माँझ, गास्पार : (१० मे १७४६–२८ जुलै १८१८). फ्रेंच गणितज्ञ व भौतिकीविज्ञ. अभियांत्रिकीय आरेखनात महत्त्वाच्या ठरलेल्या वर्णनात्मक भूमिती [⟶ भूमिती] या गणितीय शाखेच्या स्थापनेकरिता विशेष प्रसिद्ध.

माँझ यांचा जन्म बोन येथे झाला. बोन व लीआँ येथील महाविद्यालयांत शिक्षण घेतल्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी काही काळ लीआँ येथील महाविद्यालयात भौतिकीचे अध्यापन केले. १७६४ मध्ये त्यांनी बोन गावचा एक मोठ्या प्रमाणावरील नकाशा तयार केला आणि त्याकरिता त्यांनी स्वतःच निरीक्षण पद्धती योजून आवश्यक सर्वेक्षण उपकरणे बनविली. या नकाशाच्या गुणवत्तेमुळे प्रभावित होऊन एका लष्करी अधिकाऱ्यांनी मेझ्यॅर येथील लष्करी शाळेच्या प्रमुखांकडे माँझ यांची शिफारस केली .तथापि तेथे त्यांची केवळ आरेखक या पदावर नेमणूक झाली. तेथे एका किल्ल्यावर तोफा बसविण्याच्या जागा ठरविण्याची समस्या माँझ यांनी एक भूमितीय पद्धत योजून अतिशय जलदपणे सोडविली. ही पद्धत फार मौलिक वाटल्याने १७९५ पर्यंत एक लष्करी गुपित म्हणून राखण्यात आली. मेझ्यॅर येथे पुढे संशोधन करून त्यांनी बांधकामातील समस्यांकरिता आपली भूमितीय व्यापक पद्धत अधिक विकसित केली. हाच विषय पुढे वर्णनात्मक भूमिती म्हणून ओळखला जाऊ लागला.

माँझ यांनी १७६८–८३ या काळात मेझ्यॅर येथे भौतिकी व गणित या विषयांचे अध्यापन केले. त्याबरोबरच १७८० मध्ये पॅरिस येथील लूव्हर येथे द्रविकीच्या (पाणी व इतर द्रव्य यांच्या गतीच्या व्यावहारिक उपयोगासंबंधीच्या शास्त्राच्या अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली. त्याच वर्षी फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. १७८३ पासून सार्वजनिक कार्यात सक्रिय भाग घेण्यासाठी त्यांनी पॅरिस येथे वास्तव्य केले. १७८३–८९ या काळात त्यांनी नाविक छात्रसैनिकांचे परीक्षक म्हणून काम केले. वजने व मापे यांच्या प्रमाणीकरणासाठी नेमलेल्या समितीवर त्यांनी काम केले आणि या समितीनेच १७९१ मध्ये मेट्रीक पद्धती प्रस्तापित केली. १७९२–९३ मध्ये ते नौसेना व वसाहती या खात्यांचे मंत्री होते. त्याचबरोबर ते शस्त्रास्त्रे व दारूगोळा यांच्या उत्पादनाचे प्रभारीही होते. त्यांनी १७९५ साली इन्स्टिट्यूट नॅशनल द फ्रान्स या संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाचा भाग घेतला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात राष्ट्रीय संरक्षणांच्या कार्यात सहभागी होण्याच्या दृष्टीने त्यांना धातूंच्या ओतशालांच्या कामावर देखरेख केली आणि तोफा व पोलाद यांच्या शालांत कामावर देखरेख केली आणि तोफा व पोलाद यांच्या निर्मितीत कारखान्यांना उपयुक्त ठरतील अशी निदेशपुस्तकेही लिहिली. १७९४–९५ मध्ये त्यांनी एकोल नॉर्मल या संस्थेत अध्यापन केले आणि तेथे त्यांना प्रथमच वर्णनात्मक भूमितीची तत्त्वे शिकविण्यास परवानगी मिळाली.

