बौद्ध गान ओ दोहा : बौद्ध गान ओ दोहा : वज्रयान पंथाच्या सहजयानी शाखेतील तांत्रिक बौद्ध सिद्धाचार्यांनी मागधी अपभ्रंश भाषेत रचलेल्या गीतांचा संग्रह. चर्यागीति (म्हणजे गूढाचार गीते), दोहाकोश, चर्यापदे ह्या नावांनीही ही रचना ओळखली जाते. ह्या गीतांची रचना विविध सिद्धाचार्यांनी इ. स. ६०० ते १००० ह्या दरम्यान केली असावी, असे काही अभ्यासक मानतात तर काहींच्या मते ती १०५० ते १२०० ह्या काळात रचली असावीत. कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार पिढ्यांतील कवींचा ह्या गीतांच्या रचनेस हातभार लागला असावा. बंगाली, मैथिली, ओडिसा व असमिया ह्या आधुनिक भारतीय भाषांचे मूळ ह्या रचनेत असल्याचे बहुतांश अभ्यासक मानतात. ⇨हरप्रसाद शास्त्रींना १९०७ मध्ये ‘नेपाळ दरबार ग्रंथालया’त सिद्धांच्या ५० गीतांचे एक हस्तलिखित मिळाले. त्यावर सु. १० वर्षे संशोधन–संपादन करून त्यांनी ‘वंगीय साहित्य परिषदे’मार्फत बौद्ध गान ओ दोहा ह्या नावाने ते प्रकाशित केले. या संस्करणात चर्यागीतिव्यतिरिक्त सहजाम्नाय-पंजिका तसेच काण्हपाविरचित दोहाकोश (मेखला टीकेसह) ह्या रचनाही अंतर्भूत आहेत.
हरप्रसाद शास्त्रींच्या मते ह्या रचनेचे कवी बंगाल व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील आहेत. त्यांत काही ओडिसा कवींचाही समावेश असून ⇨ओडिया भाषेचे काही आद्य नमुनेही ह्या रचनेत आढळतात. के. के. कर यांनी आपल्या डी. लिट्. प्रबंधात म्हटले आहे, की ह्या रचनेतील बरीच गीते अस्सल प्राचीन ओडिया भाषेतील असून ती ओडिया कवींनीच रचलेली आहेत. त्यांनी ह्या गीतांत वापरलेली भाषा ही सातव्या ते नवव्या शतकातील प्रचलित ओडिया भाषाच आहे. सरहपा, काण्हपा, लुइपा व भुसुक हे कवी तर निश्चितपणे ओडियाच होत. ओरिसातील उड्डियान पीठ हे तांत्रिक बौद्ध सिद्धांचे एक महत्त्वाचे केंद्र होते, हेही या दृष्टीने लक्षणीय आहे. ह्या रचनेतील छंद व विषय हे नंतरच्या ओडिया काव्यातही संक्रांत झाल्याचे दिसते. ह्या गीतांतील आशय व अंतःसत्त्व (स्पिरिट) ओडिया संस्कृतीच्या शाश्वत अंतःप्रवाहाचे निदर्शक आहे. विशेषतः नाथ व महायानी संप्रदायाच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब त्यांत पडले आहे. सातव्या ते नवव्या शतकांतील ह्या गीतांचे अतूट नाते ओडियातील चौदाव्या शतकातील शिशुवेद ह्या काव्याशी, पंधराव्या ते सोळाव्या शतकांतील ⇨पंचसखा कवींच्या काव्यग्रंथांशी, सतराव्या शतकातील अरक्षित दासकृत महीमंडलगीता ह्या ग्रंथाशी, अठराव्या शतकातील भीमभोईच्या भजनांशी व गीतांशी तसेच एकोणिसाव्या शतकातील ⇨मधुसूदन राव यांच्या काव्याशी असल्याचे स्पष्टत्वे दिसते.
