बेसबॉल : प्रत्येकी नऊ खेळाडूंच्या दोन संघांमध्ये चेंडू व बॅट यांच्या साहाय्याने खेळला जाणारा क मौदानी खेळ. बेसबॉलच्या क्रीडांगणाचा जो आकार असतो, त्यावरून त्यास ‘डायमंड’ असे म्हणतात. त्यात ठराविक अंतरावर ज्या चार ‘बेसीस’ म्हणजे तळ वा घरे खलेली असतात, त्यावरून या खेळास ‘बेसबॉल’ हे नाव पडले. बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे.
बाजूस, गृहफळीपासून २.४ मी. (८ फुट) लांब व १.१ मी. (३ फुट ७ इंच) रुंद अशी ‘कॅचर्स बॉक्स’ म्हणजे झेलकरीकक्ष असते. गृहफळीपासून दुसऱ्याय घराच्या दिशेने १८.४ मी. (६० फुट ६ इंच) अंतरावर, साधारणपणे आंतरमैदानाच्या मध्यभागी एक गोलाकार लहानसा उंचवटा असतो. त्याचा व्यास ५.५ मी. (१८ फुट) व मध्याची उंची २५ सेंमी. (१० इंच) असते. त्या उंचवट्यावर ६१ सेंमी. (२ फुट) लांब व १५ सेंमी. (६ इंच) रुंद अशी पांढर्या रबराची फळी बसवलेली असते, तिला ‘पिचर्स प्लेट’ म्हणजे गोलंदाजी-फळी म्हणतात. गृहफळीच्या पहिल्या व तिसऱ्या घरांच्या दिशेने, क्रिडांगणाच्या सीमांपर्यंत ज्या रेषा काढलेल्या असतात, त्या प्रमाद-रेषा (फाउल लाइन्स) होत. त्या रेषांपलीकडील तसेच गृहफळीच्या मागील बाजूचे क्षेत्र म्हणजे प्रमादक्षेत्र होय. त्या रेषांच्या आतील आंतर व बाह्य मैदानाचे मिळून होणारे क्षेत्र हे खेळाचे विहित-क्षेत्र (फेअर टेरिटरी) मानले जाते.
‘पिचर’ म्हणजे गोलंदाज हा गोलंदाजी-फळीजवळ, तर क्रिकेटमधील यष्टिरक्षकाप्रमाणे फलंदाजामागे उभा राहून चेंडू अडवणारा झेलकरी हा झेलकरीकक्षात उभा राहतो. उर्वरित खेळाडूंची क्षेत्ररचना पुढील प्रमाणे असते : गृहफळी वगळता उरलेल्या प्रत्येक तळावर एकेक क्षेत्ररक्षक असतो, त्यांस अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा बेसमन म्हणजे तळरक्षक म्हणतात. ‘शॉर्ट्स्टॉप’ म्हणजे लघुटप्प्यावरील चौथा क्षेत्ररक्षक दुसऱ्या आणि तिसऱ्या घरांच्या साधारण मध्यभागी, पण खोलवर क्षेत्ररक्षण करतो. उरलेले तीन क्षेत्ररक्षक बाह्यमैदानात डाव्या, उजव्या व मध्य बाजूंना उभे राहून क्षेत्ररक्षण करतात. खेळण्याच्या ओघात क्षेत्ररक्षक आपापल्या जागा बदलू शकतात. फलंदाजी करणाऱ्या संघाचा क्रमांक एकचा फलंदाज हा दोहोंपैकी एका फलंदाज-कक्षामध्ये फलंदाजीच्या भविष्यात उभा राहतो. दोन फलंदाज-कक्षांपैकी एक उजव्याहाती खेळाडूच्या व दुसरी डावखोर्याल खेळाडूच्या सोयीसाठी योजलेली असते. गोलंदाजाचे चेंडूफेक करताना त्याचा एक पाय गोलंदाजी-फहीवर असला पाहिजे, तव्दतच त्याने फेकलेला चेंडू हा नेमका गृहफळीच्या वरुन तसेच पविष्यात उभ्या असलेल्या फलंदाजाच्या खांद्याच्या खाली व गुडघ्याच्या वर इतक्या उंचीने गेला, तरच तो ‘स्ट्राइक झोन’ मध्ये म्हणजे आघात-सीमेत असल्याचे धरले जाते. असा योग्य चेंडू नेमका हेरुन फलंदाजाने तो क्षेत्ररक्षकांच्या आवाक्यापलीकडे मात्र विहित-क्षेत्राच्या हद्दीतच टोलवायचा असतो व तो क्षेत्ररक्षकांनी अडवण्यापूर्वीच त्याने बॅट तिथेच टाकून, घड्याळकाट्याच्या विरुध्द दिशेने पहिल्या घराकडे धावत जावयाचे व त्यास स्पर्श करुन पुढे क्रमाक्रमाने दुसऱ्या, तिसऱ्या घराला