग घेऊनही बिहारींनी केवळ एक सतसई लिहिली आहे. तिचे स्थान गाथासप्तशती आणि आर्यासप्तशतीपेक्षा कमी नाही. एका समीक्षकाचे अनुमान असे आहे, की पूर्ण निष्ठेने एकाग्र होऊन बिहारी एका आठवड्याला एक दोहा रचत असत. सतसई मध्ये मोगलकालीन कलेचा असा परिपाक आहे, की त्याला ‘ब्रज भाषेचा ताजमहाल’ म्हणता येईल. काव्यकलेच्या दृष्टीने ब्रज भाषेची कोणतीही रचना बिहारी सतसईशई तुल्यबल नाही. अनेक कवींनी या ग्रंथाचे अनुकरण केले, अनेक टीकाकारांनी त्यावर टीका लिहिल्या, समीक्षकांनी यथाशक्ती गुणदोषविवेचन केले आणि आजही करीत आहेत. ब्रज भाषेमध्ये सतसईविषयक साहित्याची एक वेगळी रासच बनलेली आहे. सौंदर्याच्या जितक्या कसोट्या आहेत त्यांतील प्रत्येकावर पारखून असा निर्णय दिला जातो, की सतसईमध्ये काव्यसौंदर्याचे अपूर्व भांडार आहे. त्यांचा प्रत्येक दोहा एकेक तेजस्वी हिरा आङे. सतसईच्या अध्ययनाची आणि अनुकरणाची परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. मुक्तक प्रकारची रचना करणाऱ्यांत बिहारीनंतरचे दुसरे नाव⇨घनानंद (सतरावे-अठरावे शतक) याचे आहे. त्याच्या कवितेचा काळ बिहारींहून एक शतकानंतरचा आहे. वैयक्तिक वेदनेने गायन करणारा असा दुसरा कवी ब्रज भाषेत नाही. कुण्या प्रेयसीसाठी दिल्ली सरकारची नोकरी सोडून घनानंद ‘प्रेम की पीर’ मध्ये जणू पागल बनला. त्याच्या वाणीत वेदनानुभूतीचे चित्र आहे. कालांतराने त्याने वृंदावनाला जाऊन दीक्षा घेतली आणि भगवत्प्रेमात गढून गेला. सुजान-सागर ही त्याची प्रसिद्ध रचना आहे. प्रेमकवींची संख्या अनंत आहे. एक कवी कोण्या कलावंतिणीच्या प्रेमाखातर ब्राह्मणत्व सोडून मुसलमान झाला आणि ‘आलम’ नावाने कविता करू लागला. या उलट ताज नावाची मुसलमान स्त्री श्रीकृष्णाच्या रूपावर मोहित होऊन हिंदू होण्यास तयार होती. वेनी, मंडन, ग्वाल बोधा, ठाकूर इ. कवी रसिक असल्यामुळे कविता करीत होते.

