बोर्निओ : जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट. क्षेत्रफळ ७,४३,३३० चौ.किमी. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ४० द. ते ७० ५०’ उ. व १०९० ३५’ पू. ते ११९० १०’ पू. असा आहे. नैर्ऋत्य-ईशान्य कमाल लांबी १,३३६ किमी. व कमाल रुंदी ९६५ किमी. ग्रेट सूंदा द्वीपसमूहातील साधारणपणे पंचकोनाकृती दिसणाऱ्या या बेटाच्या वायव्येस दक्षिण चिनी समुद्र, ईशान्येस सूलू समुद्र, पूर्वेस उ. भागात सेलेबीझ समुद्र व दक्षिण भागात माकॅसर सामुद्रधुनी दक्षिणेस जावा समुद्र आणि पश्चिमेस कारीमाता सामुद्रधुनी आहे.
भूवर्णन : बोर्निओचा बराचसा भाग डोंगराळ आहे. बेटावरील प्रमुख पर्वतश्रेणी नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने पसरली असून तीमुळे बेटाची मलेशियन व इंडोनेशियन अशी राजकीय प्रदेशविभागणी झाली आहे. या पर्वतप्रदेशांची उंची ६१० मी.पासून १,९०५ मी. पर्यंत वाढलेली आढळते. या पर्वतरांगांत मलर, स्कफानर, इरॅण व तामाबो या पर्वतरांगा असून उत्तरेकडील साबामधील मौंट किनाबालू (४,१०१ मी.) हे बेटावरील सर्वोच्च शिखर आहे तर स्कफानर पर्वतातील राजा (२,२७८ मी.) हे कालीमांतानमधील सर्वात उंच शिखर आहे. मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशाशिवाय किनारपट्टीवर मैदानी व दलदलीचे भाग आढळतात. कालीमांतानच्या दक्षिण किनाऱ्यावर तर दलदलींचा सलग असा पट्टा आहे.
ज्वालामुखीजन्य सुपीक जमिनीचा प्रदेश वगळता बेटावरील जमीन नापीक आहे. नद्यांच्या खोऱ्यांत कणाश्म, नीस, शीस्ट इ. स्फटिकमय खडकांची विपुलता आहे. तृतीयक व मध्यजीव कालखंडांत तयार झालेल्या या खडकांत मँगॅनीज, लोखंड, कथिल, पारा, बॉक्साइट, जिप्सम, तांबे, मोनाझाइट, अँटिमनी, सोने, हिरे, गंधक इत्यादींची खनिजे आणि दगडी कोळसा व खनिज तेल सापडते. परंतु वेगवेगळे कर, वाहतूक खर्च व स्पर्धा यांमुळे उत्पादन कमी आढळते. येथे सापडणाऱ्या हिऱ्यांमुळेच इंडोनेशियन लोक व बेटाला ‘कालीमांतान’ म्हणजे ‘हिऱ्यांची नदी’ असे म्हणतात. बोर्निओतील हिऱ्यांची पिवळसर छटा असून आफ्रिकेतील हिऱ्यांपेक्षा येथील हिरे कमी प्रतीचे आहेत.
वनस्पती व प्राणी : येथे उष्ण कटिबंधीय सदाहरित वर्षारण्ये (सेल्व्हाज) आढळतात. किनाऱ्यावरील दलदलींच्या प्रदेशात कच्छ वनश्री, तर कमी पावसाच्या प्रदेशात उंच गवत व झुडपे आढळतात. येथील जंगलांमध्ये कापूर, चंदन, साग, साल, शिसवी, ओक, चेस्टनट इत्यादी वृक्षप्रकार पहावयास मिळतात. जंगलांतून देवधूप, कापूर, खैर, वेत, कातडी कमावण्याची साल इ. उत्पादने मिळविली जातात. येथील रबर उत्पादनही महत्वाचे आहे.
इतिहास : पोर्तुगीजांनी १५११ मध्ये या बेटावर प्रथम प्रवेश करण्यापूर्वीचा इतिहास विशेष ज्ञात नाही. तथापि इ. स. पू. सातव्या शतकापासून इ. स. चौदाव्या शतकापर्यंत भारत-चीनदरम्यान होत असलेल्या व्यापाराच्या मार्गावर हे बेट होते, म्हणून चिनी व भारतीय यांना ह्या बेटाविषयीचे ज्ञान इ. स. पू. सातव्या शतकापासून असल्याचे दिसते. चिनी व भारतीय यांची छाप येथील लोकांच्या भाषा, साहित्य, लेखनकला इत्यादींवर दिसून येते.
आर्थिक स्थिती : लागवडयोग्य जमिनीचे कमी प्रमाण, सभोवतालचा उथळ समुद्र, धोकादायक किनारा, वाहतूक व दळणवळणाच्या साधनांचा अभाव तसेच प्रशासकीय अडचणी हे बोर्निओच्या आर्थिक विकासातील प्रमुख अडथळे आहेत.
बेटावरील सु. ७०% लोक लहान प्रमाणावरील शेतीत, १०% लोक मासेमारी व जंगलतोड व्यवसायांत आणि उरलेल्या २०% पैकी बरेच लोक खाणकाम (विशेषतः तेलविहिरींमध्ये), लहान प्रमाणावरील व्यापार-उद्योग, निर्मितीउद्योग, बांधकाम, वाहतूक व दळणवळण इत्यादींमध्ये गुंतलेले आहेत.
