ब्रजबुलीभाषा –साहित्य : ब्रजबुली हे एका विशिष्ट वैष्णव भावकवितांच्या प्रकाराला व त्याच्या शुद्ध वाङमयीन भाषेला दिलेले नाव आहे. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांच्या दरम्यान ब्रजबुलीत वैष्णवांनी भावगीते रचली. ब्रजबुली व⇨ब्रज भाषा यांचा गोंधळ टाळणे आवश्यक आहे.⇨बंगाली,⇨असमिया व उडिया [ ओडिया भाषा] या भाषांचे भरपूर मिश्रण असलेली⇨मैथिली भाषा ही ब्रजबुलीचा आधार. शिवाय⇨हिंदी व ब्रज भाषा यांचाही थोडाबहुत बाह्य प्रभाव या भाषेवर दिसतो. या भाषांच्या आवर्जून केलेल्या संमिश्रणामुळेच ब्रजबुलीला व तिच्यातील काव्याला एक लोभस सौंदर्य, भावपूर्णता व नादमाधुर्य प्राप्त झाले आहे. ब्रजवासी राधाकृष्ण या दिव्य प्रेमी युगुलाच्या संभाषणाची भाषा हीच होती, या भाबड्या समजुतीने तिला ‘ब्रजबुली’ असे नाव मिळाले. या गीतांत राधाकृष्णांच्या पूर्वराग, अभिसार, मान, मानभंजन, विरह, मिलन इ. अवस्थांचे शृंगाररसपूर्ण वर्णन आहे. तसेच चैतन्यांच्या स्तवनाची गीतेही आहेत. त्यांत मुख्यतः शृंगाराला व भक्तिरसाला प्राधान्य आहे.
⇨गोविंददास कविराज (१५३५ – १६१३, सर्वश्रेष्ठ ब्रजबुली कवी), नसील मामूद आणि⇨आलाओल सैयद (१६०७ – ८०) हे होत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत बंगालमध्ये ब्रजबुली वाङंमय सतत निर्माण होत राहिले. या शतकाच्या अखेरीस काही आंग्लविद्याविभूषित तरुणांनी त्याचे पुनरुज्जीवन केले, मात्र त्यात कृत्रिमता आढळते. हे पुनरूज्जीवन करणाऱ्यांत प्रमुख म्हणून जनमेजय मित्र व प्रसिद्ध कादंबरीकार⇨बंकिमचंद्र चतर्जी (१८३८ – ९४) उल्लेखनीय आहेत.
⇨रविंद्रनाथ टागोर (१८६१-१९४१) यांनी १८८४-८५ मध्ये ‘भानुसिंह ठाकुर’ या टोपणनावाने वीस ब्रजबुली भावकवितांचा संग्रह प्रसिद्ध केला. त्यांची गणना ब्रजबुलीतील काही सर्वश्रेष्ठ कवींमध्ये करावी लागते. बंगालमध्ये अजूनही प्रसंगपरत्वे ब्रजबुली काव्ये रचिली जातात.