विलास आणि वासना यांच्याशी बंडखोरी दोन प्रकारांनी झाली. पहिला म्हणजे वीररसाचा आश्रय घेऊन राष्ट्राला जागे करण्याचा प्रयत्नत आणि दुसरा नीतिकाव्याच्या रचनेद्वारा समाजाला सुधारण्याचा प्रयत्ना. शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू⇨गोविंदसिंग (१६६६-१७०८) यांनी शस्त्र व शास्त्र दोन्हीच्या मदतीने राष्ट्राला नवीन स्फूर्ती दिली. त्यांच्या रचनांच्या संग्रहाला दसमग्रंथ  म्हणतात. यात एक लहानशी रचना पंजाबी आहे. एक पत्र (औरंगजेबाला लिहिलेले) फार्सी भाषेत आहे, बाकी संपूर्ण ग्रंथ ब्रज भाषेत आहे. यातील ‘चंडीचरित्र’, ‘रामावतार’ व ‘कृष्णावतार’ हे फार प्रसिद्ध आहेत विचित्र नाटक हे त्यांचे आत्मचरित्र आहे. या रचनांचा प्राण भक्ति-वीर रस आहे. भूतकाळातून प्रेरणा घेऊन वर्तमानात सुधारणा करीत ते भविष्याला आकार देत होते. दसग्रंथाचे मूल्यमापन सांस्कृतिक सौंदर्याच्या दृष्टीने झाले पाहिजे, काव्यसौंदर्याच्या दृष्टीने नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजींच्या आश्रयाने भूषण कवीने शिवराजभूषणाची रचना करून काव्यशास्त्रीय वातावरणाला राष्ट्रीय रूप देण्यात यश मिळविले. बुंदेलखंडाच्या लालकवीचा छत्रप्रकाश ग्रंथ राष्ट्रीय जागृतीच्या बरोबरच ऐतिहासिक सामुग्रीसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. राजस्थानाच्या जौधराजाने हमीर रासौची रचना केली, मथुरेच्या सूदन कवीने सुजानचरित्र ग्रंथात भरतपूरचे जाटवीर सूरजमल अथवा सुजानसिंह यांच्या पराक्रमाचे अत्यंत प्रभावशाली वर्णन केले आहे. पतियाळामध्ये राहणारे चंद्रशेखर वाजपेयी यांचे वीरकाव्य हम्मीर हठ अतिशय प्रसिद्ध आहे. येथे हे नमूद करणेही आवश्यक आहे, की या मौलिक ग्रंथांच्या बरोबरच रमाभारताचे ब्रज भाषानुवादीह या युगात झाले. पतियाळाच्या सरकारी ग्रंथालयात या अनुवादांची अपार रास असून त्यांचीही भाषा ब्रजच आहे आणि लिपी गुरूमुखी. नीतिकाव्यांची परंपरा ब्रज भाषेत रहीम यांच्या पूर्वीही चालू होती. पुढे वृंद कवी वृंदसतसई, वैताल (विक्रमसतसई), गिरिधर कविराज (कुंडलिया), सम्मन (दोहे), दानदयाल गिरी (अन्योक्ति कल्पद्रुम) इत्यादींनी तिला समृद्ध केले. काही भक्त कवीदेखील बहुधा समाजसुधारणेसाठी पुढे आले आणि सांप्रदायिक काव्यरचनेद्वारा त्यांनी जनतेला वासनेपासून दूर करण्याचा प्रयत्नू केला. रेवाचे किशनगढचे राजे नागरीदास यांनी विरक्त होऊन कृष्णभक्ती आणि ब्रजलीलेचे वर्णन करीत आपले सारे जीवन व्यतीत केले. वल्लभ संप्रदायाच्या ब्रजवासीदासांनी ब्रजविलास नावाचे कथाकाव्य लिहिले आणि प्रबोध चंद्रोदय नाटकाचा अनुवाद केला. मधुसूदनदासांनी रामाश्वमेध नावाच्या कथाकाव्यात तुलसीदासांच्या शैलीचे अनुकरण केलेले आहे. भक्तिकाव्याचे हे प्रयत्नं विखुरलेले आणि क्षीण आहेत. त्यांनी परंपरेला जिवंत ठेवण्याची धडपड मात्र निश्चितच केलेली आहे.

