ब्यॅर्कनेस, व्हिल्हेल्म ( फ्रिमनकोरेन ) : (१४ मार्च १८६२ – ९ एप्रिल १९५१). नॉर्वेजियन भौतिकीविज्ञ व सैद्धांतिक वातावरणवैज्ञानिक. वातावरणातील ⇨वायुराशींच्या हालचालींचे भौतिकीय दृष्टीने स्पष्टीकरण करून त्यावरून हवामानाच्या पूर्वानुमानाच्या तंत्राचा पाया घालणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक प्रमुख वैज्ञानिक. त्यांचा जन्म क्रिस्तियाना (आताचे ऑस्लो, नॉर्वे) येथे झाला. त्यांचे वडील कार्ल आंतोन ब्यॅर्कनेस हे क्रिस्तियाना विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. त्यांच्याच प्रभावाने व्हिल्हेल्म यांना विज्ञानाची गोडी लागली. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांनी आपल्या वडिलांना संशोधनाच्या कार्यात मदत केली होती. क्रिस्तियाना विद्यापीठात १८८० साली शास्त्रशाखेत अभ्यासास आरंभ करून व्हिल्हेल्म यांनी १८८८ मध्ये एम्. एस् पदवी संपादन केली. यानंतर काही काळ पॅरिस येथे राहून व १८९० मध्ये बॉन (जर्मनी) येथे जाऊन भौतिकीविज्ञ हाइन्रिख हर्टझ यांचे सहाय्यक व वैज्ञानिक सहकारी म्हणून त्यांनी काम केले. १८९२ साली त्यांनी पीएच्य डीय पदवी मिळविली. बिनतारी संदेशवहनाच्या व रेडिओविषयक तंत्रांच्या विकासास निश्चितपणे कारणीभूत झालेल्या विद्युत अनुस्पंदनाचे [ →अनुस्पंदन] सर्वांगीण संशोधन त्यांनी हर्टझ यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यानंतर प्रथम दोन वर्षे स्टॉकहोम विद्यापीठात यामिकी व गणितीय भौतिकी या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. येथेच त्यांनी आपल्या अभिसरणाच्या प्रसिद्ध सिद्धांताचा शोध लावला. द्रवाचा दाब व विशिष्ट आकारमान यांचा अनन्य किंवा अतूट संबंध असतो, ही रूढ कल्पना सर्वस्वी बरोबर नसून द्रवातील हालचालींच्या अभ्यासात ऊष्मागतिकीचा (उष्णता आणि यांत्रिक व इतर रूपांतील ऊर्जा यांच्यामधील संबंधांचे गणितीय विवरण करणाऱ्या शास्त्राचा) उपयोग केला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. पुढील काळात त्यांनी जलयामिकी व ऊष्मागतिकीचे संयोगीकरण केले . त्याच्या साहाय्याने वातावरणातील व महासागरांतील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हालचाली कशा घडत असतात, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. याचीच परिणती पुढे वातावरण हे भिन्न गुणधर्मांच्या वायुराशींनी बनलेले आहे, असे मानण्यात झाली.