बोधगया : बिहार राज्यातील बौद्ध अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. ते गयेच्या दक्षिणेस सु. ११ किमी. वर निरंजना किंवा निलांजना (फल्गू) नदीच्या काठी वसले आहे. लोकसंख्या १५,७२४ (१९८१). याची माहिती गयामाहात्म्य, अग्निपुराण, वायुपुराण इ. ग्रंथातून तसेच चिनी प्रवासी ह्यूएनत्संग याच्या प्रवासवर्णनातून मिळते. या ठिकाणी झालेल्या पुरातत्वीय उत्खननांद्वारेही काही अवशेष उपलब्ध झाले. बुद्धगया, उरुबिल्ववन, उरुवेला, उरुविल्व वगैरे नामांतरांनी याचा उल्लेख प्राचीन वाङ्‌मयात आढळतो. अलेक्झांडर कनिंगहॅमने १८६२ मध्ये प्रथम ह्या स्थानाची पाहणी करून येथील अवशेषांसंबंधी तपशीलवार अहवाल सादर केला.

गौतम बुद्धाला येथील बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. त्यावेळेपासून ते बौद्ध धर्माचे पवित्र स्थान झाले. सम्राट अशोकाने या स्थळास भेट देऊन येथे एक विहार बांधला आणि येथील बोधिवृक्षाची एक फांदी संघमित्रा या आपल्या कन्येबरोबर श्रीलंकेस पाठविली. अशोकाच्या बौद्ध धर्माविषयाच्या प्रेमाचा तिटकारा येऊन त्याच्या तिष्यरक्षिता या राणीने हा वृक्ष नष्ट केला पण अशोकाने तो पुन्हा लावला, अशी एक दंतकथा रुढ आहे. अशोकानंतर हा प्रदेश शुंग वंशाच्या अधिपत्याखाली होता. त्या वेळी येथील बोधिवृक्षाभोवती कठडा बांधण्यात आला व त्यावर बौद्ध धर्मातील प्रतीकांचे व जातकातील प्रसंगाचे शिल्पांकन केले. गुप्तांच्या वेळी (इ. स. ३२४-५५०) येथे काहीच बांधकाम झाले नाही कारण पुढे फाहियानने या स्थळास भेट दिली पण त्याला इथे जंगल व ओसाड प्रदेश दिसला. त्यानंतर ह्यूएनत्संग (इ. स. ६२९-६४८) ह्याच्या प्रवासवर्णनात मात्र येथील महाबोधी मंदिराची पूर्ण माहिती मिळते. त्याच्या येथील भेटीपूर्वी गुप्तकाळाच्या अवनतीनंतर येथील महाबोधी मंदिराची बांधणी इ. स. ५५० ते ६०० दरम्यान केव्हातरी झाली असावी. इ. स. ६०० मध्ये गौडाधिपती शशांकाने येथील वृक्ष तोडला पण पूर्णवर्मा या मगधाधिपतीने त्याची मुळे शोधून तो पुन्हा वाढविला इ. वर्णन ह्यूएनत्संगाच्या लेखनात मिळते. त्यानंतरही हा वृक्ष अनेक वेळा पडला आणि पुन्हा लावण्यात आला तथापी या बोधिवृक्षास २,६०० वर्षांची प्राचीन परंपरा आहे. तसेच मध्य युगात ब्रह्मदेश, श्रीलंका येथील राजांनी या देवळाचा जीर्णोद्धार केला व काही नवीन वास्तू याच्या परिसरात उभ्या केल्या आणि चैत्य बांधले.