गद्य : आधुनिक काळाशी येण्यापूर्वी ब्रज साहित्याच्या आणखी एका रूपाचा विचार केला पाहिजे. ते रूप म्हणजे गद्य. सामान्यतः आधुनिक युगाच्या पूर्वी गद्य लिहिण्याची प्रथा नव्हती. संस्कृतमध्ये नाटकांव्यतिरिक्त जे गद्य लिहिले गेले आहे, ते कलेच्या कमनीयतेच्या बाबतीत पद्यापेक्षा सरस आहे. म्हणूनच अशी समजूत होती, की कवीची परीक्षा तर गद्य आहे, पद्य नव्हे. ‘गद्यं कवीनां निकषं वदन्ति’ पंचतंत्र, जातककथा इ. लोककथांमध्ये गद्य प्रकट होत होते परंतु त्यात कलेच्या चमत्कृतीचा जवळजवळ अभाव होता. शास्त्राकरिता गद्याचा आश्रय घेतला जात असे, कलेकरिता बहुधा नाही. ब्रज भाषेला साहित्याच्या या प्रवृत्तीचा वारसा मिळाला. परिणामतः ब्रज गद्याचे दर्शन आपल्याला सांप्रदायिक प्रसंगांतून वा कथावार्तामधूनच घडते. गोस्वामी विठ्ठलदासांनी शृंगार रसमंडन नावाचा सांप्रदायिक ग्रंथ ब्रज भाषेत लिहिला. चौरासी वैष्णधन की वार्ता आणि दो सौ बावन वैष्णवन की वार्ता यांमध्ये ब्रज भाषेचे सुधड गद्य दृष्टीस पडते. उत्तर मध्ययुगात आणखी थोडा विकास झाला आणि काव्यशास्त्रीय ग्रंथांमध्ये गद्याच्या ओळी समन्वयासाठी म्हणून वापरल्या जाऊ लागल्या. अठराशे आणि एकोणीसशे शताब्दी संवत्सरांत टीकेच्या निमित्ताने गद्याचा जास्त उपयोग झाला. परंतु तोदेखील संस्कृत टीकांच्या समांतर आहे, स्वतंत्र नाही. वस्तुतः ब्रज भाषेचा आविष्कार पद्यामध्ये इतका जास्त झालेला आहे, की गद्याची उदाहरणे पद्याच्या समोर निस्तेज दिसतात. ती पराश्रयी आहेत स्वतंत्र नाहीत. त्यांच्यातू लेखकाचे व्यक्तिमत्व डोकावत नाही.

आधुनिक काळ : यूरोपीय संपर्काने आपले साहित्य दोन प्रकारे प्रभावित झाले : वर्ण्य विषयाच्या बाबतीत भावनेच्या जागी तर्काची प्रतिष्ठापना आणि अभिव्यक्तिच्या बाबतीत पद्याच्या जागी गद्याचा प्रयोग या दोन्ही गोष्टी ब्रज परंपरेला अनुकूल नव्हत्याआणि त्यांचा विकास सांस्कृतिक केंद्रांच्या ऐवजी व्यापारी केंद्रांत (विशेषतः कलकत्ता) होत होता. परिणामतः हिंदी साहित्याचा आधुनिक काळ म्हणजे ब्रज भाषा-साहित्याची उपेक्षा आणि खडी बोली-भाषा-साहित्याचा उदय व समृद्धी यांचा काळ आहे. आधुनिक काळाचा प्रारंभ ईस्ट इंडिया कंपनीच्या आश्रयाने फोर्ट विल्यम कॉलेज, ख्रिस्ती मिशनऱ्यांचा धर्मप्रचार आणि वृत्तपत्रांचा श्रीगणेशा यांनी झाला. या सर्वांमध्ये गद्याचा उपयोग व्हावयाचा होता. हळूहळू ब्रड साहित्याचे क्षेत्र संकुचित होऊ लागले. ते येथपर्यंत, की शेवटी राष्ट्रीय व्यासपीठावर हिंदीचे प्रतिनिधित्व करणारी खडी बोलीच प्रजासत्ताक भाषेच्या रूपात स्वीकारली गेली.


