बोल्यॉई, यानोश : (१५ डिसेंबर १८०२ – २७ जानेवारी १८६०). हंगेरियन गणितज्ञ. अयूक्लिडीय भूमितीचे [⟶ भूमिती] एक मूळ शोधक म्हणून प्रसिद्ध. फॉर्कॉश बोल्यॉई यांचे हे पुत्र होत. यानोश यांचा जन्म हंगेरीतील कॉलॉझ्व्हार (आता रूमानियातील क्लूझ) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मॉरॉशव्हाशाऱ्हे (आता टर्गू मुरेश, रूमानिया) येथे झाले. प्रथमतः वडिलांनीच त्यांना शिकविले. लहानपणापासूनच त्यांनी गणितात व संगीतात प्राविण्य दाखविले. १८१५-१८ या काळात त्यांनी वडील ज्या महाविद्यालयात प्राध्यापक होते तेथेच शिक्षण घेतले. नंतर १८१८-२२ मध्ये त्यांनी व्हिएन्ना येथील रॉयल एंजिनियरिंग ॲकॅडेमीत लष्करी शिक्षण घेतले. १८२३-३३ या काळात लष्करात नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यावर ते वडिलांच्या गावी परतले.
वडिलांप्रमाणेच त्यांनाही यूक्लिड यांच्या समांतर रेषांच्या गृहीतकात रस निर्माण झाला. वडिलांनी १८२० मध्येच त्यांना या विषयात व्यर्थ वेळ खर्च करू नये असा इशारा दिलेला होता. तथापि त्याच वर्षी यानोश यांनी निराळ्याच दिशेने विचार करण्यास सुरुवात केली. यूक्लिड यांच्या इतर भूमितीय गृहीतकांपासून समांतर रेषांचे गृहीतक स्वतंत्र असून ते सिद्ध करणे अशक्य आहे आणि भूमितीच्या रचनेत हे गृहीतक आवश्यकही नाही, असे त्यांनी दाखविले. १८२३ मध्ये त्यांनी समांतर गृहीतकविरहित भूमितीची रचना करता येईल ही कल्पना वडिलांना कळविली. त्याप्रमाणे समांतर गृहीतकविरहित अशी संपूर्ण, सुसंगत व पद्धतशीर भूमिती विकसितही केली आणि वडिलांना ही माहिती कळविली. फॉर्कॉश यांना ही कल्पना पसंत पडली नाही तथापि त्यांनी या माहितीचे हस्तलिखित गौस यांना पाठविले. गौस यांनी अशा भूमितीच्या शोधाची पूर्वीच अटकळ केली होती व ३०-३५ वर्षे त्यासंबंधी विचारही केलेला होता पण त्यांनी त्या शोधाच्या श्रेयावर आपला हक्क सांगितला नाही. १८३२ मध्ये गौस यांनी यासंबंधी फॉर्कॉश यांना पाठविलेल्या पत्रामुळे यानोश निराश झाले. तथापि त्यांनी वडिलांच्या Tentamen या ग्रंथाच्या पुरवणीत यासंबंधीचा आपला चोवीस पृष्ठांचा निबंध Appendix scientiam spati absolute veram exibens या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यास संमती दिली. ⇨न्यिकली इव्हानव्ह्यिच लोबाचेव्हस्की या रशियन गणितज्ञांनी १८२६ मध्ये याच स्वरूपाच्या भूमितीच्या विकासास स्वतंत्रपणे प्रारंभ केला होता आणि १८२९ मध्ये आपले कार्य पूर्ण झाल्यावर प्रसिद्ध केले होते. लोबोचेव्हस्की यांच्या काऱ्याची माहिती १८४८ मध्ये बोल्यॉई यांना समजली. अशा प्रकारे पूर्व-प्रकाशनाच्या निकषावर लोबोचेव्हस्की यांना अयूक्लिडीय भूमितीच्या शोधाचे श्रेय सामान्यतः देण्यात येते. रिचर्ड बाल्टझर यांनी १८६७ मध्ये आपल्या Elemente der Mathematik या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत बोल्यॉई व लोबोचेव्हस्की यांच्या कार्यांचे विवरण करेपर्यंत Tentamen मधील पुरवणी उपेक्षितच राहिली होती. जूल्स हॉएल यांनी १८६७ मध्ये लोबोचेव्हस्की यांच्या ग्रंथाचे व १८६८ मध्ये बोल्यॉई यांच्या निबंधाचे फ्रेंचमध्ये भाषांतर केले. एऊजान्यो बेल्ट्रामी (१८६८) व फेलिक्स क्लाइन (१८७१) यांच्या कार्यानंतरच बोल्यॉई यांच्या कार्याचे खरे मूल्यमापन झाले.
बोल्यॉई पितापुत्रांनी याब्लोनॉव सोसायटी या संस्थेने १८३७ मध्ये आयोजित केलेल्या ‘सदसत् संख्या’ [⟶संख्या] या विषयावरील निबंधस्पर्धेसाठी निबंध पाठविले होते तथापि त्यांचे निबंध पारितोषिकपात्र ठरले नाहीत. यानोश यांनी केवल भूमिती, केवल त्रिकोणमिती व गोलीय त्रिकोणमिती यांतील संबंध आणि केवल अवकाशातील चतुष्फलकाचे घनफळ यांविषयी महत्त्वाचे कार्य केले. ते मॉरॉशव्हाशाऱ्हे येथे मृत्यू पावले.
सूर्यवंशी, वि. ल.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..