बोहरा: इस्लाममधील शियापंथी लोक इथ्नाअशारी आणि इस्माइली अशा दोन प्रमुख पंथांत विभागलेले आहेत. बोहरा हे ⇨इस्माइली पंथाच्या एका उपपंथाचे अनुयायी आहेत. ⇨खोजा हा इस्माइली पंथाचा दुसरा उपपंथ असून ⇨आगाखानांचे भारतीय अनुयायी या उपपंथात मोडतात. १४ वे इमाम इस्माइल यांच्या नावावरून ‘इस्माइली’ हे नाव निष्पन्न झाले आहे. १८ वे इमाम मुस्तनसीर साहेब यांच्या मृत्यूनंतर मुस्तली साहेब व निझार या त्यांच्या दोन पुत्रांमध्ये उत्तराधिकाराच्या प्रश्नावरून झगडा निर्माण झाला. ज्यांनी मुस्तली यांचे अनुयायित्व पतकरले, ते ‘मुस्तली’ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि ज्यांनी निझार यांचे अनुयायित्व पतकरले, ते ‘निझारी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. बोहरा हे मुस्तली आहेत, तर खोजा हे निझारी आहेत.
२१ इमाम होऊन गेले अशी बोहरांची श्रद्धा आहे. प्रेषित मुहंमद पैगंबर यांचे जावई हझरत अलीसाहेब आणि पैगंबरांची कन्या व इस्लामची पवित्र महिला फातिमा या दोघांचे पुत्र इमाम हसन यांच्यापासून इमामांच्या उत्तराधिकाराची परंपरा सुरू झाली व एकूण २१ जणांनी अधिकारग्रहण केले. इमाम तय्यिब हे २१ वे इमाम होते. धर्मवेड्या लोकांच्या उठावामुळे हिजरी सन ५२४ मध्ये (इ. स. ११३०) इमाम तय्यिब यांनी ईजिप्तमध्ये एकांतवास पतकरला. ते अजूनही एकांतवासात रहात आहेत आणि भावी काळात आपल्या अनुयायांपुढे प्रकट होतील, अशी बोहरांची श्रद्धा आहे.
धार्मिक अधिकाऱ्यांचा अंतर्भाव असलेले इमामांचे एक धर्ममंडळ होते. त्या मंडळातील सदस्य असलेली अरवा नावाची एक महिला दक्षिण अरेबियातील येमेन येथे पळून गेली. तेथे तिने ‘दावत-ए-तय्यिबी’ (इमाम तय्यिब यांचे धर्ममंडळ) या संस्थेची स्थापना केली. दाई हा या धर्ममंडळाचा प्रमुख असतो. दोन्ही शब्द अरबी आहेत. दाई म्हणजे ‘निमंत्रक’, प्रस्थापित धर्मसंस्थेकडे येण्याचे जो निमंत्रक देतो तो. दाईंना नेमणुकीने उत्तराधिकार देण्याची परंपरा अरवाच्या काळापासून चालू आहे. प्रत्येक दाई ज्याची धर्मनिष्ठा व धर्मज्ञान विख्यात आहे, अशा व्यक्तीची दाई म्हणून नेमणूक केल्याची जाहीर घोषणा आपल्या मृत्यूपूर्वी अनुयायांपुढे करीत असे. येमेनी दाईने अब्दुल्ला नावाचे एक धर्मप्रचारक भारतात पाठविले. अब्दुल्ला खंबायतमध्ये उतरले. त्यांनी कित्येक उच्च वर्णीय हिंदूंना, प्रामुख्याने ब्राह्मणांना, धर्मांतरित केले. या धर्मांतरितांमध्ये भरमल व तरमल नावाचे एका राजाचे दोन मंत्रीही अंतर्भूत होते. मुंबईमध्ये भरमल हे आडनाव असलेली कित्येक बोहरा कुटुंबे आहेत. हे आडनाव त्यांच्या वंशपरंपरेचे मूळ सूचित करते. यावरून भरमल व तरमल यांचे वंशज आजही अस्तित्वात असल्याचे दिसते. २३ वे येमेनी दाई-उल्-मुत्लक मुहंमद इझ्झुद्दीनसाहेब यांनी सिद्धपूर (द. गुजरात) येथील युसूफ नावाच्या एका भारतीयाची आपल्या मृत्यूनंतर उत्तराधिकार घेणारा २४ वा दाई-उल्-मुत्लक म्हणून नेमणूक केली. युसूफ यांनी ‘नज्मुद्दिन’ हा किताब धारण केला. ते पहिले भारतीय दाई-उल्-मुत्लक होते. युसूफनंतर भारतातील दाईंची परंपरा सुरू झाली. सध्याचे दाई मुहंमद बुऱ्हानुद्दीनसाहेब हे ५२ वे दाई-उल्-मुत्लक आहेत. त्यांचे वास्तव्य मुंबईमध्ये असते. ते औरंगाबादच्या शेख जीवनजीसाहेबांचे वंशज आहेत. ‘जीवन’ हे नाव त्यांचे मूळ हिंदू ब्राह्मणी असल्याचे सूचक आहे. आपल्या पदाचा धार्मिक वेश म्हणून पगडी, जामा व दुपट्टा हा भारतीय वेश स्वीकारला.