आधुनिक साहित्याचे पुराणपुरूष भारतेंदू हरिश्चंद्र यांनीही काव्यासाठी ब्रज भाषा व गद्यासाठी (नाटक, निबंध वगैरे) खडी बोलीचा उपयोग केला. त्यांच्या कवितेत पूर्वकालीन काव्याची पडछाया आहे, विशेषतः भक्ती आणि प्रेमाची विविध रूपे त्यात दिसतात. नवीन विषयांसाठी गद्यात वापरलेली खडी बोली हळूहळू स्थिर होण्याचा प्रयत्नी करीत आहे. प्राचीन परिपाठीचे पालन करतानाही साहित्यिक नियतकालिकांचे संपादन, नाटयलेखन आणि प्रस्तुतीकरण, समीक्षेचे सिद्धांत, त्याचप्रमाणे भाषणांच्याद्वारे भारतेंदू हरिश्चंद्र नवीन युगाचे संदेशवाहक बनले आणि सरकारचे समर्थक राजा शिवप्रसाद यांच्या के. सी. एस्. आय. (सितारेहिंद) या उपाधीची प्रतिक्रिया म्हणून जनतेने हरिश्चंद्रांना ‘सितारे हिंद’ च्या जागी ‘भारतेंदु’ या उपाधीने विभूषित केले. भारतेंदूंच्या पश्चात हिंदी साहित्याचे नेतृत्व महावीर प्रसाद द्विवेदी (१८६४-१९३८) यांनी सरस्वती पत्रिकेच्या माध्यातून सांभाळले आणि केवळ जुन्या विषयांचा कसून विरोधच केला नाही, तर प्रचलित कवितेसाठी खडी बोलीची वकिली करून नवोदित कवींना प्रोत्साहन दिले. द्विवेदीयुग पहिल्या महायुद्धापर्यंत चालले. यादरम्यान प्रतिस्पर्धी बनून ब्रज भाषेने नवीन विषयांमध्ये आणि नवीन अभिव्यक्तींत प्रवेश करून घेतला आणि कायापलट करून आपल्या जिवंतपणाची साक्ष पटविली. पण उदयोन्मुख काळात ब्रज भाषा अभिजात (क्लासिकल) बनली आणि साहित्यिकांचे लक्ष नव्या साहित्याच्या निर्मितीपेक्षा प्राचीन साहित्याचे संपादन, टीक, समीक्षा इत्यादींमध्येच गुंतून राहिले. या युगातील ब्रज भाषेत रचलेली पुस्तके केवळ वैचित्र्य निर्माण करण्यासाठी आहेत, ती गतीची जाणीव देत नाहीत, प्रगतीचा तर प्रश्नच उद्‍भवत नाही. आजकाल अनेक साहित्यांतर्गत व साहित्यबाह्य कारणांनी लोकभाषांचा स्वीकार करण्याची चर्चा चालू आहे. लोकव्यासपीठ अविकसित क्षेत्रांत प्रविष्ट झाले आहे. याच प्रवृत्तीमुळे ब्रज साहित्यात किंचित वृद्धी होण्याची शक्यताही वाढली आहे.