एकोल पॉलिटेक्निक ही संस्था १७९५ मध्ये स्थापन करण्यात त्यांनी केलेले कार्य गणितीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. या संस्थेत प्रशासक म्हणून काम करण्याबरोबरच त्यांनी वर्णनात्मक, वैश्लेषिक व अवकल भूमितीचे [⟶ भूमिती] अध्यापन केले. त्यावेळी या विषयांवरील पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याने माँझ यांची व्याख्याने संपादित करून विद्यार्थ्याच्या उपयोगाकरिता प्रसिद्ध करण्यात आली. त्याच्या एकोल नॉर्मल येथील व्याख्यानांवर आधारलेल्या Geometrie Descriptive (१७९९) या पाठ्यापुस्तकात त्यांनी त्रिमितीय अवकाशातील घन आकृतीचे द्विमितीय प्रतलावर निदर्शन करण्याची आपली प्रक्षेप पद्धत [⟶ आरेखन, अभियांत्रिकीय] विकसित केली. Feuilles d’analyse appliquee a la geometrie (१८०१) या त्यांच्या दुसऱ्या पाठ्यपुस्तकात त्यांनी त्रिमितीय भूमितीतील बैजिक पद्धती प्रस्थापित केल्या. त्यांच्या नवीन पद्धतीमुळे अभियांत्रिकीय अभिकल्पात (आराखड्यात) मोठी क्रांती झाली. त्यांच्या यशस्वी पाठ्यपुस्तकांमुळे व लोकप्रिय व्याख्यानांमुळे गणिताच्या शिक्षणात लक्षणीय प्रगती झाली. त्यांनी भौतिकीय प्रश्न सोडविण्यासाठी गणिताचा उपयोग केला व स्थितिकीवरील (भौतिक पदार्थामध्ये समतोल निर्माण करणाऱ्या प्रेरणांमधील संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रावरील) Trait elementaire Statique (१७८८) हा ग्रंथ लिहिला. त्रिमितीय वैश्लेषिक भूमितीवर त्यांनी जे. एन्‌. पी. आशेत यांच्यासमवेत लिहिलेला Application de I’ algebre  a la geometrie (१८०५) हा ग्रंथही सुप्रसिद्ध आहे. गणितीय विश्लेषणातही त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. दुसऱ्या कोटीच्या आंशिक अवकल समीकरणांचा [⟶ अवकल समीकरणे]. समावेश असलेले अवकल समीकरणांवरील महत्त्वाचे संशोधन लेख त्यांनी लिहिले. वक्रतेसंबंधी माँझ यांनी प्रस्थापित केलेला व्यापक सिद्धांत पुढे जी. एफ. बी. रीमान यांच्या भूमिती व वक्रता यांवरील क्रांतिकारक कार्यात मूलभूत ठरला.

माँझ यांची १७९६ मध्ये नेपोलियन यांच्याबरोबर अधिकृत भेट झाली आणि त्यानंतर ते नेपोलियन यांचे विश्वासू व जिवलग मित्र झाले. माँझ यांना त्यांनी आपल्या लष्करी मोहिमांकरिता आर्थिक मदत होण्याच्या दृष्टीने इटलीतील चित्रे व पुतळे यांची निवड करण्यासाठी पाठविले. यांतील कित्येक कलावस्तू नंतर लूव्हर येथे ठेवण्यात आल्या. १७९८ मध्ये नेपोलियनबरोबर ते ईजिप्तला गेले आणि तेथे इन्स्टिट्यूट द फ्रान्सच्या धर्तीवर इन्स्टिट्यूट द ईजिप्त ही संस्था स्थापन करण्यासाठी त्यानी मदत केली. १७९९ मध्ये नेपोलियनबरोबर फ्रान्सला परतल्यावर माँझ यांनी एकाल पॉलिटेक्निकमधील आपले कार्य पुन्हा सुरू केले. १८०४ मध्ये सिनेटर म्हणून त्यांची तहहयात नेमणूक झाली आणि नेपोलियन यांनी त्यांना काँत (काउंट) द पेल्यूझ हा किताब (१८०८) व इतर सन्मान बहाल केले.

नेपोलियन यांचा १८१४ मध्ये पाडाव झाल्यावर अठराव्या लूईंनी माँझ यांचे सर्व सन्मान काढून घेतले. १८१६ मध्ये पुनर्रचित इन्स्टिट्यूट द फ्रान्सच्या सदस्यांच्या यादीतूनही माँझ यांचे नाव वगळण्यात आले. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

ओक, स. ज.