बोब्बी : (पून क. इरई, किरिहोन्ने इं. पूनस्पार ऑफ त्रावणकोर लॅ. कॅलोफायलम एपेटॅलम कॅ. वाइटियानम कुल-गटिफेरी). हा सु. २०-३० मी. उंच, सदापर्णी वृक्ष ⇨ उंडण व ⇨ नागरी यांच्या वंशातील असून भारतात व श्रीलंकेत आढळतो.

बोबी

पश्चिम घाट, उ. कारवार, कोकण व म्हैसूर ते त्रावणकोरपर्यंत दक्षिणेस (सु. ३०० मी. उंचीपर्यंत) गर्द जंगलात आणि नद्या व ओढे यांच्या काठाने हा आढळतो. साल जाड व पिवळी शाखा सोंडेप्रमाणे गोलसर व कोवळ्या फांद्या चौधारी व गुळगुळीत पाने साधी, उंडण व नागरीपेक्षा लहान टोकाकडे खोलगट फुलोरा व त्यावरील पांढरी फुले त्यांच्याप्रमाणे पण लहान व प्रदलहीन (बिनपाकळ्यांची) असून ती डिसेंबरात व फळे मार्चमध्ये येतात. आठळीयुक्त फळ लहान व करवंदाएवढे आणि पिकल्यावर लाल होते. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ गटिफेरीमध्ये (कोकम कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. या वृक्षाचे लाकूड टणक, लालसर, सागापेक्षा कठीण आणि टिकण्यास व वजनात मध्यम व पृष्ठभाग थोडा चिरणारा असतो ते कापण्यास व रंधण्यास सोयीचे असून घरबांधणी, पूलबांधणी व इतर अभियांत्रिकी कामांस उपयुक्त असते नावा, तेल घाणे वगैरेसाठीही हे वापरतात. सालीतून निघणारी राळ स्वच्छ पिवळी, ठिसूळ व गंधहीन असून भिन्न प्रकारच्या रंगकामात व कापडास ताठपणा आणण्यास उपयुक्त असते. ती वेदनाहारक व सूज कमी करणारी आहे दुधात शिजवून चर्मरोगांवर लावतात. बियांचे तेल (४५ – ५०%) चर्मरोग व कृष्ठ यांवर गुणकारी असते. बियांचा फांट [विशिष्ट प्रकारे बनविलेला काढा ⟶ औषधीकल्प] मधाबरोबर खरुज आणि संधिवात यांवर देतात.

महाजन, मु. का.