ब्यॅर्कनेस, याकॉप ऑल बॉन्नेव्ही : (२ नोव्हेंबर १८९७ – ७ जुलै १९७५). अमेरिकन वातावरणवैज्ञानिक. वातावरणातील भिन्न गुणधर्मांच्या ⇨वायुराशींना  विभागणाऱ्या ⇨सीमापृष्ठावर  लाटेसारखा क्षोम निर्माण होणाऱ्या जागी बहुतेक वेळी चक्रवातांची निर्मिती होते, असा शोध त्यांनी लावला. हवामानाच्या पूर्वानुमानासंबंधीच्या आधुनिक तंत्राच्या विकासाला या शोधाचा मोठा हातभार लागलेला आहे. त्यांचा जन्म स्टॉकहोम येथे झाला. त्यांचे वडील ⇨व्हिल्हेल्म ब्यॅर्कनेस  यांच्या भौतिकी व वातावरण विज्ञानांतील संशोधनाच्या प्रभावामुळे याकॉप यांनीही अध्ययनासाठी तेच क्षेत्र निवडले. ऑस्लो विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षण पुरे करून याकॉप बर्गेनच्या (नार्वे) वातावरणवैज्ञानिक वेधशाळेत दाखल झाले (१९१८). तेथे ते हवामान पूर्वानुमान केंद्रांचे अधीक्षक होते (१९२०-३१). याच काळात त्यांनी ऑस्ले विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९२४). १९३१ साली बर्गेन येथील भूभौतिकीय संस्थेत ते वातावरणविज्ञानाचे प्राध्यापक झाले. १९४० च्या सुमारास कॅलिफोर्निया (लॉस अँजेल्स) येथील विद्यापीठात वातावरणविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९४६ साली त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. १९४७ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.

पहिल्या महायुद्धाच्या काळात देशाबाहेरील हवामानाचे वेध मिळण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्यामुळे हवामान निरीक्षण केंद्रांचे देशव्यापी जाळे नॉर्वेमध्ये उभारण्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांना खूप साहाय्य केले होते. या केंद्रांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी भिन्न घनता व भिन्न तापमान असलेल्या वायुराशींची संकल्पना विकसित करून वायुराशी व त्यांना विभागणारी सीमापृष्ठे यांची स्थिती व हालचाली यांचे विश्लेषण केले. १९१८ साली बर्गेन येथे काम करीत असताना त्यांच्या असे लक्षात आले की, प्रभावी होत जाणारा चक्रवात हा अटलांटिक महासागरावर नेहमीच आढळणाऱ्या थंड व उष्ण वायुराशींमधील सीमापृष्ठांवरील लाटेमध्ये निर्माण होतो. थंड हवेच्या प्रदेशात घुसत जाणाऱ्या उष्ण हवेच्या जिव्हेच्या (पाचरीप्रमाणे पुढे जाणाऱ्या भागाच्या) अग्राशी चक्रवाताचा केंद्रबिंदू असतो. या प्राथमक माहितीच्या आधाराने त्यांनी चक्रवाताच्या निर्मितीपासून तो नामशेष होईपर्यंतचा चक्रवात जीवनक्रम कसा असेल, याचे चित्र रेखाटले व याचा उपयोग मध्य व उत्तर अक्षांशावरच्या प्रदेशांवरील हवामानाच्या पूर्वानुमानासाठी केला. सीमापृष्ठाची संकल्पना १९१८ पूर्वीही माहितीची होती मात्र सीमापृष्ठावरील लाटेत अग्राच्या पुढे उष्ण वायुराशीचे सीमापृष्ठ व त्यामागे शीत वायुराशीचे पृष्ठ असते. नव्याने निर्माण झालेल्या चक्रवाताला सीमापृष्ठीय लाटेची संरचना असल्यास आणि सीमापृष्ठाच्या दोन्ही अंगांस असलेल्या वायुराशींच्या तापमानात लक्षणीय तफावत असल्यास चक्रवात अधिक प्रभावी होत जाण्याची शक्यता असते यांतून निघणारा उपसिद्धांत म्हणजे लाटेचे स्वरूप नष्ट होऊन चक्रवाताचा गाभा थंड वायुराशीचा असल्यास चक्रवाताची तीव्रता कमी होत जाते (इत्यादी तपशील हवामानाच्या नकाशावरील माहितीचे विश्लेषण करू लागल्यावर कळून येऊ लागला). चक्रवातांचे सैद्धांतिक चित्र प्रारंभी वातावरणाच्या तळाच्या (भूपृष्ठाजवळील) माहितीवर आधारलेले होते परंतु वातावरणाच्या उच्च स्तरांतील माहिती मिळू लागल्यावर वातावरणाचे त्रिमिती चित्र रेखाटता आले. त्यावरून ब्यॅर्कनेस यांना असे आढळून आले की, प्रक्षोभी आवरणाच्याही वरपर्यंत पसरलेल्या पश्चिमी वाऱ्यांच्या प्रवाहांतील लाटेचा चक्रवात हा भूपृष्ठाजवळचा आविष्कार असतो. [→ चक्रवात].

वातावरण व महासागर यांच्या परस्परांमध्ये चालणाऱ्या क्रिया व प्रतिक्रिया यांच्याही अभ्यासाकडे त्यांनी लक्ष दिले. हवामानातील दीर्घकाल टिकणाऱ्या बदलांच्या पूर्वानुमानासाठी या माहितीची अत्यंत जरूरी असते. १९२०-४० या कालावधीत त्यांनी न्यूनदाब क्षेत्रांच्या संरचनेविषयीची माहिती संकलित केली. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी वातावरणातील अभिसरणाच्या अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित केले. फार उंचीवर उडवलेल्या रॉकेटांद्वारे घेण्यात आलेल्या वेधांचा त्यांनी हवामानाचे विश्लेषण व पूर्वानुमान करण्यासाठी वापर केला. अशा प्रकारे वातावरणातील घटनांच्या संशोधनासाठी अवकाशयुगातील तंत्राचा वापर प्रथम करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी ते एक होत. हवामानविषयक असंख्य नकाशांवरील समदाब रेषांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर उत्तर गोलार्धावरील अशा रेषांत होणारे बदल (विवक्षित क्षेत्राचे होणारे दाबांतील चढ किंवा उतार) हे उत्तर ध्रुवीय प्रदेशावर नेहमी तरंगत असणाऱ्या प्रचंड वायुराशींच्या आकुंचन-प्रसरणाशी निगडित असल्याचे त्यांना आढळले. ब्रिटन व स्वित्झर्लंड या देशांच्या निमंत्रणावरून त्यांनी या देशांत जाऊन तेथील हवामानविषयक कार्यात भाग घेतला होता.

अमेरिकन भूभौतिकीय संस्थेचे बोई पदक (१९४५), अमेरिकन वातावरणविज्ञान संस्थेचे रॉस्बी पदक (१९६०) आणि विज्ञानाचे राष्ट्रीय पदक (१९६६) इ. पदके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. लॉस अँजेल्स येथे ते मृत्यु पावले.

ठाकूर, अ. ना.