ब्येद्न्यी, द्यिम्यान : (१८८३- मे १९४५). सोव्हिएट कवी. खरे नाव येफीम अलिस्स्येयेविच प्रिद्वोख. खिर्सोन्स्काया प्रांतातील गुवोर्का ह्या गावी जन्मला. शिक्षण पीटर्झबर्ग विद्यापीठात. काही काळ सैन्यात नोकरी केली. १८९९ पासून त्याच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या आणि लवकरच एक लोकप्रिय कवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. लोकमानस चेतविण्याची क्षमता त्याच्या कवितेत होती. समूहगीते, क्रांतिगौरवगीते अशा प्रकारची कविता त्याने लिहिली. विख्यात रशियन बोधकथाकार ⇨ इव्हान अंद्रबेयेव्हिच क्रिलॉव्ह (१७६८-१८४४) ह्याच्या बोधकथांनी प्रभावित होऊन त्याने काही उपरोधप्रचुर बोधकाथाही लिहिल्या. प्राव्हदा ह्या सोव्हिएट रशियाच्या अधिकृत वृत्तपत्रातही त्याने काही वर्षे काम केले होते. १९२३ मध्ये त्याला ‘ऑर्डर ऑफ रेड बॅनर’ देऊन त्याचा बहुमान करण्यात आला होता. मॉस्को येथे तो निधन पावला.