बेलत्सोनी, जोव्हान्नी बातिस्ता : (५ नोव्हेंबर १७७८-३डिसेंबर १८२३). ईजिप्तचे प्राचीन अवशेष शोधून काढणारा धाडसी इटालियन संशोधक त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात

जोव्हान्नी

पॅड्युआ (इटली) येथे झाला. जेमतेम शिक्षण घेऊन तो उदरनिर्वासाठी फ्रान्स, हॉलंड, स्पेन, पोर्तुगाल इ. देशांत फिरून १८०३ साली इंग्लंडमध्ये आला. तेथे त्याने सर्कशीतही काम केले. (१८०३-१२) पुढे अनेक युक्त्याप्रयुक्त्या कस्न तो ईजिप्तमध्ये गेला व ब्रिटीश राजदुतामार्फत ब्रिटीश संग्रहालयासाठी ईजिप्तमधील प्राचीन वस्तू मिळविण्याचे काम केले. (१८१५-१९). फारसे विधिनिषेध न पाळता अनेक भल्याबुऱ्या मार्गांनी त्याने ईजिप्तमधील अनेक प्राचीन वस्तू मिळविल्या. त्यापैकी दुसरा रॅमसीझ याचा भव्य अर्धपुतळा `व्हॅली ऑफ द किंग’ मधुन इंग्लंडला पाठवुन दिला. या उद्योगात असतानाच त्याला ⇨ अबू सिंबेल येथील प्राचीन मंदिराचा शोध लागला. त्याने अनेक ईजिप्शियन शाही थडगी शोधून काढली. त्यापैकी पहिला सेती या राजाचे थडगे व गिझा येथील कॅफ्रॅचे पिरॅमिड ही महत्वाची होत. त्याने सेतीची अश्मशवपेटीका लंडन येथील सोआन संग्रहालयात पाठवुन दिली. पुढे त्याने बेरनायसी या प्राचीन नगरीचा व अल्‌-झुवायर येथील पाचुच्या खाणीचा शोध लावला. याशिवाय त्याने फायले येथील ऑबेलिस्कचा तसेच इद्‌फू मंदिराचा शोध लावला. आपल्या विविध सफरींचे व ईजिप्तमधील संशोधनाचे रोमांचकारी वर्णन त्याने नॅरेटीव्ह ऑफ द ऑपरेशन्स ऍन्ड रिसेंट डिस्कव्हरीज इन द पिरॅमिडस, टेम्पलस, टूम्ज ऍन्ड एक्सकॅव्हेशन इन ईजिप्त ऍन्ड न्यूबिया (१८२०) या नावाच्या ग्रंथाच्यादोन खंडात प्रसिद्ध केले. पश्चिम अफ्रिकेत पुढील संशोधनासाठी माली प्रजासत्ताकाकडे तिंबूक्ताला जात असताना गाटो (नायजेरिया) येथे तो मरण पावला. त्याच्या संशोधनात शास्त्रीय दृष्टी नव्हती पण अनावर जिज्ञासा व तिच्या परिपूर्तीसाठी इष्ट असलेले साहस व कल्पकता यांमुळे त्याने जगाला प्राचीन ईजिप्तचे एक अज्ञात दालनच खुले करून दिले.

संदर्भ:Mayes,Stanley,GreatBelzonl,London,1961.

देव, शां. भा.