बोलिंग : एक अंतर्गेही क्रीडाप्रकार. ⇨बोल्सप्रमाणेच हा खेळही घरंगळत सोडून खेळला जातो. मात्र ह्यात दुसऱ्या टोकाला दहा खुंट्या असतात व त्या चेंडूच्या धक्क्याने पाडणे, हे उद्दिष्ट असते.त्यास ‘टेनपिन्स’ (दहा
खुंट्यांचा खेळ) असेही नाव आहे. चेंडू टाकण्यासाठी विशिष्ट प्रकारची, गुळगुळीत लाकडी गल्ली (ॲली) तयार केलेली असते. ती १.०४ ते १.०७ मी. (४१ ते ४२ इंच) रुंद व सु. १९.१७ मी. (६२ फुट १० इंच) लांब असते. चेंडू कठीण रबराचा वा प्लॅस्टिकचा असून त्यात बोटांच्या पकडीसाठी तीन ते चार खोबणी असतात. त्याचे वजन अदमासे ४.५ ते ७.२६ किग्रॅ. (१० ते १६ पौंड) असून परिघ जास्तीत जास्त ६८.५ सेंमी. (२७ इंच) असतो. खुंट्या मॅपल लाकडापासून केलेल्या, साधारण बाटलीच्या आकाराच्या असतात. त्यांची उंची ३८.१ सेंमी. (१५ इंच) असते. त्यांना १ ते १० क्रमांक दिलेले असतात. त्या गल्लीच्या एका टोकाला चार रांगांमध्ये उभ्या करून मांडतात. त्यांपैकी सर्वांत मागच्या रांगेत चार खुंट्या (क्र. ७, ८, ९, १०), त्याच्या पुढच्या रांगेत तीन (क्र. ४, ५, ६), तिसऱ्या ओळीत दोन (क्र. २ व ३) व अगदी पुढच्या ओळीत एक खुंटी (क्र. १) अशा पद्धतीने ठेवतात. अशा रीतीने या रांगांची रचना त्रिकोणाकृती होते. खेळाडू गल्लीच्या दुसऱ्या टोकाला उभा राहून चेंडू सरपटी घंरगळत गल्लीतून सोडतो व १८.३ मी. (६० फुट) अंतरावर, गल्लीच्या विरुद्ध टोकाला उभ्या ठेवलेल्या खुंट्या पाडण्याचा प्रयत्न करतो. एकूण दहा खेळी असतात. त्यात खेळाडूने प्रत्येक वेळी दोन चेंडू टाकावयाचे असतात. प्रत्येक पाडलेल्या खुंटीमागे खेळाडूस एकेक गुण मिळतो. एकूण १० खेळींमध्ये जास्त गुण मिळवणारा खेळाडू जिंकतो. एकाच फेकीत खेळाडूने सर्व खुंट्या पाडल्यास तो आघात (स्ट्राइक) मानला जातो व त्याबद्दल १० गुण जास्त मिळतात. या बाबतीतला विक्रम न्यूयॉर्क येथील फ्रँक कॅरूनाच्या नावावर नमूद आहे. एकाच फेकीत सर्व खुंट्या पाडण्याची कामगिरी त्याने लागोपाठ २९ वेळा केली आहे (१९२४). याच विक्रमाची बरोबरी लॉस अँजेल्सच्या मॅक्स स्टाइनने १९३९ साली केली. पुढच्या दोन चेंडूफेकींमध्ये जितक्या खुंट्या तो पाडेल तितके गुण त्याच्या नावावर जमा होतात. सर्वांत जास्त म्हणजे ३०० गुण मिळाले, तर तो परिपूर्ण डाव (पर्फेक्ट गेम) समजला जातो. असा परिपूर्ण डाव मिसूरीच्या एल्व्हिन मेस्गरने २४ वेळा साधून १९७२ साली एक विक्रम नोंदवला आहे. ओळीने १२ आघात झाल्यास हा डाव साधतो.