महाबोधी मंदिर हे बोधिवृक्षाच्या पश्चिमेस प्राकारात बांधलेले भव्य मंदिर असून त्याची उंची सु. ५२ मीटर आहे. हे मंदिर दुमजली आहे. त्याचे विधान चतुरस्त्र असून शिखर वर निमुळते होत गेले आहे. त्यावर आमलक असून अगदी वरच्या बाजूस एक लहानसा स्तूप व छत्रावली आहे. शिखराच्या सर्व बाजूंना कोनाडे असून त्यांत मूर्ती बसविल्या आहेत. मंदिराच्या चारी कोपऱ्यांत या मुख्य मंदिराच्या प्रतिकृती बांधलेल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर पंचायतन वास्तूशैलीचा एक उत्कृष्ट नमुना समजले जाते. बुद्धाच्या वास्तव्यामुळे पवित्र झालेली अनिमेष, चंक्रमण, रत्नघर, अजपाल वृक्ष, मुचलिंद ऱ्हद, राजायतन, वज्रासन आदी काही स्थळे बोधिवृक्षाच्या आसमंतात आढळतात. मंदिराच्या परिसरात अनेक भग्नावशेष इतस्ततः पडलेले असून त्यांतील लहान मंदिरे, स्तूप व स्मृतिभंग यांचे अवशेष उल्लेखनीय आहेत. भारहूत व येथील शिल्पांत नागराज व हत्ती हे बोधिवृक्षाची पूजा करीत आहेत, अशी शिल्पे कठड्यावर खोदलेली आहेत. कठड्यावर काही ठिकाणी शिलालेख असून त्यांतून येथील वास्तूची बांधणी, डागडुजी इत्यादींची माहिती मिळते. स्तूपांतील कोनाड्यात बुद्धमूर्ती असून कठड्याच्या स्तंभांवर जातकातील व बुद्धजीवनातील प्रसंग चितारलेले आहेत. यांशिवाय विविध पशुपक्षी, फुले इत्यादींचे नक्षीकाम आढळते. एकूण शिल्पांकनात कमळाचे ज्ञापक सर्वत्र आढळते. लहान स्तूपांवरही बुद्धमूर्ती खोदलेल्या असून स्तूपांची प्रतीकेही दिसतात. येथील शिल्पशैलीवर शुंग, कुशाण अशा विविध शैलींची छाप असून त्यांचे मिश्रण झालेले आढळते. त्यामुळे इथे कोणतीच विशिष्ट शिल्पशैली आढळत नाही. विद्यमान महाबोधी मंदिराचा काही भाग इ.स. पू. १००-५० या काळातील असावा. त्याच्या भोवती नेहमीसारखी वर्तुळाकार वेदिका नसून ती चौकोनी आहे. ख्रिस्तपूर्व काळात उभारल्या गेलेल्या या मंदिराची डागडुजी व जीर्णोद्धार वेळोवेळी होत गेल्यामुळे विविध कालखंडातील बौद्धकलेची त्यातून ओळख होते. या मंदिरापासून बौध्दांच्या पिढ्यान् पिढ्यांना प्रेरणा मिळत गेल्यामुळे ब्रह्मदेश, थायलंड इ. देशांतही त्याच्या प्रतिकृती उभारल्या गेल्याचे आढळते.

येथील शिल्पाकृती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. भारहूतची परंपरा इथे अधिक खोलवर रुजल्याचे दिसते. शिल्पे अधिक नाट्यपूर्ण आहेत आणि कथाप्रसंगाचे शिल्पांकन कमी पाल्हाळिक आहे. बुद्धाच्या जीवनावर आधारित प्रसंग तसेच ऐहिक जीवनातील प्रसंग- उदा., नवपरिणित वधू, वादक, नर्तक – इत्यादींचे शिल्पांकन येथे आढळते. येथील शिल्पे भारहूतसारखी चैतन्यपूर्ण नसली, तरी ती शिल्पांकनाचे प्रगत तंत्र दर्शविणारी आहेत.

महाबोधिमंदिराशिवाय बोधगयेत एक जगन्नाथ मंदिर आहे आणि जपान, चीन, थायलंड, ब्रह्मदेश, तिबेट इ. देशांचे स्वतंत्रपणे बांधलेले स्तूप आहेत. यांपैकी जपानी व थाई स्तूप भव्य असून त्यांच्या वास्तू कलात्मक आहेत व तेथील भित्तिचित्रेही प्रेक्षणीय आहेत. गावात एक पुरातत्वीय वस्तुसंग्रहालय व जयप्रकाश उद्यान आहे. बौद्ध यात्रेकरुंसाठी बोधगयेत अनेक धर्मशाळा असून पश्चिमेस तीन किमी. वर मगध विद्यापीठ व संस्कृत महाविद्यालय आहे. पुरातत्त्व खात्याच्या दक्षतेमुळे महाबोधिमंदिराची देखभाल सुव्यवस्थित असून उरलेल्या स्तूपांची व्यवस्था ते ते देश पाहतात. बौद्ध धर्मीयांचे आज हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र झाले आहे.

संदर्भ :

1. Barua, B. M. Buddha Gaya Temple : Its History, Buddha Gaya, 1981.

2. Thakur, Upendra Akhtar, Naseem Banerjee, Naresh, Ed. Glories of Gaya, Bodha Gaya, 1981.

देशपांडे, सु. र.