ख्वारिज्मी, अल् : (सु. ७८०–८५०). अरबी गणितज्ञ व ज्योतिषशास्त्रज्ञ. पूर्ण नाव महमद इब्न मुसा अल् ख्वारिज्मी. त्यांचा जन्म ख्वारिज्म (आता रशियात असलेल्या) येथे झाला असावा असा तर्क आहे. अल् मामुम व अल् मुतासिम या खलिफांच्या कारकीर्दीत ख्वारिज्मी यांनी बगदाद येथील वेधशाळेत काम केले, तसेच विज्ञान व गणित विषयांवर ग्रंथ लिहिले. किताब अल्-जाब्र वाल मुकाबला  या नावाच्या बीजगणितावरील आपल्या ग्रंथात त्यांनी एकघाती आणि द्विघाती समीकरणांचे अंकगणितात्मक निर्वाह काढण्याचे नियम, प्राथमिक भूमिती इ. विषयांचे विवरण केले होते. या ग्रंथाचे पुढे लॅटिनमध्ये भाषांतर झाल्यानंतर मध्ययुगीन यूरोपात गणिताच्या अभ्यासाला मोठी चालना मिळाली. या ग्रंथाच्या नावावरूनच ‘आल्जिब्रा’ हा शब्द पुढे रूढ झाला. हिंदूंच्या दशमान पद्धतीवरील ख्वारिज्मी यांच्या ग्रंथाचा काही अवशेष लॅटिन भाषांतराच्या स्वरूपात अद्यापही सुरक्षित आहे. या ग्रंथामुळेच यूरोपला दशमान पद्धतीच्या संख्यालेखनाचा व गणितक्रियांचा परिचय झाला. ब्रह्मसिद्धांत या भारतीय ग्रंथावर आधारलेल्या सिंद-हिंद  या अरबी ग्रंथावरून ख्वारिज्मी यांनी ज्योतिषीय कोष्टके तयार केली होती.

वाड, श. स.