बेहिस्तून : प्राचीन प्रस्तरलेखासाठी प्रसिद्ध असलेले इराणमधील एक स्थळ. प्राचीन बागिस्तान. ते केरमानशाह शहरापासून पूर्वेस ३२ किमी. वर केरमानशाह-हामादान रस्त्यावर वसले आहे. गावाच्या शेजारी असणाऱ्या सु. ५६० मी. उंचीच्या डोंगरात जमिनीपासून ९० मी. उंचीवर एका सपाट प्रस्तरावर क्यूनिफॉर्म लिपीत बॅबिलोनियन, प्राचीन इराणी (पर्शियन) व एलमाइट या इराणी साम्राज्याच्या तीन प्रचलित भाषात लिहिलेला एक लेख असून त्यावर अपोतथत शिल्पात पहिला डरायस, दोन योद्धे व तयाने जिंकलेले नऊ सेनानी-कैदी आणि अहुर मज्द यांच्या प्रतिमा आहेत. हा लेख पहिला डरायस (कार.५२१-४८६ इ.स.पू.) याने इ.स.पू. ५१० मध्ये उत्कीर्ण केला. त्या लेखात डरायसने स्वतःच्या लढाया आणि त्यांत मिळविलेल्या विजयांची नोंद केली असून आपली वंशावळ नमूद केली आहे.
क्यूनिफॉर्म अक्षरवथ्अकेची फोड करण्यास या लेखामुळे फार मदत झाली. शिवाय बॅबिलोनियन, इराणी व सुसियन (एलमाइट) या क्यूनिफॉर्म लिपीच्याच तीन घाटण्यांमुळे या अक्षरवाटिकेचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी मदत झाली. या लेखतील इराणी भषेतील मजकुराचे वाचन ⇨हेन्री रॉलिन्सन या संशोधकाने १८३५ साली केले. डायोडोरस सिक्यूलस व स्टीव्हन ऑफ बायझंटिअम यांच्या लेखनातून याचा उल्लेख आढळतो. रॉलिन्सनच्या संशोधनामुळे क्यूनिफॉर्म लिपी उजेडात आली आणि ऍसिरियाच्या इतिहास-अभ्यासाला गती प्राप्त झाली. शिवाय पुरामिलेखाविद्येत एक मोलाची भर पडली.
“