पहिले जागतिक महायुद्ध : नवाबशाहीच्या कारभारास कंटाळून जनतेने ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकीर्दीचे स्वागत केले आणि करो, परंतु जे स्वदेशी राज्य असते, ते सर्वांत उत्तम असते’ (दयानंद). सर्वांत अधिक खुपणाऱ्या दोन गोष्टी होत्या : एक म्हणजे इंग्रज लोक भारताची संपत्ती परदेशी घेऊन जात होते, त्यामुळे भारत दिवसेंदिवस दीन आणि दरिद्री बनत चालला होता. दुसरे असे, की इंग्रजही परकीय आहेत आणि ते कधीही भारतीय जनतेच्या हिताची इच्छा करणार नाहीत संधी मिळताच विविध गटांत फूट पाडण्याचा प्रयत्न् करीत आहेत. हे सावधगिरीचे सूर ब्रज कवितेच्या माध्यमातून जनतेच्या समोर भारतेंदूंच्या जीवनकाळातच प्रसृत झाले होते.⇨आर्यसमाजाच्या प्रचार प्रसारातून भारताच्या प्राचीन गौरवाकडे साहित्यिकांची दृष्टी बळली आणि मध्ययुगीन कुप्रवृत्तींना दूर सारून समाजसुधारणा करण्यासाठी ते कटिबद्ध झाले. भारतेंदूंच्या पूर्वी राजा लक्ष्मणसिंहांनी अभिज्ञानशाकुंतलाचा अनुवाद करताना गद्यात खडी बोली आणि पद्यात ब्रज भाषेचा वापर केला आहे. भारतेंदूंच्या मौलिक नाटकांमध्येही पद्यासाठी ब्रज भाषेचाच वापर केलेला आहे. भारतेंदू-युगाचे समस्त साहित्यिक गद्यरूपांच्या मधूनमधून ब्रज पद्यखंडांचा उपयोग करीत. दैनंदिन समस्या, मनोरंजन इत्यादींसाठी खडी बोलीचा निर्वाह होऊ शकतो पण मधेच भावुकता आल्यावर कवितेसाठी ब्रज भाषाच वापरली पाहिजे, अशी त्यांची समजूत होती. कादंबरीकारदेखील मधूनमधून ब्रज भाषेची पदे रचीत असत. त्याकाळी साहित्यिक कविसंमेलनांत एकत्र येत आणि समस्यापूर्तीच्या कविता ऐकवीत त्या सर्वांचे माध्यमही ब्रज भाषाच होते. जे कवी खडी बोलीत कविता रचण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांनीही आपल्या रचनेचा प्रारंभ ब्रज भाषेतील रचनेनेच केला होता⇨मैथिलीशरण गुप्त (१८८६-१९६४) ‘मधुप’ या टोपणनावाने कविता लिहीत,⇨अयोध्यासिंह उपाध्याय ‘हरिऔध’ यांची कितीतरी कथाकाव्ये ब्रज भाषेमध्ये आहेत.⇨जयशंकर प्रसाद (१८८९-१९३७) यांची सुरूवातीची गीते ब्रज भाषेत आहेत. त्याचबरोबर देवीप्रसाद पूर्ण, सीताराम, शंकर कवी, भगवानदीन, ‘सनेही’ इ. कवींची नावेदेखील ब्रज कवितेच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. बगालीचे प्रसिद्ध कवी⇨रविंद्रनाथ टागोर (१८६१-१९४१) यांनी ‘भानुसिंह’ टोपणनावाने ब्रज-पदे लिहिली. मानुसिंहेर पादवली नावाने ती प्रकाशित झालेली आहेत. प्रसिद्ध समीक्षक ⇨रामचंद्र शुक्ल यांनी बुद्धचरित्र नावाचे महाकाव्य ब्रज भाषेत लिहिले आहे.

पहिल्या महायुद्धानंतर : आता काही अशा कवींचीही चर्चा करूया की जे खडी बोली युगातही ब्रज भाषेचे कवी आहेत. जगन्नाथदास ‘रत्‍नाकर’ (१८६६-१९३२), सत्यनारायण कविरत्न, वियोगी हरी, दुलारेलाल भार्गव, रामशंकर शुक्ल ‘रसाल’, जगनसिंह सेंगर, रामेश्वर करूण, उलफतसिंह निर्मय, शरणबिहारी गोस्वामी वगैरे. ही यादी फार मोठी आहे. ‘रत्नाकर’ ब्रज भाषेचे साहित्यिक होते. त्यांची कीर्ती उद्धवशतक आणि गंगावतरण या रचनांखेरीज बिहारी रत्‍नाकरीची पाठचिकित्सा आणि स्वच्छ संपादन यासाठी आहे. कविरत्नांची कविता अत्यंत मधुर आणि मार्मिक आहे. त्यांचे भ्रमरदूत हे काव्य अतिशय प्रसिद्ध आहे. वियोगी हरींनी ब्रज साहित्याचे संपादन, टीका वगैंरेंशिवाय वीरसतसईचीही रचना केली. दुलारेलाल भार्गव दुलारे दोहावलीकरिता प्रसिद्ध आहेत. ‘रसाल’ हे विद्यापीठीय प्राध्यापक आणि प्रसिद्ध टीकाकार होते. त्यांची उद्धवशतक ही उत्तम रचना आहे. जगनसिंह सेंगर आणि रामेश्वर करूण यांनी अनुक्रमे किसानसतसई आणि करुणसतसईची रचना केली आहे. शरणबिहारी गोस्वामींनी पाषाणी कथाकाव्याखेरीज पूंछरी को लौटा कादंबरीही ब्रज भाषेत लिहिली आहे. दिल्ली विद्यापीठाचे राजेंद्रकुमार शर्मा यांनी आधुनिक ब्रज भाषा काव्य या आपल्या प्रबंधात अशा अनेक कवींचे विवेचन केले आहे, की जे सातत्याने ब्रज भाषेत लिहीत आहेत पण त्यांच्या प्रकाशित काव्यांची संख्या कमी आहे. प्रामुख्याने त्यांच्या स्फुट रचना वेळोवेळी पत्रिकांमधून प्रकाशित होत आल्या आहेत. तरीही मूल्यमापनाच्या दृष्टीने समकालीन ब्रज भाषा-काव्य हिंदीच्या कोणत्याही उपभाषेच्या काव्याहून कमी महत्त्वाचे नाही.

