ब्यूनेल लूईस : (२२ फेब्रुवारी १९०० – ). नामवंत स्पॅनिश चित्रपट-दिग्दर्शक. कालांदा येथे जन्म. त्याचे उच्च शिक्षण माद्रिद महाविद्यालयात झाले (१९२०-२३). त्यावेळी जगप्रसिद्ध अतिवास्तववादी चित्रकार साल्वादोर दाली आणि स्पॅनिश कवी गार्सीया लॉर्का या दोन प्रतिभाशील व्यक्तींशी त्याचा परिचय झाला. १९२५ मध्ये ब्यूनेल पॅरिसला गेला व तेथे फ्रिटस लांग या जर्मन दिग्दर्शकाचे चित्रपट पाहून त्याला चित्रपटक्षेत्रात रस वाटू लागला. अतिवास्तववादाचा जनक आंद्रे ब्रताँ याच्या प्रभावामुळे तो त्या विचारसरणीकडे ओढला गेला. पॅरिसमधील चित्रपट शिक्षण महाविद्यालयात त्याने शिक्षण घेतले व त्यानंतर झान एपस्टाइनसारख्या प्रतिशयश दिग्दर्शकांच्या हाताखाली सहायक म्हणून काम केले. १९२८ साली दालीसमवेत त्याने आपल्या पहिल्या उन चिन अन्दालो या चित्रपटाची निर्मिती केली. अतिवास्तववादाला अभिप्रेत असलेले स्वयंचलनाचे तंत्र वापरून आणि स्वप्नांचे व मुक्त कल्पनासाहचर्याचे प्रसंग योजून हा चित्रपट तयार करण्यात आला. उदा., प्रेयसीकडून दुखावला गेलेला युवक प्रथम चंद्राकडे पाहताना पाठमोरा दिसतो व नंतरच्या दृश्यात तो एकदम क्रुद्ध होऊन वस्तऱ्याने तिचा डोळा कापताना दिसतो. अशा असंबद्ध, चित्तथरारक दृश्यांची रेलचेल या चित्रपटात आढळते. या प्रकारच्या अतिवास्तववादी निर्मितीवर प्रतिकूल टीकाही झाली.
ब्यूनेलने १९३२ मध्ये लँड विदाऊट ब्रेड (इं. शी.) हा स्पेन मधील लास हर्दस या कंगाल भागातील विदारक मानवी जीवनाचे दर्शन घडविणारा बोधपट निर्माण केला. त्यात श्रीमंती आणि गरिबी यांतील विरोध कलात्मकतेने दाखवून हृदयद्रावक परिणाम साधलेला आहे. १९४५ साली हॉलिवुडच्या वॉर्नर ब्रदर्स कंपनीने त्याला आमंत्रण दिले. तेथे दोन वर्षे काम करून तो मेक्सिको येथे गेला. तेथे १९४७ साली ग्रॅन कसिनो हा संगीत चित्रपट निर्माण केला. तो अयशस्वी ठरला परंतु १९४९ साली निर्माण केलेला द ग्रेट मॅडकॅप (इं. शी.) हा विनोदी चित्रपट खूप गाजला, त्यातून मिळालेल्या पैशातून ब्यूनेलने १९५० मध्ये द यंग अँड द डॅमन्ड (इं. शी.) हा श्रेष्ठ चित्रपट निर्माण केला. त्यात मेक्सिको शहरातील बकाल झोपडपट्टीची पार्श्वभूमी घेऊन ब्यूनेलने गुंतागुंतीचा सामाजिक आशय अतिवास्तववादी तसेच अभिव्यक्तिवादी पद्धतीने चित्रित केला आहे. नायकाचा छळ व अधःपतन दर्शविणारी दृश्ये भीषण व चित्तथरारक आहेत. या चित्रपटानंतर ब्यूनेलला श्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून जागतिक पातळीवर मान्यता लाभली. त्यामुळे निर्मितिक्षेत्रात तो स्थिरावला. एल् ब्रुतो (इं.शी., १९५२) द क्रिमिनल लाइफ ऑफ आर्किबाल्डो द ला क्रूझ (इं. शी., १९५५), द यंग वन (इं. शी., १९६०), विरिदायना (१९६१), द एक्सटर्मिनेटींग एंजेल (इं. शी., १९६२), त्रिस्तना (१९७०) इ. चित्रपट ब्यूनेलने निर्माण केले. त्यांचे विषय सामाजिक, धार्मिक असे असले, तरी तंत्र मात्र अतिवास्तववादी स्वरूपाचेच राहिले. या शैलीच्या बाबतीत त्याने कधीही तडजोड केली नाही. जागतिक चित्रपट इतिहासात अतिवास्तववादी आणि अभिव्यस्तिवादी शैलीच्या श्रेष्ठ दिग्दर्शकांमध्ये लूईस ब्यूनेलचे स्थान वरचे मानले जाते.
दीक्षित, विजय
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..