स्पर्श करुन गुहफळीवर परतावयाचे अशा रीतीने मंडल (सर्किट) पूर्ण झाल्यावर फलंदाजाला एक धाव मिळते. मात्र फलंदाजाने टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवला व तळरक्षकाकडे फेकला, तर तो चेंडू तळरक्षकाने झेलण्यापूर्वीच त्या तळावर पोहोचले पाहिजे. यावरुन टोल्यांचे वेगवेगळे प्रकार रुढ आहेत ते असे : फलंदाजाने चेंडू मारल्यावर क्षेत्ररक्षकाने तो अडवेपर्यंत फलंदाज पहिल्या तळावर जाऊन पोहोचला, तर तो एकेरी (सिंगल) टोला दुसऱ्यार तळापर्यंत जाऊन पोहोचल्यास दुहेरी (डबल) तिसऱ्याक तळापर्यंत जाऊन पोहोचला, तर तिहेरी (ट्रिपल) आणि सर्व तळांना स्पर्श करुन गृहफळीवर पोहोचला व मंडल पूर्ण केले, तर तो धाव-टोला (होम रन किंवा होमन) होय. सामान्यतः टोला उंचावरुन (प्लाय), सीमारेषापलीकडे, मात्र विहित-क्षेत्रातच, मारला तर धावा मिळू शकतात. फलंदाजाने एकेरी टोला मारल्यावर तो पहिल्या तळावर जाऊन थांबू शकतो. नंतर क्रमांक दोनचा फलंदाज खेळण्यासाठी येतो व फलंदाजाने टाकलेला चेंडू त्याने जर व्यवस्थित मारला, तर तो पहिल्या तळाकडे धावतो. त्यावेळी पहिल्या तळावर असलेला क्रमांक एकचा फलंदाज हा बेस-रनर म्हणजे तळ-धावक होतो व पुढच्या म्हणजे दुसऱ्याळ तळाकडे धावतो. त्यानंतर क्रमांक तीनचा फलंदाज खेळण्यास येतो आणि त्याने चेंडू मारल्यावर तो पहिल्या तळाकडे, तर तेथील खेळाडू दुसऱ्या तळाकडे व तेथील तळधावक तिसऱ्याय तळाकडे धावत जातात. नंतर चौथा फलंदाज खेळावयास येतो व चेंडू टोलवतो, तेव्हा तो पहिल्या तळाकडे धावतो व पुढील प्रत्येक तळावरील खेळाडू क्रमाक्रमाने पुढील तळावर धावत जातात व तिसऱ्यास तळावरील खेळाडू गृहफळीकडे जाऊन पोहोचतो, तेव्हा मंडल पुरे होऊन एक धाव मिळते. मात्र कोणत्याही परिस्थितीत एका वेळी एका तळावर एकच तळधावक असला पाहिजे, असा नियम आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण करणारा संघ फलंदाजाला वा तळधावकांना बाद करण्याच्या प्रयत्नात असतो. त्यांना बाद करण्याच्या वेगवेगळया पध्दती आहेत, त्या अशा : गोलंदाजाने आघातसीमेमध्ये योग्य प्रकारे म्हणजे नेमकेपणाने गृहफळीच्या वरुन व फलंदाज खेळण्याच्या पविष्यात उभा असता त्याच्या खांद्यांच्या खाली आणि गुडघ्यांच्या वर या दरम्यानच्या उंचीने चेंडू फेकला असता तो जर फलंदाजाने मारला नाही, वा मारताना हुकला, अथवा प्रमादक्षेत्रात मारला, तर तो ‘स्ट्राइक’ म्हणजे आघात म्हणून गणला जातो. असे तीन आघात झाले, की फलंदाज बाद होतो. दोन वेळा चेंडू प्रमादक्षेत्रात मारला आणि तिसऱ्या दा चेंडू मारताना तो हुकला, तरी फलंदाज बाद होतो. मात्र तो झेलकर्या ने झेलला पाहिजे. फलंदाजाने उंच मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने जमिनीवर न पडू देता अधांतरी झेलल्यास (हा चेंडू प्रमादक्षेत्रात मारला असता तो झेलला तरी) फलंदाज बाद होतो. फलंदाजाने जमिनीलगत मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवून, तो पहिल्या तळरक्षकाकडे, फलंदाज तिथे पोहोचण्यापूर्वी फेकला व तळरक्षकाने तळावर एक पाऊल ठेवून तो झेलला, तरी फलंदाज बाद होतो. अशाच प्रकारे तळधावकालाही