विविध भाषाभ्यासक व साहित्य संशोधक ह्या गीतांच्या रचनेचा काल सहाव्या ते चौदाव्या शतकांच्या दरम्यान विविध प्रकारे प्रतिपादन करतात. त्याबाबत एकवाक्यता आढळत नाही. ह्या रचनेच्या पाठचिकित्सेबाबत नंतरच्या संशोधकांनी तिच्या तिबेटी अनुवादाचा मागोवा घेतला आणि ह्या अनुवादाचा सखोल अभ्यास करून काही निष्कर्ष काढले. या दृष्टीने प्रबोधचंद्र बागची यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. हरप्रसादांच्या संस्करणात या रचनेचे मूळ नाव चर्याचर्य-विनिश्चय असे होते तथापि विधुशेखर शास्त्री यांनी तिचे मूळ नाव आश्चर्यचर्याचय असावे, असा अभिप्राय व्यक्त केला आहे. बागची यांनी मूळ रचनेचे नाव चर्या-श्चर्य-विनिश्चय आणि तिबेटी अनुवादातील नाव चर्यागीतिकोश असल्याचे प्रतिपादिले आहे. सुकुमार सेन यांनीही आपल्या ओल्ड वज्रयानी टेक्स्ट ह्या ग्रंथात तिला चर्यागीतिच म्हटले आहे.
ह्या रचनेच्या तिबेटी अनुवादावरून असे दिसते, की मुनिदत्त नावाच्या पुरुषाने तिचे सध्या आहे त्या स्वरूपात प्रथम संकलन करून त्यावर संस्कृत टीकाही लिहिली नंतर चौदाव्या शतकात किर्तिचंद्र याने नेपाळमधील पंबुनगर येथे मूळ रचनेचा (मुनिदत्तकृत टीकेसह) तिबेटी भाषेत अनुवाद केला. मूळ रचनेवरील मुनिदत्ताची संस्कृत टीका अर्थनिर्णयाच्या दृष्टीनेच नव्हे, तर इतरही दृष्टीने महत्वाची मानली जाते. मुनिदत्ताने ५० चर्यागीतांचे संकलन केले होते तथापि मूळ हस्तलिखितातील ५ ताडपत्रे गहाळ झाल्यामुळे हरप्रसादांच्या संस्करणातही चोविसावे आणि पंचविसावे चर्यागीत तसेच तेविसाच्या चर्यागीताच्या काही ओळी उपलब्ध आहेत. बागची यांनी मात्र आपल्या संस्करणात गहाळ गीतांचे तिबेटी अनुवाद व त्यांची संस्कृत टीकाही दिली आहे.
हरप्रसादांच्या संकलनात नसलेली सरहपा, काण्हपा, विनयश्री व इतर काही सिद्धाचार्यांची गीते व दोहे राहुल सांकृत्यायन यांना सापडले असून ते त्यांनी प्रसिद्धही केले आहेत. याचा अर्थ बौद्ध गान ओ दोहा ह्या हरप्रसादांच्या संस्करणात असलेल्या ५० दोह्यांव्यतिरिक्त इतरही अनेक दोहे व गीते त्या काळी रचली असावीत व ती फार मोठ्या भूप्रदेशात लोकप्रिय व प्रचलितही असावीत.