‘बोली’ पासून प्रारंभ होऊन ‘भाषा’ आणि मग ‘प्रातिनिधिक भाषा’ बनून ब्रज भाषेने एक हजार वर्षांपर्यंत उत्तर भारताच्या सांस्कृतिक घडामोडींची अभिव्यक्ती केली आहे. काळाच्या ओघात परिस्थिती बदलल्यावर ब्रज भाषेने स्वतःचा संकोच केला आणि ‘प्रातिनिधिक भाषे’  वरून ‘भाषा’ आणि पुन्हा ‘बोली’ बनून ती राहिली. आज ब्रज भाषेचा उपयोग ब्रज प्रदेशाच्या बोलीच्या रूपात होतो. ब्रज प्रदेशाच्या नगरांतूनही खडी बोलीने प्रवेश मिळवला आहे. वाङमयीन भाषेच्या रूपात ब्रज भाषा ‘अभिजात’ बनली आहे. तिचे अध्ययन आणि अध्यापन संस्कृत, प्राकृत आणि अपभंशाप्रमाणे गौरव प्राप्त करून देते. संस्कृतप्रमाणेच ब्रज भाषेमध्ये काही करून आपले महत्त्व प्रस्थापित करतात. सामान्य अभिव्यक्तीकरिता आज ब्रज भाषेतील साहित्यसृष्टीची विशेष समाधानकारक स्थिती नाही. लोकोदयाबरोबर लोकसाहित्याचे महत्त्व वाढल्यावर लोकभाषांचा अवलंब केला जाईल आणि तेव्हा ब्रज भाषा-साहित्य पुन्हा नव्या रूपात अवतीर्ण होऊ शकेल, अशी आशा आहे.

पहा : हिंदी साहित्य.

संदर्भ :

१. मीतल, प्रभुदयाल, ब्रजभाषा साहित्य का ऋतुसौंदर्य, मथुरा १९५०.

२. रूपनारायण, ब्रजभाषा के कृष्णकाव्य मे माधुर्य  भक्ति, दिल्ली, १९६२.

३. वर्मा, राजेन्द्रकुमार, हिंदी कृष्णभक्ति काव्य, अलाहाबाद, १९७२.

४.वाजपेयी, जगदीश, आधुनिक ब्रजभाषा काव्य, मुझफ्फरनगर, १९६४.

५. शुक्ल, रामशंकर ‘रसाल’, आधुनिक ब्रजभाषा काव्य, अलाहाबाद,  १९४२.

६. सत्येंद्र, ब्रजलोक साहित्य का अध्ययन, आग्रा, १९५७.

७. सिंग, इंद्रपाल, रीतिकाल के प्रमुख प्रबंध काव्य, आग्रा, १९६५.

८. सिंह, कपिलदेव, ब्रजभाषा और उसका साहित्य, वाराणसी, १९६४.

९. सिन्हा, सावित्री, ब्रजभाषा के कृष्णभक्ति काव्य में अभिव्यंजना शिल्प, दिल्ली, १९६१.

ओम प्रकाश (हिं.) मिरजकर, ललिता (म.)