२५ वे दाई-उल्-मुत्लक दाऊद बिन अजबशाह यांनी अहमदाबाद येथे धर्ममंडळाची स्थापना केली. त्यांनी अकबर बादशाहाच्या दरबारात जाऊन आपल्या अनुयायांसाठी सुरक्षित आश्रयस्थानाची सनद मिळविली पण औरंगजेब बादशाहाने या सनदेचा मान राखला नाही. ३२ वे दाई-उल्-मुत्लक कुत्बुद्दीन कुत्बशाह यांनी शिया पंथ सोडण्यास नकार दिल्यामुळे औरंगजेबाने त्यांच्या हत्येचा हुकूम दिला. कुत्बशाह यांची संगमरवरी कबर अहमदाबाद येथे आहे.
दाऊद बिन कुत्बशाह यांच्या काळात सुलैमान नावाच्या आणखी एक जणाने दाईपदावर आपला हक्क सांगितला. सुलैमान यांनी ‘सुलैमानी बोहरा’ या नावाने एक स्वतंत्र पंथ सुरू केला आणि काही जणांनी त्यांचे अनुयायित्व पतकरले. ज्यांनी या दाऊद बिन कुत्बशाह यांचे अनुयायित्व पतकरले, ते लोक तेव्हापासून ‘दाऊदी बोहरा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. बोहरांपैकी बहुसंख्य लोक दाऊदी बोहराच आहेत.
पुन्हा एकदा म्हणजे पस्तिसाव्या दाईंच्या काळात अली नावाच्या आणखी एक जणाने आपण सनदशीर मार्गाने नेमले गेलेले दाई आहोत, असे जाहीर केले. त्यांनी काही अनुयायी मिळविले आणि बडोदा येथे आपल्या धर्ममंडळाची स्थापना केली. त्यांचे अनुयायी ‘अलिया बोहरा’ म्हणून ओळखले जातात. हे लोक म्हणजे एकूण बोहरांपैकी एक छोटा असा अल्पसंख्य गट आहे.
पहिल्यांदा धर्मांतरित झालेले बहुसंख्य लोक ब्राह्मण व्यापारी होते, म्हणून या पंथाला ‘बोहरा’ असे नाव देण्यात आले आहे. व्यापार या अर्थाच्या ‘वेह्वार’ या गुजराती शब्दापासून (संस्कृत-व्यवहार) बोहरा हा शब्द बनला आहे. बोहरा समाज हा अजूनही मोठ्या प्रमाणात व्यापारीच आहे आणि त्याने आपले जीवन शांततामय व्यवसायांना वाहिलेले आहे. हा अल्पसंख्य समाज राजकारणापासून अलिप्त असून पोलिसांच्या नोंदींमध्ये तो राजकीय महत्त्वाकांक्षांपासून मुक्त आहे.
झैदी, अब्देअली तय्यबअली (इं.) साळुंखे, आ. ह. (म.)
बहुसंख्य बोहरा हे शियापंथी व व्यापारी असले, तरी काही बोहरा हे सुन्नी असून ते प्रामुख्याने शेती करतात. १५३९ पर्यंत बोहरांचे पंथप्रमुख येमेनमध्येच राहत असत. भारतातील बोहरा त्यांच्याकडे जाऊन आपल्या समस्या त्यांच्याकडून सोडवून घेत. परंतु येमेनपेक्षा भारतातील अनुयायांची संख्या खूपच वाढल्यामुळे १५३९ साली पंथप्रमुख येमेनहून द. गुजरातमधील सिद्धपूर येथे आले.
१७८९ मध्ये अलिया या उपशाखेतून फुटून नागोशी (शाकाहारी) नावाची दुसरी उपशाखा निर्माण झाली. मुझफ्फर शाह याच्या राजवटीत (१४०७-१४११) सुन्नी झालेल्या बोहरांना ‘जाफरी बोहरा’ म्हणतात. पंधराव्या शतकातील सय्यिद अहमद जाफर शिराझी यांच्या वंशजांना ते आपले गुरू मानतात. ‘हिबती’ किंवा ‘हिप्तीया’ (अठराव्या शतकाच्या शेवटी) ही उज्जैनची आणि महदी बागवाला (१८९७) ही नागपूरची, अशा गौण उपशाखाही आहेत.
बोहरांच्या धार्मिक नियंत्रणव्यवस्थेला ‘दावत’ असे म्हणतात. ‘दाईं’नी आमिल नावाचे स्थानिक अधिकारी नेमलेले असतात. ते दावतचे सेवक असतात. विवाहादी समारंभातील धार्मिक विधी करण्याचे आणि अनुयायांचे तंटे ‘दाईं’कडे नेण्याचे काम ते करतात. बोहरा लोक प्रामुख्याने गुजरात व मुंबई येथे असून भारताच्या इतर शहरांतून व पूर्व आफ्रिका, श्रीलंका इ. ठिकाणीही ते अल्प प्रमाणात आढळतात.
साळुंखे, आ. ह.
संदर्भ : 1. Fyzee, A. A. A. “A Cronological List of the Imams and the Dai’s of the Mustalian Ismailis,” Journal of Bombay Branch of the Royal Asiatic Society, Bombay, 1934. 2. Ivanow, W. A Guide to Ismaili Literature, London, 1933.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..