बोय : हे मासे ‘ग्रे मुलेट’ या नावाने ओळखले जातात. यांचा समावेश म्युगिलीडी या कुलात होतो. यांचे शास्त्रीय नाव म्युगिल सेफॅलस असे आहे. यांना मांगण असेही म्हणतात. इंग्रजीत ग्रे मुलेट, गोल्डस्पॉट मुलेट, डायमंड स्केल मुलेट, लजिस्केल मुलेट किंवा नुसत्या मुलेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या निरनिराळ्या जातींच्या माशांसही बोय असे म्हणतात. हे मासे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांतील समुद्रात किनाऱ्याजवळ राहतात. हे मचूळ पाण्यातही आढळतात. यांच्या काही जाती गोड्या पाण्यातही आढळल्या आहेत. समुद्रकिनाऱ्यापासून नदीच्या प्रवाहात हे फार दूरवर जात नाहीत. गंगा, यमुना यांसारख्या मोठ्या नद्यांत यांची पिले आढळली
आहेत. हे मोठ्या संख्येने एकत्र फिरत असल्यामुळे एकाच ठिकाणी भरपूर मासे पकडणे शक्य होते. यांच्या सु. २६ जाती नदीमुखात आढळल्या आहेत. म्यु. सेफॅलस किंवा बोय हा भारतात आढळणाऱ्या ग्रे मुलेटपैकी सर्वांत मोठा व पुष्कळ ठिकाणी आढळणारा मासा होय.
या माशाचा पृष्ठभाग फिकट हिरवा असतो व दोन्ही बाजू रुपेरी असतात. शरीर प्रवाहरेखित व साधारण आकाराच्या खवल्यांनी आच्छादिलेले असते. शरीर चापट व डोके काहीसे पसरट असते. दोन आखूड पृष्ठपक्षांपैकी (पाठीवरील परांपैकी) पुढच्या पक्षामध्ये चार चिवट काटे असतात. पुच्छपक्ष (शेपटीचा पर) बळकट व दोन खंडांचा (भागांचा) असतो. तोंड अरुंद व आडवे असते. दात दुर्बल असतात. काही जातीत दात नसतात. जंभाच्या (जबड्यांच्या) कडा तीक्ष्ण असतात. काही जातींत उदर कणखर व स्नायुयुक्त असते आणि त्यांच्या ग्रसनीतील (घशातील) दातांचा उपयोग अन्न गाळण्याकरिता होतो. भारतात आढळणाऱ्या बोयाचे वजन अंदाजे ४ ते ५ किग्रॅ. व लांबी ९१ सेंमी. असते. ज्यांना उत्तम दात असतात ते लहान जलचरांवर उपजीविका करतात ज्या जातींत दात नसतात त्यांच्या आहारात वाळूत मिसळलेले सूक्ष्म प्राणी व वनस्पती यांचा समावेश असतो. हा मासा झपाट्याने वाढतो व तो खाण्यास रुचकर व पथ्यकर आहे. यामुळे याच्या संवर्धनाकडे व उत्पादनाकडे यूरोपमध्ये व इतर देशांतही विशेष लक्ष पुरविले जाते.
ओरिसातील चिल्का सरोवरात यांची मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. कोचीनजवळही (केरळ) यांच्या मासेमारीचा व्यवसाय भरभराटीत आहे. मद्रासमधील गोड्या पाण्याच्या तलावातही हे मासे पाळले जातात. म्यु. सेफॅलस उत्तर अमेरिकेत व जगात इतरत्रही आढळतो. फ्लॉरिडात याला ब्लॅक मुलेट म्हणतात. उष्ण कटिबंधात आढळणाऱ्या मुलेटच्या काही जाती ॲगोनोस्टोमस या वंशात समाविष्ट केल्या आहेत.
“