बौद्ध कला : बौद्ध कलेचा उगम भारतामध्ये इ.स.पू. तिसऱ्या शतकामध्ये झाला आणि त्यानंतर सु. दीड हजार वर्षांच्या काळात ही कला प्रायः सर्व आशिया खंडात पसरली. जेथे जेथे बौद्ध धर्म पोहोचला, तेथे तेथे बौद्ध कला पोहोचली व तिचा परिपोष झाला. चीनसाररख्या ज्या देशातून पूर्वीपासून समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा होती, तेथील बौद्ध कलेला प्रादेशिक विशेष लाभले तसेच कालिक गुणधर्मही प्राप्त झाले. या संभारातही काही समान सूत्रे सांगता येतील.
वास्तुकला, मूर्तिकला व चित्रकला या तीनही कलाप्रकारांत बौद्ध कलेचा आविष्कार झाला. ⇨स्तूप (उदा., ⇨सांची, ⇨अमरावती, ⇨बोरोबूदूर) ⇨चैत्य व ⇨विहार (उदा.,⇨सांची, ⇨नालंदा) हे बौद्ध कलेचे वास्तुविशेष होत. शैलशिल्पे-डोंगरात कोरलेली मंदिरे व मठ –ही बौद्ध कलेइतकी मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या प्रभावीपणे अन्य कोणत्याच कलापरंपरेत वापरलेली नाहीत. म्हणून शैलशिल्प हा बौद्ध कलेचा सगळ्यात ठळक असा विशेष म्हणून सांगता येतो (अजिंठा, ⇨बामियान). हीनयान पंथीयांनी प्रार्थना-मंडप उभारले तर महायान पंथीयांनी बुद्धमूर्तीसाठी देवालये बांधली अथवा खोदली. बोद्धधर्मीयांनी बांधलेल्या अतिप्राचीन वास्तू आज जवळपास अस्तित्वात नाहीत.
हीनयान काळातील सर्व मूर्तिकाम वास्तूच्या आश्रयाने, वास्तूच्या सजावटीसाठी निर्माण झाले. जातककथा (⇨भारहूत) व बुद्धचरित्र (अमरावती) लोकांसमोर ठेवणे, हा या मूर्तिकामाचा उद्देश होता. ते करीत असताना कलाकारांनी तत्कालीन जीवनाचे बहारदार दर्शन घडविले आहे. त्यातील मुक्त व जिवंत शिल्पांकन हे बौद्ध धर्माच्या प्रारंभीच्या काळातील साध्यासुध्या तत्त्वज्ञानाची सुसंगत होते. लोकजीवन, श्रद्धा व परंपरा यांना जवळचे होते. यानंतरच्या महायान काळात बुद्धाच्या शारीर मूर्ती घडविण्यास प्रारंभ झाला. गांधार व मथुरा या केंद्रांत कुशाण राजवंशाच्या आश्रयाने हा संप्रदाय बहरला. अजिंठा, वेरूळ, बामियान व कालांतराने सर्वच देशात मूर्तींची निर्मिती झाली. सुरुवातीच्या काळात मूर्तीच्या चेहऱ्यावर एक शांत व सात्त्विक भाव कोरण्यात कलाकारांना यश आले, पण पुढे त्या साचेबंद झाल्या, त्यांच्या मुद्रेवरील स्मितसुद्धा कृत्रिम भासू लागले. गौतमाच्या जोडीला बोधिसत्त्व, यक्षगण, देवता यांच्याही मूर्ती निर्माण झाल्या. कथनशिल्प जवळपास लोप पावले. या पुढच्या काळात वज्रयान व तांत्रिक पंथांचा उदय झाला आणि वर्ण्य विषयांची व मूर्तींची विविधता व संख्या कितीतरी पट वाढली. अमिताभ, मैत्रेय, प्रज्ञापारमिता, वज्रचर्चिका अशा देवदेवतांच्या स्वतंत्र आणि ‘यब-युम’ म्हणजे मिथुनरूपी मूर्ती प्रचलित झाल्या. या दगडी तशाच पंचधातूंच्या होत्या. बंगाल, नेपाळ व तिबेट या भागांत अशा असंख्य मूर्ती मिळाल्या आहेत. देवदेवतांची संख्या व त्यांच्याभोवती उभारलेले कर्मकांड वाढत गेले, तसतसा या मूर्ती जास्तीत जास्त कृत्रिम होत गेल्या. शिल्पकाम क्वचित मुक्त असले, तरी बव्हंशी त्यात एक प्रकारचा साचेबंदपणा जाणवतो.
कथनात्मक चित्रकलेला बौद्ध कलेत फार मोठे स्थान होते (उदा., अजिंठा, ⇨बाघ, मध्य आशिया). रंगयोजना व रेषालालित्य यांसाठी लक्षणीय ठरलेली अजिंठ्याची चित्रकला सर्वदूर जाऊन पोहोचली. मूर्तिकलेप्रमाणेच चित्रातही कथनाची जागा व्यक्तिचित्रणाने घेतली आणि कलाकाराच्या स्वातंत्र्यावर बंधन पडले, चित्रविषय मर्यादित झाले. भित्तिचित्रांपेक्षा कापडी भारतीय पटचित्रे तसेच तिबेटी ⇨टंकचित्रे जास्त लोकप्रिय ठरली. त्यावर मूर्ती व मूर्तिव्यूह यांचे चित्रण करण्यात येऊ लागले. दुसरीकडे हस्तलिखित ग्रंथांत आणि ग्रंथांच्या वेष्टणांवर चित्रे रंगविण्यास प्रारंभ झाला. आज उपलब्ध ग्रंथ, चित्रे व वेष्टण-चित्रे ही व्यक्तींची आहेत, कथनाचे नव्हेत. रंगयोजना व रेषा आकर्षक आहेत, पण ती ठराविक आवर्तातच फिरतात.
बौद्ध कलेचे पूर्व व उत्तर असे दोन भाग कल्पिले, तर पूर्वकालीन कला अधिक जिवंत, जनसामान्यांना जवळची व प्रयोगशील म्हणतात येते तर उत्तरकालीन कला कर्मकांडबद्ध व साचेबंद मानली जाते. गौतमाच्या शारीरमूर्तीचे अस्तित्व एवढाच अनुबंध दोहोंमध्ये समान राहिला आहे.
पहा : अजिंठा कुशाण वंश गांधार शैली तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म प्रतिमाविद्या बुद्धमूर्ति बौद्ध धर्म.
संदर्भ : 1. Bhattacharyya, Benoytosh, The Indian Buddhist lconography, Calcutta, 1958. 2. Frederic, Louis Trans. Rosin, Arnold, The Art of Southeast Asia, New York. 3. Government of India Publication. The Way of Buddha, Delhi, 1938. 4. Hallade, Madeleine, The Gandhara Style and the Evolution of Buddhist Art, London, 1968. 5. Marshall, John, The Buddhist Art of Gandhara, London, 1960. 6. Rowland, Benjamin, The Art of Architecture of India : Buddhist, Hindu, Jain, London, 1959. 7. Snellgrove, David, Ed. The Image of the Buddha, New Delhi, 1978. 8. Zimmer, Heinrich, The Art of Indian Asia, 2 Vols., New York, 1960.
माटे म. श्री.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..