बाद करता येते. तसेच फलंदाजाने चेंडू टोलवल्यानंतर क्षेत्ररक्षकाने तो मध्येच अडवून, धाव घेणाऱ्यात फलंदाजाला वा तळधावकाला तो तळावर पोहोचण्यापूर्वीच वाटेतच चेंडूने स्पर्श केल्यास तो फलंदाज वा तळधावक बाद होऊ शकतो. ज्यावेळी प्रत्येक तळावर धावक खेळाडू असतो आणि प्रत्येकाला मागच्या तळधावकाला तो तळ रिकामा करुन देण्यासाठी पुढच्या तळाकडे धाव घेणे भाग पडते, अशा वेळी धावक पुढच्या तळावर पोहोचण्यापूर्वीच त्या तळाकडे क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला व त्या तळावरील तळरक्षकाने तळावर पाय ठेवून तो चेंडू झेलला, किंवा चेंडूने केवळ तळाला स्पर्श केला, तरी तो धावक बाद होतो. अशा वेळी खेळाडूला चेंडूने स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. फलंदाजाने चेंडू मारल्यावर त्याला पहिल्या तळाकडे धावावे लागते, अशा वेळी पहिल्या तळावरील खेळाडूला दुसऱ्या तळाकडे व तेथील खेळाडूला तिसऱ्या तळाकडे धावावेच लागते. त्यामुळे साधारणपणे पहिल्या, दुसऱ्यात किंवा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या तळावर खेळाडू असतील तर अशी परिस्थिती उद्भवते व या सर्वच खेळाडूंना पुढीलतळाकडे सक्तीने धाव घ्यावी लागते (फोर्स्ड रन ) आणि वर उल्लेखिल्याप्रमाणे प्रतिपक्षाचे क्षेत्ररक्षक त्यांना बाद करू शकतात. मात्र मधला एखादा तळ मोकळा असेल, तर केवळ तळाला चेंडूने स्पर्श करून चालत नाही.तर त्या विवक्षित धावकालाच तळाला पोहचण्यापुर्वीच क्षेत्ररक्षकाने धावत जाऊन चेंडूने स्पर्श करूनच बाद करावे लागते. तळधावकाला चेंडू फेकून मारून बाद करता येत नाही.आणखीही काही अपवादात्मक प्रसंगी फलंदाज बाद होऊ शकतो, तसेच क्षेत्ररक्षकाच्या तत्परतेने व चपळाईने एकावेळी एकापेक्षा अधिक खेळाडूही बाद होऊ शकतात. अशा प्रकारे फलंदाजी करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू बाद झाले, की त्यांची एक खेळी संपुष्टात येते आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रतिपक्षास फलंदाजीची संधी मिळते.
या खेळात फलंदाजाला वा तळधावकांना चेंडू टोलवलेला नसता, अन्य प्रकारेही एका तळावरून दुसऱ्या तळावर जाता येते. उदा., गोलंदाजाने फेकलेला चेंडू गृहफळीवरून न गेल्यास तसेच फलंदाजाच्या खांद्यावरून वा गुढघ्याखालून गेल्यास, तो ‘बॉल’ (निषिध्द चेंडू ) म्हणून घोषित केला जातो व असे चार ‘बॉल’ झाल्यास फलंदाजाला पहिल्या तळाकडे जाण्याची सवलत मिळते. मात्र असा चेंडू फलंदाजाने मारल्यास वा मारण्याचा प्रयत्न केल्यास तो बॉल धरला जात नाही. फलंदाजाने तो वेळीच ओळखून सोडून देणे आवश्यक असते. तसेच गोलंदाजाने फेकलेला चेंडू फलंदाजाला लागल्यास, तो ‘डेड् बॉल’( निकामी चेंडू ) म्हणून घोषित केला जातो व त्या बदल्यात फलंदाजाला पहिल्या तळाकडे व तेथील खेळाडूला दुसऱ्या तळाकडे जाता येते. तव्दतच फलंदाजाला फलंदाजी करताना झेलकऱ्याने अडथळा केल्यासही पुढच्या तळावर जाण्याची सवलत मिळते. गोलंदाजाने गोलंदाजी फळीवर एक फाऊल ठेवून चेंडू फेकण्याची कृती केली पण प्रत्यक्षात चेंडू फेकलाच नाही. तर त्यास ‘बॉक’ म्हणतात व त्याबद्दल