भात हे येथील प्रमुख पीक असून भाताची स्थलांतरित व ओली शेती केली जाते. यांशिवाय धान्य, रताळी, सुरण, मॅनिओक, तंबाखू, द्विदल धान्ये, ऊस, टोमॅटो, कलिंगड, भोपळा, घेवडा, अननस व विविध फळांचे उत्पादन घेतले जाते. खनिज तेल, लाकूड, रबर ही येथील प्रमुख नैसर्गिक संपत्ती आहे. ब्रूनाई हा बोर्निओतील प्रमुख खनिज तेल उत्पादक भाग आहे. ब्रूनाईतील सारीआ हे प्रमुख तेलक्षेत्र असून सारावाकमधील लूटुंग हे तेलशुद्धीकरणासाठी प्रसिद्ध आहे. यांशिवाय सारावाकमधील मिरी, पूर्व बोर्निओतील सॅमारिंडा व टाराकान येथे तेलक्षेत्रे आहेत.
कालीमांतानच्या पूर्व किनाऱ्यावरील लोआ कोएलोए व पॅरापट्टन येथून कोळसा मिळतो. रबर, खोबरे, तंबाखू, मासे व ताग यांवरील प्रक्रिया-उद्योग तसेच ॲसिटिक अम्ल, अल्कोहॉल, खते, शेवया, सोडावॉटर, वनस्पती तेल, आगकाड्या, मातीची भांडी, विटा, सूप इ. निर्मितीउद्योग बेटावर चालतात. काही लोकांनी आपल्या परंपरागत कारागिरीच्या कौशल्याचे जतन केलेले असून ते लाकडावरील नक्षीकाम उत्तम करतात. सुंदर कापड व चट्या विणण्यात बोर्निओतील स्त्रिया तरबेज आहेत.
खनिज तेल, लाकूड, रबर, तंबाखू, खोबरे, ताग, कात या प्रमुख निर्यात वस्तूंशिवाय साबूदाणा, कॉफी, डिंक, मिरी, दालचिनी, वेत, डांबर, लोणारी कोळसा, धूप, टॅनिन, पक्ष्यांची वैशिष्ट्यपूर्ण घरटी (सूप तयार करण्यासाठी), मासे इत्यादींची निर्यात केली जाते. तेलाची निर्यात महत्त्वाची असून ⇨बालिकपापान हे कालीमांतानमधील मुख्य तेलनिर्यात केंद्र आहे. निर्यात प्रामुख्याने जपान, फिलिपीन्स, हाँगकाँग, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया व काही प्रमाणात अमेरिका, ग्रेट ब्रिटन व प. यूरोपीय देशांना होते. आयातीत यंत्रे, सिगारेटी, धातू, शुद्ध तेल, कापड, तांदूळ, मोटारी, पादत्राणे, साखर, बांधकामाचे साहित्य व काही घरगुती वापराच्या वस्तूंचा समावेश होतो.
त्याशिवाय सारावाक, ब्रूनाई, साबा, कालीमांतान अशी बेटांतर्गत हवाई वाहतुकीची सेवाही उपलब्ध आहे. रेडिओ, दूरध्वनी, दूरलेखा, टपाल, केबल यांद्वारे बेटावरील व बेटाबाहेरील स्थळांशी दळणवळण चालते.
लोक व समाजजीवन : बेटावरील लोकसंख्या खूपच विरळ असून लोकसंख्येची घनता साधारणपणे दर चौ.किमी.स ७ आढळते. बेटावरील एकूण लोकसंख्येपैकी सु. तीन-चतुर्थांश लोकसंख्या कालीमांतानमध्ये आढळते. बोर्निओ ही दाया लोकांची मुख्य भूमी असून जावातील श्रीविजय राजाच्या कबजात बोर्निओ बेट जाण्यापूर्वी त्यांच्या तेथे वसाहती होत्या. आजही दाया व मलायी लोकांचे बेटावर आधिक्य आहे. कालीमांतानमध्ये चिनी व मुस्लिम लोकांचे, तर बँजरमासन, कूचिंग, पांतीआनॅक या शहरांमध्ये चिनी लोकांचे प्रमाण जास्त आहे. ब्रूनाई, सारावाक व साबामध्ये काही यूरोपियन लोकही आहेत. किनारी व अंतर्गत भागांतील दाया लोकांच्या चेहऱ्यांत व सवयींमध्ये फरक आढळतो. मूळ दाया लोक आदिवासी असून बेटाच्या अंतर्गत भागात ते राहतात. शेती, शिकार, कंदमुळे किंवा जंगलातील इतर पदार्थ गोळा करून ते आपली उपजीविका करतात. किनारी प्रदेशातील लोक अधिक सुसंस्कृत असून तेथील लोकांमध्ये मलायी, चिनी, द्राविड व आग्नेय आशियातील इतर वेगवेगळ्या वंशांच्या लोकांचे मिश्रण झालेले आढळते. किनाऱ्यावरील मलायी, अरब व चिनी लोक व्यापार, खाणकाम, मासेमारी किंवा शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. बोर्निओतील मूळच्या लोकांची घरे जमिनीपासून ०.९ ते १.२ मी. उंचीवर बांधलेली आढळतात.
पहा : इंडोनेशिया ब्रूनाई मलेशिया साबा सारावाक.
चौधरी वसंत.
“