जयदेवाच्या गीतगोविंदाच्या रचनेसारखा आकृतिबंध ह्या चर्यागीतांत दिसून येतो. त्यांतील प्रत्येक गीतावर रागाचे नाव व शेवटच्या दोन ओळींत (बहुतेक ठिकाणी) ते रचणाऱ्या कवीचे नाव आहे. दुसरी ओळ ध्रुवपद म्हणून येते. बहुतांश गीते १० ओळींची आहेत फक्त तीनच गीते १४ ओळींची आहेत. छंदोरचना अक्षरवृत्ताची असून तिचे दोन प्रकार आढळतात : (१) १५ (१६) अक्षरे, आठव्या अक्षरावर यती व हिंदी –राजस्थानी-गुजरातीतील चौपाईसारखी आणि (२) २५ (२६) अक्षरे, ८ व १६ अक्षरांवर यती व त्रिपदीयुक्त. हा दुसरा प्रकार अर्थातच नंतरच्या काळातील मानला जातो. ही गीते बौद्ध तांत्रिक सिद्धाचार्यांनी रचल्याचे मानले जाते परंतु त्यांत शैव, योगमार्गी व वैष्णव तांत्रिकांचाही गुह्याचार आलेला दिसतो. उदा., लुईपा, सरहपा, भुसुक, दारिक, महिण्डा, अजदेव यांच्या गीतांत तंत्रापेक्षा योगमार्गी आचारविचारांचे सूचन होते. तथापि बहुतांश गीतांतून त्या काळी पूर्व भारतात प्रचलित असलेल्या सहजयानी तांत्रिक बौद्ध मताच्या आचारविचारांचाच ठसा प्रभावी आहे.
यांतील तीन गीते निनावी व चार गीते शिष्यांनी लिहिलेली असून त्यांवर त्यांच्या गुरूंच्या नावांचा निर्देश आहे. चार कवींचा अपवाद सोडल्यास प्रत्येक कवीचे एकच गीत त्यांत आहे. ह्या चार कवींत लुइपाची २, सरहपाची ४ (किंवा ३), भुसुकाची ८ व काण्हपाची १२ गीते आहेत. अंतःसत्त्व व शब्दकळा यांबाबत ह्या रचनेचे साम्य कबीराच्या दोह्यांशी, मैथिली कवी विद्यापतीच्या रचनेशी तसेच बंगालीतील लोकगीते-वा बाउलगीते-यांच्याशी असल्याचे दिसते. ही रचना सांप्रदायिकांसाठी केली असून ती द्वयर्थी आहे. ही द्वयर्थी भाषा ‘संध्याभाषा’ म्हणून ओळखली जाते. ह्या रचनेची प्रेरणा वाङ्मयीन नसून पंथीय आहे. तीत बाह्यार्थाने खरा आंतरिक अर्थ आवृत्त व्हावा हाच हेतू आहे. हा आंतरिक, आध्यात्मिक अर्थ गूढार्थ, गूढानुभूती व आत्मसाक्षात्काराच्या वाटेवरील गुरूची भावना व्यक्त करणे हा असल्याने ही रचना कूटात्मक व गूढगुंजनपर आहे. मागधी अपभ्रंशमधून उत्क्रांत झालेल्या आधुनिक भारतीय भाषांतील मैथिली, बंगाली, ओडिया व असमिया ह्या भाषांच्या दृष्टीने ह्या रचनेस विशेष महत्त्व आहे. ह्या भाषांच्या विकासक्रमातील काही आद्य नमुने व दुवे ह्या रचनेत आढळतात. शैव संप्रदाय, तंत्रमार्ग, योगमार्ग, नाथ संप्रदाय व बौद्ध धर्म ह्या धार्मिक मतांच्या दृष्टीनेही ही रचना विशेष महत्त्वाची ठरते.
संदर्भ : 1. Bagchi, Prabodh Chandra, “Charyagitikosh of the Buddhist Siddhas”, Vishvabharati Quarterly, Santiniketan, 1956.
2. Bhattacharya, Binoytosh, An Introduction to Buddhist Esoterism, London, 1932. 3. Dasgupta, Shashibhusan, Obscure Religious Cults, Calcutta, 1962. 4. Shastri, Hara Prasad, Bauddhagan O Doha (2nd Edi.) Calcutta. 1959. 5. सांकृत्यायन, राहुल, सिद्ध सराहपादकृत दोहाकोश, पाटणा, १९५७.
सुर्वे, भा. ग.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..