फलंदाज वगळून तळावर असणाऱ्या अन्य खेळाडूंना एकएक तळ पुढे सरकता येते. बेसबॉलच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी खेळाडूंस अनेकविध तत्रे व कौशल्ये आत्मसात करावी लागतात: चांगला गोलंदाज चेंडूफेकीमध्ये अनेक प्रकारे वैविध्य आणू शकतो. द्रुतगतीने चेंडू फेकणे (फास्ट बॉल ), चेंडूस गतीबरोबरच दिशा व वळण देणे (कर्व्ह बॉल ). चेंडूस वक्रगतीबरोबरच घरंगळू देण्याची (स्लायडर ) किमया साधणे, तसेच अशा प्रकारांची सतत मिश्रणे करीत फलंदाजाला चकवून बाद करण्याचे कौशल्य त्याच्या अंगी असावे लागते. फलंदाजाने सदोष चेंडू सोडून देऊन योग्य तो चेंडू मारण्यासाठी निवडावा लागतो. तसेच चेंडू त्याच्याकडे निमिषार्धात येतो व तो कुठल्याही दिशेला वळू शकतो तेव्हा त्याची गती व वळण यांचा तत्क्षणीच अंदाज घेऊन, तो क्षेत्ररक्षकांच्या आवाक्यापलीकडे, पुऱ्या ताकदीनिशी अतिशय जोरात फटकावण्याची क्षमता त्याच्यात असावी लागते. तसेच दोन क्षेत्ररक्षकांमधून चेंडू पसार करण्याचे (प्लेस हिटिंग ) कौशल्यही त्याच्याजवळ असावे लागते. चेंडू मारताक्षणीच बॅट जागीच टाकून, पुढे पहिल्या तळाकडे धावण्याची तत्परता व चपळपणाही त्याच्या अंगी असावा लागतो. तळधावकाला चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवून तळाकडे फेकण्यापूर्विच पुढील तळाला स्पर्श करण्यासाठी चपळपणाने, द्रुतगतीने व योग्य त्या अंदाजाने धावता आले पाहिजे. एका वेळी एका तळावर एकच खेळाडू असला पाहिजे, त्या दृष्टीने त्यास धावण्याचा अचूक अंदाज हवा, अन्यथा तो स्वतः वा दुसरा खेळाडू त्याच्या धिसाडघाईने वा दिरंगाईमुळे बाद होण्याची शक्यता असते. बाह्यमैदानातील क्षेत्ररक्षकांना फलंदाजाने जोरात उंच अधांतरी फटकावलेला चेंडू झेलण्याचा तसेच जमिनीलगतचा चेंडू चपळपणे अडवून तो तत्परतेने योग्य त्या तळरक्षकाकडे फेकण्याचा सराव असावा लागतो. खेळाडू ज्या पुढच्या तळाकडे धावत असतो, त्याच खेळाडूकडे चेंडू फेकणे फलदायी ठरते, त्याने सोडलेल्या तळाकडे नव्हे, याचे भान त्याला सतत राखावे लागते. तळरक्षकाला तळावर एक पाय ठेवूनच चेंडू झेलावा लागतो. तसेच तळाला वा तळधावकाला (जशी परस्थिती असेल त्याप्रमाणे ) चेंडूने स्पर्श करून खेळाडूस बाद करण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी लागते. या खेळात झेलकऱ्याचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. गोलंदाजाने फेकलेला चेंडू मागे जाऊ न देता अडवणे व योग्य त्या तळरक्षाकाकडे अचूक फेकणे, तव्दतच फलंदाजाला वा धावकाला तो गृहफळीवर पोहचण्यापूर्वीच तळास चेंडूने स्पर्श करून बाद करणे, अशी महत्वाची कामगिरी तो पार पाडू शकतो. या खेळात सतत फक्त निकामी चेंडू व प्रमाद वगळून इतर सर्व परिस्थितीत–तळधावक एका तळावरून दुसऱ्या तळाकडे धावत असतात, त्याचवेळी ते तळावर पोहचण्याअगोदरच त्यांना बाद करण्यासाठी क्षेत्ररक्षक धडपडत असतात आमि गोलंदाज व फलंदाज यांचे व्दंव्दही सतत चालूच असते. त्यामूळे हा खेळ विलक्षण गतिमान व रोमहर्षक होतो.
संदर्भ : 1. Koppett, Leonard, All About Baseball,New York, 1974.
इनामदार, श्री. दे.
“