बोरोबूदूर : इंडोनेशियाच्या जावा बेटातील बौद्ध अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. जोगजाकार्ताच्या उत्तरेस सु. २५ किमी.वर ते मगेलांगजवळ वसले आहे. तेथे सु ४० वास्तू होत्या. त्यांपैकी आठ अवशिष्ट असून त्यांतील एक स्तूप भव्य आहे. या वास्तू शैलेंद्र काळात बांधलेल्या
असून त्यांचा काळ इसवी सनाचे आठवे-नववे शतक असा समजला जातो. या काळात भारताचे आग्नेय आशियायी व्यापारी-सांस्कृतिक संबंध घनिष्ठ स्वरूपाचे असल्याने बोरोबूदूर येथील शिल्प स्थानिक जीवनावर झालेला भारतीय सांस्कृतिक परिणाम यथार्थपणे दर्शविते.
बोरोबूदूरचा स्तूप प्रचंड आहे. एकावर एक येणारे असे सहा चौरस चौथरे येथे असून सर्वांत वरच्या चौथऱ्यावर आणखी तीन गोल चौथरे एकावर एक योजलेले आहेत. या तीन गोल चौथऱ्यांच्या मध्यभागी सर्वांत मोठा स्तूप उभारलेला आहे. याचा वरील व्यास १५ मी. असून तळाच्या स्तराचा व्यास १४५ मी. आहे. यावरून या प्रचंड वास्तूच्या परिमाणाची कल्पना येते. स्तूपाच्या बाहेरील भिंतीवर पाच स्तरांत शिल्पांकन असून प्रत्येक बाजूवर सु. ९२ लहानमोठी शिल्पे आहेत. त्यांत बुद्धजीवनातील प्रसंग चित्रित केलेले आहेत.
स्तूपाच्या सर्वांत खालच्या चौथऱ्यावर नरकातील यातना आणि स्वर्गातील सुखे दाखविणारी शिल्पे आहेत. यावरच्या चौथऱ्यावर प्रत्येक दर्शनी बाजूवर कोनाड्यात बसविलेल्या बूद्धमूर्ती आहेत. पूर्वेस अक्षोभ्य, दक्षिणेस रत्नसंभव, पश्चिमेस अमिताभ आणि उत्तरेस अमोघसिद्ध या चार अवस्थांतील बुद्धाच्या मूर्ती आहेत. यावरच्या चौथऱ्यावर बुद्धाच्या जीवनातील प्रसंग, तसेच जातक आणि अवदानातील कथा शिल्पित केलेल्या आहेत. याच्यावरच्या चौथऱ्यावर बोधिसत्व सुधनकुमाराचे गण्डव्यूह ग्रंथामध्ये वर्णिलेले जीवनप्रसंग कोरलेले आहेत. सर्वांत वरच्या चौथऱ्याच्या भिंतीवर मैत्रेय बोधिसत्वाची जीवनकथा आढळते.
या चौथऱ्यांवर येणाऱ्या तीन गोलाकार चौथऱ्यांवर अनेक जाळीदार छोटे स्तूप आहेत. त्या प्रत्येकात एक बुद्धमूर्ती आहे. अशा एकंदर ५०४ बुद्धमूर्ती या जाळीदार स्तूपांत आहेत. सर्वांत वर येणारा स्तूप मात्र साधा शिल्परहित आहे. ज्या शैलेंद्र राज्यकाळात हा स्तूप बांधला गेला, त्या काळातच या विभागाचा भारताशी घनिष्ठ सांस्कृतिक संपर्क होता. ललित-विस्तर ग्रंथात वर्णिलेले बुद्धजीवनप्रसंग तंतोतंत बोरोबूदूरला शिल्पित केलेले आढळून येतात.
येथील शिल्पांची व्याप्ती व शैली महत्त्वपूर्ण आहे. दागदागिने, वस्त्रप्रावरणे, कलश व कुंभ, रथ व जहाजादी वाहने, वास्तू, शस्त्रे व वाद्ये यांची शिल्पांत रेलचेल आहे. यांतील कित्येक नमुने भारतीय शिल्पांतही जसेच्या तसे आढळतात. या दृष्टीने पाहता बोरोबूदूरचा स्तूप भारतीय संस्कृतीचा एक मनोहर व वास्तव आविष्कार समजला जातो. ही कलाशैली पल्लवांच्या कलाशैलीशी मिळती जुळती आहे आणि इतकी प्रचंड स्वरूपाची भव्य अशी वास्तू अन्यत्र कुठे सापडत नाही. बोरोबूदूरजवळच चंडी मेंदूत या ठिकाणी साडेचार मीटर उंचीची एक बैठी बुद्धमूर्ती असून तिच्या दोन्ही बाजूंस दोन बोधिसत्त्वांच्या मूर्ती आहेत. येथील शिल्पांकनही उल्लेखनीय आहे.
पहा : बृहद्भारत.
देव, शां. भा.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..