बोएन (बॉवेन), नॉर्मन लेव्ही : (२१ जून १८८७-११ सष्टेंबर १९५६). अमेरिकन, भूवैज्ञानिक, अग्निज खडकांच्या उत्पत्तीशी निगडित असलेल्या सिलिकेटी प्रणालींच्या संश्लेषणाविषयीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे आहे. प्रायोगिक शिलाविज्ञानातील (खडकांची उत्पत्ती, संरचना, रासायनिक संघटन व वर्गीकरण यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रातील) त्यांचे हे संशोधन विसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वाचे शिलावैज्ञानिक संशोधन असून त्यामुळे भूविज्ञानातील प्रयोगांचे महत्त्व प्रस्थापित झाले. त्यांचा जन्म व आधीचे शिक्षण किंग्स्टन (कॅनडा) येथे झाले. त्यांनी क्कीन्स विद्यापीठाची ए. एम्. (१९०७), तेथील फॅकल्टी ऑफ ॲप्लाईड सायन्समधून बी. एस्सी. (१९०९) आणि मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पीएच्. डी. (१९१२) या पदव्या संपादन केल्या. १९१२ साली ते कार्नेगी इन्स्टिट्यूशन (वॉशिंग्टन) येथे दाखल झाले व त्यांचा पुढील बहुतेक काळ तेथील भूभौतिकीय प्रयोगशाळेत संशोधन करण्यात गेला. तेथे १६ वर्षे त्यांनी अग्निज खडकांच्या सिलिकेटी प्रणालीविषयी संशोधन केले. त्यासाठी यूरोप व आफ्रिकेत जाउन त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रातही काम केले. १९१७-१९ या काळात त्यांनी प्रकाशीय काचेसंबंधीच्या एका प्रकल्पात काम केले, तर १९१९-२० मध्ये ते क्कीन्स कॉलेजात आणि १९३७-४७ या काळात शिकागो विद्यापीठात प्राध्यापक होते. १९५२ साली ते कार्नेगी इन्स्टिट्यूशनमधून निवृत्त झाले.
लॅटर स्टेजेस ऑफ इव्होल्यूशन ऑफ इग्नियस रॉक्स (१९१५) व द रिॲक्शन प्रिन्सिपल इन पेट्रॉलॉजी (१९२२) हे त्यांचे लेख महत्त्वाचे असून त्यांमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. एकाच क्षेत्रात आढळणाऱ्या खडकांमध्ये पद्धतशीरपणे बदल होत गेलेले आढळतात. त्यावरुन थंड होणाऱ्या एकाच सामान्य अशा शिलारसापासून विविध प्रकारचे खडक बनल्याचे सूचित होते, हा अग्निज खडकांच्या उत्क्रांतीविषयीचा सिद्धांत त्यांनी मांडला. याचे स्पष्टीकरण देणारे विक्रियाविषयक तत्त्व विशद करण्यासाठी त्यांनी विशिष्ट खडकांसाठी सुलभ अशा विक्रियाविषयक माला बनविल्या. शिलारस थंड होताना कोणत्या क्रमाने खनिजे स्फटिकीभूत होतात, हे त्यांना प्रयोगांवरुन कळून आले आणि हा अनुक्रम दर्शविणाच्या खंडित व अखंडित अशा दोन माला त्यांनी तयार केल्या. त्यांच्यावरुन या मालांना ‘बोएनविक्रियामाला’ असे नाव देण्यात आले [⟶ अग्निज खडक]. थंड होणाच्या शिलारसामध्ये स्फटिकीभवन व भिन्नीभवन (भिन्नभिन्न घटक अलग होत जाण्याची क्रिया) यांचे नियंत्रण या विक्रियामालांनी कसे होते, हेही त्यांनी दाखविले. यामुळे एकाच मूळ शिलारसापासून भिन्नीभवनाने अनेक खडक कसे तयार होतात, हे कळून आल्यामुळे अग्निज खडकांची उत्पत्ती व खडकांचे रूपांतरण (दाब व तापमान यांमुळे खडकांत होणारे बदल) हे समजण्यास चांगली मदत झाली.
भूविज्ञानातील विविध प्रक्रियांचे भौतिक व रासायनिक आधार त्यांनी नंतर तपासून पाहिले. तसेच बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारी) द्रव्ये (विशेषतः पाणी) यांनी युक्त अशा सिलिकेटी प्रणालींचा त्यांनी अभ्यास केला. यामुळे ग्रॅनाइट खडकाच्या उत्पत्तीची आणि रूपांतरणाविषयीच्या काही प्रश्नांची माहिती उपलब्ध झाली. अशा तऱ्हेने त्यांच्या संशोधन कार्यामुळे भूविज्ञान व रसायनशास्त्र यांतील दुवा सांधला गेला. मृत्तिका उद्योग व काचनिर्मिती यांच्या दृष्टीनेही त्यांचे संशोधन उपयुक्त ठरले आहे.
बोएन हे नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९३५) व रॉयल सोसायटी (१९४९) यांचे सदस्य आणि मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका (१९३७) व जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका (१९४६) यांचे अध्यक्ष होते. बिग्जबी (१९३१), पेनरोज (१९४१), मिलर (१९४३), वुलस्टन व रोएब्लिग (१९५०) ही पदके व इतर सन्मान त्यांना मिळाले. त्यांनी अनेक नियतकालिकांतून संशोधनपर लेख लिहिले आहेत. त्यांच्या संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष द इव्होल्यूशन ऑफ द इग्नियस रॉक्स (१९२८) या पुस्तकात आले असून तदनंतरच्या शिलावैज्ञानिक विचारांचा या पुस्तकाचा चांगलाच प्रभाव पडलेला दिसून येतो. वॉशिंग्टन (डी. सी.) येथे ते मृत्यू पावले.
ठाकूर, अ. ना.