प्राचीन काळापासून अशा प्रकारचे खेळ अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतात. इटलीतील आल्प्स पर्वताच्या परिसरात सु. २,००० वर्षांपूर्वी दगड हातात घेऊन तो समोरच्या लक्ष्यावर मारण्याचा खेळ खेळला जाई. याच पुरातन खेळातून ‘बोक्की’ नावाचा खेळ निघाला. हा खेळ इटलीमध्ये आजही खेळला जातो. या खेळाचे बोलिंगशी खूपच साधर्म्य आहे. दोन्हीतही खांद्याखालून एक गोलाकार पदार्थ विशिष्ट अंतरावर ठेवलेल्या वस्तूकडे नेम धरून फेकावयाचा, ही क्रिया समान आहे. तथापि बोलिंग या खेळाची उत्पत्ती एका धार्मिक उत्सवाचा भाग म्हणून प्राचीन जर्मनीत झाली असावी, असेही एक मत आहे. मध्ययुगीन जर्मनीमध्ये हा खेळ ग्रामीण नृत्यांमध्ये तसेच बाप्तिस्मा विधीसारख्या धार्मिक सोहळ्यामध्येही अंतर्भूत केला गेला होता. सोळाव्या शतकात बोलिंग हा स्कॉटलंडमध्ये राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता पावला होता. डच लोकांनी तो अमेरिकेत नेला व तिथे एकोणिसाव्या शतकात त्यास अमाप लोकप्रियता लाभली. सध्याही अमेरिकेत तो अत्यंत लोकप्रिय आहे. तिथे सु. १०,००० बोलिंग क्लब आहेत व सु. पाच कोटी खेळाडू तो खेळतात. ‘द अमेरिकन बोलिंग काँग्रेस’ (एबीसी स्थापनवर्ष-१८९५) आणि ‘द विमेन्स इंटरनॅशनल बोलिंग काँग्रेस’ (डब्ल्यूआय्बीसी स्थापनावर्ष -१९१६) यांच्यातर्फे प्रतिवर्षी अजिंक्यपदाचे सामने भरवण्यात येतात. ‘Federation Internationale des Quilleurs’ (एफ्आय्क्यू) ही या खेळाचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संघटना १९५४ पासून प्रतिवर्षी हौशी खेळाडूंसाठी जागतिक पातळीवर स्पर्धा भरवते. या स्पर्धेस बोलिंगचे ऑलिंपिक्स असेही संबोधले जाते. त्यामध्ये संघटनेचे सदस्य असलेले सु. ५० देश भाग घेतात. जपानमध्येही हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. जगातील सर्वांत मोठे बोलिंग केंद्र टोकिओ येथे आहे. तेथील बंदिस्त क्रिडागारात २५२ गल्ल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बोलिंग स्पर्धेतील सर्वांत लहान वयाचा विजयी खेळाडू डिट्रॉइटचा हॅरल्ड ॲलेन हा आहे. १९१५ साली वयाच्या अठराव्या वर्षी त्याने बोलिंगची दुहेरी स्पर्धा जिंकली होती. तसेच या खेळातील सर्वांत वयोवृद्ध विजयी वीर म्हणून डिट्रॉइटच्या इ. डी. (सार्ज) ईस्टरचे नाव मशहूर आहे. त्याने १९५० साली वयाच्या ६७ व्या वर्षी एक स्पर्धा जिंकली होती.
मात्र या खेळास अद्यापही आशियाई स्पर्धा वा ऑलिंपिक स्पर्धा यांमध्ये स्थान मिळालेले नाही. कारण हा खेळ जगात सर्वत्र खेळला जात नाही. भारतातही हा खेळ खेळला जात नाही.
हलके व लहान चेंडू तसेच वेगवेगळ्या आकारांच्या कमीअधिक खुंट्या यांवरून या खेळाचे भिन्नभिन्न प्रकार होतात व ते वेगवेगळ्या ठिकाणी खेळले जातात. उदा., ‘डक्पिन्स’, ‘रबरबँड डक्पिन्स’, ‘कँडल्पिन्स’, ‘कॅनडियन फाइव्हपिन्स’ इत्यादी. ‘नाइनपिन्स’ किंवा ‘स्किटल्स’ हा नऊ खुंट्यांचा खेळही उत्तर यूरोपमध्ये बराच लोकप्रिय आहे. खुंट्यांची नऊ ही संख्या आदर्श आहे, असे मार्टिन ल्यूथरने म्हटले आहे.
संदर्भ : Martin, J. L. Bowling, 1971.
इनामदार, श्री. दे.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..